Tuesday, May 04, 2021

मित्र

  पिसाने दिला मित्र


चंपकवनातला पिटू उंदीर सगळ्यांचा लाडका. कधी कुणाला त्रास देणार नाही की कुणाशी भांडणार नाही. उलट कुणाला मदत हवी असेल तर सगळ्यात पुढे हाच असणार. 

त्याला एक आवड होती. पक्ष्यांची पिसे जमवण्याची... पण त्यासाठी त्याने कोणत्याही पक्ष्याला, कधीही त्रास दिला नाही बरं का. जंगलभर फेरफटका मारुन आपोआप गळून पडलेली पिसे तो गोळा करायचा. आधी असलेले पिस तो सहसा परत घेत नसे. त्याच्याकडे चिमणी, मोर, कावळा, पोपट, इतकच काय पण घार, घुबड, गरुड यांचीही पिसे होती. ती त्याने घरात छान मांडून ठेवली होती. त्यामुळे घर खूप सुंदर दिसायचे. 

एकदा काय झाले, पिटूला एक खूपच सुंदर चिंतामणी रंगाचा पक्षी दिसला. हा पक्षी चंपकवनातला नव्हता. पिटूला त्याचे पिस हवे होते. तो गुपचूप त्याच्या मागे मागे जाऊ लागला. एका ठिकाणी तो पक्षी दाणे टिपण्यासाठी जमिनीवर आला. बराच वेळ झाला तरी तो उडेच ना. नंतर तर काही वेळाने विचित्र आवाजात ओरडूही लागला. त्याच्या आवाजात भिती होती. दुःख होते. पिटूला काळजी वाटली. तो घाबरत घाबरत त्याच्याजवळ गेला तर त्याला दिसले...


तो बिचारा चिमुकला जीव शिकाऱ्याने लावलेल्या जाळ्यात अडकला आहे. पिटूने त्याला धीर देत आपल्या अणकुचीदार दाताने जाळे कुरतडले. मोकळे होऊनही पक्षी उडेना. नीट पाहिल्यावर पिटूला दिसले की, त्याचे पंख जाळ्याच्या धारधार धाग्यांनी जखमी झाले आहेत. 

मग पिकू त्याला आपल्या घरी घेऊन गेला. मलमपट्टी केली. त्याची विचारपूस केली, पाहुणचार केला. त्याला बरे व्हायला दोन दिवस लागले. त्यात दोघांची छान गट्टी जमली. पक्ष्याचे नाव होते, खंड्या. तो दुसऱ्या जंगलातून इकडे आला होता. परिसर नवीन असल्याने आणि नीट लक्ष न दिल्याने जाळ्यात अडकला. पण पिटूमुळे संकटातून सुखरुप सुटला. 


खंड्याला पिटूची पिसांची गंमत खूपच आवडली. खंड्याने घरी परत जाताना आपले एक छानसे पिस पिटूला आठवण म्हणून दिले. शिवाय आपल्या जंगलातल्या इतर पक्षी मित्रांची पिसे देण्याचे वचनही दिले. कुणाच्याही मदतीला धावून जाणे आणि पिसे जमवण्याची आवड यामुळे पिटूला नवा मित्र मिळाला.

आजही खंड्या चंपकवनात येतो आणि येताना पिटूसाठी एखादे छानसे नवे पिस आठवणीने आणतो.


link -  https://youtu.be/RtU8nBnpFVE 

वरील link मधील कथा उडण्याची इच्छा असलेला ससा आणि जखमी पक्षी यांची आहे.


No comments:

Post a Comment

suggestions most wlcome