केशरी_भगवा_नारिंगी_रंग
या देवी सर्व भुतेषु कौसुम्भ रंगेन संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
देवी आज तू कौसुम्भः म्हणजे भगवा.. केशरी.. नारंगी रंग धारण करुन ये..
त्यागाचे प्रतीक असणारा हा भगवा रंग..
आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास, यामध्ये त्याग हा सदैव अग्रभागी वर्णिला आहे..
त्याग हा आप्तजन, मायभूमी, सृष्टी जिथे आवश्यक तिथे करणारे, अनेक वीर, श्रेष्ठ यांच्या कथा आम्ही सदैव ऐकतो..
त्याची जाणीव सदैव जागृत ठेवण्यासाठी आणि या कथांचे सार आमच्यामध्ये यावे यासाठी हा रंग परिधान करुन ये..
केसरिया जोहर येथले इथली बलिदाने
सर देईन परि सार न देईन हे कणखर बाणे..
असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे
अमुच्या शुभव्रतांना आई तुझे शुभाषिश दे..
ही पंरपरा आजही प्राणपलीकडे सांभाळणारे आमुचे पोलीस, सैनिक आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते यांना माझा मनापासून प्रणाम..
यांच्या कामाची, त्यागाची जाणीव जागृत करण्यासाठी ये..
ही प्रेरणा विश्वातील प्रत्येकात यावी, असा आशीर्वाद दे..
या देवी सर्व भुतेषु मातृ पितृ रुपेन संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
त्यागाचा रंग जरी केशरी असला, तरी त्याचे सृष्टीतील सर्वत्र अनुभवाला येणारे रुप म्हणजे मातापिता..
माझ्यासाठी यापैकी कोणीही एक श्रेष्ठ नाही, ही तर निर्मितीची दोन चाके असून त्यांच्या समान बलिदानावर या विश्वाचा पसारा सहजपणे सांभाळला जातो..
मला नेहमी मोहिनी घालते ते अर्धनारी नटेश्वराचे रुप..
हे प्रतीक वाटते, प्रत्येकतल्या मातृ आणि पितृ गुणांचे..
प्रसंगानुरुप माझ्यातील हे मातृ पितृ रुप, कामी यावे अशी प्रेरणा मला दे..
संकटे, कष्ट, दुःख अशी आव्हाने पेलताना, माझ्यातील पौरुषत्व जागे करुन पितृ कर्तव्य पूर्ण करण्याची शक्ती दे..
तर स्नेह, माया, माफी, आदर व्यक्त करताना, माझ्यातील स्त्रीत्वाचा झरा वाहून, मातृ हृदयाची प्रचिती मिळू दे..
याचबरोबर सर्वत्र भरुन राहिलेल्या या तुझ्या मातृ पितृ रुपाची सेवा माझ्या हातून घडू दे..
त्यांचा चुकूनही अवमान, माझ्या हातून घडणार नाही, असा आशीर्वाद मला दे..
हे देवी तू चैतन्य, त्याग, माया, ममता बनून माझ्यात वास करायला ये..
तुझे वास्तव्य पेलण्यासाठी, माझी काया, माझे मन तितके पवित्र व सक्षम होण्याचा आशीर्वाद दे..
तुझीच अभिगंधशाली..


छान
ReplyDelete