अनेकदा आपण विरंगुळा, मनोरंजन, नित्य कामातून विश्रांती घेण्यासाठी चित्रपट, नाटक बघायला जातो..
आणि परत येताना नवीन काहीतरी सोबत घेऊन येतो, कधीतरी अनावश्यक त्रास, प्रश्न, समस्या असतात, तर कधी आपल्या नित्यक्रमातील समस्यांची उत्तरे..
अशी अचानक उत्तरे जेंव्हा सापडतात, तेंव्हा ती विश्रांती, विरंगुळा नवीन ऊर्जा, उत्साह देते, नव्याने जगायला शिकवते..
असाच अनुभव 'संगीत देवबाभळी' बघताना आला..
खरे तर हे नाटक बघायला उशीरच झाला, आता ते अंतिम टप्प्यात आहे, ५०० प्रयोगानंतर महाराष्ट्रात प्रयोग बंद होणार आहेत..
पण शेवटी का होईना, बघायचे राहिले नाही यातच आनंद..
आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम कलाकृतींमधली ही एक..
त्यासाठी जमेची बाजू म्हणजे, बघण्याआधी विषय अजिबात माहीत नव्हता, काहीही वाचनात आले नव्हते..
त्यामुळे पूर्णपणे अज्ञात ते ज्ञात प्रवास अनुभवता आला..
त्याबद्दल थोडे नंतर,
तसे बघायला गेले तर हे नाटकाचे कोणतेही परिक्षण, समीक्षण नाही..
जे आवडले त्याबद्दलची निखळ प्रशंसा, कौतुक म्हणले तरी चालेल..
तेही फक्त यासाठी की, झगमगाट हरवलेल्या आजच्या मुलांना आपल्याकडे असलेल्या समृद्धीची किमान ओळख व्हावी..
संगीत नाटक असले तरी, कोणतीही रागदारी, शास्त्रीय संगीत नसल्यामुळे माझ्यासारख्या गायन फारसे कळत नसणाऱ्यानांही आनंद घेता आला..
संगीतिका म्हणताना, तुकाराम महाराजांच्या एकाहून एक उत्कृष्ट अभंगाची आणि गरजेनुसार रचलेल्या नव्या रचनांची, लेखक प्राजक्त देशमुख यांनी प्रसंगानुरुप केलेली गुंफण..
त्याला साजेसे संगीत दिग्दर्शन, शब्दांचे अर्थ मनापर्यंत झिरपेल अशी सुरावट..
मानसी जोशी, शुभांगी सदावर्ते या दोघींचे प्रत्यक्ष, तर आनंद भाटे यांचे ध्वनिमुद्रित असलेले अतिशय गोड आणि आर्त अभंग गायन यातून शब्द न् शब्द सार्थ, काळजाचा ठाव घेतात..
लिपस्पिंग मध्ये अडकलेल्या आजच्या पिढीला, गायन हे रेकॉर्डेड नाही हे पटण्यासाठी, प्रयोगाच्या शेवटी दोघी पुन्हा चार ओळी गातात..
रंगमंच, वेशभूषा, प्रकाश योजना यातील जिवंतपणा प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जातो..
खळखळणारा इंद्रायणी काठ, तुकारामांचे घर, भंडारा डोंगर सारे काही अनुभवता येते..
चुलीवरची भाकरी, दिवस, रात्र, संध्याकाळ, पाऊस हे सारे प्रसंग बघताना, आपण त्यातले एक होऊन जातो..
यासाठी कुणा एकाचे नाही, तर त्यासाठी अखंडित कार्यरत असणाऱ्या सर्व टीमचे कौतुक वाटते..
एकत्रित प्रयत्नातून, असे भन्नाट आविष्कार अनुभवता येतात..
या अनुभवाचा परमोच्च आनंद म्हणजे, नाटकाचा विषय, त्यातील गर्भित अर्थ..
वरवर बघता सहज सोपा, पण जितका खोलवर रुजेल, तितकाच सूचक, क्लिष्ट, अगदी बाभळीच्या काट्या सारखा..
देवबाभळी ही बाभळीच्या झाडाची एक जातं, याचा काटा बऱ्यापैकी मोठा, अणकुचीदार असतो, ज्याची बोच खोलवर आणि सहज बरी न होणारी असते..
यातच नाटकाचा विषय लक्षात येतो..
खोलवर गेलेली, लवकर बरी न होणारी, सतत खुपणारी जखम..
रंगमंचावर हा काटा रुतला आहे, तुकाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे आवलीच्या पायात..
आवली गरोदर असल्याने, तिच्या मदतीला, स्वतःच्या मनाविरुद्ध पण विठ्ठलाच्या सांगण्यावरुन आलेली रखुमाई, तेही लखुबाई नावाच्या सामान्य स्त्रीच्या रुपात..
रखुमाई जी विठ्ठलावर रुसलेली आहे, जिच्या मनात भक्तांवर अपार प्रेम करणाऱ्या, त्यांच्या धुणेभांडी, सडा सारवण, वेणीफेणी सारख्या कोणत्याही कामासाठी धावणाऱ्या पांडुरंगाच्या वागण्याची बोच आहे..
एक काटा प्रत्यक्ष रुतलेला तर दुसरा अदृश्य तरी जिव्हारी खुपणारा..
यानिमत्ताने एकमेकांसमोर आलेल्या दोघींमध्ये होणारे संवाद, नित्य कामे, त्या अनुषंगाने येणारे काही तुकारामांचे तर काही लेखकाचे चपखल अभंग..
या सगळ्याचा एकत्रित परिणाम, आपल्या मनात रुतणाऱ्या विविध काट्यांची आठवण करुन देतात..
मांडणी तुकाराम महाराजांच्या काळातली असली तरी, आजच्या काळाला सुसंगत प्रसंग,विचार मांडले आहेत..
एकीकडे रखुमाई, आवलीच्या खऱ्या काट्याची जखम बरी करताना, स्वतःच्या मनात रुतलेला काटा काढून टाकते..
तर दुसरीकडे आवली विठ्ठकाचा राग राग करत असतानाही, त्याबद्दल असलेले प्रेम, आधार व्यक्त करत, प्रत्यक्ष देवी रखुमाईला संसार कोडे उलगडून सांगते..
हा सारा द्वैत अद्वैताचा खेळ, आपण तर अति सामान्य आहोत, मग आपल्या समस्या इतक्या मोठ्या का करतो, असे नकळत सुचवतात..
आधीच म्हणल्याप्रमाणे, नाटक बघताना, मनोरंजन तर होतेच पण नकळत आपल्या नित्य प्रश्नांची उत्तरे सापडतात..
या सगळ्याची प्रचिती घेण्यासाठी अशा कलाकृती आवर्जून बघायला हव्यात..
कलाकृतीची अनावश्यक माहिती दिल्यास, ते स्वतःहून बघण्याचा आनंद हरवून जातो..
तरी उदाहरण म्हणून एक प्रसंग आणि एक अंभग नक्कीच मांडेल, अर्थात तोही माझ्या नजरेतून, अनुभवातून..
लखुबाई म्हणजेच देवी रखुमाई आवलीला विचारते, "सधन माहेर, सुरुवातीला असणारे सुखवस्तू सासर या साऱ्याची नंतर वाताहात झाल्यावर, तू हे सारे सोडून, निघून का नाही गेली?"
आवलीचे विनाविलंब उत्तर, "ते काम रखुमाईचे कारण ती देवी आहे, मी सामान्य आहे, त्यामुळे असे करणे मला जमणार नाही आणि शोभणार नाही.. (हे आपण प्रत्यक्ष रखुमाईला सांगतो आहे हे माहीत नाही)
यातूनच रखुमाईच्या मनातील सल हळूहळू कमी होऊ लागतो..
आपल्या मनात नकळत अनेक गोष्टींची उलथापालथ होते..
अजून एका प्रसंगात पावसाला घाबरणाऱ्या, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी त्रासलेल्या आवलीला, रखुमाई पावसात घेऊन जाते, त्यात भिजायला सांगते..
यातून नकळत आपण प्रश्न, समस्या, त्रास याचाच आधी विचार करतो, त्यामुळे त्याक्षणी मिळणारे छोटे छोटे आनंद हरवून बसतो..
पाऊस सगळे धुवून स्वच्छ करतो, नव्याची रुजवात होते, कोवळी पालवी फुटते हे बघायचे, की चिखल, ओल, गळणारे छप्पर..
जशी निवड तसा दृष्टिकोन, असेच काहीसे हा प्रसंग सांगतो, हो ना..?
अभांगांबद्दल सांगायचे झाले तर सर्वप्रथम एकच मनात येते की..
आपल्याला लाभलेला हे संत साहित्य पाठांतर, गायन इतके मर्यादित नसून सहज, सोपे आणि समाधानी जगणे शिकवणारा प्रसादरुपी ठेवा आहे..
त्यानुसार नित्यक्रम जेवढे आचरण जमेल तितका आनंद, सुख मिळेल..
पंढरीचे भूत मोठे | आल्या गेल्या झडपी वाटे ||
बहू घेतलीच राना| बघ हे वेडे होय मना|
तेथे जाऊ नका कोणी|गेले नाही आले परतोनी|
तुका पंढरीसी गेला|पुन्हा जन्मा नाही आला|
तुकारामांची भक्ती (पंढरीचे भूत) म्हणजे आवड, छंद असा अर्थ घेतल्यास, प्रत्येकाला आपल्या छंदाची परिसीमा (पुन्हा जन्मा नाही आला) गाठता यायला हवी, असे हा अभंग सुचवतो असे मला वाटते..
असे कृतीत उतरवले तर आधी सुख, नंतर ओघाने समाधान निश्चित लाभणार, हो ना..?
तर अजून एक प्राजक्त देशमुख यांनी या नाटका साठी रचलेला अभंग,
माझ्या काेटी शिव्या। तुझ्या येवाे ठायी।
विटे तुझ्या पायी। तडे जावाे।।
इझू दे रे देवा। इझू दे रे।
अंतरीची पिडा । इझू दे रे।।
सजू दे रे देवा। सजू दे रे
पायातळी काटा। सजू दे रे।।
माझा त्रास, माझे प्रश्न (पायातळी काटा) हाच मला नव्याने घडवणारा, यशस्वी बनवणारा होवो (सजू दे)अशी, विठ्ठल चरणी आर्त मागणी..
हे अवघे चार मार्मिक शब्द, आपणास सहज अन् सोपे जगणे, नाही का सुचवत..!
असे विचारमंथन घडविणाऱ्या कलाकृती रोज नव्याने भर येत राहोत, हीच सदिच्छा..
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome