या देवी सर्व भुतेषु धूसर रंगेन संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
देवी आज तू धूसरः म्हणजेच करडा रंग धारण करुन ये..
करडा रंग राखेचा असतो, कोणतीही गोष्ट स्वतःचे पूर्णतः दहन करुन घेते तेव्हा तीचे राखेत रुपांतर होते..
राख म्हणजे नाश असे मानण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही, उलट ही संधी वाटते..
जुने नको असलेले, जीर्ण झालेले टाकून देऊन नवीन काहीतरी मिळवणे यात मला अभिप्रेत दिसते, मग शरीर असो, चालतं आलेल्या चुकीच्या प्रथा असो किंवा माझ्यातील त्रुटी असोत..
तुझ्या आशीर्वादाने, अशा नको असलेल्या गोष्टींचे सहज विसर्जन होऊ दे..
राखेतून फिनिक्स खगासम, भरारी घेण्याची प्रेरणा देण्यासाठी, तू या धूसर रंगात वास्तव्यास ये.
ज्याचा जन्म झाला, त्याचा एक दिवस मृत्यू होणार, जे निर्माण झाले त्याचाही कधीतरी नाश होणारच..
प्रारंभ आणि अंत हे या निसर्गाचे चक्र आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी ये..
मृत्योर्मा अमृतमं गमय ||
माझा प्रवास नश्वरकडून ईश्वराकडे, अशाश्वताकडून शाश्वताकडे होण्यासाठी मला बळ दे.
या देवी सर्व भुतेषु श्याम रंगेन संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||
श्याम रंग म्हणजे काळा रंग..
माझा किंबहुना साऱ्या सृष्टीचा प्रिय रंग, म्हणूनच तर साऱ्या विश्वाला युगानुयुगे मोहिनी घालणारा श्रीकृष्ण अवतार याच रुपात सजला होता..
तूही कालीमाता बनून अराजकता माजविणाऱ्या असुरांचा संहार करण्यासाठी भूतलावर आली होतीस..
केस, डोळे, दृष्ट लागू नये म्हणून लावले जाणारे काजळ, जलाने भरलेले ढग, कठीण कातळ, विश्रांती देणारी रात्र अशा अनेक गोष्टी काळ्या तरीही सर्वांना प्रिय असतात..
असे असतानाही या रंगाचा अनेकदा तिरस्कार होताना दिसतो, या रंगाला अशुभ मानले जाते..
अशा रंगाच्या व्यक्ती, प्राणी-पक्षी यांना, त्यांचा काहीही दोष नसताना याची झळ सोसावी लागते..
त्यांच्यावर कधी शारीरिक तर कधी मानसिक अन्याय, अत्याचार होताना दिसतात..
हे सगळे बदलण्यासाठी तू या कृष्ण वर्णात वास्तव्यास ये..
काळ्या रंगाची, नव्याने ओळख करुन देण्यासाठी ये..
माझ्याकडून चुकूनही असा अवमान कधीही होणार नाही, असा आशीर्वाद देण्यासाठी ये..
माझ्या सद् वर्तनाची प्रेरणा, उत्त्पत्ती, दिशा बनून ये, सदैव माझ्यासोबत रहा..
तुझीच अभिगंधशाली..
🌚🌚🌚🩶🩶🩶🩶🩶🌚🌚🌚




No comments:
Post a Comment
suggestions most wlcome