Thursday, April 30, 2020

दहीहंडी



एकदा गंधारच्या घरी त्याचे खूप सारे मित्रमंडळ जमले होते. सगळे दहीहंडीच्या तयारीसाठी नुसती धावपळ चालू होती. सोहम तर असा सजला होता की जसा काही खराखुरा गोकुळीचा कृष्णकन्हैयाच. बाकी सगळे पण गोप म्हणून काही कमी सजले नव्हते. सगळ्या मुलीसुद्धा एकाहून एक नटून गोपिका बनल्या होत्या.

बाबा मधल्या चौकात हंडी बांधण्याचे काम करत होता. आई, मावशी दहीकाला बनवण्याच्या गडबडीत होत्या. सगळी यथासांग तयारी झाल्यावर सगळे चौकात जमले.

अनुज :- काका डीजे  कुठे आहे ?  मस्त गाणी लावून नाचू या.

बाबा :- गाणी लावू, नाचू पण त्या आधी आजी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे.

आजीची गोष्ट हा मुलांचा आवडता विषय असल्याने सगळे लगेच आजी भोवती गोळा होऊन छान बसले.

बच्चेकंपनी :- आजी गोष्ट .....आजी गोष्ट.

आजी :- गोष्ट तर मी सांगणारच आहे पण आधी मला तुम्ही मला सांगा की पूर्ण आठवडा आपण कुणाच्या गोष्टी ऐकल्या?

सगळे :- कृष्णाच्या...

आजी :- असे सगळे ओरडतात का? एकेकाने सांगा. कृष्ण म्हणजे कोण?  कुठे रहायचा काय करायचा?

स्वरा :- कृष्ण म्हणजे देवबाप्पा.

कौस्तुभ :- तो गोकुळात राहायचा आणि खूप दंगामस्ती करायचा आमच्यासारखी.

(सगळे जोराने हसू लागले.)

बाबा :- आई या मुलांनी तुझ्या गोष्टीतून तेवढ बरोबर लक्षात ठेवलं.

गार्गी :- नाही गं आजी आम्हाला माहिती आहे  की तो खूप बुद्धिमान, शूर, प्रेमळ होता. छान बासरी वाजवायचा. त्याने खूप राक्षसांना मारले. 

कौस्तुभ :- गोकुळातल्या लोकांना पाऊस-पुरापासून वाचवले. गोप म्हणजेच मित्रांना नेहमी मदत केली.

कौशिकी :- त्याने अर्जुनाला गीता सांगितली. दुर्योधन वाईट होता, तरीसुद्धा त्याला आपली सेना देऊन मदत केली.

आजी :- वा वा छान !  म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही छान ऐकल्या आहेत आणि तुम्हाला नीट समजल्या पण आहेत.  आता सांगा काल काय होत आणि आज काय आहे?

(बच्चे कंपनी विचार करते पण काही सुचत नाही, आठवत नाही.)

आई :- मी सांगू ?

सगळे :- हो सांग लवकर कारण त्याशिवाय नवीन गोष्ट नाही आणि हंडीपण फोडायची आहे ना.....

आई :- काल होती कृष्णाष्टमी म्हणजेच कृष्णबाप्पाचा जन्मदिवस आणि आज नवमी म्हणजे दहीकाला.

बच्चेकंपनी :- हो हे माहिती आहे पण विसरलो कसेआजी असे दोन वेगवेगळे दिवस का गं?

आजी :- तीच तर आहे आजची गोष्ट.  दहीकाला का करायचा, याची.

नाचदंगा, गाणी, काय तो तुमचा डिजे, हंडी फोडणे इतकंच किंवा हे सगळ म्हणजे दहीहंडी नाही बरं का.. तर दहीहंडी आहे आठवण आणि शिकवण..

श्लोक :- आठवण ती कशाची आणि यात काय शिकायचे?

निनाद :- आजी गोष्टीतून सांग ना गं... मज्जा येते आणि नीट समजत.

आजी :- बरं चालेल..... 

(आजीने सुरुवात केली. तिची गोष्ट म्हणजे जणू सगळे प्रत्यक्ष आत्ताच घडते आहे अशी असायची.)

आजची गोष्ट आहे कृष्णबाप्पाच्या दहीकाल्याची.

कृष्ण गोकुळात रहायचा. सकाळ झाली की गायी घेऊन आपल्या मित्रांबरोबर रानात जायचा. संध्याकाळी परत यायचा.
गाईंना चरायला सोडून सगळे मित्र विटीदांडू, चेंडू,  लपाछपी, सूरपारंब्या असे खूप खेळ खेळायचे तर कधी कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा. त्यांचा सगळा दिवस रानातच जायचा. भूक लागल्यावर खाण्यासाठी सगळे बरोबर शिदोरी घेऊन जायचे.

साची :- आजी... शिदोरी म्हणजे ?

आजी :- शिदोरी म्हणजे डबा फक्त त्यावेळी खाऊ किंवा अन्नपदार्थ स्वच्छ धुतलेल्या कापडात बांधायचे त्याला शिदोरी म्हणायचे...तर अशी शिदोरी प्रत्येकाकडे असायची. खेळून दमले की सगळे शिदोरी उघडून खायला बसायचे.

एकदा गंमतच झाली. सगळ्यांनी शिदोरी उघडून खायला सुरुवात तर केली पण आपल्यापेक्षा दुसऱ्याचा खाऊ त्यांना छान वाटत होता. मग काय मला हे नको ते हवं असे म्हणत सगळे भांडू लागले. कृष्णाला आधी तर काही समजेच ना की काय झालं मग मात्र लक्षात आलं की खाऊवरुन सगळे भांडण करत आहेत. चिडून कृष्ण म्हणाला,

(आजी वेगवेगळे आवाजही मस्त काढायची.त्यामुळे ती गोष्टीतल्या पात्रांना छान सादर करायची.)

कृष्ण :- अरे काय हा आरडाओरडा काय हा गोंधळ..  तुमच्या आईने इतक्या कष्टाने हे अन्न बनवले आणि तुम्ही त्यावरुन भांडण करताय नाव ठेवताय?

पेंद्या :- नाही रे कृष्णा अन्नाला नाव नाही ठेवत फक्त आम्हाला रोज तेच तेच खायचा कंटाळा आला आहे?

कृष्ण :- अरे मग त्यात भांडायच काय. एकमेकांना आपला खाऊ द्यायचा, वाटून खायचे.

गोप :- हे तर आमच्या लक्षातच आले नाही. आता आजपासून आपण असेच करु या. सगळ्यांच्या शिदोऱ्या मध्ये ठेऊ आणि मिळून खाऊ या.

दुसरा गोप :- हे तर ठीक आहे, पण कृष्णा तू तर रोज खूप दूध, दही, लोणी, तूप खातोस. आमच्या घरी मात्र हे सगळे बाजारात विकायला नेतात. आम्हाला अजिबात मिळत नाही.

कृष्ण :- इतकच ना मग दूध, दही, लोणी आणि तूप मी आणेन तुमच्यासाठी.

(मधेच आजीला थांबवत सोहम ओरडला.....)

सोहम :- आजी थांब....हे माहिती आहे मला. कृष्णबाप्पा दूध, दही, लोणी चोरायचा.

आजी :- तो चोरायचा नाही, तर जिथे जास्त आहे, त्यांच्याकडून घेऊन ज्यांच्याकडे नाही त्यांना द्यायचा.

स्वरा :- म्हणजे आमच्या गोष्टीतल्या रॉबिन हूड सारखे का?

आजी :- हो तसच फक्त रॉबिन हूड कृष्णसारखा आहे असं म्हणावं लागेल.

तर अशाप्रकारे त्या दिवसापासून कृष्ण आणि त्याचे सवंगडी मिळून, वाटून शिदोरी खाऊ लागले. कृष्ण सगळ्यांना दुध, तूप, लोणी द्यायचा.

सगळ्यांना सगळ मिळाव म्हणून आपल्याकडे असलेलं एकमेकांना देण्याचा कृष्णाबाप्पाचा हा गुण लक्षात रहावा आणि आपणही तसे करावे म्हणून दहीहंडी करायची.

कौस्तुभ :- पण दहीहंडीचा आणि एकमेकांना देण्याचा काय संबंध?

आजी :- दहीहंडीच्या काल्यासाठी ज्याच्याकडे जे आहे, ज्याला जे आणता येईल त्याने ते आणायचे. कुणी पोहे, कुणी लाह्या, कुणी फळ तर कुणी मिरचीचा ठेचा ते सगळं एकत्र करुन कृष्णाच्या आवडीचे दूध-दही घालून तो हंडीत भरायचा आणि हंडी फोडल्यावर सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा. पटलं का?

गार्गी :- हो पटलं पण मग हंडी अशी उंच का टांगून ठेवतात? थर बनवून का फोडतात त्यात पण काही आहे का ?

आई :- हो आहे तर. हे मी सांगते मला माहित आहे. उंच हंडी आहे कष्टाचे प्रतिक. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात हे आपल्याला उंच असलेली हंडी सांगते. थोडक्यात ज्याच्याकडे जे जास्त आहे ते त्याने द्यावेच पण कुणीतरी देईल म्हणून आपण नुसते बसून राहिलेले कृष्णबाप्पाला चालणार नाही. आपणही हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवे.

सुश्रुता :- पण मग हंडी खूप उंचीवर बांधायची नाही असे काल मी पेपरमध्ये वाचले ते का बर?

मावशी :- कारण नको इतकी उंची नुसती स्पर्धा आहे. त्यात अपघात होतात. लोक पडतात. त्यांना इजा होतात. कृष्णबाप्पाला कुणाला असा त्रास झालेला बघायला आवडत नाही म्हणून उगाच खूप उंच नको. सगळ्यांनी मिळून दोन ते चार थर बनवून फोडता येईल इतकी उंची खूप झाली.

बाबा :- आणि त्या हंडीपर्यंत पोहचण्यासाठीचे असे थर का करायचे माहितीये?
चांगले काम सगळ्यांनी मिळून करायला हवे. एकीने प्रयत्न करायचे. सर्वात वर असले तरी ह्याची जाणीव ठेवायची की आपण इथे खाली भक्कमपणे उभे असलेल्या आपल्या साथीदारांमुळे आहोत.

आजी :- एकदम बरोबर. कोणतेही यश हे कधीच एकट्याचे नसते तर त्यात आपले नातलग, मार्गदर्शक, मित्र आणि आपल्यासाठी कष्ट घेणारे सगळेच सहभागी असतात.

कौशिकी :- काय मस्त गं आजी हे सगळं आम्हाला माहितीच नव्हतं. आता आम्ही नीट लक्षात ठेवू.

बाबा :- पण तरी एक राहीलच.. हंडी फोडायची का?

निनाद :- एकच अजून काल मी पेपरमध्ये असही वाचलं की आता अनेक ठिकाणी वेगवेगळे विषय घेऊन हंडी फोडतात कुणी पुस्तक हंडी, कुणी आरोग्य हंडी तर कुणी आहार हंडी.

आजी :- हो कारण आता सगळे सण काळानुरूप नव्या विचारांनी सण साजरे करतात. ही चांगली पद्धत आहे.

आधी दहीहंडीच्या मागे सगळ्यांना सगळ मिळाव इतकाच विचार होता.

आता आहार योग्य व सकस हवा. भरपूर पुस्तके वाचायला हवी. चांगल्या सवयी रुजवायला हव्या. आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे छान विचार घेऊन दहीहंडी साजरी करतात.

रेवती :- मग आजी...आपली हंडी कशाची आहे?

आजी :- संस्कारांची आणि चांगल्या परंपरांची. आपण हंडी फोडण्याआधी DJ लावणार नाही तर छान श्लोक, गीतेचा अध्याय म्हणणार आहोत. गंधारची आई, मावशी आणि मी तुम्हाला  सगळ्यांना ओवळणार आहे. छान भजन आणि कृष्णाची गाणी म्हणत फेर धरुन नाचणार आहोत आणि शेवटी मिळून हंडी फोडून खाऊ खाणार आहोत.

पयस :- आणि हो मी ती चौकातली हंडी बघायला अजिबात जाणार नाही कारण तिथे असं काहीच नसते. नुसती गर्दी आणि धक्काबुक्की, खूप आवाज, ट्राफिक जाम.....

गंधार :- नकोच जाऊ. त्यापेक्षा सगळ्यात शेवटी मी छान कृष्णबाप्पाची आवडती बासरी वाजवेन. मला येते.

आजी :- मस्त म्हणजे तुम्ही गोष्ट नुसती ऐकली नाही तर ती पटली आणि तसचं तुम्ही करणार पण आहात.

सगळे :- हो करणारच आणि इथे नसलेल्या आमच्या मित्रांना पण सांगणारच.

असे म्हणत सगळ्यांनी छान बसून श्लोक आणि अध्यायाला केली. मग औक्षण झाल्यावर फेर, भजन म्हणत हंडी फोडली. छान दहीकाला खाल्ला अशाप्रकारे गंधारच्या घरी सगळ्यांनी मिळून आनंदात व उत्साहात छान नवनवीन गोष्टी शिकत दहीहंडी दणक्यात साजरी केली.

मग तुम्हीपण करणार ना अशीच छान दहीहंडी !
  खर दहीहंडी ही गोष्ट नाही तर अनेकदा घरी,  शाळेत प्रत्यक्ष घडलेले आणि अनेकांनी अनुभवलेले प्रसंग आहेत.  इथे सोयीसाठी ते एकत्र करुन गोष्टीच्या साच्यात मांडण्याचा  छोटासा प्रयत्न करणार आहे. यातून अनेकांना नवीन कल्पना सुचाव्या हीच इच्छा.



<<<<<<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>>>

ही गोष्ट बघण्यासाठी...



1 comment:

suggestions most wlcome