Showing posts with label काव्यसुमने. Show all posts
Showing posts with label काव्यसुमने. Show all posts

Wednesday, July 19, 2023

प्रार्थना

 


तासाची सुरुवात अतिशय छान, प्रसन्न, उत्साहपूर्ण, ताण विरहित व्हावी हा उद्देश..


वनस्थळी संस्थेचा बालभवन अभ्यासक्रम शिकताना, आम्हाला प्रत्येक पाठाची सुरुवात प्रार्थना म्हणून करायची हे बिंबवले होते..


का हे विचारायचे नाही, हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पिढीत वाढलेली मी आणि माझे सहकारी यांनी मनापासून  ते ऐकले व त्याचे फायदेही अनुभवले..


पूर्व प्राथमिक, खेळगटाचे काम करताना, दहा वर्षे वेगवेगळ्या प्रार्थना, भक्तीगीते यांचा भरपूर वापर अभ्यासक्रमात करुन, त्यांचे शब्द, चाली, ताल, नाद, या साऱ्यांची सकारात्मकता पुरेपूर अनुभवली होती..


म्हणूनच नव्याने स्वीकारलेल्या प्राथमिक आणि त्यातही मराठी विषयात काम करताना, नित्य तासिकेची सुरुवात प्रार्थनेने करण्यावर भर राहिला..


माझी ही नवी सुरुवात कोरोना काळ वरदहस्त लाभला..


(जाणीवपूर्वक वरदहस्त या शब्दाचा वापर केला आहे, कारण या काळाने आपल्या सर्वांना निद्रीत अवस्थेतून जागे केले आहे, भविष्यात  या दोन वर्षाच्या काळाला सुवर्ण इतिहास म्हणून अभ्यासले जाणार आहे, आणि आपण सारे त्याचे साक्षीदार आहोत) 


त्याकाळात मुलांनी स्क्रीनकडे सतत बघू नये, काही मिनिटांची विश्रांती घ्यावी ही मुख्य भूमिका होती..


त्यासाठी कधी देवा तुझे किती, हीच अमुची प्रार्थना, तु बुद्धी दे या चलचित्र फितीचा वापर केला तर कधी दोन - चार ओळींचे श्लोक जसे आई माझा गुरु, वक्रतुंड, मनोजवं, चला शारदेला इ. म्हणणे,..


यामागे चित्रांमधून शब्दांचे अर्थ लक्षात यावे, तर दरवेळी अशी चित्रांची साथ हवीच असेही गरजेचे नाही, अशी विचारपूर्वक उद्दिष्टे टि.टी.सी, बी.एड. या अभ्यासक्रमाने बिंबवली आहेत..


मुलांनी  प्रार्थनेचा नुसता स्वीकार केला असे नाही, तर मनापासून आनंद घेतला (या कालावधीमध्ये मुलांसोबत, असणारा पालक वर्ग हाही या प्रवासात उत्साहाने सहभागी असायचा, यात आईबाबा, आजी आजोबा तर कधी लहान मोठी भावंडे असायची)


शाळेच्या सामूहिक परिपाठासाठी अशाच काही श्लोकाच्या सार्थ चलचित्र फिती तयार झाल्या होत्या, त्या गटासोबत काम करण्याचा आनंद घेतला..


तास सुरु  करण्यापूर्वी कदाचित प्रार्थना म्हणता येणार नाही असे एक जुने मराठी चित्रपट गीत, 'तू चाल पुढ तुला रे गड्या भीती कशाची' हे तर मुलांचे अतिशय प्रिय झाले होते, मुले हट्टाने ते लावायला सांगायची..


अनेकदा मुले त्यावर गाण्यामधल्या मुलाप्रमाणे नृत्यही करायची, यामुळे नकळत मराठी विषयाशी जोडली जायची, 


त्यानंतर आमचा ठरलेला अभ्यास फारच म्हणजे मजेत आणि गमतीत चालायचा, ज्यामुळे नियोजित घटक मुलांना अधिक प्रभावीपणे समजायचा..


त्यात मला दुसरे उद्दिष्ट नकळत सापडले, ते म्हणजे प्रार्थना ऐकताना, म्हणताना, विद्यार्थी आधी सुरू असलेला विषय बाजूला ठेवून, नव्याने चालू होणाऱ्या विषयाशी स्वतःला जोडतात..


सकाळी साडेआठला शाळेत आलेली ही बच्चे कंपनी, साडेतीन पर्यंत शिक्षक म्हणतील, त्याप्रमाणे अतिशय सहज स्वतःला एका विषयातून दुसऱ्या विषयात नेत असतात, त्यात त्यांची इच्छा अनेकदा दुय्यमच असते..


म्हणूनच आजही माझ्या प्रत्येक तासिकेची सुरुवात प्रार्थनेने  होते..


गेल्या वर्षी सलग दोन वर्षानंतर मुले शाळेत आली होती, तेंव्हाही हे सारे सुरु ठेवले फक्त त्यात विशेष भर घातली नाही..


२०२२-२३ शैक्षणिक वर्ष संपताना मराठी विभागाच्या आढावा बैठकीत, आपल्या शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी ताईंनी शिक्षकांनी मुलांचे आणि स्वतःचे उच्चार अधिक शास्त्रशुद्ध व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा, असा  विचार मांडला..


माझे स्वतःचे उच्चार ही कधीतरी चुकत असतील, नाकारणार नाही, पण जी किमान शुद्धता आहे, ती घरातील वातावरण, शालेय जीवनातील उत्तम श्रवण, वाचन याची देणगी आहे..


इंग्रजी माध्यमांच्या शाळेत, मुलांना खूप कमी वेळ मराठी भाषा ऐकायला मिळते..


त्यात एकूणच कोणतीही भाषा शिकण्याच्या पद्धतीत अति तांत्रिकता सध्या दिसते, त्यामुळे भाषेची गोडी वाटण्याऐवजी भीतीच जास्त बसते..


भाषा ऐकायला मिळणे जिथे दुरापास्त, मग वाचन करावेसे वाटणार कुठून..?


पण ही सगळी झाली कारणे आणि ती पुढे करणे म्हणजे, मूळ प्रश्न सोडवण्यापेक्षा पळवाटा शोधण्यावर भर देणे..


इतिहास शिकताना, तानाजीचा धडा हा इतका रुजला, की लढायचं नसेल तर उड्या मारुन जीव द्या, पण पळून जाण्यासाठी परवानगी नाही, मग माझे मन पळवाट निवडणार कशी..?


मे महिन्यात काय बरे यावर करु या..?


हा प्रश्न सतत मनात घोळत होता आणि त्यावर वेगवेगळे राजा उपलब्ध संदर्भ बघताना लक्षात आले की सर्व भाषांची जननी संस्कृत भाषेला म्हणतात..


संस्कृत श्लोक गीतांचे श्रवण, पाठांतर यामुळे जीभेवर शुद्ध उच्चारांचे नकळत संस्करण होते..


मग यावर्षीच्या प्रार्थना आहेत काही संस्कृत लोकांचा सार्थ समावेश केला..


श्लोक नुसते म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेतला तर, ते म्हणताना अधिक ताकद येते म्हणून गोष्टी रूप अर्थ सांगण्यावर भर दिला..


उदाहरणादाखल

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।

देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥


हा श्लोक म्हणताना,  कृष्ण, देवकी, यशोदा, वसुदेव, नंद पासून ते कंस कोण यात शक्तिशाली कोण विचारी कोण असे अनेक संदर्भ मुलांना प्रश्न विचारत त्यांच्याकडे असलेली माहिती ऐकून घेत गोष्टी रुपात समजावून सांगितला, हे करताना काही संदर्भ आजचा अभ्यास पूर्ण झाल्यावरती गोष्टीतून ऐकूया असे सांगितले..


अर्थात त्यामुळे त्या दिवशीचा अभ्यासक्रम नियोजित वेळेपेक्षा लवकर आणि तरीही नीट लक्षात राहील असा झाला कदाचित कृष्णाचे आशीर्वाद लाभले असतील..


असे हे श्लोक, गोष्ट यात विद्यार्थ्यांसोबत होणारे, विचारांचे आदान-प्रदान हे अनेकदा मुलांना आपल्यापेक्षा अधिक माहिती आहे का?, असे नव्याने विचारही करायला लावतात..


आणि पुढच्या वेळी अधिक तयारीने वर्गात जावे लागेल याची जाणीव करून देतात..


यात तोच तोच पणा येऊन, प्रार्थनेचा कंटाळा निर्माण होऊ नये म्हणून जुलै महिन्यात एक उडत्या चालीचे भक्तीगीत ही समाविष्ट केले (जे बालभवनमध्ये काम करताना मुलांचे सर्वात आवडते होते)


ते घेताना फार विचार केला नव्हता, पण शिकविणे, म्हणणे या प्रक्रियेमध्ये अश्विनीताईंना उच्चाराविषयी वाटणाऱ्या तळमळीचे उत्तर सापडले..


ते गाणे होते, 


कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धावून..

काय पाहिजे बाळा तुला देते मी आणून.. धृ

आई मला वाघ दे आणून,

त्याचा घोडा दे करून..१

आई मला साप दे आणून, 

त्याचा चाबूक दे करून..२ 

आई मला चंद्र दे आणून,

त्याचा चेंडू दे करून..३ 

आई मला चांदण्या दे आणून, 

त्याच्या लाह्या  दे फोडून..४

असलं रे कसलं मागणं तुझं,

जगाच्या वेगळं.., 

कृष्ण घालितो लोळण..


हे गाणे शिकवताना शब्दांचे उच्चार जाणीवपूर्वक सांगितले, चुकीचे म्हणण्याचे परिणाम ऐकविले..


सोबत गाण्याचे सार्थ स्पष्टीकरण की कृष्णाप्रमाणे सर्वांहूनी निराळ्या गोष्टींचा हट्ट, मागण्या करणारे व्हा असे सांगितले, ज्यामुळे मुलांना हे म्हणताना फारच मजा येते.. 


(कृष्णाची मोहिनीतून लहान वा थोर कुणीच सुटू शकत नाही, त्यामुळे पहिली, दुसरी, तिसरी सगळ्याच वर्गात शिकवले, अर्थ - गोष्ट यात थोडे कमीजास्त झाले)


या गाण्यात ल, न, ळ, ण इतक्या वेळेला आणि विविध जागी आला आहे, लोळण यात तर त्याचे कमालीचे सख्य आहे, अशा शब्द रचनांना इंग्रजीत टंग ट्विस्टर म्हणतात..


असे शब्द, वाक्य, गाणी जर सतत म्हणली गेली तर उच्चार आपोआप शुद्ध व प्रमाण भाषानुरुप होत जातात, हे लक्षात आले..


आता सध्या अशी प्रार्थना, श्लोक, गाणी शोधण्याची धडपड सुरु आहे..


तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वादाने त्यास नक्कीच यश येईल, ही खात्री..


अशी माझ्या या प्रार्थना प्रयोगाची साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सफळ संपूर्ण..


पुरुषोत्तम मास, प्रथम पुष्प मनःपूर्वक अर्पण..


तुम्हा सर्वांचे संबंधित अनुभव ऐकायला, समजून घ्यायला आणि त्याची माझ्या दिनक्रमात भर घालायला नक्की आवडेल..


त्यासाठी प्रतिसाद, प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..

Saturday, April 29, 2023

एक धागा सुखाचा

मी आणि गाणी..

 

सध्या फेसबुक, इंस्टा यांच्या  रिलं प्रकाराने सर्वांना वेड लावले आहे, मलाही कधीतरी आवडतात बघायला..


असेच परवा एक बघण्यात आले, ज्यात एक मानसशास्त्रीय विचार मांडला होता..


की माणसे उदास, दुःखी, त्रस्त असताना, तशीच गाणी ऐकतात आणि अजून प्रश्नात गुरफटत जातात..


त्यातले वाक्य, ' तुमचे दुःख तुम्ही लहान बाळाप्रमाणे सांभाळता, त्याला खाऊ पिऊ घालून वाढवत रहाता' ..


आधी पटले, पण नंतर विचार केला तर जाणवले की मीही आनंदात आनंदी आणि प्रश्नात शांत, कधीतरी उदास गाणीच निवडते, पण त्यामुळे अजून दुःखी होत नाही किंवा प्रश्नात अडकत नाही..


मग मी अपवाद आहे त्याला, की त्या म्हणण्याला पक्का शास्त्रीय आधारच नाही..


त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी, मी माझी पद्धत तपासली..


आणि मला काहीतरी वेगळे सापडले..


अर्थात इथे स्वानुभव इतकाच आधार आहे, आणि तो नेहमी ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो..


मला समजले की 


मी गाणी ही चाल, संगीत याहीपेक्षा अर्थ, गर्भित अर्थ (वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारा), भावार्थ (शब्द, अर्थ आणि आपल्या भावना यांची एकत्रित सांगड) याने जास्त ऐकत असते, अनुभवत असते, त्याच्याशी एकरुप होत असते..

त्यामुळे शब्द, चाल, संगीत उदास असेल पण त्यांची बांधणी नेहमीच निराशा, दुःख देणारी नसतात..

त्याही पलीकडे विचार केला तर,  आपण त्यातून काय घेतो, यावरुन ती कशी आहेत हे ठरते..


उदाहरण देऊन स्पष्ट न केल्यास, काहीतरी अपूर्णता वाटते म्हणून एका गाण्याची मांडणी करते..


बघा पटते का..?


गाणे माझ्या अत्यंत जवळचे, शिवाय माय मराठीचे शिरोमणी, गदिमा आणि बाबूजी (सुधीर फडके) यांनी अजरामर केलेले आहे..


एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्‍त्र माणसा तुझिया आयुष्याचे


पांघरसी जरी असला कपडा

येसी उघडा, जासी उघडा

कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे


मुकी अंगडी बालपणाची

रंगीत वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे


या वस्‍त्रांते विणतो कोण?

एकसारखी नसती दोन

कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे


आता माझा हे गाणे ऐकताना नकळत होणारा प्रवास..


एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्‍त्र माणसा, तुझिया आयुष्याचे


वस्त्र ही आपण प्राथमिक गरज मानतो, की जी प्रत्येकाची पूर्ण झालीच पाहिजे..


मग तसे मानवी आयुष्य जे प्रत्येकाला मिळालेच पाहिजे, त्याचे उत्तम बांधणी

ही एक धागा सुखाचा आणि शंभर दुःखाचे अशाच गुणोत्तराची असते..


किंवा तशीच असली पाहिजे..


यातला जरतारी हा शब्द, सुखाला सोनं, रत्नजडीत याची उपमा देत आहे..


हे समजायला पूर्वी जेंव्हा वस्त्र बनवताना, खरोखर सोन्याचा धागा बनवून वापरला जायचा, अशी जीर्ण वस्त्र जाळण्यास ते सोनं मिळायचे हे माहीत असायला हवे..


मी बघितले नसले तरी ऐकले आहे, आजीच्या आजीला, तिच्या आजीच्या साडीतून इतकं ग्रॅम सोनं मिळालं होत वगैरे..


दुसरं म्हणजे ग्रॅम हे अत्यंत कमी परिमाण असले तरी, सोनं मोजताना नक्कीच कमी नाही..


त्याचे वजन (धागे) वाढवत गेलो तर, त्याचे दिसणे आणि ज्या शरीराने ते परिधान करायचे त्याची ते पेलण्याची, सांभाळण्याची ताकद याचा विचार असणारच, किंवा बनवणारा करणारच ना..?


आणि असे उच्चवस्त्र कोणीही, अगदी राजा असला तरी, रोज आणि दिवसाचे सगळे प्रहर घालू शकेल का..?


याचा विचार केला, तर आपले आयुष्य असेच तर आहे, रोज मी किलोभर सोनं असणारी साडी (आवडीचे कपडे) घालून चोवीस तास वावरु शकणार आहे का..? 


नाही ना..!


अगदी तसेच सतत प्रचंड आनंद, सुख असणार नाही किंवा सहन होणार नाही..


ते वस्त्र अतिशय तलम, शरीराला छान वाटणारे, हलके, मऊसूत होण्यासाठी शंभर साधे धागे आणि एकच जरीचे असे असल्यास ते उत्तम बनेल, टिकाऊ असेल आणि तरीही आकर्षकही असेल..


तसेच दुःख जास्त असली तरी आपण नेहमीच त्यात हरवून जात नाही, तर त्यातून नवे मार्ग शोधतो, स्वतःच्या शक्तीचा, गुणाचा वापर करुन त्यावर मात करतो, स्वतःला शोधत, आजमावत रहातो..


पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा


आता हा सुख दुःखाचा जरतारी कपडा पांघरला, म्हणजेच असे जीवनात सगळे अनुभव घेतलेस, तरी ते तुझ्यासोबत येणार नाहीत..


जसा रिक्त आलास, तसाच जाणार आहेस, मग कशात काय कमी, काय जास्त याचा हिशोब करुन काहीच उपयोग नाही..


कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची

रंगीत वसने तारुण्याची

जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे


मानवाने कपडे म्हणजेच सुख-दुःख वाट्याला यावे किंवा न यावे, हे आपणच ठरवू शकतो, अशी वेडी समजूत करुन घेतली आहे..


गदिमांनी जीवनास नाटकाची उपमा दिली आहे, आणि त्याचे तीन अंक म्हणजे बालपण, तारुण्य आणि वार्धक्य, ते पूर्ण करणारा मानव एक पात्र आहे, 


बालपण हे न कळते परावलंबी असल्याने त्यास मुके..


तारुण्यात धाडस, प्रेम, शौर्य, महत्वाकांक्षा एक न अनेक पदर असल्याने त्यास रंगीत..


आणि वार्धक्य अनुभवांनी समृद्ध असल्याने शालीप्रमाणे उबदार असले तरी त्यानंतर अनंताचा प्रवास करण्यासाठी निसर्गतः शारीरिक, भावनिक, आणि अनेकदा मानसिकही जीर्ण होत जाणारे असे सुरेख शब्दबद्ध केले आहे..


या वस्‍त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन


ही वस्त्रे कोण विणतो हे सांगायचे झाले, तर आपण त्यास सगुण वा निर्गुण देवत्व मानतो..


ती शक्ती इतकी सर्जनशील आहे की, कोणाचेही आयुष्य, त्याचे दिसणे, वागणे दुसऱ्यासारखे नाही..


एवढेच कशाला त्याची निसर्गातली  कोणतीच निर्मिती एकसारखी नाही, काही ना काही फरक आहेच..


म्हणूनच सगळ्यांना जे मिळायला हवे, ते शंभर दुःख त्यास एक सुख असे गुणोत्तर, प्रत्येकाचे गणित वेगळे मांडणारा तो अजब विणकर आहे.. 


प्रत्येकासाठी वेगळे वस्त्र विणताना कुणाचे अधिक भरजरी, कुणाचे त्यामानाने कमी  हे ओझे स्वतःला नको म्हणून, कर्मबंध रुपी धागे आपल्याकडूनच मिळतील अशी व्यवस्थाही करतो आणि ती एकाच जन्मासाठी नाही असेही सुचवतो..


चांगले कर्म अधिक जरीचे धागे, चुकीचे कर्म दुःखाच्या धाग्यात वाढ..


आणि हे असले तरी..,


कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे


त्या शक्तीला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघू शकतच नाही, ही आपली मर्यादा आहे..


आणि ती मर्यादा ओलांडायची असेल तर, सुख असो वा दुःख, ते आपण फक्त परिधान करतो आहे..


त्याच्या निर्मात्याने ते खास आपल्यासाठी बनवले आहे.. 


त्याचा तो क्षण, प्रसंग, परिस्थिती पुरता स्वीकार करुन, त्या अज्ञात शक्तीला अनुभवण्याचा प्रयत्न करायला नको का..?


असे चाल, संगीत, गायकी, शब्द, अर्थ, भावार्थ सगळेच गाणे एकरुप होऊन ऐकताना होते..


आणि संपता संपता मनात स्वीकार भावना येत जाऊन, उदासीनता आपोआप गळून पडते आणि स्वच्छ नजरेने आहे त्यात समाधान, मजा शोधण्याची प्रेरणा मिळते..


तेही अगदी नकळत, सहज.. 


नाही का..? 

तुमचा अनुभव, असा प्रवास सांगायला विसरु नका..





Wednesday, May 12, 2021

चारोळी

 चित्र चारोळी 

अनेकदा चित्र बघून सहज काहीतरी सुचते.. 

असेच चार ओळींमध्ये बांधण्याचा प्रयत्न.... 
























Tuesday, May 04, 2021

कविता


 नको ना रे पावसा ...


नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

आठवणींचे गाव लोभस किती सांग
भेटींची आपल्या भली मोठी रांग
येताना तुझ्या बरोबर कोरडी असेल
ओलेचिंब होऊन परतावे कसे वाटेल

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

लहानपणी तुझ्यासवेचे स्वैर बागडणे
साचलेल्या डबक्यातच चिंब भिजणे
चिंता नसायची कपडे खराब व्हायची
भिती तरी कुठे उगाच वेळ गाठायची

नंतर जेव्हा जेव्हा तरुणपणी भेटलास
इंद्रधनुष्याचे एकेक रंग घेऊन आलास
बहरुन जायला व्हायचे तू येता क्षणी
ओठातून नकळतच फुलायची गाणी

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

आता आठवण तुझी छत्री रेनकोट शोधते
उशीर,चिखल असली कोरडी गणित मांडते
होता आभाळ सावळ भरुन येतो ऊर
साचलेल्या साऱ्याचा उठतो काहूर

तो बिनधास्तपणा खरच नाही उरला
भेटीतल्या आपल्या आनंद हरवला
काय माहित का मनावर येत ओझं
कसही भेटावं तुला नाही धाडस माझं

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

 पण एकदातरी भेटेन विसरुन भान
तोडून सारी बंधने होईल मी लहान
कागदाच्या होड्या ते चिखलाचे चंदन
घेऊन मग फुलवेन छानसं नंदनवन

मधेच तरुणाईचे डाव नवे मांडेन
तो दंगा ते मित्र नव्याने जमवेन
होतील क्षण जणू मोरपीस मखमली
हवी पुन्हा अशी एकतरी भेट आपली

म्हणूनच हो हो म्हणूनच

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
नको ना रे पावसा असा न सांगता येऊ

  ***************************************




त्याचं माझं प्रेम !!

त्याचं माझं प्रेम
म्हणजे नक्की काय आहे ?

एकमेकांना समजून घेण्याची
एक अनोखी रीत आहे.

त्याचा माझ्या मैत्रीची
घट्ट रेशमी विण आहे.

वरवर एकमेकांची थट्टा
मनात अतूट विश्वास आहे.

मलमली स्पर्शाची हलकी
ऊबदार जाणीव आहे.

बाळाची आईकडे असते
तशीच निरागस ओढ आहे .

दुःखातही हसवणारी
त्याची माझी गंमत आहे.

खरच सांगू ....? 

त्याचं माझं प्रेम
म्हणजे नक्की काय आहे ?

शब्दांपलीकडे जगण्याचा, 
अलगद सुखद अनुभव आहे.




*******************************

 जगावेगळी भेट !

तू हवा आहेस मला.....
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

स्पर्श नसला तरी चालेल
पण मायेची मखमली शाल
पांघरलेला नजरेचा एक
कटाक्ष हवा आहे !!

तू हवा आहेस मला...
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

सदैव सुख हवं हा
अट्टहास नाही पण
 दुःख लपवू शकणार
निरागस हसू हवं आहे !!

तू हवा आहेस मला...
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

रौद्रावतार नाही हं चालणार
पण तुझा इवलासा रागही हवा
कारण लगेच निघून जायची
भाषा ठाऊक आहे त्याला !!

तू हवा आहेस मला...
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

प्रेमापायी वेडापिसा...
छे बाई काहीपण
पण माझ्यासाठी तुझं
थोड झुरणं मात्र हवं आहे !!

तू हवा आहेस मला.....
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

नुसत्या आठवणीतूनही सदैव 
मिळणारी प्रेरणा हवी आहे
प्रत्यक्ष न भेटून सुद्धा,
 भेटीचा आनंद हवा आहे .



****************************

चित्र कविता 

मेणबत्ती, पणती आणि निरांजन 

एका वाड्यात मेणबत्ती, पणती आणि निरांजन आपापली शान जोपासायचे...

एकदा मेणबत्तीला वाटले..ह्या दोघी जिथे मानाने ठेवल्या जातात तिथे मला का नाही..?

पणती असते तुळशी वृन्दावनावर आणि निरांजन असते देवघरात..

मी मात्र कुठेही अंधार असला की प्रज्वलित केली जाते,

अन्यथा पडली असते कोनाड्याच्या कोप-यात...!!!

मित्रांनो मेणबत्तीच्या ही खंत तुम्ही कशी दूर कराल...? सांगणार इथे थोडक्यात...? 

मधुसूदन थत्ते
१८-११-२०१७

काकांना  प्रतिसाद म्हणून काही ओळी जुळवल्या.




खंत विरली

अंधार म्हणे मेणाबत्तीला
झाले काय सखे तुला

का अशी तू दिसते उदास
सोड सारे जराशी हास

मेणबत्ती मग बोलू लागे
खंत मनाची सांगू बघे

रोज निरांजनास देवघरात मान
पणती तुळशी वृंदावनी सान 

मी मात्र असते कोनाड्यात
दिवे जाण्याची वाट पहात

अंधार मग हसून बोलला
विचार का मनी हा आला

प्रत्येकास देऊन काम
बनवे आपणास प्रभू श्रीराम

स्पर्धा का बरे करावी कुणाशी
उगीच खंत नको बाळगू उराशी

एरवी जरी तू कोपऱ्यात बसली
तरी जाता वीज मदतीस धावली

रोज नसेल पडत गरज तुझी
अंधारात सज्ज सखी माझी

ऐकून स्वस्तुति मेणबत्ती खुलली
सोडून खंत आनंदे सुखावली

...........................................


 एकच भाव सर्वत्र

निरांजन म्हणे मेणबत्तीला,
सल कसला दुखवे तुला

तुम्हा देवजीच्या जवळी ठाव
मला मात्र नाही कसला भाव

पणती मग जरा रागावली, 
येशूचे घर कसे तू विसरली ?

माणसा सम तुझे विचार झाले
भेदभाव मनी का बरे आले

स्थळ, नाव, रुप असले भिन्न जरी
निरंकार शक्तीचीच ही रुपे सारी

मग आता सांग कसली आहे खंत
अंधार सारुन दूर घे रुप तू शांत

ऐकूनीया बोल पणतीचे
उघडले डोळे मेणाबत्तीचे

तिने साऱ्यांची माफी मागितली.
समाधानाने कोपऱ्यात विसावली.
_____________________________

टॉम&जेरी


टॉम&जेरी म्हणजे निखळ मनोरंजन

टॉम&जेरी म्हणजे गमतीचे अंजन

नसली जरी त्यात थोडीही वाणी

नुसतं बघूनही डोळ्यात येत पाणी


टॉम&जेरी म्हणजे मैत्रीची गोष्ट

टॉम&जेरी म्हणजे सहज अन् स्पष्ट

दोघांच ना कधी जमणार ना करमणार

 पण ताणल जरी कितीही तरी नाही तुटणार


टॉम&जेरी म्हणजे हरवलेले बालपण

टॉम&जेरी म्हणजे जगण्याचे शहाणपण

वेळ,वय,जागा सारी काही जात विसरुन

धावत रहण्यामागचं रहस्य जातात शिकवून


*****************

 फेसबुक वरील सनविवि गृपमधल्या प्रशांत कुलकर्णी यांनी,

 त्यांच्या कुंचल्यातून दर्शन देऊ पाहणाऱ्या पांडुरंगाचे (पूर्ण न झालेले) चित्र पोस्ट केले होते 

आणि पूर्ण अनुभूती दुसऱ्या दिवशी मिळणार होती.

त्या अनोख्या आणि वेगळया रुपाची इतकी ओढ लागली होती की,
 त्यामागे वेड मन अनेक रुपांचा ठाव घेऊन आले.
कधी कृष्ण दिसला तर कधी पाणी तर कधी आभाळ

आज जेव्हा त्यांची पूर्ण कलाकृती बघितली आणि नेहमीच्याच रूपाचे दर्शन झाले..  
तेव्हा जी अनुभूती झाली ती मांडायचा छोटासा प्रयत्न........

  भक्तीकाव्य 
             
           

कसे मी भुललो वरलिया रंगा

तूची कृष्ण सखा तूची पांडुरंगा


कि अंतरंग तुझा शांत नी नितळ

कलियुग ल्यातो वरी हे कातळ


ठाव अंतरीचा सांग लाभे कशा संगे

कसा मी भुलतो सदा वरलिया रंगे


 तुझे लेकरु मी सान आज दे एकची दान

पडो रुपाचा विसर नामतत्वतची महान


 कधी रुक्मिणी विठ्ठल कधी कृष्ण कधी राम

 कधी गजानन नाम घेता मज लाभतो आराम


काय नाम मुखी नको काळजी आसक्ती

सवे तुझ्या मज आता लाभू दे विरक्ती ।।

************************

 काव्य शिरोमणी


बाबा आणि बाहुली 


तू लाडुली माझी, बाबा मी तुझा...
पाठीशी सदैव, असेन ग राजा... !

माझ्या भक्कम पायी राहून उभी...
उंच उंच आकाशी, तू घे ना भरारी... !

सदैव तुझं लाभो, मनातले सारे...
सुखी तुझं बघूनी, अश्रू तरळले... !

झाली मोठी तरी रहा, बाहुलीच माझी...
तुला बघता मिळू दे, भाग्याची पावती... !

<<<<<<<<<>>>>>>>>

एका सहशिक्षकाची पोस्ट आली. एका स्पर्धेत राज्यस्तर गाठण्यात अपयश आले.
त्यातील नकारात्मक सूर लहानपणीच्या आठवणीत घेऊन गेला.
स्पर्धेचे निकाल कधीच निखळ नसतात त्यामागे खूप राजकारण असते,
कधी मान, कधी अर्थकारण, कधी सामाजिक दबाव, वरिष्ठ हस्तक्षेप ...
असं असताना आपण याचे ताण घेऊन निराश का व्हायचे? निकाल हातात नाही,
पण सहभाग निखळ करुन त्यातून अनुभव मिळवत राहायचे..
यातून काही ओळी सुचल्या





हार हीच खरी प्रेरणा
हरवून मला एकदा
स्पर्धा खट्याळ हसली
डोळ्यात तिच्या मला
नवी स्वप्ने दिसली
म्हणलं तिला मीही हसून
बरे झाले दिलीस हार
जिंकून यश मिळाले म्हणून
झालो असतो आळशी फार
आता लागेल कामाला
पुन्हा नव्या जोमाने
काल पर्यंत होतो जिथे
त्याच्या पुढेच जाईल नव्याने
स्पर्धा तर दिशा होती
मिळाले मला क्षितिज माझे
होणार ध्रुवतारा तेथील
त्यासाठी हेच सहाय्य तुझे
आता स्पर्धा माझी
फक्त असेल माझ्याशी
ज्यात हार होताच
पडेल गाठ नवं स्वप्नांशी

****************************