सिटी प्राईड शाळेत काम करण्याचे माझे हे चौथे वर्ष, आजही येथील अनेक गोष्टी माझ्यासाठी खूप नवीन आणि आश्चर्यकारक आहेत..
शिक्षणात काहीतरी वेगळे आणि अचंबित करणारे मला नेहमीच आवडते..
अशाच एका स्पर्धेबद्दल आज सांगणार आहे, अर्थात ही शाळा इंग्रजी माध्यमाची असल्यामुळे स्पर्धेचे नाव इंग्रजी आहे, क्लास ट्रान्सफॉर्मेशन..
अनेकदा एखाद्या शब्दास दुसऱ्या भाषेत अपेक्षित अर्थ सांगणारा सूचक शब्द उपलब्ध नसतो..
त्यावेळी तो शब्द जसाच्या तसा दुसऱ्या भाषेतील लिपीत लिहायला आवडते..
पण क्लास ट्रान्सफॉर्मेशन या शब्दाला एक छान शब्द सापडला, तो म्हणजे वर्ग कायापालट..
ही एक सांघिक स्पर्धा असून इयत्ता आठवी, नववी, दहावी या तीन वर्गांसाठी आयोजित करण्यात येते..
कामात एकवाक्यता असावी म्हणून विद्यार्थी व वर्गशिक्षक मिळून विषय ठरवतात, त्या विषयाला धरुन सारे बदल करायचे असतात..
स्पर्धेच्या दिवशी हे बदल करण्यासाठी, साधारण दोन अडीच तासांचा वेळ विद्यार्थ्यांना मिळतो..
बदलांमध्ये फक्त वर्ग सजावट पुरेशी नसते, तर प्रत्येक विद्यार्थी कोणते ना कोणते पात्र सादर करतात..
त्या पात्रांचे काही ना काही सादरीकरण असते, त्यासाठी पाच मिनिटांचा कालावधी देण्यात येतो..
या सगळ्याचे नियोजन करण्यासाठी कोणताही स्वतंत्र वेळ मिळत नाही..
स्पर्धा जाहीर झाल्यापासून विद्यार्थी त्यासाठीचे वर्गश: नियोजन मधल्या सुट्टीमध्ये किंवा शाळेत येण्या-जाण्याच्या वेळेमध्ये करतात..
यानिमित्ताने वर्गातील प्रत्येकाच्या सुप्त कलागुणांना संधी मिळते..
अशा स्पर्धांमुळे एकमेकांमध्ये असलेले किरकोळ वाद-विसंवाद, काही काळापुरते तरी बाजूला राहून गट उत्तम बांधला जातो..
स्पर्धा या नेहमीच काहीतरी अफलातून आणि भन्नाट कृती करण्यासाठी प्रेरणा देतात..
कायापालट हा शब्दच मोहित करणार आहे..
काय शब्दाचा अर्थ शरीर, म्हणजेच बाह्यरुप..
थोडक्यात सांगायचे तर बदल करताना बाह्यरुप कितीही बदलले तरी चालेल, पण आंतरिक गुण तसेच राहिले पाहिजेत, किंबहुना अधिक उत्तम प्रकारे सर्वांपुढे सादर झाले पाहिजेत..
हाच धागा पकडून सर्व विद्यार्थी मिळून वर्ग अतिशय उत्तम रित्या सजवतात, विषय दर्शनी गोष्टीतून लक्षात येईल इतकी मेहनत त्यावर घेतात..
वर्गातील प्रत्येकाला स्वतःमधील जमेच्या बाजू पूर्णपणे वापरता येतील असे काम मिळते, यात सजावट आणि सादरीकरण दोन्हीचा समावेश असतो..
प्रत्यक्ष सादरीकरणाचा कालावधी जरी पाच मिनिटांचा असला तरी, विद्यार्थी साधारण महिनाभर यासाठी स्वतःच्या मजेचा, मस्तीचा जो वेळ देतात ती मेहनत निश्चित दिसून येते..
आत्ता हे सर्व तांत्रिक वाचताना कदाचित तितका परिणाम लक्षात येणार नाही, पण ही स्पर्धा प्रत्यक्ष बघताना फार मजा येते..
आणि त्याद्वारे होणारे नकळत शिक्षण मुलांना जीवन शिक्षणाचे अनुभव देतात हे नक्कीच..
अशा स्पर्धा प्रत्येक शाळेत असायला हव्यात, म्हणून ही लेखनाची उठाठेव..
(काही गोष्टी प्रत्यक्ष बघून स्पष्ट होतात, म्हणून सोबत काही छायाचित्रे जोडत आहे..)







No comments:
Post a Comment
suggestions most wlcome