Sunday, May 28, 2023

सावरकर विचार

 आज २८ मे.. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती..


कोणत्याही व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथी निमित्ताने फक्त प्रतिकात्मक  फोटोला हार घालणे, आंतरजालावरून त्यांचे विचार कॉपी करून एकमेकांना पाठवणे, यातून आपण त्यांचे स्मरण करू शकतो का.. ?


अशा गोष्टींना विचारपूर्ण कृतीची जोड नसल्यास, त्यास अवडंबर किंवा सोपस्कार म्हणतात..


त्यांचे विचार आपल्या दैनंदिन कृती वापरणे, याला त्यांचे स्मरण म्हणतात, जे कोणत्याही एका दिवसा पुरते मर्यादित नसतात, हे माझे वैयक्तिक मत आहे..


आणि अशी कृती प्रधानता मला आवडते..


अगदी परवाच, माझ्या लेकासोबत बोलताना विषय होता, सध्याच्या काळात आजूबाजूला अस्वस्थ करणारा जातीयवाद, धर्मांधता आणि त्यात होणारी सामान्य विचारांची ससेहोलपट..

यावर सहज उत्तर मिळाले, स्वामी विवेकानंदानी मांडलेले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या कृतीतून, लेखनातून ठळक केलेले विचार कृतीत आणून, सवयीत रुजवले पाहिजेत..

ज्यात म्हंटले होते की,

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येणाऱ्या काळात, आमचे दैवत फक्त आणि फक्त मातृभूमीच असावी..

आणि आमची ओळख हिंदुस्थानात राहतो, म्हणून हिंदू ही असावी. त्या हिंदुत्वाचे अनेक पैलूही सावरकरांनी त्याचवेळी मांडून ठेवले आहेत..

आत्ता हिंदू या शब्दाची फारच चिरफाड झाल्याने, काही काळासाठी हा शब्द बाजूला ठेवून, त्याला भारतीय म्हणू या, कारण आपण आपल्या मातृभूमीचे नाव भारत हे स्वीकारले आहे..


भारतात राहतो, तो प्रत्येक जण भारतीय आणि त्याचे दैवत फक्त मातृभूमी म्हणजेच भारत..

याला इतर कोणतेही जात, धर्म, पंथ याचे नवीन ठिगळ लावू नये, हेही त्यावेळी सावरकरांनी मांडून ठेवले आहे, जे आजही तितकेच चपखल बसते, व यातून अनेक समस्या अगदी सहज सुटतील हा विश्वास वाटतो..


पण या समस्या सुटल्या तर अनेकांची वेगवेगळी दुकाने बंद होतील, म्हणूनच जाणीवपूर्वक ना या गोष्टी घडतात, ना सावरकरांची साधी तोंड ओळखही आजच्या पिढीला करून दिली जाते..


एकदा मी, एका व्याख्यानात सर्व ऐकून झाल्यावर प्रश्न विचारला की, ज्ञानेश्वरांचे पसायदान नित्य म्हटल्यामुळे असे वाटते, विश्व कल्याणातून फक्त भारत इतका मर्यादित का करायचा..?


त्यावर उत्तर मिळाले, 'विश्व कल्याण तर करायचे आहेच, पण त्याआधी स्वतःला सक्षम बनवणे गरजेचे आहे..

त्याची पहिली पायरी म्हणून उत्तम भारतीयत्व रुजवावे लागेल आणि नंतर साऱ्या विश्वाला सुजलाम् सुफलाम् बनवण्याचे दिवास्वप्न बघता येईल..


त्यावरुन म्हणावेसे वाटते, त्यासाठी आधी सर्वांनी अगदी रोज हे म्हणले पाहिजे की..

 

मी भारतात राहतो, त्यामुळे मी फक्त आणि फक्त भारतीय आहे. माझा धर्म, जात, पंथही भारत आहे, माझे दैवत ही भारतच आहे. 

माझे फक्त भारतावर प्रेम आहे. मला भारतीय असण्याचा अभिमान आहे. आणि तो अभिमान जपण्यासाठी मी अशी कोणतीही कृती करणार नाही, आणि कुणालाही करु देणार नाही, ज्यातून माझ्या प्रिय भारताचे कोणतेही नुकसान होईल.

असा हा सक्षम भारत उद्या जगज्जेता बनून विश्व कल्याणाची जबाबदारी अगदी सहज पूर्ण करेल.


हे म्हणाताना, यातील प्रत्येक शब्दाला साजेशी कृती केली पाहिजे..



पण असे करण्यासाठी वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले पाहिजे, त्याकरता सावरकरांच्या चरित्राचा, कामाचा अभ्यास झाला पाहिजे, उत्तम शाळेत शिकल्यामुळे स्वा.सावरकर या विषयीची भरपूर ऐकले, वाचले होते.. 


त्याबरोबर अनेक तज्ञ व्यक्तींकडून, नाटक, चित्रपट, प्रवचने यातूनही त्यांना समजून घेत असते..

तरीही अजून समजून घेण्यासाठी, मिळणारी प्रत्येक संधी आजही नकळत घेतली जाते..

कितीही केले, तरी अजून काहीच समजले नाही असेच वाटत रहावे, इतके त्यांचे काम अफाट आहे..

 

त्यांची प्रतिभा सूर्यासारखी प्रखर, तेजस्वी आणि निष्कलंक आहे, म्हणूनच त्यांच्यासाठी अनेकांनी स्वातंत्र्य सूर्य असे गौरवोद्गार काढले आहेत..

सावरकरांच्या विषयीची ही एक अनाम ओढ कायम वाटत असते आणि राहील..


त्यातूनच अनेकदा त्यांनी तन, मन, धन सर्वार्थाने दिलेल्या, बलिदानाच्या ऋणात राहावे असे वाटते..

पण असे फक्त ऋणात राहून आपली जबाबदारी झटकता येते का..?

जे स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानाने, प्रयत्नांच्या पराकाष्ठेने मिळविले, ते जपण्यासाठी हवी असलेली घडी कोणत्याही प्रकारे बसवता येत नाही, हे समजल्यावर सावरकरांनी त्यावेळी आत्मत्याग केला, हे वैषम्य सतावत नाही का..?


स्वा. सावरकरांचे मला समजलेले काही विचार, जे आज समाजात दिसणाऱ्या अस्वस्थतेवर उत्तरे वाटतात.. 


त्यावर हे लेखन ही माझी त्यांना आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी आदरांजली..


तुम्हाला हे विचार आवडले, पटले असतील, तर तुम्हीही स्वा. सावरकर अजून समजून घेत, त्यांचे विचार कृतीत आणण्याची सुरुवात आजपासून करु या का..?

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome