Sunday, October 06, 2024

भोंडला आधुनिक गाणी


भोंडला आला, नको आता सासू सून गाणी,

पुरे नको ती उणीदुणी, त्यांचे आता मेतकूट जमले..

आता वेळ नवीन विचारांची, लहान मुलांना दिशा द्यायची..

कारण बदल होत नसतो, आपण करावा लागतो..

लहान मुलांसोबत भोंडला खेळू, हादगा पूजन करू..

मुले हादगा आणि भोंडला पुढे नेतील, जपतील..

त्यासाठी ही आधुनिक गाणी

१)

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे

करीन तुझी सेवा ।। धृृ ।।

माझा खेळ मांडिला

मोकळया मैदानी

मोकळ्या मैदानात

खूप खूप खेळू

आरोग्य संपदा

आम्ही सारे मिळवू ।।

२)

एक थेंब झेलू चला

दोन थेंब झेलू

तीन थेंब झेलू चला

चार थेंब झेलू

पाच पाच थेंब प्रत्येकाचे

बघता बघता तळे साचेल

पाऊस आमच्या आवडीचा

जमिनीमधे जिरवायचा

एकेक थेंब मोलाचा

जपून वापर करायचा

उरलेल पाणी बागेला घाला

वाहते नळ बंद करा

एक तरी झाड लावा

एक तरी झाड जगवा

३)

अरडी ग परडी ग

परडीमधे काय ग

परडीत गोळ्या, चाॅकलेट ग

नानकटाई केक ग

बिस्किट फरसाण वेर्फस ग

पिझ्झा बर्गर कोक ग

त्यांच्यासोबत पाहुणे आले

ठिय्याच देऊन बसले

दात मग किडु लागले

पोटामधे दुखू लागले

नको रे बाबा नको

असले पाहुणे नको रे

पाहुण्यांना पाहुणेच ठेवू

बिस्किट फरसाण

कधीतरीच खाऊ

परडीत भरु पोळी भाजी पराठा,धिरडी ,थालपीठ ,वडी

शंकरपाळी,गुळपापडी

बदाम,खारका,फळे,सॅलेड

चावून चावून सारे खाऊ

दात मग छान राहतील

पोट कधी दुखणार नाही शरीर मस्त बलवान होईल।।

४)

अक्कणमाती चिक्कणमाती खड्डा तो खणवा

अस्सा खड्डा छान आहे

त्यात बी पेरावं

अस्स बी छान आहे

रोप छान उगवेल

अस्स रोप छान आहे

झाड डेरेदार होईल

अस्स झाड छान आहे

कळ्या खूप लागतील

अश्शा कळ्या छान आहेत

फळे खूप येतील

अश्शी फळे छान आहेत

सारे मिळूनी खाऊ या ।।

५)

भारत आमुचा देश

आम्ही हो देशाचे भक्त

याचे नेहमी स्मरण ठेवू

आमुचा देश उत्तम बनवू

विज्ञानाचे शिखर चढू

अध्यात्माची जोड देऊ

सर्वच क्षेत्रात प्रगती करु

सुवर्णपदके जिंकून आणू

पराभवाचा रावण मारु

यशाचा मार्ग चालू

हादग्यापुढे संकल्प करु

हादगा देव आम्हा पावू दे

स्वप्न आमुचे सत्य व्हावे

हादगा देव आम्हा पावू दे

ही गाणी सगळ्यांना पाठवू या, चला आपली मराठी आपण जपू या , वाढवू या, फुलवू या..

ती अभिजात होतीच, ते सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली हेच दुर्भाग्य..

पण आता तिला पुन्हा नव्याने अभिजात म्हणून गौरवलं जात असेल तर ते शिव धनुष्य आपण पेलू या..

मराठी फक्त भाषा नाही संस्कृती आहे , ती मनामनात रुजवू या..

तुमची अभिगंधशाली..



No comments:

Post a Comment

suggestions most wlcome