Saturday, September 04, 2021

शिक्षक


माझी आई शिक्षिका असल्याने, लहानपणापासूनच उत्तम शिक्षक असण्याचे अनेक गुण बघितले, अनुभवले आणि रुजले आहेत...

उत्तम शिक्षकांच्या तालमीत तयार झाल्याने, त्यावेळीही अनेक प्रसंगांनी शिक्षक कसा असावा हे मनावर नकळत बिंबले आहे... 

कधीतरी कसा नको हेही, पण तो आताचा विषयच नाही... 

उत्तम शिकवायचे असेल तर आधी उत्तम शिकावे लागते... 

आणि हा अखंड, न संपणारा प्रवास आहे... 

मला तर नेहमीच विद्यार्थी दशेत रहायला आवडते... 

त्यासाठीचा एक सहज, सोपा आणि छान मार्ग वाचन,

माझ्या शिक्षक संकल्पना ज्या पुस्तकाने समृद्ध केल्या, त्या विषयी चार शब्द...

 टू सर, विथ लव्ह

लेखक :- ई. आर. ब्रेथवेट     अनुवाद :- लीला सोहनी

लेखक हा उच्चशिक्षकीत, बुद्धिमान, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर.

दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअरफोर्समध्ये यशस्वी कामगिरी.

त्यातील निवृत्तीनंतर नोकरीसाठी प्रयत्न करताना, कृष्णवर्णी म्हणून अतोनात मानहानी होते. 

यातून सुरु झालेले कथानक... लेखक एका उनाड, वाया गेलेल्या मुलांच्या, आर्थिक परिस्थिती हालाखीची असणाऱ्या मुलांच्या शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारतो.  यातूनच एका वेगळ्या शैक्षणिक प्रयोगाचा पायंडा घालतो.

काम म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करता करता, लेखक भावनिक दृष्ट्या त्या मुलांमध्ये गुंतत जातो. त्यातूनच वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होतो. त्याचे हे अनुभव शैक्षणिक जगतात सर्वांनाच प्रेरणा देणारे आहेत.

पुस्तकात मला भावलेल्या गोष्टी

● लेखकाची मानहानी, उपेक्षा यात अडकण्यापेक्षा, मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची जिद्द खूपच प्रेरणादायी आहे. 

● समस्या सोडवण्यापूर्वी, त्या समस्यांशी झुंजणाऱ्यांशी भावनिक अनुबंध तयार व्हावे लागतात, हे सांगणारे प्रसंग सामजिक बांधिलकीची जाणीव करुन देतो.

● लेखक आपल्या कामावर इतरांच्या आधी आपला विश्वास, निष्ठा आणि प्रेम हवे हे अनुभवातून सांगताना त्याचे अवास्तव चित्रण करत नाही.

● शिक्षक हा आपले काम यांत्रिकपणे करुच शकत नाही, कारण विद्यार्थी हा जीवंत झरा त्याचे प्रेरणास्रोत असते.

● विद्यार्थ्यांची भावनिक गरज मानसिक आंदोलन आंदोलन समजून घेण्याची लेखकाची मनोवृत्ती.

● आपल्या कामावर विचारांवर प्रचंड निष्ठा व प्रेम हवे.

● पुस्तकी ज्ञानासोबतच, प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण अधिक सार्थ, उपयुक्त व आनंददायी असते.

● कोणत्याही गोष्टीकडे पूर्वग्रहदूषित न बघता, स्वतः अनुभव घेऊन आपले मत तयार करायला हवे.

● प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न हे त्याला येणाऱ्या दैनंदिन अनुभव, आर्थिक स्तर, घरातील वागणूक यानुसार भिन्न असू शकतात, त्यामुळे ते सोडवण्यासाठी चे उपायही भिन्न पद्धतीनेच शोधावे लागतात.

● कोणताही प्रश्न समस्या सोडवण्यासाठी संवाद, चर्चापद्धती ही सगळ्यात जास्त उपयुक्त असते.

● सध्याच्या काळात कृतीयुक्त  शिक्षण असे वारे वहात असताना, लेखकाने अनेक वर्षांपूर्वी केलेले यशस्वी प्रयोग वाचताना सध्याच्या  नुसतेच करायचे म्हणून केले जाणारे प्रयोग आठवून त्रास होतो.

● शिक्षण हा व्यवसाय नसून साधना आहे, मानणाऱ्या प्रत्येकाने जरुर वाचावे असे हे पुस्तक आहे.

● शिवाय चटकन निराश होणाऱ्यांनी तर, जरुर वाचावे कारण प्रश्नांवर मात करायला शिकणारे अनेक संदर्भ मिळतात.

******************************

3 comments:

suggestions most wlcome