Monday, May 03, 2021

शून्यशी मैत्री

 


सोहम आता बालवर्गात होता.

खेळगाणी,गोष्टींबरोबर आता अंक,  अक्षर असा अभ्यासही चालू झाला होता.

सोहमला अक्षर आणि अंक लिहायला खूप मजा यायची.

अंक जरा जास्तच कारण ते खूप थोडेच होते. 

० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ बास इतकेच. 

सगळेच मजेशीर कुणाला उभी रेघ तर कुणाला आडवी

कुणी दोन अर्धगोल, तर कुणी आजोबांची उलटी काठी नुसती गंमतच.

 हे सगळे अंक त्याला त्याचे मित्रच वाटायचे,

 फक्त एक अंक सोडून आणि तो म्हणजे शून्य.

त्याला वाटायचं ० हा काही अंक आहे..?

नुसताच गोलढिम्म गोळा. 

अंकापुढे चित्र काढताना याच्यापुढे काहीच नाही

वस्तू मोजतानाही याला काहीच नाही

बोटावर मोजताना, सगळी बोट बंद...

यात काय गंमत.

अभ्यास नाही केला तर, आई दादाला रागावून म्हणते मोठ्ठा भोपळा म्हणजेच शून्य मिळेल. 

ई ई ई....  भोपळ्याची भाजी किती बोअर लागते. 

असा हा शून्य सोहमला अजिबात आवडायचा नाही...

पण एकदा गंमतच झाली. 

सोहमची स्वारी शाळेतून घरी आली. 

कपडे बदलले,हातपाय धुतले, जेवण केलं.

आता ताईनी दिलेला अभ्यास करुन टाकू म्हणजे मग खेळायला मोकळं म्हणून अभ्यासाला बसला. 

बाराखडी लिहिली, मग अंक आणि त्यासमोर चित्र काढायला घेतली...

प्रत्येक अंकाला वेगळं चित्र
१ 
२ 🌴🌴
३ ☔☔☔
४ 🍁🍁🍁🍁                   
५ 🌸🌸🌸🌸🌸
६ 🍎🍎🍎🍎🍎🍎
७ 🍦🍦🍦🍦🍦🍦🍦
८ 💧💧💧💧💧💧💧💧
९ 🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓

पण बेट्यानी शून्य काढलाच नाही. वर म्हणला, आज तुला लिहिणारच नाही मला तू आवडतच नाही...!

इतक्यात त्याला रडण्याचा आवाज आला.

त्याने आवाज दिला कोण आहे...

कोण रडत आहेइकडे तिकडे बघितलं, तर त्याला एक मोठा गोल रडताना दिसला... 

सोहम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला," काय झालं तुलारडू नको मला कुणाला रडताना बघितलं की वाईट वाटत. मलाही रडू येत. कोण आहेस तू

शून्य :- मी शून्य आहे. सगळ्यात पहिला अंकपण तुला मी आवडतच नाही. आज तू मला काढलं पण नाही. नेहमी माझा राग राग करतोस...

  
सोहम :- अरे पण तू म्हणजे काहीच नाही. मोजायला काही नाही की चित्राला काही नाहीदिसायलाही नुसता गोल, मजाच नाही.

शून्य :- अरे मी एकटा जरी काही नसलोसगळ्यात लहान असलो तरी दुसऱ्या अंकाबरोबर आलो ना की सगळ्यात जास्त मीच. कोणत्याही अंकापुढे मला लिहिलं की एकदम जास्त...!

१ च्या पुढे म्हणजे १०,
२ च्या पुढे म्हणजे २० अशी अंकांच्या पुढे ० वाढवली की खूप नाही खूप जास्त.

सोहम :- काय सांगतोस काय. किती मज्जा. मला तर हे माहीतच नव्हतं. खरं तरं तू काढायलालक्षात ठेवायला सगळ्यात सोपा. मी उगाच नाव ठेवली तुला.
शून्य :- असू दे आता पटलं ना तुला मी पण छान आहे. लक्षात ठेव मी एकटा काही नाही पण दुसऱ्या अंकबरोबर आलो की त्याची किंमत खूप वाढवतो. मी नुसता अंक नाही तर मैत्रीची गंमत सांगतो. जरी मी काही नसलो तरी माझ्यामुळे इतरांना जास्त किंमत मिळते.


सोहम :- खरच आता तूही माझा आवडता बरं का. मी तुला रडवले सॉरी... 

सॉरी खूप खूप सॉरी...

"अरे सोहम कुणाला सॉरी म्हणतो आहेसकाय झालं?" आई त्याला झोपेतून उठवत म्हणाली. 

हातात पेन्सिल समोर वही तशीच,  दमल्यामुळे सोहमला लिहिता लिहिता झोप लागली होती.

म्हणजे शून्य स्वप्नात आला होता वाटत...!

सोहमनी आईला शून्याची गंमत सांगितली.

वहीत सगळ्या अंकाच्या आधी छान शून्यही लिहिला.

आता सोहमची शून्यशीही छान मैत्री झाली आहे बरं का.




*********************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome