शिक्षण यामध्ये, शिकवणे ही ठरवून केलेली क्रिया असली तरी, शिकणे ही अतिशय नैसर्गिक क्रिया आहे..
जन्माला आल्यापासून, प्रत्येक जण, प्रत्येक क्षणाला काही न काहीतरी शिकत असतो, याला कोणताही सजीव अपवाद नाही..
ही क्रिया नैसर्गिक असली, तरी त्यास कौतुकाची, शाबासकीची जोड मिळाल्यास, ती अधिक आनंददायी आणि फलदायी होते..
अशी प्रेरणा मानव प्राण्यास सर्वात जास्त हवीहवीशी असते..
त्याला सगळ्यात जास्त स्वतःवर प्रेम असते..
छान दिसावे सगळ्यांनी छान म्हणावे, यासाठी माणूस सतत प्रयत्नशील असतो..
त्यात लहान मुले ही अगदी छोट्याशा कौतुकाने प्रचंड आनंदी होतात आणि आपण जे सांगू ते करायला तयार होतात..
कदाचित म्हणूनच मुलांचे कौतुक करणे, त्यांना शाबासकी देणे, छान- उत्तम असे शेरे देणे, हे फार पूर्वीपासून चालत आलेले आहे..
आता नव्या पद्धतीत स्टार स्मायली स्टिकर्सनी शाब्दिक कौतुकाची जागा घेतली आहे..
योग्य प्रकारे केलेले कौतुक, छोटे छोटे बक्षीस याला बालमानसशास्त्र दुजोरा देते यामधून मुलांना चांगल्या गोष्टी करण्याची उत्तम वागण्याची प्रेरणा मिळत असते..
या सगळ्याची उत्तम माहिती असल्यामुळे या क्षेत्रात आल्यापासून मुलांना त्यांच्या कामाची पावती मुक्तहस्त देण्याची आवड आधीपासूनच होती..
पण पंधरा दिवसांपूर्वी सध्या काम करत असलेल्या सिटी प्राईड शाळेत त्याची एक अफलातून पद्धत बघितली आणि यावर लिहायला हवे असे मनापासून वाटले..
ती पद्धत म्हणजे कौतुक फलक (ऍप्रिसिएशन बोर्ड)..
यावरती प्रत्येक मुलासाठी एक छान चित्राकृती तयार करून ठेवली आहे..
जसे की फुलपाखरु, एखादा प्राणी एखादे कार्टून इ. त्यावर मुलांनी केलेल्या उत्तम कामाची, त्या त्या वेळी दखल घेऊन, वर्गशिक्षक - विषय शिक्षक स्टार देतात, विशेष नोंदी असल्यास शब्दात लिहून देतात..
ही माहिती मुलांना असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त स्टार मिळावे म्हणून, मुले चांगले वागण्याचा, अनेक गोष्टी उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करत असतात..
यात जास्त करून स्पर्धा स्वतःशी असल्याने, फार चढाओढ-रस्सीखेच बघायला मिळत नाही..
आणि वर्षाच्या अखेरीस ती चित्राकृती त्यांना बक्षीस म्हणून दिली जाते..
असे हे कौतुक फलक पहिली व दुसरी मिळून, एकूण आठ वर्गात बनवलेले आहेत..
हे फलक अतिशय कलात्मक पद्धतीने बनवण्यासाठी येथील मदर टीचर (याविषयी लिहिणार आहे) विशेष मेहनत घेतात, त्यासाठी त्यांचे मनापासून कौतुक वाटते..
ही माहिती मला जेव्हा नव्याने मिळाली मला फार छान वाटले..
अगदी असे दाटून आले की, आपल्या लहानपणी असे कौतुक फलक असते तर, आपल्या प्रगतीचा आढावा अशा जपून ठेवलेल्या कलाकृतीतून आपण घेऊ शकलो असतो..
या सगळ्यात मी कोणताही शैक्षणिक प्रयोग केला नसला तरी मुलांना कौतुक केलेले आवडते आणि ते कौतुक करण्यासाठी एका नवीन पद्धतीची ओळख मला झाली म्हणून त्याची मांडणी केली आहे..
त्याचबरोबर नव्याने आलेल्या राष्ट्रीय शिक्षण पद्धती शिशुवर्ग - दुसरीचा टप्पा, जिथे मुलांची प्रचंड वेगाने घडण होते..
त्यात हे प्रेरणा देणारे, कौतुक फलक प्रत्येक मुलासाठी आणि प्रत्येक शाळेत उपयुक्त आणि भावनिक विकासाला चालना देणारी गोष्ट आहे असे मनापासून वाटले, म्हणून आज यावर लेखन केले आहे..
(फोटो मधून त्याविषयी जास्त स्पष्टता येईल म्हणून सोबत ते फोटो देत आहे.)








No comments:
Post a Comment
suggestions most wlcome