Friday, August 04, 2023

बोलक्या बाहुल्या



रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्या बघून मजा वाटली नाही, असे बहुदा माझ्या वयाचे कोणीच नसेल..


मराठी चित्रपट झपाटलेला याने तर, या बोलक्या बाहुल्यांचा प्रवास वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला..


बालभवन शिक्षिका अभ्यासक्रम पूर्ण करताना, स्वतः बोलक्या बाहुल्या (पपेट कागदी, कापडी, टाकाऊ वस्तूपासून बनवलेले) बनवा आणि त्या वापरून वेगवेगळी गाणी शिकवा, गोष्टी सांगा असे वेगळे प्रशिक्षण घेतले होते..


प्रत्यक्ष बालभवनमध्ये काम करताना, या बाहुल्यांनी, अनेक प्रकारे संकल्पना स्पष्टीकरणासाठी मदत केली, पण त्यापेक्षा जास्त मुलांचे मनोरंजन  केले..


त्यामुळे याचा वापर करून, अजून वेगळे काहीतरी करायला हवे, असे मनापासून वाटत होते..


२००९ माझे प्रबोधिनी मधील पहिलेच वर्ष, बालभवनमध्ये बाजार दिवस म्हणून एक उपक्रम होता.. 


आमचे विद्यार्थी त्यात सहभागी नसल्यामुळे, आम्ही शिक्षकांनी काय करायचे, यावर चर्चा चालू असताना, आम्ही बोलक्या बाहुल्यांचे सादरीकरण करू असे सांगितले..


मग सहशिक्षकांच्या मदतीने सादर करण्यासाठी गोष्ट, गाणी ठरली..


त्यासाठी आवश्यक पपेट आम्ही तयार केली..


प्रयोग बघायला अतिशय नाममात्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीस दोन रुपये शुल्क ठेवले, तरीही सर्वात जास्त कमाई आमची झाली, नंतर त्यातून भरपूर तयार (रेडिमेड) बाहुल्या खरेदी केले..


५० % हून अधिक मुलांनी दोनदा, दोनदा हा खेळ बघितला, त्यांच्यासोबत पालकांनीही याचा आनंद घेतला व खूप कौतुकही केले..


त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी विविध सांस्कृतिक उपक्रम या बाहुल्या वापरून केले..


पण या सगळ्यात अनेकदा मुलांकडे दुर्लक्ष व्हायचे, म्हणून मग विद्यार्थ्यांच्या पालक वर्गाकडे सादरीकरण सोपवले..


पालकही या बोलक्या बाहुल्या वापरुन   उत्तम गाणी, गोष्टी सादर करू लागले.. 


त्यामुळे आम्हा शिक्षकांच्या कामाचा ताण हलका झाला, आणि मुलांसाठी वेळ मिळाला..


हे तिथेच थांबले, नवीन काही केले नाही तर ती प्रबोधिनी कशी?


स्नेहसंमेलनात बालभवनमधील, माझ्याकडे असणाऱ्या, अवघ्या तीन  साडे तीन वर्षांच्या खेळगटाच्या मुलांनी पडद्यामागून या बाहुल्यांचे उत्तम सादरीकरण केले..


मग असे सादरीकरण दरवर्षी होऊ लागले..


प्रत्यक्ष रंगमंचाची भिती वाटणारी मुले, असे पडद्या आडून अधिक छान व्यक्त होऊ लागली..


यात सगळ्यात आनंदाचा अनुभव म्हणजे, हे सादरीकरण बालदिनाच्या निमित्ताने दिव्यांग मुलांसाठी करण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्या मुलांना झालेला आनंद खूपच समाधान देणारा होता..


करोना काळात एका स्पर्धेत या बोलक्या बाहुल्यांच्या सादरीकरणास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले, त्यावेळी घरात बसलेल्या मुलांना वेगळ्या संधीचा आनंद मिळाला..


तर असा हा मुलगा बाहुल्यांचा वेगळाच प्रवासाने मला खूप समृद्ध केले.. 


अनेक नव्या मित्र-मैत्रिणींची भर माझ्या पोतडीत जमा झाली..


या बोलक्या बाहुल्या शिक्षणात अनेक प्रकारे सर्वांच्या मदतीस होत्या, आहेत व असतील, याच सदिच्छा व्यक्त करते..


आम्ही सादर केलेल्या काही सादरीकरणाची झलक..







No comments:

Post a Comment

suggestions most wlcome