Sunday, July 23, 2023

G20

G20 पुण्यात होणारे समिट आणि शाळांसाठी आलेले नवीन उपक्रम याची बैठक झाली..


आणि नकार घंटा बडवणाऱ्या मनाने, लगेच बोंब ठोकली, आता हे काय नवीन..


इथे आधी जे सुरु केले आहे, तेच पूर्ण होत नाही, किती ठरवले तरी मनासारखे करता येत नाही..


अशा नवीन गोष्टी आणताना, जे त्यावर प्रत्यक्ष काम करणार, त्यांची मते कोणी घेते तरी का..?


असा उगाच त्रागा, तोही मनातल्या मनात..


कारण बदल करा म्हणले, की पाहिले का, कशाला, मी भरपूर अनुभवी आहे, विचार करुन अनेक गोष्टी पक्क्या केल्या आहेत,असा उगाच एक ग्रह..


माझ्याकडे खापर पणजीच्या काळापासूनची शिदोरी आहे, याची विशेष जोड..


आपण करतो तेच जणू शंभर नमरी सोनं..


नाही नाही, मला नको आहे, आता काहीही नवे..


काय तर म्हणे, FLN, Shiksha sankalp, Nipun Bharat वगैरे वगैरे..


तसाही माझ्याकडे असणारा विद्यार्थी गट खूप छोटा आहे, आधीच किती ओझी लादली आहेत त्यांच्यावर, अजून भर नको..


असा विचारांचा सावळा गोंधळ चालू असताना, तोंडातून मोठ्याने, "काय ते रिकामे G20 असे निघून गेले.."


अन् "अतिशय गरजेचे आहे," लेकाचे ठाम, विश्वास पूर्ण आणि तितकेच स्वस्थ शब्द कानावर आदळले..


जो उद्याचे भविष्य आहे, त्याला जे चांगले वाटते, त्यामागचे नेमके कारण आधी समजून घ्यायला पाहिजे, असे वाटून त्याला प्रश्न विचारला, "काय आहे नेमके G20.."


मी फार कमी वेळा बोलायची संधी देते, ऐकून घेते, त्यामुळे अशी संधी हातची थोडी जाऊ देणार..


लेक आणि नवरा, दोघांनी एकत्र उत्तर दिले, २० देशांनी ठरवून केलेला मैत्री करार..


पुन्हा प्रश्न, 'कशासाठी..?'


'जागतिकीकरण सक्षम बनवण्यासाठी..'


(हे अजून समजून घ्यायचे असल्यास, या लिंक बघाव्यात..

https://www.g20.org/en/about-g20/

https://en.wikipedia.org/wiki/G20)


जागतिकीकरण शब्दाने मला एकदम साल १९९९- २००० कॉलेज मॉर्डन विषय ओसी (organisation of commerce and management) जोर्वेकर सरांच्या तासाला नेले..


आमच्या या सरांकडे अफलातून जादू होती, (त्याबद्दल परत कधीतरी) आधी सर आवडले, मग त्यांची शिकवण्याची पद्धत आणि सगळ्यात शेवटी विषय ओसी, इकॉनॉमिक्स..


शिक्षक कधीच एक विषय शिकवत नाही, त्याहीपेक्षा तो शिकवत नाहीच फक्त विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरणा देतो, (उठा शिका, त्यासाठी विविध खेळीमेळीच्या तंत्रांचे गाजर दाखवतो, उचकवतो नव्या पिढीचे शब्द..) 


या साऱ्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे, माझे हे सर..


त्यामुळे त्यांनी सांगितलेला हा जागतिकीकरण शब्द आणि त्याभोवती फिरणारे एकूण एक संदर्भ माझ्याभोवती नाचू लागले..


९९ साली मॉल हा शब्द आमच्या पुस्तकात असला तरी, त्याचे चित्रही उपलब्ध नव्हते..


प्रत्यक्ष बघण्यासाठी तर फारच दुरापास्त, असलाच कुठेतरी देशाच्या कोपऱ्यात तरी जाऊन बघावा या विद्यार्थी वर्गात आम्ही मोडत नव्हतो..


एका छताखाली काडेपेटी पासून ते हिरे सगळे मिळेल, हे सांगताना सर जणू परिकथा सांगत आहेत असे वाटत होते..


पुढच्या काही वर्षात असे मॉल गल्लीबोळात बघू शकाल, हे सरांचे शब्द आज जणू खरेच झाले आहेत..


२०२३ मध्ये जेंव्हा छोट्या दुकानांचे ही मॉल बनले आहेत, त्याच्याही पुढे जाऊन आपले डिजिटल फोन, लॅपटॉप हे चालते बोलते मॉल आहेत, हे नाकारता येणार नाही..


यातच जागतिकीकरणाचा प्रचंड वेग लक्षात येतो..


तेंव्हाच सरांनी हे सारे प्रचंड वेगाने बदलणार आहे, हे सांगितले होतेच..


आज जेंव्हा संपत जाणारे अनेक गोष्टींचे नैसर्गिक स्रोत, वाढती लोकसंख्या, सतत होणारे नैसर्गिक, आर्थिक, राजकीय बदल या सगळ्यात जर स्थैर्य, स्वास्थ आणि शांती हवी असेल, तर घर ते विश्व काही नियम ठरवून मित्रता असावीच लागेल..


आणि असे झाले नाही तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी युद्धाचे बिगुल वाजतील ही भीती सतत वाटत रहाते..


युद्ध.. भांडण..  या शब्दांचा विचार करतानाच..


मनुष्य हत्या, वित्तहानी, साधन संपत्तीचा विनाश एक ना अनेक कली (कलियुगाचा खलनायक) एकत्र येऊन नाचू लागले..


त्यात अगदी आताच बघितलेली एक मालिका असुर यात कली, आता एका असुरात असणार नाही तर तो प्रत्येक प्राण्यात (फक्त मानव नव्हे) आणि तेही कलकी (कलियुगाचा नायक) सोबत नांदणार आहे, हे अतिशय भयावह बघितले..


त्यामुळे माझे मलाच पटले की, G20 फक्त हवे नाही, तर हवेच आहे..


भाषा, अर्थशास्त्र, समाजकारण, भूगोल, राज्यशास्त्र असे अनेक विषय शिकणारा माझा लेक, आणि समाजाची खाण्याची आवड रोज नव्याने कशी बदलते यात काम करणारा माझा नवरा, दोघे एकत्र जेंव्हा एका शब्दात 'G20 = जागतिक मैत्री' हे सांगतात..


तेंव्हा बदलांना उगाच नको म्हणणाऱ्या माझ्यासारख्या सगळ्यांनी पहिल्यांदा शिक्षण क्षेत्र सोडले पाहिजे..


कारण अनेक गोष्टीच मुळात स्थिर नाही, हे विज्ञानात अनुकूल शिकताना आणि शिकवताना अभ्यासले आहे ना..?


मग ते कृतीत आणले नाही तर उपयोग काय..?


मी लगेच ठरवले की आधी या G20 चे मनापासून स्वागत करु या..



थोडा स्वतःहून अभ्यास करु या आणि मग निवांत यातले नेमके काय, कसे, कुणासाठी उपयोगात आणता येईल यावर काम करु या..


अभ्यास सुरु केला आहे, खूप मस्त नव्या जोमाचे, उत्साहाचे संदर्भ सापडत आहेत, पण सोबत एक गाणे पार्श्वभूमीवर ऐकू येत आहे..


कभी नये पॅकेट मे बेचेंगे, तुमको चीज पुरानी, क्योंकी हम हैं हिंदुस्थानी..


थोडक्यात हे G20 नवीन नाहीच मुळी, हे तर आमच्या ज्ञानदेवांनी मागितलेले पसायदान आहे..


भूतां परस्परें जडो, मैत्र जीवांचे..


शिक्षण क्षेत्रात आलेले G20, ही तर आपली समृद्ध गुरुकुल परंपरा आहे..

जी आपल्यावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकांनी जाणीवपूर्वक अभ्यास करुन दूषित केली, कारण आपले शिक्षण, त्याची पद्धती हीच आपली खरी ताकद आहे हे त्यांनी ओळखले होते..


आपले तेच शिक्षण, तीच शिक्षणपद्धती साऱ्या विश्वात उत्तमात एक होते, आहे आणि सदैव राहील..


ज्यात गुरु गोष्टी सांगायचे, शिष्य शंका विचारण्याच्या निमित्ताने त्या विषयाचा चौफेर अभ्यास स्वतःहून करायचे..


गुरु चांगले काय हे सुचवायचे, पण तेच प्रमाण माना ही सक्ती नसायची, म्हणून एकाच गुरुकडे दोन भिन्न प्रवृत्तीचे शिष्य तयार व्हायचे..


या शिक्षणाला प्रत्येक गोष्ट स्वतः करुन बघण्याची जोड होती, स्वावलंबी होण्यावर भर होता, कोणतेही काम तुच्छ नाही हे बिंबवले जायचे..


शिष्य राजपुत्र असला, तरी त्याला कोणतीच सूट किंवा वेगळी मोकळीक नव्हती की कोणत्याही पळवाटा नव्हत्या..


ते शिक्षण शिष्यांना जेवणदायी (आर्थिक सक्षम करणारे) व जीवनदायी (नीतिमूल्ये जपणारे) बनवणारे होते..


तसेच काहीसे हे G20 आहे, हा वरवरचा अभ्यास आहे..


भले बाह्य आवरण (कव्हर पेज) नवे, थोडे चकचकीत, आधुनिक असेल पण आतला विचार तसाच अबाधित आहे..


मैत्रीचा पहिला धडा म्हणजे मैत्री स्वतःशी मग इतरांशी..


स्वतःशी मैत्री व्हा, स्वतः मधल्या जमेच्या बाजू आणि त्रुटी या दोन्हींची जाणीव पाहिजे व स्वीकार पाहिजे..


थोडक्यात इतर देशांशी मैत्री करताना, आपला देश कोणकोणत्या बाबींमध्ये परिपूर्ण आहे समृद्ध आहे याचे ज्ञान पाहिजे..


सोबतच आपल्या कोणत्या कमतरता भरून काढण्यासाठी इतर देश आपल्याला मदत करतील हे शोधावे लागेल..


त्यानंतर अशा मित्र देशांच्या संस्कृतीचा, भौगोलिक रचनांचा, त्यांची समृद्धी, त्यांच्या त्रुटी, आधुनिक विकासा या साऱ्याचा अभ्यास केला पाहिजे..


यातून कोणी कुणाला कशाचे आदान प्रदान करायचे, आयात निर्यात करायची याची गणिते पक्की होतील..


व्यापार पातळीवरचे निर्णय त्या संबंधित व्यवस्थापन आणि सरकार मिळून घेतील, पण असे निर्णय का घेतले याची भूमिका पक्की करण्यासाठी या G20 विषयाची ओळख अगदी लहान वयापासूनच होणे गरजेचे आहे..


खरे म्हणजे हा विषय खूप मोठा व सखोल आहे त्यामुळे यावरचा अभ्यास ज्याचा त्याने करणे गरजेचे आहे..


हा उपक्रम राबवताना वेळ कमी पडत असल्यास, नित्य अभ्यासक्रमातला थोडा कमी महत्त्वाचा घटक बाजूला ठेवला तरी चालेल..


पण G20 आधी स्वतः समजून घेऊन त्यानुसार ज्या हिंदुस्थानामध्ये आपण राहतो, त्या भाषा, भूगोल, संस्कृती, संस्कार, समृद्धी एक ना अनेक बाबी व सोबतच काही कमतरता याची ओळख मुलांना करून दिली पाहिजे..


ही प्रक्रिया राबवताना त्याविषयीचा अभिमान जागृत झाला पाहिजे.. (अहंकार होता कामा नये)


मग आपल्याला दिलेल्या मित्र राष्ट्राची तोंड ओळख त्याची भौगोलिक रचना, सांस्कृतिक गोष्टी, भाषा आवश्यक बाबी याविषयी अभ्यासले पाहिजे..


हे सारे तांत्रिकपणे न होता, अतिशय खेळीमेळीत झाले, तर एकमेकांची मैत्री एकमेकांना विकासाकडे नेईल या विचारांची पायाभरणी लहान वयातच होईल..


आणि मग एकाच व्यक्तीत असणारा कली, अणू तंत्रज्ञानाचे शस्त्र हाती असूनही कलकी सोबत कधीही विजय मिळवू शकणार नाही..

उद्याचे भविष्य असणारी ही पिढी युद्धापेक्षा सामंजस्याने नांदणे पसंत करते..


चला तर मग मिळून G20 चे स्वागत करूया..



मुलांसाठी अधिक अर्थपूर्ण व फलश्रुती देणारे उपक्रम शोधू या व त्यांच्यासोबत त्याचा आनंद घेऊ या..

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome