मराठी भाषेच्या निर्मिती ते आजमितीच्या प्रवासाची कथा..
संस्कृत वाणीच्या ग पोटी कन्या मराठी जन्मली,
महाराष्ट्राच्या अंगणात खेळली, वाढली..
सर्वांगाने बहरता ज्ञानदात्री मग झाली..
चला मिळूनी अभ्यासू, तिच्या प्रसूतीच्या कळा,
फुलण्याचा एक नेमकाचि थाट..
ज्ञान शिखर चढण्याची, तुम्हा सापडेल वाट..
साहित्याला तिच्या, कसे बहुरंगी ते धुमारे...
अनुभूती येता, बघा तनमन शहारे...
तिच्या अंगी आहे, शास्त्रशुद्ध.. सहजता..
हा प्रवास होईल, आनंदे जाता येता..
बरं का मित्रांनो, आज मी तुम्हाला मराठी भाषेच्या निर्मितीची गोष्ट सांगणार..
मला वाटते, फार फार वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात राहायचा, तेंव्हा तो इतर प्राण्यांप्रमाणे वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी बोलायचा..
त्यातून सर्वात आधी संस्कृत भाषा तयार झाली, व पुढे गरजेनुसार वेगवेगळ्या बोली भाषा विकसित झाल्या..
आपली ही मराठी भाषा, तिला संस्कृत भाषेची कन्या म्हणू या, आणि तिचे मभा हे छोटेसे नाव ठेवू या..
मभाला वाटले, आपली संस्कृत मातृभाषा रोजच्या वापरासाठी सोपी करायला हवी..
मग मभाने संस्कृत उच्चारांचा आधार घेत, पण तरीही सर्वांना जमतील असे उच्चार तयार केले..
त्याचा उपयोग करुन आजूबाजूला दिसणाऱ्या वेगवेगळ्या कृतींना, कामांना, गोष्टींना, वस्तूंना, प्राणी, पक्षी सगळ्याला नव्याने एकेक नाव द्यायला सुरुवात केली..
तिच्याकडे अशा खूप साऱ्या शब्दांचे भांडार तयार झाले..
ते आपल्या आजूबाजूच्या मानवांना शिकविले, हळूहळू सगळे त्याचा वापर करु लागले..
या नव्या वाणीत आपले म्हणणे एकमेकांना सांगू लागले..
सुरुवातीला ती आता पेक्षा काहीशी वेगळी होती, तिचे लेखी दाखले उपलब्ध आहेत, जी आपण प्राकृत मराठी म्हणून ओळखतो.
मभा प्राकृत मराठी अजून सोपे करत गेली, पण त्यात प्रांत, बारा पगड लोक या प्रत्येकाच्या बोलणे, लकबी यातून बऱ्याच बोली भाषा तयार झाल्या, जसे की अहिरणी, कोकणी, मालवणी इत्यादी..
त्यामुळे आता मभाला त्याचे एक निश्चित लेखन प्रमाण रूप करणे आवश्यक वाटू लागले..
त्यासाठी तिने प्रथम त्यावेळी उपलब्ध मोडी लिपीचा उपयोग केला, कालांतराने मात्र आज सर्वत्र बघतो, ती देवनागरी लिपी निश्चिती केली..
संस्कृत भाषाही देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने, त्याचा आधार घेतला..
मुळाक्षरे.. त्याचे स्वर आणि व्यंजन हे दोन गट बनले..
मग स्वरांचे रूप काना, मात्रा, उकार, वेलांटी या चिन्हात बदलून व्यंजनांसोबत त्याची मैत्री करून देत बाराखडी बनवली..
अजून मजा म्हणजे दोन व्यंजनांची मैत्री केली, तर त्यातून जोडाक्षर तयार होऊन ती जोडशब्द लेखनास मदत करू लागले..
शिवाय त्यात रुकार, रफार अशीही अजून काही चिन्हे हे सारेच स्वीकारले.
पुढे जाऊन उच्चार शास्त्राच्या नियमांना धरून, गरजेनुसार नवीन अक्षरांची भरही घातली..
तर काल ओघात काही अक्षरे नाहीशी झाली..
ऌ ञ
या सगळ्या प्रवासातून मराठी भाषेला लिखित स्वरुप अधिक अचूक, प्रमाणबद्ध रूप मिळत गेले..
त्याला अधिक विशिष्ट व तार्किक नियम ठरवून शास्त्र शुद्धता द्यायला, मभा अजिबात विसरली नाही..
अगदी अलीकडच्या काळात पर्यायी मराठी शब्द नसणाऱ्या इंग्रजी शब्दांसाठी, ॲ ऑ हे दोन स्वर आणि त्यामुळे बाराखडी बदलून चौदाखडी मान्य केली..
ज्यामुळे मराठी प्रतिशब्द नसणारे इंग्रजी शब्द लिहिता येऊ लागले..
या सगळ्यावर संस्कृत भाषेचा प्रभाव असला तरी, मराठी भाषेला संपूर्णतः वेगळी ओळख मिळाली, ती म्हणजे सोपी, सहज बोलता येणारी तरीही शास्त्रशुद्ध भाषा..
नुकताच ३ ऑक्टोबर २०२४ रोजी आपल्या केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे 'अभिजात भाषा' दर्जा प्रदान केला आहे, ज्यामुळे मराठीतील प्राचीन साहित्य, संशोधन आणि संवर्धनाला चालना मिळेल ..
अशा या अगदी छान, बहुगुणी मराठी भाषेची थोडीशी ओळख जर, प्रत्येकाने करुन घेतली, तर तिच्याकडे असलेली अफाट माहिती, साहित्य, ज्ञान यांची अनेक भांडारे खुली करण्यासाठी खुद्द देवी सरस्वती आपल्या स्वागतास उभी राहील..
मग करणार ना, अशा या अद्भूत आणि अभिजात माय मराठी भाषेची सफर माझ्यासोबत..
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome