Tuesday, May 04, 2021

कविता


 नको ना रे पावसा ...


नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

आठवणींचे गाव लोभस किती सांग
भेटींची आपल्या भली मोठी रांग
येताना तुझ्या बरोबर कोरडी असेल
ओलेचिंब होऊन परतावे कसे वाटेल

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

लहानपणी तुझ्यासवेचे स्वैर बागडणे
साचलेल्या डबक्यातच चिंब भिजणे
चिंता नसायची कपडे खराब व्हायची
भिती तरी कुठे उगाच वेळ गाठायची

नंतर जेव्हा जेव्हा तरुणपणी भेटलास
इंद्रधनुष्याचे एकेक रंग घेऊन आलास
बहरुन जायला व्हायचे तू येता क्षणी
ओठातून नकळतच फुलायची गाणी

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

आता आठवण तुझी छत्री रेनकोट शोधते
उशीर,चिखल असली कोरडी गणित मांडते
होता आभाळ सावळ भरुन येतो ऊर
साचलेल्या साऱ्याचा उठतो काहूर

तो बिनधास्तपणा खरच नाही उरला
भेटीतल्या आपल्या आनंद हरवला
काय माहित का मनावर येत ओझं
कसही भेटावं तुला नाही धाडस माझं

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
आठवणीच्या गावी मला घेऊन जाऊ

 पण एकदातरी भेटेन विसरुन भान
तोडून सारी बंधने होईल मी लहान
कागदाच्या होड्या ते चिखलाचे चंदन
घेऊन मग फुलवेन छानसं नंदनवन

मधेच तरुणाईचे डाव नवे मांडेन
तो दंगा ते मित्र नव्याने जमवेन
होतील क्षण जणू मोरपीस मखमली
हवी पुन्हा अशी एकतरी भेट आपली

म्हणूनच हो हो म्हणूनच

नको ना रे पावसा असा न सांगता येऊ
नको ना रे पावसा असा न सांगता येऊ

  ***************************************




त्याचं माझं प्रेम !!

त्याचं माझं प्रेम
म्हणजे नक्की काय आहे ?

एकमेकांना समजून घेण्याची
एक अनोखी रीत आहे.

त्याचा माझ्या मैत्रीची
घट्ट रेशमी विण आहे.

वरवर एकमेकांची थट्टा
मनात अतूट विश्वास आहे.

मलमली स्पर्शाची हलकी
ऊबदार जाणीव आहे.

बाळाची आईकडे असते
तशीच निरागस ओढ आहे .

दुःखातही हसवणारी
त्याची माझी गंमत आहे.

खरच सांगू ....

त्याचं माझं प्रेम
म्हणजे नक्की काय आहे ?

शब्दांपलीकडे जगण्याचा, 
अलगद सुखद अनुभव आहे.




*******************************

 जगावेगळी भेट !

तू हवा आहेस मला.....
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

स्पर्श नसला तरी चालेल
पण मायेची मखमली शाल
पांघरलेला नजरेचा एक
कटाक्ष हवा आहे !!

तू हवा आहेस मला...
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

सदैव सुख हवं हा
अट्टहास नाही पण
 दुःख लपवू शकणार
निरागस हसू हवं आहे !!

तू हवा आहेस मला...
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

रौद्रावतार नाही हं चालणार
पण तुझा इवलासा रागही हवा
कारण लगेच निघून जायची
भाषा ठाऊक आहे त्याला !!

तू हवा आहेस मला...
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

प्रेमापायी वेडापिसा...
छे बाई काहीपण
पण माझ्यासाठी तुझं
थोड झुरणं मात्र हवं आहे !!

तू हवा आहेस मला.....
माहितीये म्हणजे काय हवं आहे ?

नुसत्या आठवणीतूनही सदैव 
मिळणारी प्रेरणा हवी आहे
प्रत्यक्ष न भेटून सुद्धा,
 भेटीचा आनंद हवा आहे .



****************************

चित्र कविता 

मेणबत्ती, पणती आणि निरांजन 

एका वाड्यात मेणबत्ती, पणती आणि निरांजन आपापली शान जोपासायचे...

एकदा मेणबत्तीला वाटले..ह्या दोघी जिथे मानाने ठेवल्या जातात तिथे मला का नाही..?

पणती असते तुळशी वृन्दावनावर आणि निरांजन असते देवघरात..

मी मात्र कुठेही अंधार असला की प्रज्वलित केली जाते,

अन्यथा पडली असते कोनाड्याच्या कोप-यात...!!!

मित्रांनो मेणबत्तीच्या ही खंत तुम्ही कशी दूर कराल...? सांगणार इथे थोडक्यात...? 

मधुसूदन थत्ते
१८-११-२०१७

काकांना  प्रतिसाद म्हणून काही ओळी जुळवल्या.




खंत विरली

अंधार म्हणे मेणाबत्तीला
झाले काय सखे तुला

का अशी तू दिसते उदास
सोड सारे जराशी हास

मेणबत्ती मग बोलू लागे
खंत मनाची सांगू बघे

रोज निरांजनास देवघरात मान
पणती तुळशी वृंदावनी सान 

मी मात्र असते कोनाड्यात
दिवे जाण्याची वाट पहात

अंधार मग हसून बोलला
विचार का मनी हा आला

प्रत्येकास देऊन काम
बनवे आपणास प्रभू श्रीराम

स्पर्धा का बरे करावी कुणाशी
उगीच खंत नको बाळगू उराशी

एरवी जरी तू कोपऱ्यात बसली
तरी जाता वीज मदतीस धावली

रोज नसेल पडत गरज तुझी
अंधारात सज्ज सखी माझी

ऐकून स्वस्तुति मेणबत्ती खुलली
सोडून खंत आनंदे सुखावली

...........................................


 एकच भाव सर्वत्र

निरांजन म्हणे मेणबत्तीला,
सल कसला दुखवे तुला

तुम्हा देवजीच्या जवळी ठाव
मला मात्र नाही कसला भाव

पणती मग जरा रागावली, 
येशूचे घर कसे तू विसरली ?

माणसा सम तुझे विचार झाले
भेदभाव मनी का बरे आले

स्थळ, नाव, रुप असले भिन्न जरी
निरंकार शक्तीचीच ही रुपे सारी

मग आता सांग कसली आहे खंत
अंधार सारुन दूर घे रुप तू शांत

ऐकूनीया बोल पणतीचे
उघडले डोळे मेणाबत्तीचे

तिने साऱ्यांची माफी मागितली.
समाधानाने कोपऱ्यात विसावली.
_____________________________

टॉम&जेरी


टॉम&जेरी म्हणजे निखळ मनोरंजन

टॉम&जेरी म्हणजे गमतीचे अंजन

नसली जरी त्यात थोडीही वाणी

नुसतं बघूनही डोळ्यात येत पाणी


टॉम&जेरी म्हणजे मैत्रीची गोष्ट

टॉम&जेरी म्हणजे सहज अन् स्पष्ट

दोघांच ना कधी जमणार ना करमणार

 पण ताणल जरी कितीही तरी नाही तुटणार


टॉम&जेरी म्हणजे हरवलेले बालपण

टॉम&जेरी म्हणजे जगण्याचे शहाणपण

वेळ,वय,जागा सारी काही जात विसरुन

धावत रहण्यामागचं रहस्य जातात शिकवून


*****************

 फेसबुक वरील सनविवि गृपमधल्या प्रशांत कुलकर्णी यांनी,

 त्यांच्या कुंचल्यातून दर्शन देऊ पाहणाऱ्या पांडुरंगाचे (पूर्ण न झालेले) चित्र पोस्ट केले होते 

आणि पूर्ण अनुभूती दुसऱ्या दिवशी मिळणार होती.

त्या अनोख्या आणि वेगळया रुपाची इतकी ओढ लागली होती की,
 त्यामागे वेड मन अनेक रुपांचा ठाव घेऊन आले.
कधी कृष्ण दिसला तर कधी पाणी तर कधी आभाळ

आज जेव्हा त्यांची पूर्ण कलाकृती बघितली आणि नेहमीच्याच रूपाचे दर्शन झाले..  
तेव्हा जी अनुभूती झाली ती मांडायचा छोटासा प्रयत्न........

  भक्तीकाव्य 
             
           

कसे मी भुललो वरलिया रंगा

तूची कृष्ण सखा तूची पांडुरंगा


कि अंतरंग तुझा शांत नी नितळ

कलियुग ल्यातो वरी हे कातळ


ठाव अंतरीचा सांग लाभे कशा संगे

कसा मी भुलतो सदा वरलिया रंगे


 तुझे लेकरु मी सान आज दे एकची दान

पडो रुपाचा विसर नामतत्वतची महान


 कधी रुक्मिणी विठ्ठल कधी कृष्ण कधी राम

 कधी गजानन नाम घेता मज लाभतो आराम


काय नाम मुखी नको काळजी आसक्ती

सवे तुझ्या मज आता लाभू दे विरक्ती ।।

************************

 काव्य शिरोमणी


बाबा आणि बाहुली 


तू लाडुली माझी, बाबा मी तुझा...
पाठीशी सदैव, असेन ग राजा... !

माझ्या भक्कम पायी राहून उभी...
उंच उंच आकाशी, तू घे ना भरारी... !

सदैव तुझं लाभो, मनातले सारे...
सुखी तुझं बघूनी, अश्रू तरळले... !

झाली मोठी तरी रहा, बाहुलीच माझी...
तुला बघता मिळू दे, भाग्याची पावती... !

<<<<<<<<<>>>>>>>>

एका सहशिक्षकाची पोस्ट आली. एका स्पर्धेत राज्यस्तर गाठण्यात अपयश आले.
त्यातील नकारात्मक सूर लहानपणीच्या आठवणीत घेऊन गेला.
स्पर्धेचे निकाल कधीच निखळ नसतात त्यामागे खूप राजकारण असते,
कधी मान, कधी अर्थकारण, कधी सामाजिक दबाव, वरिष्ठ हस्तक्षेप ...
असं असताना आपण याचे ताण घेऊन निराश का व्हायचे? निकाल हातात नाही,
पण सहभाग निखळ करुन त्यातून अनुभव मिळवत राहायचे..
यातून काही ओळी सुचल्या





हार हीच खरी प्रेरणा
हरवून मला एकदा
स्पर्धा खट्याळ हसली
डोळ्यात तिच्या मला
नवी स्वप्ने दिसली
म्हणलं तिला मीही हसून
बरे झाले दिलीस हार
जिंकून यश मिळाले म्हणून
झालो असतो आळशी फार
आता लागेल कामाला
पुन्हा नव्या जोमाने
काल पर्यंत होतो जिथे
त्याच्या पुढेच जाईल नव्याने
स्पर्धा तर दिशा होती
मिळाले मला क्षितिज माझे
होणार ध्रुवतारा तेथील
त्यासाठी हेच सहाय्य तुझे
आता स्पर्धा माझी
फक्त असेल माझ्याशी
ज्यात हार होताच
पडेल गाठ नवं स्वप्नांशी

****************************




No comments:

Post a Comment

suggestions most wlcome