माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स
यावर मी बोलण्यापेक्षा, माझे शिक्षक वा पालक छान सांगतील..
कारण ते त्यांनीच जास्त अनुभवलेले असते..
म्हणूनच मी असाच अनुभव, एक शिक्षिका, बालचमूची ताई, म्हणून सांगणार आहे..
वर्ष २०१६ च्या स्नेहसंमेलनात नाटक बसवायचे ठरवले..
सादर करणारे कलाकार, वय वर्षे तीन ते चार या वयोगटाचे..
इतकी लहान मंडळी, आई-बाबा, नातेवाईक, मित्रमंडळी समोर बसलेले असताना, ऐनवेळी काय करतील हे सांगणे महाकठीण..
पण प्रत्येक वर्षी नवीन काही केले नाही, तर काय मजा..
मग कसले शिक्षण आणि कसले आपण शिक्षक...
असा विचार मनात येऊन, हा प्रयोग करुन बघायचा चंग बांधला..
आधी नाटक लिहिणे, अभिनयाचे उपजत गुण दिसणाऱ्या मुलांची निवड करून, संवादाची चिठ्ठी घरी पाठवून देणे, पालकांना पाठांतर करुन घ्यायला सांगणे, मग एकत्रित सराव घेणे, ही आधीपासून वापरली जाणारी परंपरा मोडीत काढली..
सर्वात आधी गोष्ट निवडली..
ती अतिशय मनापासून, रंगवून मुलांना अनेकदा सांगितली. त्यांना ती समजली, आवडली..
आणि मग साहजिकच ती गोष्ट आपोआप इतकी झिरपली, की वर्गातल्या सत्तर टक्के मुलांची पाठच झाली..
मग गोष्टीतल्या पात्रांना साजेशी, अभिनयाची मुळातच आवड, चुणूक ज्यांच्यात जाणवते अशी कलाकार मंडळी निवडली..
त्यांना त्यांचे पात्र, संवाद समजावून सांगितले..
हळूहळू सराव सुरु झाला..
गोष्टीमधली वाक्य मुले, त्यांच्या आवडीनुसार, बोलण्याच्या सवयीनुसार बदलत होती, ते पूर्ण स्वातंत्र्य त्यांना दिले होते..
फक्त विषय व आशय बदलणार नाही, इतकीच काळजी घेतली..
हळूहळू मुलांची गोष्टीचे नाटक सादर करण्यावर छान पकड बसत होती, त्यात सराईतपणा दिसू लागला..
आनंदाने मूठभर मांस चढले..
यावर्षी काहीतरी वेगळे करणार, म्हणून उत्साह वाढला..
प्रयोग छान जमला आहे, या आनंदात अनेकांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले...
इकडे सराव करताना मात्र, नाटकाची गंमत कमी होऊ लागली..
आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे उत्तम समजल्यावर या बालचमूंचा, त्यातला रस संपला, मग त्यांनी आपल्या बाललीलांची उधळण सुरु केली..
शेवटचे तीन- चार सराव प्रत्यक्ष स्टेजवर झाले, तेव्हा तर या मंडळींनी स्वतःचे संवाद नसताना विंगमध्ये चक्कर मारली..
खाली बसून, लोळून घेतले, मारामारी केली..
आता कसे होणार?, याची खूप चिंता वाटू लागली..
त्यावर उपाय म्हणून कधी कौतुक, कधी खाऊ तर कधी ओरडा असे उपाय करून पाहिले, तेही विशेष लागू पडेना..
कार्यक्रमाच्या आदल्या रात्री, तर झोपच आली नाही..
प्रत्यक्ष नाटक करण्यासाठी मंडळी माईक समोर उभी करताना, मनात प्रचंड धडधडत होते..
त्यात भर म्हणजे, आज सगळे बाळगोपाल, पात्रांच्या वेशभूषेत होते..
त्यामुळे ही कलाकार मंडळी, अजून काय, काय करामती दाखवणार, याचे दडपण आले होते..
ठरल्याप्रमाणे नाटकाची सुरुवात, माझ्या निवेदनाने होणार होती..
मुलांना उभे करुन मी समोर जाऊन बसायला रोजच्या पेक्षा थोडा जास्त (काही सेकंदाचा) वेळ लागला..
आणि...
.
.
.
..
..
..
..
...
...
..
..
..
..
..
..
.
.
..
...
...
...
....
....
..
..
...
...
मला माझ्या निवेदनाच्या ओळी ऐकू आल्या..
बहुदा मी विसरले असे वाटून, त्यांच्यातल्याच एका चिमुरडीने सुरुवात केली होती..
क्षणात सारे दडपण दूर झाले, आणि आभाळ फक्त दोन बोटे उरले..
मग मात्र माझ्या रोजच्या शिक्षिका, मुलांची ताई अशा सगळ्या भूमिका बाजूला ठेवल्या..
आणि पुढची जवळपास पंधरा मिनिटे, फक्त एक रसिक प्रेक्षक बनले..
माझे विद्यार्थी कलाकार सादर करत असलेल्या कलेचा मनसोक्त आनंद घेतला..
गेले पाच-सहा दिवस आपल्या खोड्यांनी मला हैराण केलेल्या, या कलाकारांनी नाटक अतिशय उत्तम वठवले..
मस्ती नाही, गडबड नाही...
रंगमंचावर त्यांचा सहज वावर, भन्नाट सादरीकरण या साऱ्याला प्रेक्षकांच्या टाळ्यांची मनमुराद दाद मिळत होती..
साहजिकच रंगत हळूहळू वाढत होती..
ठरल्याप्रमाणे, धन्यवाद..! म्हणत समारोप करुन, ही मंडळी, विशेष काहीच केले नाही, या अविर्भावात विंगेत पळाली..
त्या सादरीकरणाने मुलांना काय दिले, शिकविले हे माहित नाही..
पण मला मात्र विश्वास मिळाला की इतक्या लहान वयाची मुलेही एकमेकांशी जुळवून घेत, उत्तम व्यक्त होऊ शकतात..
आणि गंमत म्हणजे, त्याचे सगळे श्रेय, कौतुक माझ्याच खात्यावर जमा झाले..
तर मग...
आता तुम्हीच सांगा, असे पहिल्यांदा मुलांसाठी केलेले वेगळे प्रयत्न, हे त्यांच्यासोबतच, माझेही पहिलेच स्टेज परफॉर्मन्स ( रंगमंच सादरीकरण ) नाहीत का...?
नंतर पुढेही..
ताई तुम्ही केले, तुमच्यामुळे मुले शिकली, त्यांना संधी मिळाली..
वगैरे वगैरे... गोष्टींनी हुरळून न जाता..
स्वतःला फक्त एक मार्गदर्शिका समजत राहिले..
पण असे प्रयोग करण्याने माझी वाढ, प्रगती होणार असेल, तर यात खंड पडून चालणार नाही, हे ओळखून, दरवर्षी नाटक बसवण्यास सुरुवात केली..
तेच अनुभव पुन्हा पुन्हा येत राहिले..
आता सरावाच्या मधल्या दिवसात मुलांचा दंगा मला टेन्शन देत नाही, तर अजून अजून नवे प्रयोग करण्याचा उत्साह देतो..
त्यातूनच प्रेरणा घेऊन, प्रत्येक वर्षी याच वयोगटासाठी दिपनृत्य, पपेट शो, प्रांतीय भाषा, संगीत सभा, शांत-भावगीत गाण्यावर नृत्य अशी विविध आव्हाने घेऊन पाहिली..
आणि माझ्या या दोस्तांनी ती नेहमीच लीलया पेलली...
अर्थातच त्यातून माझे नवीन प्रयोग करुन बघणारे खाते फुलत राहिले..
कौतुक जमा करत होते, आहे आणि राहील...
सादर मुले करतील, मी रसिक प्रेक्षक म्हणून मनसोक्त आनंद घेईन...
आणि तरीसुद्धा...
दरवेळी हा माझाही पहिलाच स्टेज परफॉर्मन्स असे म्हणत, मिरवत राहील...!




खूप छान लेख आहे ताई,मुलांकडून सराव करून घेताना तुम्ही मुलांच्या व मुले तुमची कधी होतात कळतंच नाही.
ReplyDeleteमनापासून आभार !
Deleteखरंय छोट्या मुलांचे कार्यक्रम बसवून सादर करेपर्यंत एक मोठे आव्हानच असते.पण हे सर्व करताना तुम्ही मुलांच्या व मुले तुमची कधी होतात कळतंच नाही.छान लेख आहे.
ReplyDeleteमनापासून आभार !
Deleteआपल नाव नाही समजल..?
मनापासून आभार !
ReplyDeleteहे प्रत्यक्ष अनुभवताना खूप आनंद अनुभवलाय
ReplyDeleteखूप प्रेम ♥️♥️♥️♥️
मनापासून आभार !
Delete