मनोगत
भाषा समृद्धी कार्यशाळा - मार्गदर्शक - उल्का पासलकर
आज २४ एप्रिल २०२३ सोमवार रोजी ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल व त्यात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन !
अशा कार्यशाळा नवीन विचार, नव्या दिशा आणि सर्वात महत्त्वाचे नवी ऊर्जा देतात.
सिटी प्राईड शाळेत काम सुरु केल्यापासून अनेक प्रकारचे प्रशिक्षण अनुभवले आणि त्यातून भरपूर माहिती नव्याने मिळवली, पण ज्या भाषा विषयाचे काम करतो, त्याला प्राधान्य देऊन विचार करायला लावणारी ही पहिलीच कार्यशाळा.
या विषयाला धरुन वेगवेगळे मार्गदर्शन, विचारधारा याचा अनुभव या आधीच्या कामाच्या ठिकाणी किंवा आवड म्हणून स्वतः जाणीवपूर्वक अनेकदा घेतला होता.
आज त्यातील अनेक मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित झाले तर काही संपूर्णतः नव्याने समजले.
*अधोरेखित ( जे माहित होते पुन्हा पक्के झाले)*
* भाषा हे विचार व्यक्त करण्याचे माध्यम आहे. ती सहज शिकता येते, आणि ज्याची तोच शिकतो आपण फक्त साधन उपलब्ध करुन देऊ शकतो.
* प्रथम एका भाषेवर ( मातृभाषा) प्रभुत्त्व असल्यास, इतर भाषा लवकर शिकता येतात.
* सगळ्या भाषांना समान दर्जा असतात, अभ्यासक्रमात गरजेनुसार त्याचा प्राधान्य क्रम ठरवावा लागतो.
* भाषा शिकण्यासाठी आधी त्याची आवड निर्माण व्हायला लागते.
* भाषा अभ्यासाची पहिली पायरी भरपूर ऐकणे (ते जितके उत्तम, शुद्ध तितके श्रवण संस्कार परिपूर्ण व त्यातून मिळणारे ज्ञान प्रमाणबद्ध)
ऐकताना नकळत ओठांच्या हालचालींचे, उच्चारांचे अनुकरण केले जाते त्यामुळे बोलणाऱ्याची भाषा शास्त्रशुद्ध हवी.
त्यानंतर किंवा त्यासोबत निरिक्षणातून लिपीची ओळख (वाचता आले नाही तरी, वयोगटाशी संबंधित भरपूर साहित्य नजरेसमोर उपलब्ध असणे)
लिपी ओळख आणि वाचन टप्पा - यात जितकी सहजता, मजा असेल तितकी भाषा आवड निर्माण होते.
बोलणे - हा पुढचा किंवा सोबतचा टप्पा, बोलण्याच्या, अनुकरणाच्या भरपूर संधी असल्यास, आत्मविश्वास वाढतो, चुका होत असल्यास सुधारता येतात, भाषेचे व्यक्त होण्याचे मुख्य उद्दिष्ट साध्य होते.
त्यानंतरचा किंवा शेवटचा टप्पा लेखन
यात पहिला आणि अतिशय आवश्यक टप्पा गिरवणे हाच असला पाहिजे, सतत गिरवून गिरवून मग आपोआप स्वतःचे स्वतः लिहिता येते.
लेखन शुद्धता असायलाच हवी आणि ती अगदी पहिल्यापासूनच. त्यास उत्तम ऐकणे , वाचणे(बघणे) मदत करते त्यामुळे तशी व्यवस्था असायला हवी.
(वेळेअभावी याविषयी पुरेशी माहिती नाही मिळाली)
* भाषा शिकण्याची गरज, त्यातल्या अर्थार्जनाच्या संधी.
* रोज आपल्या विषयाचा थोडातरी नवा अभ्यास हवा (वाचन, श्रवण, निरीक्षण इ. व जमल्यास त्याची लेखी नोंदही )
नव्याने समजले
सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला अजून जे खूप काही शिकायचे आहे, त्यासाठी कोण सहकार्य करु शकेल.
मराठी भाषा ही संपूर्णतः उच्चार आधारीत नाही, उच्चार अनेकदा व्यक्तीसापेक्ष बदलतात. त्यामुळे ऐकून बरोबर लिहिता आलेच पाहिजे असे ठामपणे सांगता येत नाही.
मराठी भाषेत शुद्धलेखनाचे असे साधारण सतरा ते अठरा नियम आहेत, की जे समजून घेतल्यास बऱ्यापैकी प्रमाणबद्ध लिहिता येते.
भाषेत काम करताना, तिची संस्कृती ती वापरणाऱ्या लोकांची संस्कृती याचाही अभ्यास करायला हवा.
या सगळ्यातून पुढील काम करताना काय नव्याने करता येईल, काय करायला नको यासाठी विचार व्हायला आणि कृती झाली तरच कार्यशाळा फलदायी होईल. बदल एका दिवसात अपेक्षित नक्कीच नाही, पण तशी मानसिकता आणि किमान सुरुवात तरी व्हायला हवी.
बदल हे करावे लागतात, त्यासाठी चालत आलेल्या पद्धती, परंपरा मोडव्या लागतात, त्यासाठी तयारी हवी, ही प्रेरणा मिळाली.
हे सगळं मला जे समजले ते मांडले ते कदाचित बरोबर असेलच असे नाही, जे चुकीचे असेल ते दुरुस्त करायला नक्कीच आवडेल.
सकाळी दहा ते दुपारी साडेतीन (मध्ये अर्धा तासाची विश्रांती ) सुमारे पाच तास अगदी साध्या, सोप्या आणि अस्खलित मराठी भाषेत उल्काताई पासलकर यांनी हे सारे सार त्या हृदयीचे या हृदयी पोहचवले.
त्यांची अतिशय हळूवार, पण ठामपणे असणारी मांडणी प्रत्येक गोष्टीवर पुन्हा विचार करायला हवा हे सुचवत राहिली.
बोलणे, लिहिणे यातल्या चुका नेमक्या काय परिणाम करतात, याची त्यांनी दिलेली उदाहरणे कधी मनमोकळे हसवत होती, तर कधी अस्वस्थ करत होती.
एकूणच अतिशय हसत खेळत अनुभवलेली आजची पाच तासांची कार्यशाळा कधी संपली, हेही कळलं नाही.
ही फक्त झलक आहे, या विषयात कराल तेवढा अभ्यास कमी आहे हा त्यांनी दिलेला विचार कृतीत आणण्याचा नक्कीच प्रयत्न असेल इतक सांगून थांबते.
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome