उत्तम नेतृत्व म्हणून साऱ्या विश्वात ज्या राजाला मानतात, पूजतात आणि त्यांचा अभ्यास करतात ते म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज
एक शिक्षक म्हणून मी, त्यांना महाराष्ट्राचे, त्यातही मराठीचे आद्य दैवत म्हणत फक्त एक जयंती साजरी करुन अभिमान दाखवणार की माझ्या रोजच्या दिनक्रमात त्यांच्यातले गुण माझ्यात विकसित करणार.
माझे आळशी मन लगेच म्हणेल, पण माझ्याकडे कुठे आहे, कोणते नेतृत्व मला नाही करायचे पुढे पुढे...
पण जिथे शिक्षकी पेशा स्वीकारला तिथे या वक्तव्याला मुळात मान्यताच नाही,
स्वामी विवेकानंद म्हणतात,
मुलांसाठी शिक्षक हा वाटाड्या असतो. मुलांना त्यांच्यातील स्वयंभू गुणांची ओळख करुन देत त्यांना परिपूर्ण करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकाची असते. हे करताना नकळत अनेक प्रकारचे नेतृत्व करावेच लागते.
आणि दुसरे म्हणजे शिवाजी महाराज अभ्यासताना, राहून राहून वाटते की महाराज कधीच एकटे मोठे झाले नाही, त्यांचे अनुयायी, जीवाला जीव देणारे सरदार यांनी त्यांना मोठे केले.
यातून हा विचार घेता येऊ शकतो की, नसतील आपल्यात नेतृत्व गुण, मग आपण किमान चांगले अनुयायी तर होऊ शकतो का..?
हा - का..
जो काही आहे ना, तो नुसत्या उच्चारातून ही आपल्याला नकारात्मक बनवतो..
बघा कसे ते..वरचे वाक्य परत वाचा,
नेतृत्व नको, पण मी उत्तम अनुयायी बनू शकतो का..?
आता का चे स्थान बदलू या..
नेतृत्व तर नकोच, पण मी का उत्तम अनुयायी बनू ..?
(नवीन प्रश्नमालिका त्यासाठी तयारच असते- त्यासाठी गरजेचे नेतृत्व कुठे आहे, मला स्वातंत्र्य कुठे आहे, त्याने मला काय मिळेल..?)
हे अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येक जण घरात, कामाच्या ठिकाणी रोज घेत असतो..
या साऱ्या, का..? ची उत्तरे
मला एप्रिलमध्ये आमच्या सिटी प्राईड शाळेच्या तिन्ही शाखेच्या शिक्षकांसाठी झालेल्या लीडर इन मी या कार्यशाळेत मिळाली.
सुरुवातीला सक्ती म्हणून सहभाग असला तरी, नंतर मात्र कन्नन सरांच्या उत्साहवर्धक पद्धतीमुळे हसत खेळत तो पूर्ण दिवस अनुभवला.
त्यात अनेक जमेच्या आणि काही रुखरुख लावणाऱ्या गोष्टी आहेत.
शेवट नेहमी गोड असावा म्हणून, त्यातल्या जमेच्या बाजू नंतर मांडते,
आधी काय नाही आवडले ते सांगते.
१) मराठी माध्यमात शिकलेल्या मी, अगदी आजही इंग्रजी अनेक कारणाने थोडी दुर्लक्षित केली आहे. याची प्रचंड खंत मला या कार्यशाळेत झाली. कारण पूर्ण वेळ फक्त इंग्रजी बोलले जात होते. ही अवस्था माझ्यासोबत अजूनही अनेक शिक्षकांची बघण्यात आली.
२) प्रत्येक मुद्दा पटण्यासाठी दाखवण्यात आलेल्या चल चित्रफिती सुद्धा वेगळ्या इंग्रजी उच्चार पद्धतीच्या होत्या.
२) त्यात भर, कन्नन सरांचे दाक्षिणात्य उच्चार, प्रचंड वेगात बोलणे.
एकूण परिणाम कदाचित ५०% समजले.
त्यावेळी घरात मराठी भाषेचा प्रभाव असणारी व स्वतःची इंग्रजी भाषा न वाढवलेले विद्यार्थी रोज शाळेत अशा गोष्टींना सामोरे जात असतील का याचीही चिंता वाटली.
३) सुटी पूर्वीचा एक दिवस सर्व शिक्षक रोजच्याप्रमाणे एकमेकांना भेटले असते, तर या कार्यशाळेची चर्चा त्यांच्यात झाली असती आणि त्याचा अधिक परिणाम झाला असता
४) अजून एक आणि फार महत्वाचे या सारख्या अनेक कार्यशाळा एका उत्तम शाळेची विद्यार्थिनी म्हणून अनुभवलेली मी,
हे सगळे विचार माझ्या मातृभूमीला सुजलाम् सुफलाम् ठेवणाऱ्या अनेक ऋषीमुनी, वेद, संस्कृती, विद्वान, पराक्रमी वीर, समाजसुधारक यांनी प्रथम मांडलेले आहेत, तसे लेखी दाखले आहेत तरीही त्यांच्या नावाचा साधा उच्चार ही कुठेच झाला नाही
हे स्वीकारू नाही शकत.
कारण येत्या काही वर्षात माझी मातृभूमी जगज्जेती आणि सुपथदर्शी असेल असे विश्वासपूर्वक सांगणाऱ्या स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर ते अब्दुल कलाम यांच्यावर माझा फार विश्वास आहे.
पण ते पूर्ण करणारे आजची पिढी जर असे आपली संस्कृती, परंपरा, स्वत्त्व यापासून लांब गेली तर हे दिवास्वप्न प्रत्यक्षात येईल कसे?
या साऱ्याला योग्य दाखले पुढे देईनच
आता काय आवडले..
१) अशी कार्यशाळा शाळेच्या सर्वच शिक्षकांसाठी आयोजित करणे.
२) गिरीष कन्नन सरांचा प्रचंड उत्साह, प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघण्याची सवय करा हे सतत सांगणे.
३) त्या सवयी अंगीभूत करण्यासाठी किंवा त्याचे महत्त्व समजण्यासाठी घेतलेल्या छोट्या छोट्या कृती, जसे
आज हयात नसणाऱ्या प्रिय व्यक्तींचा, शरीराने जाण्याचा स्वीकार करणे, एखाद्याच्या नजरेला नजर देऊन सांगितलेल्या गोष्टी करणे, त्यातून त्याच्याविषयी अजून समजून घेणे, पत्रलेखन, एकमेकांचे गुण लिहिणे, स्वतः च्या पंच्याहत्तरी वाढदिवसाचे लेखन इत्यादी बरेच काही.
४) मुलांसाठी असे उपक्रम शाळेत राबवणे.
५) याला ७ सवयी म्हणण्यापेक्षा, प्रत्येकामध्ये असणाऱ्या या ७ गुणांची ओळख त्याला असायला हवी हा विचार. (त्या प्रत्येक सवयी विषयी अधिक सविस्तर आणि सोदाहरण लिहिणार आहे)
६) स्वतःचे गुण माहिती झाल्यावर, त्यांचा योग्यप्रकारे उपयोग आणि त्याची सवय बनल्यास होणारा व्यक्ती विकास.
असे अजूनही बरेच असेल पुन्हा विचार करताना नव्याने सापडत जाईल.
पण, या कार्यशाळेने मला नेमके काय दिले..
१) ४ मार्च २०२३ माझ्या प्रिय बाबांनी शरीराने सर्वांचा निरोप घेतला, त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न अगदी आजही चालूच आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी करत असताना या कार्यशाळेत काही गोष्टी नकळत घडल्या.
२) अप्रेझलच्या वेळी मी पुरेशी स्वस्थ नसल्याने अश्विनी मॅडम यांनी माझ्या अनेक नकारात्मक बाजू ऐकवल्या.
ज्या योग्य नाहीत हे मला पूर्ण माहित असले, तरी ते त्यांना पटेल यासाठी काय करायचे याचा रस्ता शोधत होते, एक नाही, अनेक रस्ते सापडले..
३) पहिल्या वर्षी अनुभवलेली CPS Family पुढच्या दोन वर्षात पुष्कळ बदलली, किंवा अनेक गोष्टी हळूहळू बाहेर येत आहेत, त्यात एक नकार बाजू तयार होत होती, त्याची दुसरी बाजू बघायचे राहून जात होते, ते बघायला हवे हे जाणवले.
४) कामाच्या ठिकाणी प्रेरणा नेमकी काय ही माझी भूमिका नक्की आहे, मी एक शिक्षक आहे, म्हणून माझ्यासाठी प्रेरणा नेहमी विद्यार्थीच असतील त्यात गेल्या दोन वर्षात अनेक अडथळे आले होते. ज्यांना पार करताना योग्य उडी घ्यायला जमत नव्हते, त्याची सुरुवात यातून झाली.
५) एकमेकांविषयी लिहा या कृतीत, आपल्या नकळत किती जण आपल्याला पॉझिटीव्ह वाईब, आशीर्वाद देत असतात हे लेखी समजले.
५) एकमेकांना त्यांच्यातले काय आवडते हे सांगा, या कृतीत खूप जणांना जे रोज सांगायला मिळत नाही ते सांगण्याची संधी मिळाली, आणि नकळत घडून गेलेल्या गोष्टींची वाईट वाटले असेल तर माफी मागता आली.
त्यांनी मला माझ्यातल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तेंव्हा छान तर वाटलेच, पण नवीन माहिती पण मिळाली.
७) सुटी घालवायची नाही तर मिळवायची हा लहानपणी शाळेत मनावर कोरलेला संस्कार.
त्यासाठी उत्तम सुरुवात या कार्यशाळेमुळे झाली.
अजून खूप काही आहे, पण सगळच लिहिले तर कंटाळा येऊन जाईल.
(मी माझ्यासाठी नक्की लिहून ठेवले आहे)
पण असा तो शोध त्यात सहभागी प्रत्येकाने घेतला, आणि त्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये दिल्या तर खूप मस्त उजळणी होईल आणि मला छान वाचायला जरुर आवडतील.
अजून एक यातले न पटलेल्या मुद्यांची, जर दुसरी बाजू असेल तर तीही समजून घ्यायला, ऐकायला आवडेल.
(काहींना लिहायला नाही आवडत, त्यांनी ऑडिओ पाठवून किंवा प्रत्यक्ष भेटून सांगितले तरी चालेल)
पुन्हा एकदा..
लीडर इन मी या कार्यशाळेतून खूप काही शिकायला मिळाले, त्यासाठी सिटी प्राईड संस्थेच्या संचालिका विद्या वाचस्पती अश्विनी मॅडम, विद्या वाचस्पती दिपाली मॅडम यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन नियोजन करणारी टीम यांचेही मनापासून आभार मानते.
यात सहभागी होता आले याचा आनंद व्यक्त करुन आणि वेळ घेऊन ७ सवयी यावर लेखन करेन हा शब्द देऊन थांबते.





No comments:
Post a Comment
suggestions most wlcome