Tuesday, May 04, 2021

रहस्य

आजीच्या गोष्टींचे...  


रेवा आणि शंतनु आज खूप दिवसांनी रात्रीचे फिरायला घराबाहेर पडले होते.

समुद्राच्या किनारी घर असूनही कामाचा व्याप असे काही करायला गात्रात त्राण शिल्लक ठेवायचा नाही.

पण आजचा दिवस दोघांनी ठरवून लवकर गुंडाळला. काम काय पण जेवणही लवकर आवरलं. मुले आता मागे लागण्याएवढी लहान राहिली नव्हती.

मध्यरात्रीशिवाय परतायचं नाही असं ठरवून दोघे निघाले. किनाऱ्यावर अशी अजूनही काही प्रेमीयुगुल आली होती पण फार वर्दळ नव्हती.
रात्रीची नीरव शांतता आणि सागराचे मधूनच जाणवणारे सप्तसूर याने परिसर भारला होता. त्यात आज पौर्णिमा त्यामुळे स्वच्छ नितळ प्रकाश चौखुर उधळला होता.

हातात हात घालून फिरण्याचे दिवस संपून अनुभवाने परिपक्व झाल्यामुळे एकमेकांसोबत असूनही त्याचे प्रदर्शन न करता दोघे चालू लागले.
वातावरणातले प्रेम बाधून शंतनूने गाणी म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला श्रवणभक्ती करणाऱ्या रेवाचे सूरही हळूहळू त्यात मिसळू लागले. फिरणारे पाय सुंदर जागा पाहून रेंगाळले. थंड रेतीत दोघे विसावले. गाण्यांची मैफिल अधिकच रंगली. शंतनुबरोबर गाणारी रेवा आता त्याच्या गाण्यांना छेडून उत्तरादाखल गाणी म्हणू लागली. सूरांबरोबर आता हावभावही बोलते झाले. आनंद, राग, गंमत, रुसवा, हट्ट अश्या साऱ्यांनी रात्र अधिकच बहरु लागली.

या सगळ्यात रेवाची ती नेहमीची कथा झाली नाही तर काय मजा असे वाटून शंतनूने ते गाणे छेडले,

" चांद तू नभातला नी
सावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा
उभा तुझ्यासमोर मी "

गाण्याला अभिनयाची साथ म्हणून हात पुढे करुन तो चक्क गुडघ्यावर बसला.

त्याच्या इच्छेनुसार रेवाने लगेचच तो हात झिडकारला आणि लटक्या रागात म्हणाली, " मी अजिबात नाही हो चंद्र. तो शापित आहे. मी तसे काही केले नाही आणि करण्याची शक्यताही नाही."

" अरेच्या इतकं कशाला रुसायला हवं ? नुसतं गाणं तर म्हणलं मी."

" गाण्यातसुद्धा नकोच. मला ती गोष्ट आठवली की अशी गाणीपण आवडत नाहीत."

" अगं पण चंद्र-चांदण्या यांनी तर कथा,कविता,चित्रपट आणि वास्तवातही प्रेम सजते जिथेतिथे. तुझं काहीतरी वेगळच असत सदा. "

" असू दे माझं वेगळं पण आजीने मला सांगितलेली गोष्ट मनात इतकी रुजली आहे ना की ..."

" की काय ? आम्हालाही सांगा ना ती गोष्ट. प्रेमाचे प्रतिक, दैवत असलेला हा चंद्र तुम्हाला का बरे सलतो इतका ? "

त्यांच्या गाण्यांनी आजूबाजूला फिरणारी मंडळीही तिथे जमत गेली आणि दोघांनी हरकत घेतली नाही त्यामुळे तिथेच विसावली होती. त्यातल्या एकाने रेवाला छेडले. 

ही गोष्ट गाण्यांची मैफिल भरली आणि चंद्राच्या कौतुकाचे गाणे आले की हमखास निघायचीच पण आजचा दिवस खास करण्यासाठी शंतनूने मुद्दाम तार छेडली होती. त्यामुळे त्यानेही री ओढली.

" रेवा सांगाच तू गोष्ट. आज ते रहस्य समजू दे सगळ्यांना. भले ऐट मारत फिरत असतो ना तो चंद्र पण अखेरीस शापितच ना तो."

" ही गोष्ट मला माझ्या आजीने सांगितली होती. मला म्हणजे आम्हा साऱ्या भावंडाना. आम्ही शाळा संपवून कॉलेजला जाण्याच्या तयारीत होतो तेव्हा.

(रेवा लीलया आजीच्या पात्रात समरस झाली आणि ऐकणारे नातवंडांच्या)

" मला माहिती आहे की हे तुमचे गोष्ट ऐकण्याचे वय नाही पण तरी आज ऐकाच आवडेल तुम्हाला. तुम्ही सारे आता तरुणाईच्या हिंडोळ्यांवर झुलणार, सगळं कसं गुलाबी गुलाबी दिसणार त्यात तो चंद्र त्याचे येणे तुम्हाला मोहवून टाकणार, कथा-कविता होणार पण तुम्हाला वाटतो तसा तो चंद्र मुळी सुद्धा नाही बरं का. शापित आहे शापित."

"हो गणपती बाप्पानी शाप दिलाय त्याला ऐकली आहे लहान असताना आम्ही ही गोष्ट ..." ,आमच्या पैकी एकाने सूर लावला. आजीने मात्र गाडी घसरु न देता तेच पुढे जोडले.


"ते त्याच्या लहानपणी झाले पण ही त्याची खोड पुढेही कमी नाही झाली. हे घडले तेव्हा चंद्र उमदा, रुबाबदार झाला होता. त्याला साजेशा सुंदर यामिनिशी त्याचा विवाह ठरला होता.

आपल्या रुपाची त्याला नशा चढली होती. आपल्या चांदण्यात सगळे न्हाहून निघते, रुपेरी होते याची घमेंड वाढत चालली होती. अशात एकदा फिरत असताना त्याची नजरानजर झाली ती एका सुकोमल चंद्रिकेशी.
तिला बघून तो मोहित झाला. आपला वांङ्निश्चय झाला आहे हेही तो विसरला. त्याने तिची वाट अडवली आणि तिच्या समोर बाहू पसरुन म्हणाला, " हे सुंदरी माझी होशील का ?"

चंद्रिका काहीशा तीव्र स्वरात उत्तरली, " हे चंद्रदेव काय हे आपले वर्तन. आपला विवाह ठरला असताना असे करणे शोभा देते का?"

" विवाह ठरला आहे पण झाला नाही अजून. आणि एका पेक्षा अधिक पत्नी असणे देव लोकात नवीन नाही."

" तुम्हाला चालत असेल असले असभ्य वर्तन मला नाही आणि सखी यामिनीला पण चालणार नाही."

हा वाद चालू असतानाच घडल्या प्रकाराची वार्ता यामिनी पर्यंत गेली आणि तीही तिथे आली.

चंद्राला झालेला रुपाचा गर्व आणि चालू असलेले असभ्य भाष्य तिला अजिबात आवडले नाही. ती क्रोधित स्वरात म्हणाली, " हे चंद्रा मी तुला पती म्हणून निवडले याची आज मला खंत वाटत आहे.

तुझे वर्तन तर असभ्य आहेच पण बोलणे त्याहून वेदना देणारे आहे.
आजपर्यंत कोणत्याही देवाने असा स्त्रीचा अपमान केलेला नाही. आपली मर्यादा सोडलेली नाही.

असूर संहार किंवा अन्य कार्यासाठी जरी कुणी दुसरा विवाह केला असला तरी अशी छेडछाड कोणीही केलेली नाही."

तिच्या बोलण्याने चंद्र भानावर येण्याऐवजी अधिकच उन्मत्त झाला होऊन म्हणाला, " नसेल केलं कोणी म्हणून मी करु नये असे थोडीच आहे. माझ्याइतके देखणे रुप त्यांच्याजवळ नसेल कदाचित."

हे ऐकून यामिनी, चंद्रिका आणि त्यांच्या सख्या रागाने बेभान झाल्या आणि एकसुरात गरजल्या , " आम्ही सगळ्या तुला शाप देतो....चंद्रा ज्या रुपाचा तुला गर्व झाला आहे ते तुझे रुप क्षणात नाहीसे होईल. तुझा नितळ गौरवर्ण नाहीसा होऊन तू डागाळशील. लहानपणी महिन्यातून एकदाच पूर्ण दिसण्याचा शाप तुला मिळालाच आहे पण आता त्याही पेक्षाही मोठी शिक्षा तुला मिळेल.

तू नेहमी एकटा राहशील. तुझ्यावर कोणतेही प्राणीमात्र वस्ती करु शकणार नाहीत. सजीवतेचा आनंद तुला कधीही मिळणार नाही.
तुला प्रेमाचे प्रतीक मानतील. तुझ्यावर कथा कविता रचल्या जातील पण स्त्रिया तुला भाऊ म्हणूनच ओवळतील. लहानपणापासून मुलांना तुझी मामा म्हणूनच ओळख करुन दिली जाईल. "

इतके सारे बोलून त्या सगळ्या निघून गेल्या. शापवाणी खरी झाली. तेव्हापासून चंद्र एकटा पडला. आकाश भरुन चांदण्या असल्या तरी जवळ एकही नाही उलट सगळ्या त्याला वाकुल्या दाखवून चिडवायच्या.
आजही आपण बाळालाही ते बघ चांदोमामा अशीच ओळख नाही का करुन देत?"

गोष्ट पूर्ण करुन आमच्या आजीने प्रश्न विचारला तसे " प्रेमाचा विश्वासघात करु नये. स्त्रियांना छेडू नये हेच सांगायचे ना तुला." आमच्यापैकी एकाने विचारले तसे हसत आजी म्हणाली , " मी फक्त कथा सांगितली बोध काय तो तुम्ही घ्या नाहीतर राहू द्या."

" काय मंडळी तुम्ही सांगा जर माझ्या आजीची गोष्ट खोटी म्हणावी तर तिचे दाखले तर चपखल बसतात. आणि मी म्हणते का खोटी म्हणावी यात काही चुकीचे तर सांगतच नाही ना? उलट या गोष्टीचा परिणाम असेल म्हणून आम्ही कधीही कोणतेही गैरवर्तन केले नाही. अस नाही का वाटत तुम्हाला? "

रेवाने आपल्या प्रश्नाचा चेंडू भोवती जमलेल्या श्रोत्यांच्या कोर्टात टोलवला.
ऐकण्यात रमलेले सगळे काहीशा विचारात गुंगले पण एक हजरजबाबी मात्र निमिषार्धात उत्तरला, " ताई तुमच्या आजीची खरी गरज आज सगळ्या चॅनलवरच्या डेलीसोपच्या लेखकांना आहे.

पुराणातली वांगी पुराणात म्हणणाऱ्या या साऱ्या लेखकांनी टी आर पी साठी चालवलेले वर्तनाचे अधःपतन बघवत नाही. प्रेमाचे त्रिकुट, विवाहबाह्य संबध हे इतके सहज दाखवतात की आजची पिढी याला आदर्श म्हणेल का काय अशी भिती वाटू लागली आहे "

" शंभर नंबरी बोलला राव. हेच तर आहे आपल्या आजीच्या गोष्टींमागचे रहस्य. त्या काहीशा अवैज्ञानिक, अवास्तव, रंजक असतील पण नकळत संस्कारांची पुंजी द्यायच्या.

त्या गोष्टी हरवल्या आणि आजची पिढी या खजिन्याला मुकली. चांगले वाईट समजण्यातच कमी पडू लागली.

लहानपणापासून हे संस्कारांचे बीज रुजवायला हवे. आजी नसेल जवळ कदाचित पण याची जबाबदारी आईबाबानी घ्यायला हवी. तरच म्हणता येईल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी." शंतनुने सांगता केली.

कितीही धवल चांदणे पसरले तरी चंद्रावरचे डाग अधिक ठळक वाटू लागले.

वातावरणात आजीच्या गोष्टींमधले रहस्य अगदी अत्तरासम पसरुन सारा परिसरच गंधित झाला.

काहीतरी निश्चय करुन सारे परतीच्या वाटेला लागले.




No comments:

Post a Comment

suggestions most wlcome