Wednesday, May 05, 2021

सांताक्लॉज




सांताक्लॉज आणि मी



२५ डिसेंबर - ख्रिसमस - नाताळ

गेल्या आठवड्यापासूनच आपण हे सण का साजरे करतो, ते आपले सण करतात का....? असे विचार सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून येऊन आदळू लागले.


मी म्हणजे दोन टोकाची भूमिका (अतिरेक असेल कदाचित) असलेल्या पिढीमधली पिढी. 


एक जीने आधीच्या पिढीकडून पारतंत्र्याच्या तेही स्वानुभवाच्या भीषण गोष्टी ऐकल्या व त्यामुळेच परकीय संस्कृती वाईट, चूक, स्वैराचारी असेच ठाम मत बनवलेले.... ( चूक नसेलही)


आणि दुसरी आजची पिढी, जी जन्माला आली तेच ग्लोबलायझेशनच्या युगात... जिथे स्वतःच्या प्रगतीसाठी देशांच्या सीमा या फक्त कागदोपत्री राहिल्या.... शिक्षण, नोकरी, व्यवसाय यानिमित्ताने सर्व विश्वात भ्रमंती चालू झाली. साहजिकच भाषा, संस्कृती सगळ्यांचे आदानप्रदान सुरु झाले तेही नकळत.... मग त्यांचे सण, खाद्यपदार्थ साहजिकच आवडू लागले. त्याची मागणी होऊ लागली. आणि त्यात काहीच चूक नाही असे या पिढीला वाटते किंवा ती यावर विचारच करु इच्छित नाही...


मी आधीच म्हणले, त्याप्रमाणे मी या दोन्हीच्या मधली पिढी. 

मला कोण बरोबर किंवा चूक ठरवता येत नाही... आणि दोन दगडांवर तोल सावरताही येत नाही...

मग आधी सुरु होतो विचारांचा गोंधळ, नंतर हळूहळू मंथन आणि अंतिम असे वाटते की जर याचा समतोल साधला नाही तर काही खरं नाही....

मला या दोन पिढ्यांमधला दुवा व्हायला हवं....

शिक्षण, व्यवसाय यासाठी वैश्विक भरारी घेताना परकीय संस्कृतीच्या चांगल्या गोष्टी मी मनापासून स्वीकारायला हव्या आणि वायफळ खर्च, स्वैराचार, व्यसनाधीनता यापासून मात्र स्वतःला आणि पुढच्या पिढीला सांभाळायलाही हवे.

म्हणूनच जेंव्हा नाताळ येतो, तेंव्हा.... 

लहान मुलांनाच का पण मोठ्यांनाही आवडेल असा एखाद्या गुबगुबीत बाहुल्यासारखा  असणारा, लाल-पांढरे कपडे घालणारा, मोठी पांढरी दाढी असलेला आणि सगळ्यात महत्वाचे खूप साऱ्या भेटवस्तू, खाऊ देणारा गोंडस आजोबा असणारा सांताक्लॉज मला मोहिनी घालतो.

या निमित्ताने येणारे केक, चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थही आवडतात.

( आपण आपल्या सगळ्या सणांनाही गोड पदार्थ करतोच की फक्त कशाचाही अतिरेक नको.)

सांताक्लॉज आवडण्याची अजूनही कारण म्हणजे तो वयाने खूप मोठा म्हणजे आजोबाच पण त्याला अहो-जाहो करण्याची गरज नाही. एकेरीमुळे अगदी जवळचा. फक्त निखळ आनंद, मजा-मस्ती, गमतीजमती, खाऊ, खेळ देणारा. परीकथा, कल्पना याला खरं ठेवणारा. अगदी निरागस. 

वर्षात एकदाच येणार, त्यासाठी वर्षभर वाट पहावी लागणार. त्याच्याकडे काय मागायचे याची मोठी यादी बनवून ठेवायची, पण पूर्ण नाही झाली तरी नंतर कधीतरी होईल हा आशावाद, विश्वास मात्र तसाच असतो. 

आणि शिवाय....

माझ्यातले लहानपण मला परत देतो, 

आनंदाने नाचायला, गायला, हसायला लावतो....

म्हणूनच....

मला सांताक्लॉज खूप आवडतो.

आणि मी त्याचा मनापासून स्वीकारही करते.

दरवर्षीप्रमाणे तो याही वर्षी खूप आनंद, 

थोडासा विरंगुळा घेऊन येवो, हीच सदिच्छा !

( पटलं तर घ्या, नाहीतर माझे मत माझ्याजवळ... )

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome