खुर्ची...नव्हे, सोबत..!
रोजचा परिपाठ...
बागेत बसायला खुर्ची न्यायची....सो सिम्पल...!!!
but not so simple for the 81 year काका...
पुतण्याकडचे आश्रित...!!!
काकांचा तोच तर एकुलता एक विरंगुळा...
डोळे साथ देतील तसे संध्याकाळचे रंगीत आकाश झाकोळले होईतो बघायचे..
विविध पक्षी-विहार पाहायचा...
बाग अंधारली तरी उमलती नभ-नक्षत्रे बघायची ...
मृग दिसण्याचा महिना होता..मग मनात विचारायचे...
"नलिनी, तू तिथेच आहेस ना...? आलोच बघ मी सोबतीला...!!"
कुणीही न पाहिलेला अश्रू बोटांनी झिडकारायचा...
सावकाश खुर्ची उचलायची...
दोन पाय-या चढून घरात आणायची अन मिळेल तेवढी "personal स्पेस" शोधत काही बाही करत निजून जायचे...
खुर्ची न्यायची.अन आणायची... ८१ वर्षीय काकांनी...
सून, पुतण्या कधी कधी हे पाहायचे...
काका म्हणायचे नाहीत "जरा मदत करा.."
सून, पुतण्या म्हणायचे नाहीत "काका, राहू दे...आम्ही आहोत ना ..!!!.."
खरं म्हणजे काका किंवा इतर कुणीही ती खुर्ची आत नेण्याची तशी गरज नव्हती.
पण खुर्ची बघणाऱ्यासाठी काकांसाठी तिचे स्थान काही निराळेच होते.
आणि ते घरातील सगळ्यांना माहित असल्याने या कृतीचा सगळे आदर करत.
काका काकू दोन वर्षापूर्वी पुतण्याकडे रहायला आले होते.
यापूर्वी ते जवळच असलेल्या त्यांच्या भल्या मोठया बंगलीत असायचे.
एकुतला एक मुलगा वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच देशासाठी शहीद झाल्यावर काका-काकू दोघांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन लहान वयात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम सुरु केले. साधारण वीस वर्षे हे काम करुन अनेक कुटुंब सावरली होती. वय झाल्याने पूर्वी सारखे काम होईना म्हणून हे काम आपल्या पुतण्याकडे सोपवून दोघेही त्याच्याघरी रहायला आले होते.
येताना त्या घरातून फक्त या खुर्च्यांची जोडी घेऊन आले होते कारण त्यावर बसूनच दोघांनी अनेक सुखदुःख अनुभवली आणि झेलली होती.
इथे आल्यावरही यावर बसून हितगुज करत बसणे हाच त्या दोघांचा विरंगुळा होता.
दोघे असे बोलत असताना कधी पुतण्या- सून डोकावून जात , गप्पात सहभागी होत असत तर कधी चार वर्षाची नात आजूबाजूला बागडताना मधूनच आपल्या बोबड्या बोलांनी त्यांना आपल्या खेळात सामील करत असे.
नाही म्हणायला सगळं छान चालले असले तरी आता वयोमानानुसार कुरबुरी चालू झाल्या होत्या. नियतीचे बोलावणे येणारच आणि कुणीतरी एकटे मागे राहणार याचाही विचार दोघांनी केला होता आणि तेव्हाच ठरवले होते की काही झाले तरी स्वतःला एकटे समजायचे नाही. ही खुर्ची आपली सोबत बनवायची आणि आत्तासारखेच आनंदी रहायचे.
विचार केल्यानुसार महिनाभरापूर्वी काकू विशेष काही त्रास न होता एक दिवस झोपलेल्या उठल्याच नाही. काकांच्या दिनक्रमात खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. सुरुवातीला आठ दिवस पुतण्या-सून त्यांच्याजवळ बसायचे, बोलायचे पण मग त्यांचे ऑफिस, इतर धावपळ सुरु झाली.
आधी काकांना स्वतःहून सगळे संपवून टाकावे असे वाटू लागले पण मग यावर काकूसोबत केलेला विचार आठवला आणि जे घडले होते ते स्वीकारले.
खुर्चीलाच काकूंचे स्थान दिले. तिला स्वतःसोबत ठेवणे, तिच्यासोबत गप्पा मारणे, तिची स्वच्छता यात आंनद शोधू लागले.
एकदा पूर्वी तुम्ही खुर्च्या आत आणत नव्हता आणि आताही एकच आणता असा प्रश्न सूनबाईने विचारल्यावर तिला त्यामागचे रहस्य सांगितले.
काही का असेना काका सावरले यातच समाधान मानून सगळेच त्यांच्या या कृतीचा आनंद मानू लागले. इतकेच काय काका खुर्ची खोलीत घेऊन गेले की चिमुरडी नात त्यावर बसून आपला दिवसभराचा पाढा वाचू लागली की काकांना ती आजीच्या कुशीत बसल्याचे समाधान मिळे.
त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून पुतण्या आणि सून यांनाही आता काकूंचे खुर्चीतील अस्तित्व जाणवे.
काकूंनंतर दोन महिन्यातच काकांनी आपला इथला प्रवास संपवला.
नियतीपुढे जाता येत नाही. येणे व जाणे आपल्या हातात नाही पण ते सुकर करण्यासाठी काका-काकूंनी निवडलेला मार्ग हा खूपच आशादायी आणि आल्हाददायक होता म्हणूनच त्या दोन्ही खुर्च्या सांभाळून ठेवल्या आहेत. पुतण्याच्या संसारतल्या सगळ्या चढ उताराचे, नातीच्या यशाचे आनंद त्यांनी चाखले आहेत.
समर्थ सहजीवनाची प्रेरणा देत त्या आजही सर्व समारंभात लक्ष वेधून घेतात.
****************************************

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome