Wednesday, October 25, 2023

रंगमंच

माझा जन्म तसा मध्यम वर्गीय तरीही सुखवस्तू घरात..


प्राथमिक गरजा तर उत्तम पद्धतीने पूर्ण व्हायच्या, पण सोबतच पर्यटन, मनोरंजनाची पर्वणी असायची..


पालकत्व म्हणजे नुसती सुबत्ता, पाल्य मागतील ती प्रत्येक गोष्ट हजर करून देणे नव्हे, तर आपल्या चिमुकल्यांना एक सजग नागरिक बनवण्यासाठी विविध अनुभव देणे..


शिक्षण जितके शाळेच्या चार भिंतीत मिळते, त्याच्या हजार पट समाजात वावरताना मिळते..


त्याकरता देश विदेश फिरणे, विविध प्रदर्शन, संग्रहालये बघणे, चित्रपट-नाटक यांचा आनंद घेणे यातूनही अनेक प्रकारचे धडे नकळत गिरवले जातात..


याची पूर्ण जाणीव असलेले माझे आई बाबा या साऱ्या गोष्टींना आम्हाला घेऊन जायचे,त्यासाठी दोघांचे आर्थिक नियोजन तर काय सांगू..


नाटक, चित्रपट हे बाबांच्या विशेष जिव्हाळ्याचे, त्यामुळे नवीन चित्रपट वा नाटक आले की आम्ही त्यास जाणारच, तो काळ ऑनलाईन बुकींगचा नाही बरं, पण बाबा त्याही गोष्टी लिलया सांभाळत..

आपण कोणालाही किती सहज म्हणतो, "काय नाटक करतोस..?"


पण नाटक हे जेव्हा अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य एक ना अनेक बाबींचा मेळ साधत सादर होते, तेंव्हा त्याचा आनंद घेणाऱ्या रसिकांसाठी ते स्वर्गसुख असते..


चौसष्ट कलांमधली, अभिनय कलेची सर्वोच्च परीक्षा म्हणजे रंगमंच सादरीकरण..


जो कलाकार रंगमंचावर आपली कला सादर करतो, तो चित्रपट, दैनंदिन मालिका यातील कामे सहज साकारतो..


हे सादरीकरण, नाटक करणे ही जशी कला आहे, तशीच ती रसिकतेने अनुभवणे ही देखील एक कलाच बरे..


मायबाप रसिकांच्या रसिकतेमुळे ही कलाकार मंडळी अधिक तयारीने, उत्साहाने आपल्या अभिनयाचे शत प्रतिशत देण्यासाठी दरवेळी धडपडत असतात..


त्यामुळे असे अनुभव घ्यायला हवे, आणि इतरांनाही तसे सुचवायला हवे..


मी फार लहानपणापासून ते आजपर्यंत या अनुभवात न्हाऊन निघाले आहे, आणि तरी यापुढेही त्यासाठी आसुसलेली राहील..


भक्ती बर्वे.. दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, विनय आपटे..पासून, ते प्रशांत दामले,  मुक्ता बर्वे, संकर्षण, स्पृहा जोशी पर्यंत सर्वांच्या कसदार अभिनयाने अजरामर झालेली नाटके बघितली, नव्हे अनुभवली आहेत..


भक्ती बर्वे - किमयागार, ती फुलराणी

वंदना गुप्ते - सुंदर मी होणार

दिलीप प्रभावळकर - हसवा फसवी

विक्रम गोखले - बॅरिस्टर, मी माझ्या मुलांचा

मुक्ता बर्वे, विनय आपटे - कबड्डी कबड्डी, फायनल ड्राफ्ट

रोहिणी हट्ंटगडी - चारचौघी

याशिवाय तुझ आहे तुजपाशी, कुसुम मनोहर लेले, एका लग्नाची गोष्ट, ऑल दि बेस्ट, सही रे सही, पुरुष, नथुराम गोडसे, यदा कदाचित, राशीचक्र, अलबत्या गलबत्या, खरं खरं सांग अशा एक ना अनेक कलाकृतींनी आयुष्य समृद्ध केले यात तिळमात्र शंका नाही..


रंगमंचावर हे कलाकार विविध पात्रे रंगवताना इतके तल्लीन होऊन जातात की बघणारे आपण देखील त्या विश्वातले होऊन जातो..


तो काळ भूत, वर्तमान भविष्य असो, वास्तव किंवा काल्पनिक विश्व, जणू सर्व प्रत्यक्षात समोर घडत आहे आणि आपण त्या साऱ्याचा एक भाग आहोत, असा आनंद मिळत राहातो..


काही काळासाठी नित्यकर्म विसरुन, एका वेगळ्याच दुनियेत रममाण होतो..


मनोरंजनाचा निखळ आनंद तर मिळतोच पण सोबत अनेक प्रश्न, समस्या, चिंता याची उत्तरेही सहज गवसतात..


म्हणूनच रोजच्या धावपळीत थोडीशी विश्रांती घेताना, नाटक बघण्याचा आनंद मनमुराद घेत रहावा..


ता.क. - आज असे हे मधेच का..? असा प्रश्न पडला असेल ना, 


तर त्याचे पहिले कारण एक अति सुंदर कलाकृती दोनदा अनुभवली, ती म्हणजे 'संगीत देवबाभळी..'

https://abhigandhashali.blogspot.com/2023/10/blog-post_28.html

जिने आंतर मनाला साद दिली, अनेक प्रश्नांची सहज उत्तर दिली, सोबत स्वतःला 

नव्याने शोधायची वाट दाखवली..


आणि दुसरे कारण म्हणजे नुकतेच तुफान विनोदी नाटक, पोट दुखेपर्यंत हसून हसून अनुभवले..ते म्हणजे 'शिकायला गेलो एक'


त्याविषयी लवकरच..

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome