Sunday, May 09, 2021

काळ सोकावतो


लेकाचा अभ्यास, म्हणीचा अर्थ.. 
त्यातून शिकावी, अशी दैनंदिन जगण्याची कला..

शाळेत असताना भाषा समृद्ध होण्यासाठी म्हणी लिहा, त्यांचा अर्थ सांगा, अर्धी म्हण पूर्ण करा, त्यावरुन गोष्टी लिहा असे खेळ खेळायची, खूप मजा यायची..

आज साहित्यात रमताना ही मजा थोडीही कमी झाली नाही.. 

या म्हणी भाषेत कोणी बरे सुरु केल्या.. 

याची काहीच माहिती नाही की कोणते उल्लेख नाही.. 

या म्हणी भाषेला प्रचंड समृद्ध करतात..

अशी अलंकारीक भाषा आपल्याला समजते, याचा आनंद आणि अभिमान वाटतो..

कोणती म्हण कधी, कोणामुळे जन्मली हे माहीत नसले तरी, आजही तिचा मतितार्थ चपखल अनुभवास येतो, तेंव्हा ते पचवणे मात्र फार जड जाते,_ _ हो ना..?

हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, त्याचे असे झाले की..

म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो..

त्याचा अर्थ काय हे विचारत, इंग्रजी माध्यमात शिकणारा माझा लेक आला..

आता त्याला नीट समजेल असे सांगणे, ही माझी परीक्षा होती.. 

मग मदतीला धावली गोष्ट...

एक आजी होती_ _ तिला दोन मुले, सुना, नातवंड_ _घरात भरपूर संपत्ती, ऐश्वर्य पण आजी खूप कडक.... कंजूस.. सारखी चिडचिड करणारी... सगळे तिच्या वागण्याला वैतागले होते.. आजीचे वय तर झाले होतेच.. त्यात छोट्या आजाराचे निमित्त.. आजी आजारी पडली..  वारली.... मुले-सुना-नातवंड खूष.. वाट्टेल तसे वागायला सुरुवात.. पैशाला अनेक वाटा मिळाल्या.. त्यावरुन वाद होऊ लागले..  याचा फायदा इतर लोक घेऊ लागले.. मानमरातब, संपत्ती सगळे ओसरत गेले (काळ सोकावला).. वाताहात झाली.. होत्याचे नव्हते झाले.. आता सर्वांना आजीची, तिच्या तत्त्वांची आठवण झाली.. पण उपयोग काहीच नव्हता..

लेकाला गोष्ट समजली, म्हणीचा गर्भित अर्थही समजला.. 

गोष्ट ऐकणे तर एकदम धमाल..

अभ्यास तर झाला, पण माझ्या डोक्याला उगाच भुंगा लागला..

खरंच वेगळ्या प्रकारे अर्थ मांडणी, भाषा समृद्धी इतकेच असेल का म्हणी मागे..

विद्यार्थी दशेत उत्तर हो इतकं....

पण मोठे झाल्यावर, आपण असे अनुभव प्रत्यक्ष घेतो, तेव्हा काय करतो..

मरणच काय पण कोणतीही घटना, आपल्या हातात नसते.. 

फार तर थोडे प्रयत्न करुन, प्रत्येक जण आजचे मरण उद्यावर ढकलत राहतो..

पण त्यानंतर काय..?

रोजच काळ कधी सोकावेल याची वाट बघत रहायचे..?

याचे खूप सुंदर वर्णन संदीप खरे करतो, 

मी मोर्चा नेला नाही,
मी संप ही केला नाही,
मी निषेध सुद्धा साधा,
कधी नोंदवलेला नाही..

आणि हे गाणे ऐकल्यावर क्षणात आलेले आईचे शब्द आठवले..

तिला हे गाणे कधीच आवडले नाही..

ती म्हणते कोणीही असे, काहीही न करणारे असूच नये..

तिचे आवडते गाणे (पुन्हा संदीप खरे)

नामंजूर_ _ नामंजूर_ _ नामंजूर_ _

जपत किनारा शीड सोडणे, नामंजूर
अन् वाऱ्याची वाट पाहणे, नामंजूर
मी ठरवावी दिशा, वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर झुलणे, नामंजूर..

हे आवडते कारण..

यात कोणतेही कर्तव्य, कोणीही चुकवत नाही, चुकीचे वागत नाही..

शिवाय परिस्थितीला शरण जाण्याची तयारी नाही, तर प्रवाहाविरुद्ध जाऊन प्रश्न सोडवण्याची तयारी यात आहे..

थोडक्यात सांगायचे तर.. 

जे मला पटणार नाही, योग्य नसेल तिथे मी नक्की बोलणार, इतरांना सांगणार..

आजीच्या गोष्टीप्रमाणे, काळ सोकावत आहे, हे मी बघत राहणार नाही.. 

असे झाले तरच, ती म्हण मला सर्वार्थाने कळली असे म्हणता येईल..

ती म्हण माझ्या मनात विचार बनून  झिरपेल..

त्यानुसार जर जगायला शिकले, तरच ती म्हण लक्षात घेतली म्हणता येईल..

बरं, हे सगळे फक्त माझ्याशी संबंधित असल्यावर मी करणार का..? 

तर तेही चालणार नाही..

मग पसायदान ऐकण्याचा, म्हणण्याचा उपयोग तो काय..?

थोडक्यात सांगायचे तर, एक वेळ मला म्हण शिकवता आली नाही, पूर्ण करता आली नाही, चित्रावरुन ओळखता आली नाही, त्यावर गोष्ट रचता आली नाही तरी चालेल..

पण ती जगता आली तरच, ती तयार होण्याची गरज सार्थकी लागेल.. 

असे गुण माझ्या अंगी येण्यासाठी यापुढे मी नक्की प्रयत्न करेन..

या निश्चयाने विचारांचा एक भुंगा थांबला..

आणि मी असे खरचं जगू शकते का..? 

चुकीचे घडलेले दिसल्यास त्याविरुद्ध बंड पुकारुन लढू शकते का..?

या विचारांचा दुसरा भुंगा लागला..

कुठून लेकाचा अभ्यास घेतला, असे झाले अगदी..





No comments:

Post a Comment

suggestions most wlcome