Tuesday, May 04, 2021

कन्यावेल



आटपाट नगरात आईबाबा नावाचे एक जोडपे, आपल्या अंगणात हौशेनी कन्या नावची एक सुंदर वेल लावतात. स्वतःच्या जीवापलीकडे जपतात. लाड, कौतुक, प्रेमअशा नैसर्गिक खतांनीं अधिक कसदार बनवतात. कधी ओरडा, राग अशा कीटकनाशकांची गरजेनुसार फवारणी करतात. अबोला, हट्ट, रुसवा असे तण हलकेच काढून टाकतात. सुरक्षेच कुंपण घालतात.

हळूहळू वेल वाढू लागते. अनेक पावसाळे येतात, ऊन तापत पण ते जोडपं याची झळ कधीच वेलीपर्यंत जाऊ देत नाही.बघता बघता २०-२१ वर्षे उलटतात. यशाचे, आनंदाचे, मजा मस्तीचे असे अनेक बहर वेलीवर फुलू लागतात. कोणीही प्रेमात पडावं असं रुप. 



जोडपं अनुरुप साथ शोधू लागतात,अशी साथ वेलीलाच सापडते.हा वृक्ष आपल्या वेलीला समर्थपणे सांभाळेल अशी खात्री झाल्यावरच निर्णय पक्का होतो.



एके दिवशी काय ते मुहूर्त वगैरे बघून जोडपं आपल्या अंगणातल्या मातीतून वेल अलगद बाहेर काढतात. काही मूळ इतकी खोलवर असतात की ती तुटणच पसंत करतात. नव्या अंगणात त्या वृक्षाच्या साथीत वेल लावली जाते.इतक्या वर्षाच प्रेमाच, सुरक्षित, हक्काच अंगण सोडून अचानक मिळालेल्या या नव्या अंगणात आता तुला फुलायच आहे हे वेल स्वतःला समजावते .

नव्या जागेशी,मातीशी नाळ जोडण्याचा ती मनापासून प्रयत्न चालू करते....वेलीचा हा नवा जन्मच खरतरं, पण ही तिची परिक्षा तिची एकटीचीच. जोडीला पती वृक्ष, दीर, नणंद, जाऊ अशी इतर छोटी-मोठी झाडे असतात  पण प्रत्यक्ष लढाई तिचीच ना.


ज्या मातीत आपण वाढलो त्यासारखीच ही माती असावी,हा तिचा आणि जोडप्याचा विश्वास फलदायी होणार का? हे तिलाच शोधायच असतं तर असा हा प्रवास सुरु होतो.




वरवर सारखी दिसणारी माती अंतरंगात खूप काही साठवून असते. स्वतःहून ही वेल आपण आपल्या घरी घेऊन आलो हे माहित असूनही तिची मूळ अजूनही मोकळी आणि कोरडीच असतात. 



वेल आपल्या मातीचा कस संपवून टाकेल का? तिने सगळं पाणीच संपवले तर? असे किंतु परंतु असतातच. सासूसासरे नामक झाडे तिच्याकडे अगं आमच्याकडे हे असं नाही हे पर्वणीच वाक्य वेगवेगळ्या रागात आळवातात. मग कधी ते साज-शृंगाराबाबतीत, कधी बोलण्याच्या, कधी प्रथा-पद्धती तर कधी शुल्लक पाककृतीच्या. अशावेळी मात्र दीर,जाऊ नणंदा चेष्टामस्करी करुन तिला दिलसाही देतात.


यात या घरचे चांगले वेलीला जे जे आवडते ते ते बदल ती जरुर करते पण जे तिचे चांगले ते का बदलावे हे तिला समज नाही. मग ती खूप बावरुन जाते. यात वृक्षाची साथ... सदैव नरो वा कुंजरो वा. सगळ्यांसमोर तटस्थ आणि एकांतात हो तुझं सगळ बरोबर पण....



अशा सगळ्यात बघता बघता वेल नव्या मातीत एक तपाचा पल्ला पार करते. इथल्या मातीच्या पोतानुसार स्वतःमध्ये बरेच बदल करते. आपली मुळे हळूहळू घट्ट करते.माती वेगळी, ऋतू वेगळे शिवाय वादळ, वारे,पाऊस  असतात. पण सगळ्याला मोठया हिमतीने तोंड देते



हे सगळं सहन करुन ही टिकून राहण्याची नैसर्गिक क्षमता वृक्षापेक्षा वेलीत जास्त असते हे ती ओळखून असते.त्यामुळे परिस्थितीनुसार प्रश्नांवर मार्ग शोधते. या प्रवासात ती आनंदाचे बहरही अनुभवते. त्या बहरांची गोड फळेही फुलतात, वाढतात. 



एकदा असेच निवांत क्षणी पती वृक्ष आणि कन्या वेल गप्पा मारत बसले असताना सहजीवनाचा विषय निघातो वृक्ष विचारतो, "तू सुखी आहेस ना माझ्याबरोबर की पश्चताप होतो तुला."



वेल काहीच न बोलता अर्थपूर्ण हसते. वृक्षाला काहीच समज नाही. त्याला कावरा बावरा झालेलं बघून हसत त्याला विचारते, "माझ्या जागी तू असता तर?"

लगेच उत्तर,"मी खूप सुखी आहे. मला हवं ते सगळं मिळालं आणि मला हे सुख सात नाही तर प्रत्येक जन्मात हवं आहे."                                                                              
 "सुखाच्या बाबतीत माझंही उत्तर हेच आहे पण माझा प्रश्न हा नव्हताच मुळी. मी विचारलं की माझ्या जागी तू असता तर? मी जसं माझं घर, कुटूंब सगळं सोडून आले तसं तुला कराव लागलं असत तर?"

"असं मला का करावं लागेल? अशी पद्धतच नसते." 



पुन्हा एकदा ती तशीच हसते."ए तू अशी हसू नको,काय ते स्पष्ट बोल ना."

"काही नाही रे जाऊ दे. मी सांगितलं मगाशी मी सुखी आहे."

"नाही तू सांग काय ते. मला आज ऐकायचं आहे."

"नको तुला ते झेपणार नाही."

"का नाही झेपणार? मी प्रयत्न तरी करेन. सांग ना."




"ज्या गोष्टीची तू साधी तयारीही दाखवली नाही. एक सेकंदही तसा विचार केला नाही का तर तशी पद्धतच नाही. पण आम्ही मात्र हे खूप सहजतेने स्वीकारायच, कारण ती पद्धत आहे. 



बरं हे बाळकडू लहानपणापासून दिलेलं असतंच, हे गृहीत धरलं तर ते बदल फार अवघड जायला नको असही वाटू शकते. तेही काही चूक नाही.

फक्त या सगळ्याबरोबर मी आले तेव्हा, माझ्याबरोबर एक स्वप्न घेऊन आले होते. 



स्वप्न कारण त्यात मी वास्तवता गृहीतच धरली नव्हती आणि ते माझ्या एकटीचे होते. स्वप्न काही खूप मोठे किंवा अशक्य नव्हते. एकच की ज्या आनंदानी मी इथे आले आणि तुम्ही सगळ्यांनी वाजत गाजत आणले, तोच आनंद व उत्साह मला सगळ्या बदलांसाठी मिळेल. 

इथली माती वेगळी, ऋतू वेगळे, बहर वेगळे आणि वादळही वेगळीच पण ती मी तुमच्या सगळ्यांसोबत अनुभवणार होते असे मला वाटायचे.    



पण....पण असं काहीच झालं नाही. हा सगळा प्रवास माझा मी एकटीने केला. तू साथ दिली नाही असं म्हणणार नाही पण काठावर राहून पोहायला सांगण आणि स्वतः बुडत्या प्रिय व्यक्तीसह गटांगळ्या खात किनारा गाठणं ह्यात खूप फरक असतो.



मग स्वप्नांना वास्तवता दाखवत मी प्रवास सुरु केला. 

दोन गोष्टींची पक्की खूणगाठ बांधली. 





पहिली की माझं तुझ्यावर जितकं प्रेम, विश्वास आहे तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त तुझा आहे. मग तुझी साथ नरो वा कुंजरो वा का असेना. ती तुझ्या घडणीमुळे. समाज रीत, संस्कार अशा समजांमुळे कदाचित उघड पाठींबा नाही मिळणार किंवा कधीतरी पूर्ण विरोधही असेल पण त्याचे परिणाम आपल्या नात्यावर कधीच होणार नाही.


दुसरे माझी आवड, प्रगती आणि स्वातंत्र्य यात तुझी असलेली शंभर टक्के मिळालेली साथ. 



या दोन गोष्टींवर मी माझी मोट बांधली. कर्तव्य चुकवायचं नाही पण स्वतःला दुखवायचेही नाही. शक्यतो मध्य शोधायचा. आपली आवड जोपासायची त्यात स्वतःला इतकं गुंतवायच की बाकी सगळं क्षणात विसरता आले पाहिजे. मला सापडलेला हा कानमंत्र जपण्यापेक्षा जगण्यासाठी वापरला आणि मग माझा प्रवास छान सुरु झाला.



आज मी सुखी, आनंदी, यशस्वीसुद्धा आहे यात तुझा वाटा बरोबरीचा आहे. पण नेहमी अशीच राहण्यासाठी मी माझ्याभोवती एक संरक्षित वलय करुन घेतलं आहे. 



ज्यामुळे मी या मातीत येण्यापूर्वी जशी मी खूप आनंदी किंवा खूप दुःखी व्हायचे. वेगवेगळे बहर अनुभवायचे तसे काहीच आता होत नाही. याची सल मलाही जाणवते पण त्यावर उपाय सापडत नाही. तरीही या सगळ्या विषयी माझी काहीच तक्रार नाही. निसर्गात यालाच परिपक्व होण म्हणतात कदाचित." डोळ्यांनीच तिच्या मनोगतला मनापासून संमती देत त्याने तिला थांबवले.

त्याला तीच सगळं पट होतं आणि त्याहीपेक्षा तिने आपल्याला आहे तसं स्वीकारलं याचा जास्त आनंद झाला होता. म्हणूनच पुढे काहीच न बोलता त्याने तिला घट्ट मिठीत घेतले.


काही क्षणांसाठी तीही त्या नभशामल मिठीत सगळ विसरुन पूर्णतः विरघळून गेली. 

तेव्हांपासून कन्यावेल आणि पतीवृक्ष एकमेकांच्या आधाराने नाही तर साथीने बहरत आहेत. कोणीच एकमेकांवर अवलंबून नाही कारण स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या क्षमता ते ओळखून आहेत. त्याचा दोघांनाही अभिमानही आहे. 



त्या दोघांचा एकमेकांशिवाय विचार तेच काय, पण त्यांना ओळखणारे आणि बघणारेही कोणीच करु शकत नाही हेच तेवढे खरे.



निसर्गाची एक घडी सुरळीत चालू असल्याचा हा आनंद सगळ्यात जास्त त्या विधात्याला असणार हे वेगळे सांगायलाच नको.



निसर्गतः असे एका मातीतून दुसऱ्या मातीत आपली मुळे घट्ट करताना आधीची नाळ जपत, अधिक शक्तीने नवे बहर देणाऱ्या साऱ्या कन्यावेलींना आणि त्यांना मायेची, विश्वासाची साथ देणाऱ्या साऱ्या पतीवृक्षांना माझा सादर प्रणाम.  

तर अशी ही सहज कोठेही बघायला मिळणारी साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण.

अभिगंधशाली (कहाणीतली कन्यावेल )



( राधाकृष्ण हे पतीपत्नी नव्हते हे माहिती आहे पण तसे निर्व्याज प्रेम या नात्यात असावे असे वाटते म्हणून त्या चित्रांची जोड कथेस दिली आहे.) 

********************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome