Tuesday, May 04, 2021

पुस्तक परिचय

 ब्लॅक_ब्यूटी 

लेखिका - अँना सिवेल... अनुवाद - स्मिता लिमये.


ही एका घोड्याची आत्मकथा आहे. प्राचीन काळापासून जगभरच्या संस्कृतीचा भाग व मानवाचा लाडका प्राणी घोडा. बुद्धीने तल्लख, प्रेमास उत्तम प्रतिसादी आणि ईमानी.

प्राणी जीवनावरील सर्वात यशस्वी कादंबरी.

घोडागाडीचे काम करणाऱ्या कथेच्या लेखिकेला या प्राण्याविषयी कमालीची आत्मीयता. आजारपणावर उपाय म्हणून घोड्याची आत्मकथा लिहिण्याच्या कल्पनेतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.

पाळीव प्राण्यांना उत्तम मालक मिळाल्यास मरणासन्न अवस्थेतून बाहेर येऊन दीर्घायुष्य कसे मिळते हे या कथेत भावपूर्ण गुंफले आहे.

कथेचा शेवटाकडे येताना घोड्याला एक नवा चांगला मालक मिळतो. मरणासन्न होत आलेला ब्लॅक ब्युटी पुन्हा एकदा धट्टाकट्टा होऊन वीस वर्षे अधिक जगतो. यातूनच पाळीव प्राण्यांची काळजी, या विषयीचे अनेक संदर्भ लेखिका मांडते.

पुस्तकात मला भावलेल्या गोष्टी

● पाळीव प्राण्यांचे जीवन व त्यांचे प्रश्न याची कथारूप मांडणी. 

● पाळीव प्राणी जीवनातील छोटे छोटे बारकावे.

 ● स्मिता लिमये यांनी अतिशय सुंदर केलेला अनुवाद.

● पाळीव प्राण्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन.

● लेखिकेच्या लेखनाची एक वेगळीच शैली... घोड्याच्या जागी  स्वतःला ठेवून केलेले लिखाण.

● थोडक्यात प्राणी प्रेमिकांनी जरुर वाचावे असेच हे पुस्तक आहे.

@@@@@@@@@@@@@@@@@



वन फुट रॉन्ग 

लेखिका :- सोफे लगुना.... अनुवाद :- सुनिती काणे.



'वन फुट रॉन्ग' हे नाव देताना लेखिकेने रुपक अलंकार अचूक वापरला आहे. 

कधी शारीरिक तर कधी मानसिक कमतरता घेऊन जन्माला येणे, यात त्या जीवाचा खरे तर काहीच दोष नसतो...

पण गाढवाच्या गोष्टीतला समाज हा जणू इतरांना त्रास देण्याची भूमिका चोख बजावण्यासाठीच असतो. अशावेळी अतीव दुःख, वेदना, समस्या आल्या तरी, सुखी होण्याची जिद्द लेखिका कथेच्या माध्यमातून आपल्याला देते...

बाहेरचं जग निषिद्ध होतं, 
तिथे जाणं धोक्याचं होतं, 
कारण, 
कुठे थांबायचं हे सांगण्यासाठी,
तिथं भिंती आणि छत नव्हतं.

पुस्तकाच्या नावा सोबतच त्यातील या ओळी पुस्तकाविषयी खूप काही सांगतात. हे एका मतिमंद मुलीच्या सत्यकथेवर आधारित आहे...

पूर्ण कथा लेखिकेने, त्या मुलीच्या भाषेतच प्रभावीपणे मांडली असल्याने अधिक भावते...

अशा व्यक्तींचा, कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, हा सामान्य व्यक्तीपेक्षा नक्की वेगळा असणार हे यातून प्रकर्षाने जाणवते... 

या व्यक्ती इतर माणसांची मैत्री करण्याऐवजी वस्तू, प्राणी यांना जवळ का करत असतील...?

यामागची भूमिका, लेखिकेने न लिहिताही समजते, आणि विचार ही करायला लावते...

समाजाचे घटक असलेल्या या लोकांना, असेही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यात इतरांकडून होणारी अवहेलना, शारीरिक छळ, याबरोबर अनेकदा लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो. ही सारी दुःख अनेकदा, अगदी जवळ असणाऱ्या व्यक्ती देतात, त्यात आई-वडिलांचाही समावेश असतो... हे वाचताना हृदय पिळवटून निघते...

यातील अनेक प्रसंग सांगताना, लेखिका अतिशय तरल शब्दांमध्ये मुलीची कैफियत मांडते...

कथेचा शेवट खूपच वेगळा आहे. अशाच प्रकारच्या व्यंगाला सामोरे जाणारी एक मैत्रीण नायिकेला मिळते. मग या दोघी मुली, एकमेकींचा आधार बनतात, निषिद्ध वाटणारं जग आपलंस करतात, हे फारच सुंदर पद्धतीने सांगत कथा संपते...

कथा संपताना आपण ज्या समाजाचा घटक आहोत, तिथे आपण कसे वागायला हवे, अशा व्यक्तींसाठी काय करायला हवे, हे नकळत दाटून आल्याशिवाय राहत नाही...

जर मी यातील दोषी घटकांमधील एक असेल तर, कदाचित मीच वन फुट रॉन्ग नाही ना, हेही मनात आल्याशिवाय रहात नाही...

हे सारं थेट न लिहिताही समजते याचे श्रेय उत्तम लेखन व तितकाच सहज अनुवाद याला आहे...

पुस्तकातील मला भावलेल्या गोष्टी....

★ प्रचंड दुःखातही जागृत असलेला आशावाद आणि सकारात्मकता.

★ अशा प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या मुलांना, गिफ्टेड चाईल्ड असे का म्हणावे याचा नवीन दृष्टिकोन.

★ ते सामान्य नसले तरी, निषिद्ध नाहीत, त्यांची कीव करण्याचीही गरज नाही, ते स्वतःसाठी आणि त्याचबरोबर इतरांसाठीही खूप काही करु शकतात हा विचार.

★ वेगळाच आणि अनपेक्षित शेवट कदाचित नवी सुरुवात.

★ प्रभावी आणि वेगळ्या शब्दांची सहज, सुंदर भाषाशैली.

★ उत्तम अनुवाद. मराठी भाषेला अधिक समृद्ध करत भावनिक आंदोलनांची, सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन देणारे लेखन.

थोडक्यात जरुर वाचावे... इतरांना वाचण्यास सांगावे...

असे हे पुस्तक, माझा भावनाकोश समृद्ध करुन गेले, हे आवर्जून नोंदवावेसे वाटते...


@@@@@@@@@@@@@@@@@@@@


बिचारी बालके....ताराबाई मोडक


१९४५ साली लिहिलेल्या या पुस्तकाच्या एकूण चार वेळा आवृत्ती निघाल्या. तरीही बऱ्याच गोष्टी आजही लागू होतात ही गमतीची की खेदाची कोण जाणे... यातल्या सगळ्याच गोष्टी खूप सरळ, बोली भाषेत आणि अनुभवांनी भारलेल्या आहेत. त्यामुळेच कदाचित थेट पोहचतात. घरातल्या संरक्षित वातावरणातून, शाळेच्या नवख्या वातावरणात मूल सर्वप्रथम बालभवनमध्ये येते. बालवाडी ताईकडे मूल एक मोठी बहीण म्हणून बघते, पण तो स्वीकार होण्यासाठी तिला, त्याच्या बालसुलभ मानसिकतेचे नेमके कोणते पैलू माहिती हवे... हे या पुस्तकात गोष्टीरुप आहे. एका बैठकीत पूर्ण होणारे, ६२ पानी पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. प्रत्येकाने म्हणण्यामागे कारण की आपण या वयोगटाला शिकवणारे, वाढवणारे असो वा नसो... लहान मूले आपल्या आजूबाजूला वावरत असतातच. त्यांना समजून घ्यायला, त्यांच्याशी संवाद साधयला यातील गोष्टी नकळत दिशा देतात. कवितारुपी अर्पणपत्रिका मला कळसाध्याय वाटतो. सदैव नजरेसमोर असावा असा. यातील उरलेली दोन पुस्तके आमचे घर, बालकांचा हट्ट हेही आता वाचणार आहे.
एकूण पंधरा चिमुकल्या गोष्टी वाचायला सुरुवात करुन कधी संपल्या ते कळतही नाही. त्यातून समवयस्क मुलांचा सहवास, आवडीची कामे करण्याचा कल, बालशाळांची गरज, उपजत नीटनेटके, सर्व कामांना सारखाच दर्जा, स्वावलंबन, अनुभवांचे शहाणपण, दुखावणारे प्रसंग-आठवणी, हसत्या खेळत्या वातावरणाची ओढ, नकळत अनुकरण-शिक्षण, वस्तूरुपी आधाराची गरज,खोड्या काढण्याची वृत्ती, उपजत गुण, समाजिकतेची खोटी बंधने नाकारण्यास प्राधान्य, न्यून पूर्ण करण्याचे स्व उपाय अशा बाल मानसिक गुणांची सहज आणि गोड शब्दांच्या मांडणीतून ताराबाई अनेकदा भावूक करतात. कृष्णाची काठी, मास्तरांना बुडवू या, बन्याचा आणि मिनाची बॅग या गोष्टी मला शिक्षकांच्या डायरीत लिहिलेल्या आणि आचरणात रुजलेल्या असाव्यात असे वाटते.


 
मुलांचं मूलपण जपणं हेच खरं शिक्षण. शरीराने, अनुभवाने, भावनेने, कृतीने त्याला नक्की वाढू द्या, यासाठी सहकार्य करा. मुलांना माणूस म्हणून मोठे करताना, वाढवताना त्याचे निरागस मन मात्र सदैव लहानच राहण्यासाठी प्रयत्न करा, तरच त्याला स्वतःहून सतत वाढण्याची ओढ राहील असेच काहीसे ताराबाई सुचवू बघत आहेत असे वाटून गेले. आज त्यांच्या शब्दातून त्या मला भेटल्या, हे मी माझे सौभाग्यच समजते.


*****************************

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome