संध्याकाळ झाली होती. ती दुपारपासून पांघरुण गुरफटून झोपली होती.
थोडेसे पांघरूण बाजूला करत, त्याने कपाळाला हात लावला. चटका बसावा इतके ते गरम होते.
"थोडेसे काहीतरी खाऊन, औषध घेतेस...?" त्याने आर्जव केले.
तीही उठली, अगदी यांत्रिकतेने थोडा भात खाऊन, औषधही घेतले, आणि पुन्हा एकदा स्वतःला उबदार पांघरुणात गुरफटून घेतले.
रात्री सोबत तापही सरला...
नवा दिवस सुरु झाला, पण शरीर अजूनही स्वतःचे लाड व्हावे याच तोऱ्यात होते...
अंथरुणातून उठावेसेच वाटत नव्हते...
पण तसे करण्याची तिला, ना सवय होती, ना आवड...
त्यामुळे ती उठली, स्वयंपाक घराकडे वळली...
नेमके काय करावे, कुठून सुरुवात करावी...,
यात अडकून बराच वेळ, नुसतीच उभी राहिली.
काही वेळ तसाच गेला, मग सवयीने काही कामे आपोआप झाली. त्या आवाजाने, तो जागा झाला.
ती शेजारी नाही बघून, तिला शोधत स्वयंपाक घरात आला, काळजीने म्हणाला,
"बरं नाहीतर विश्रांती घे. आराम कर. तू आजच्या दिवस काम नाही केले तर, जग इकडचं तिकडे होणार नाही. आम्ही सगळे आहेत. करु आम्हाला जमतील तशी. तू तुझी तब्येत बघ, ती महत्त्वाची आहे...!"
शब्दांपलीकडची त्याच्या डोळ्यातली काळजी तिने अचूक टिपली, आणि हसत म्हणाली,
"मला माहिती आहे, की मी नाही केले काहीही काम, तरी कोणतीच उलथापालथ होणार नाही. शिवाय तुम्ही आहातच, पण खरं सांगू... मला ना नाही आवडत लोळत राहायला. त्यापेक्षा मी थोडे काम केले ना, तर लवकर बरी होईल."
त्याने तिच्याकडे असे काही बघितले, जणू आपण हिला नक्की ओळखतो ना...? असा प्रश्न पडला असावा...
त्याचा प्रश्न न विचारता कळल्यामुळे ती पुन्हा बोलू लागली,
"ताप ना माझ्या शरीराला जाणवतो आहे, पण खरं म्हणजे आजारी आहे ते मन...
आणि ते ना एकदम वेड आहे, त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करायची सवय आहे...
त्याला सारखं सारखं काहीतरी दुखतं, कुठेतरी खुपतं...
बघावं तेव्हा धडपडत असतं...
आपलं काय चुकतं हेही त्याला कळत, पण वळत अजिबात नाही...
आणि काही केलं तरी चुकांमधून काहीच शिकत नाही...
उलट त्याच चुका पुन्हा करायच्या, तेच प्रश्न पुन्हा... मग त्यात चिंता पुन्हा..."
तिचं बोलणं आता, त्याच्या डोक्यावरुन जायला लागले...
तिला तिच्या कामात सोडून दिले, तर ती काही वेळाने पहिल्यासारखी होते, हा त्याचा पूर्वानुभव होता...
त्यामुळे फार चिंता न करता त्याने दिनक्रमाला सुरुवात केली...
तिची सकाळची सगळी घाईची सारी कामे उरकली होती...
तोही सगळे आवरुन कामावर निघाला, "आराम कर, जास्त दगदग करु नको. मुख्य म्हणजे लवकर बरी हो... तुला असं बघायची, मला सवय नाही आणि आवडही नाही", त्याने ठाम शब्दात बजावले.
शब्दातली अधिकार वजा काळजी, प्रेम तिला सुखावून गेले...
आता ती शोधू लागली, असे काम ज्यामुळे तिला सगळं सगळं विसरता येईल...
त्या चिंता, तो त्रास, झालेल्या चुका, नकारांची यादी.... खरं म्हणजे तिचे काहीच चुकले नसतानाही सगळे खापर तिच्याच माथी फुटल्याच्या आठवणी...
हो... हे सगळं विसरायचे आहे...
झालं गेलं तिथेच सोडून, सारे नव्याने सुरु करायचे आहे...
असं का.. तसं का, मीच का... ???
या सगळ्यातून तिला संपूर्ण बाहेर यायचं होत, आणि तिला माहित होतं, यावर उपाय, तिचा तिलाच शोधायचा आहे...
डोक्यात चालू असलेला विचारांचा गोंधळ आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी काम शोधण्याचा प्रयत्न चालू असताना, तिला ओट्यावर काल सकाळीच फ्रिजमधून बाहेर काढून ठेवलेलं विरजणाचं पातेल दिसलं...आणि तिच्या मनातलं फुलपाखरु नाचू लागल...!
हवं असलेलं काम मिळाले...
बरं होण्याचे औषध मिळाले...
तिने पातेल्यावरची झाकणी बाजूला केली. आठवडाभर जमवलेली साय... म्हणजे जणू तीने नेहमीच मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट...
त्यात घातलेलं विरजणाच दही... हे तर त्या गोष्टींमधून निर्माण झालेले प्रश्न, दुःख, अस्वस्थता...
आता तिला ते सारं एकजीव करायचे होते आणि हळूहळू त्यातून फक्त स्वत्त्व वेगळे करायचे होते...
स्वतःला बजावायचे होते, चांगले शोधायचे होते, आनंदी व्हायचे होते.... कुणासाठी... सगळ्यात आधी फक्त तिच्या स्वतःसाठी...
मग आपल्या माणसांसाठी...
तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांची कमतरता थोडीच होती, ती सगळी होतीच ना...!
त्यांच्यासाठीही... तिला बरे व्हायचे होते...
मग ती लागली कामाला...
आधी तीने लाकडी रवी, गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतली... (हॅन्ड मिक्सर होता, पण आज तिला कसलीच घाई-गडबड नव्हती.)
मग त्यात थोडे पाणी ओतले, हळूहळू रवी सर्व बाजूने त्यात फिरू लागली...
मधेच डाव्या हाताने धडपड करत, मोबाईलवर तिच्या आवडीचे आणि कृतीला साजेसे गाणे शोधून लावले...
राधा गवळण करीते मंथन...
मनात अविरत हरीचे चिंतन..
रवी हळुवार फिरत होती... गाणे निनादत होते...
तिच्या नकळत तो कृष्णसखा (परमेश्वर) तिला गाण्यातल्या शब्दांसारखा भुलवत होता,
जणू...
सुवर्ण चंपक यौवनकांती
हिंदोलत ती मागे पुढती
उजव्या डाव्या झुलत्या हाती
कृष्ण कृष्ण ते बोलती कंकण...१
हे ऐकताना ती सुखदुःखाच्या सीमारेषा पार करुन, एका अनाकलनीय पोकळीत हरवून गेली होती...!
मनातले विचारांचे वादळ हळूहळू शांत होत होते, मनाविरुद्ध घडलेल्या साऱ्या गोष्टींकडे आता ती तटस्थपणे बघत होती...
नाद मुरलीचा पडता कानी
बावरली ती गोकुळ हरिणी
छुमछुम छंदी घुंगुर चरणी
गुण गोविंदी गेली रंगून...२
या कडव्याने जरा भानावर येत तीने, आपण नेमके कुठे आहोत... काय करत आहोत याचा हलकासा अंदाज घेतला, तोवर पुढील ओळी सुरु झाल्या...
राधेविण ते मंथन चाले,
नवल बघाया नवनीत आले...
ध्यान तियेचे उघडी डोळे,
दृष्टीपुढती देवकीनंदन...३
आणि तिच्या समोर पातेल्यात वर तरंगणारे ते नवनीत तिला हाक घालत होते...
जे झाले त्यातल्या चांगल्या बाजू, आता तिला दिसायला लागला होत्या...
प्रत्येक घटनेमधल्या तिच्या चांगल्या भावनेच्या, कामाच्या पाऊलखुणा पाठीमागे अगदी ठळक राहिल्या होत्या...
ते सारे तिला मनापासून सांगत होते...
जे घडून गेले, ते मागे फिरुन बदलणे शक्य नाही... आणि बदलायचे तरी का जेंव्हा त्यात काही वाईटच नाही...
तिला एकीकडे खूप भरुन आले आणि दुसरीकडे छानही वाटले...
बराच वेळ ती त्या लोण्याकडे बघत बसली...
स्वत्त्व होतं ना ते...
चांगुलपणाच, घेतलेल्या कष्टाचं, सोसलेल्या त्रासाचं...
मग हलकेच त्या लोण्यात, तीने आपला उजवा हात घातला...
त्या स्पर्शाने तीचे अणू रेणू शहारले...
ती कोमल जाणीव... स्निग्धता, ते चैतन्य...
हेच तर शोधत होती ती कालपासून...
त्या स्पर्शात होती ती फक्त माया... विश्वास...
समर्थन...जणू तिच्या प्रत्येक कृतीचे...
ती चूक होती की बरोबर हे महत्त्वाचे नव्हतेच...
कारण जे घडून गेले, त्यावर काथ्याकूट हवाच का असे तो स्पर्श सांगत होता...
तीने मनापासून त्या लोण्याचा एक गोळा केला, दुसरे पातेले घेऊन त्यात काहीसे आंबट पण मस्त कढी करता येईल असे ताक बाजूला काढले...
विचारांचे वादळही घुसळून आता शांत झाले होते...
त्रास, वाद, प्रश्न यांचे ताक वेगळे होवून तीला मिळालेल्या चांगल्या आठवणी नवनीत बनून समोर दिसत होत्या...
त्या लोण्यात दोन-तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतले...
ते पांढरेशुभ्र, ओशट लोणी बघताना तिला अनामिक समाधान मिळाले...
एकीकडे त्यातले थोडे लोणी एका वाटीत घालून, तीने देवापुढे ठेवले...
जणू मिळवलेल्या चांगल्या गोष्टी त्या परमेश्वराला समर्पित करुन पुन्हा नवे काहीतरी करण्यासाठी शक्ती मिळवली...
दुसरीकडे, ते लोणी कढवायला घेतले...
लोण्यासोबत तूप होताना, तिच्या आत खूप काही बदलत होते...
काही विसरत होते तर काही नव्याने फुलत होते...
कालची ती आणि आताची ती यात जमीन अस्मानाचा फरक पडला होता...
कामावरुन परत आल्यावर तिला बघून तोही सुखावला...
रात्रीच्या जेवणात फक्त साधा वरण भात आणि ताज्या तुपाची धार इतकी रुचकर का हा प्रश्न प्रत्येकाला पडला...
त्यांना कुठे माहीत होते की तिला ती पुन्हा नव्याने मिळण्याचा सोहळा अनुभवलेल्या नवनीतातून ते तूप बनले होते...
सगळी आवराआवर झाल्यावर देवपुढची वाटी घेऊन, तीने बोट - बोट प्रसाद सगळ्यांनाच दिला...
याचा स्वाद ही नेहमीपेक्षा अधिक सुखावणारा होता...
त्यातून सुखावत होती, ती तिच्या चेहऱ्यावरची स्वस्थता, समाधान..
ज्याने सारे घर सुखावले होते...!
*************************************








मस्त लेख
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteखूपच छान.... वाचून सर्व मळभ दूर झाले
ReplyDeleteमनापासून आभार 💐
Deleteमळभ यावं लागत तेंव्हाच जलधारा बरसतात आणि नवं निर्मिती जन्म घेते...
संदीप खरे च्या एका गाण्यात आहे, बघ
जरा घन झूरु दे ना, वारा गुदमरु दे ना... तेंव्हा नभ धरा सारी भिजवेल ना...
खुप छान
ReplyDeleteमनापासून आभार !
Deleteफार छान.....
ReplyDeleteअप्रतिम, सुंदर लिखाण
ReplyDeleteमनापासून आभार !
Deleteखूप छान
ReplyDeleteमनःपूर्वक आभार💐
Deleteखुप छान
ReplyDeleteमनःपूर्वक आभार 💐
Deleteमनःपूर्वक आभार💐
ReplyDelete