Saturday, October 12, 2024

मराठी लोकगीते

 ठेवा मराठी लोकगीतांचा

सिटी प्राईड शाळा निगडी येथील
मराठी आणि समाजशास्त्र या दोन्ही विभागातर्फे बुधवार दिनांक  ९ ऑक्टोंबर २०२४ सकाळी ११.१५  ते १२. १५ या वेळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी लोकगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

या सादरीकरणात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे शाहीर अशोक कामथे सर, व ज्ञान प्रबोधिनी निगडी येथील सहा विद्यार्थी सहभागी होते..

हा उपक्रम एका विशिष्ट उद्देशाने आयोजित केला होता..

मराठी शिकणे, म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यास नाही, तर त्याही पेक्षा वेगळे काही असू शकते, याचा अनुभव मुलांना देणे हा एक उद्देश होता..

यासाठी चौथीचा वर्ग निवडला, कारण ही मुले समाजशास्त्र विषयात शिवाजी महाराजांचा अभ्यास करत आहेत..

आणि महाराजांच्या काळात त्यांचे अत्यंत लाडके आणि बहुगुण संपन्न, सैन्यात गुप्तहेर असणारे आणि लष्करी खात्याचे नेतृत्त्व करणारे बहिर्जी नाईक, हे या लोकगीतांचा वापर त्याकाळी संदेश वहन करण्यासाठी करत असत..

अशा या लोकगीतांचा अनुभव मुलांना द्यावा असे वाटले..

प्रमुख अभ्यागत शाहीर अशोक कामथे सर, हे नानाविध गुणांसाठी सर्वज्ञात आहेत..

लोकगीत सादरीकरण आणि कामथे सर हा एक दुग्ध शर्करा योग असतो, त्यांचा पहाडी आवाज, प्रत्येक लोकगीत प्रकारांची उत्तम जाण, त्याचा केलेला सखोल अभ्यास, यामुळे भाषा, संगीत या सगळ्या पलिकडे जाऊन ही गीते आपली संपन्न आणि समृद्ध भारतीय संस्कृती आहे.. (मुद्दाम महाराष्ट्र म्हणणे टाळले, कारण आपल्या प्रत्येक राज्य, प्रांत,गाव, भाषा या साऱ्या नानाविध लोक गीतांनी नटलेली आहेत)

त्यांच्या सादरीकरणात या साऱ्याचा प्रचंड अभिमान ऐकणारा अनुभवत असतो, आणि त्यामुळेच त्यांचा कार्यक्रम कधी संपूच नये, असे नेहमी वाटत रहाते..

आजचा कार्यक्रम अगदी असाच रंगला होता. लोकगीतांची नांदी असणाऱ्या गणपती बाप्पाच्या, गण गीताने सुरुवात झाली..

मग उधाणलेल्या दर्याचे वर्णन करताना, डोल डोलतयं वाऱ्यावर या कोळी गीतावर मंडळी डोलली..

शिवाजी महाराज अभ्यासताना, महाराजांना आम्ही तुमचे भक्त आहोत, तुमचे विचार, कार्य पुढे नेणारे आजचे पाईक आहोत हे गोंधळ या अनोख्या लोकगीतामधून सांगताना साऱ्यांनी नकळत 'आम्ही शिवबाचे गोंधळी' या गोंधळ प्रकारावर ठेका धरला..

दैनंदिन जीवनात गंभीर प्रश्न, समस्या, अडचणी यावर मात करण्यासाठी समाजाला पेटवून उठवणारा फटका, या गीताचा अनुभव  एकनाथ महाराजांच्या 'अरे कान्हा, अरे कृष्णा..या गीतातून घेतला..

मग ऐकले गवळण गीत, जे कृष्णाच्या बाललीला सांगणारे होते, आणि त्याचे बोल होते, आई ग आई नाही खाल्ली ग मी माती..

या गवळणी देखील अनेकदा आपल्या या गीतांमध्ये छुपे संदेश देण्याचे काम उत्तम रित्या करायच्या..

शिवाजी महाराज हा फक्त इतिहास होऊन उपयोग होणार नाही, तर त्यांचे आचार, विचार प्रत्येकामध्ये युगानुयुगे रुजले पाहिजे हे सांगणारे,

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे |
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ||

हे गीत विशेष स्फूर्ती, ऊर्जा देणारे ठरले..

त्यानंतर मात्र एक वेगळीच मजा घडली,

साऱ्या विश्वात संतांची भूमी अशी ओळख असणाऱ्या, आपल्या महाराष्ट्र भूमीचा आदर, अभिमान जागवण्यासाठी सरांनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला ही धून व मुलांसोबत त्यावर नृत्य  असा सुरेल संगम साधला..

लोकगीत हा नुसता श्रवणाचा नाही तर त्यात देहभान विसरून हरवून जाण्याचा विषय आहे, याची गंमत विद्यार्थी आणि आम्ही शिक्षकांनी अनुभवली..

नाचून दमल्यावर सरांनी बच्चे कंपनीला 'जायबा किस्ना, आता गल्या मी, येणार नाय..' या पेंद्याच्या बोबड्या गीतावर ताल धरायला लावत, मैत्रितल्या लुटूपुटू तक्रारींची गंमत ऐकवली..

शिवाजी महाराजांनी स्वराज्य तर स्थापले पण त्यांनी अचूक हरलेल्या कर्दनकाळ रुपी इंग्रजांनी आपल्या भारतमातेला पारतंत्र्यात जखडले, तिच्या मुक्ततेसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना घोषणारुपी मानवंदना द्यायला सर विसरले नाहीत..

आणि या साऱ्याचा कळस अध्याय ठरला, तो म्हणजे अर्थात पोवाडा..

प्रतापगडचा रणसंग्राम..

जणू सगळे महाराजांचे मावळे बनले, प्रतापगडावर जमले, खराखुरा अफलखान पायथ्याशी आहे आणि आता महाराज भेटीला निघाले आहेत, तिथे झालेला दगा, पण त्याला चोख उत्तर देत खानाचा फाडलेला कोथळा, त्यावेळी जिवा महालाने परस्पर परतवलेला वार, त्या अफजलखान नामक उद्दाम नराधमाचे, शीर जिजाऊला अर्पण करणारा माझा, शिव अवतारी राजा सर्वांनी त्या पोवाडा सादरीकरणात प्रत्यक्ष पाहिला..

त्या यशाने, आनंदाने, अभिमानाने भरून आलेले ऊर, संमिश्र भावना, नयनांमर्फत पाझरल्या..

नकळत शिव छत्रपती महाराजांना , त्यांच्या कार्याला, मनापासून मानाचा मुजरा केला गेला..

असे भारावलेले वातावरण म्हणजे एक वेगळाच अनुभव होता..

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मराठी लोकगीतांचा तोंडओळख नक्कीच झाली..

पण त्याही पलिकडे जाऊन आपण भारतात, त्यातूनही महाराष्ट्रात राहतो, याविषयी आनंद आणि अभिमान वाटावा हा विचार नक्कीच मिळाला असणार असे खात्रीपूर्वक सांगता येईल..

२०२० भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगितल्याप्रमाणे असे उपक्रम विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास प्रेरित करतात, संधी उपलब्ध करून देतात..

म्हणूनच असे नानाविध कार्यक्रम करत रहायला हवे असे नक्कीच वाटते..

ही ज्योत तेवती रहावी, इतरांना प्रेरित करावी यासाठी हा लेखन प्रपंच..

आपले प्रतिसाद, प्रतिक्रिया, सूचना स्वागतार्ह..



आजच्या कार्यक्रमाची काही चलचित्रे 

गण - https://youtu.be/Lsc_rQlzl_0

कोळीगीत - https://youtu.be/Lsc_rQlzl_0

गोंधळ - आम्ही शिवबाचे गोंधळी -  https://youtu.be/qeCnT9gWJTE

गवळण - अरे कृष्णा अरे कान्हा - https://youtu.be/Nk-CasKwcwg

लोकगीते - https://youtu.be/g3EymCNSUQA

सोबत सरांचा परिचय व संपर्क क्रमांक देत आहे, जेणेकरून आपणास असा उपक्रम करायचा असल्यास त्याचा उपयोग होईल..

शाहीर श्री. अशोक कामथे..

सरांनी या आधी भारतात अनेक ठिकाणी पाचशेहून अधिक ठिकाणी लोकगीत, तसेच २००७ मध्ये मॉरीशियस देशातील पाच शहरात पोवाडा गायनाचे कार्यक्रम सादरीकरण केले आहे. 

मे-जुलै १९९९ कारगील युद्धाच्या काळात अनेक ठिकाणी, ३ जून २००९ अरुणाचल तवांग येथील शिवाजी महाराजांच्या शिल्प प्रतिकृतीच्या अनावरण प्रसंगी भारतीय सेनादलासमोर पोवाडा सादरीकरणाचा मान प्राप्त झाला होता.

याच बरोबर चित्रकार म्हणून नावलौकिक आहे. भारतात व परदेशात अनेक ठिकाणी त्यांची चित्र प्रदर्शित झाली आहेत. ज्याला चित्रकला शिकायची आहे, त्याला मनापासून प्रेरणा, योग्य मार्गदर्शन करण्यात त्यांचा हातखंडा आहे, याला देशांच्या सीमा देखील नाही, ऑनलाईन माध्यमाचा वापर करून ते परदेशी स्थित विद्यार्थ्यांना हवी मदत करत असतात.

ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी प्राधिकरण येथे ३७ वर्षे चित्रकला, समाजशास्त्र, क्रीडा अध्यापनाचा अनुभव गाठीशी असून सध्या ते सेवानिवृत्त आहेत, पण तरीही काही इयत्तांच्या तासिका ते मानधनाची विशेष अपेक्षा न ठेवता घेतात, आपल्या ज्ञानाचा उत्तम वापर झाला पाहिजे, ही त्यांची तळमळ मला नेहमीच प्रेरणा देते, कारण ते माझ्या शेजारी रहातात.. 

त्यांनी शाळा व महाविद्यालयीन काळात पुरंदर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे सर्वोत्कष्ट खेळाडू म्हणून सलग दोन वर्षे पारितोषिक पटकावले होते. त्यांना खो खो खेळात एन आय एस पदवी प्राप्त असून त्यांनी अनेक खेळाडू घडवले आहेत. 

त्यांच्या पुरस्कारांची सुरुवात १९८७ रोजी अभिनव कला महाविद्यालय सर्वोत्कृष्ट विद्यार्थी इथे सुरू होते, त्यानंतर उल्लेखनीय राज्य कलाध्यापक पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, प्राधिकरण भूषण पुरस्कार, पुरंदर भूषण पुरस्कार, तर अलीकडेच २०२३ मध्ये माय होम इंडिया लता मंगेशकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा ज्ञानाचा, गुणांचा गौरव वेळोवेळी झाला आहे..

https://youtu.be/IvI7tRDbsTI?si=OZ-ZQ63jHZ0uHh_4 

सोबत सरांच्या आधीच्या कार्यक्रमाचे, चित्रांचे आजच्या कार्यक्रमाचे काही फोटो आहेत..






No comments:

Post a Comment

suggestions most wlcome