Tuesday, November 12, 2024

प्रतिकृती


उंबरखिड लढाई

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नव्हे, तर अवघ्या विश्वाचे लाडके नेतृत्व..

भगवान श्रीकृष्णानंतर जर उत्तम रणनिती कोणाची, असा सवाल उभा राहिला तर एकमुखाने नाव घेतले जाईल ते फक्त शिवाजी राजांचे..

या साऱ्याची सतत उजळणी होत राहिली पाहिजे, तेही स्वानुभवातून..

राजांचे गड, किल्ले नव्हे.. नव्हे  दुर्ग, हिंडले  पाहिजे, त्याची धूळ कपाळी मिरवली पाहिजे, तेथील गंधाने ऊर सुवासिक झाले पाहिजे, हा झाला एक सरळ सोपा मार्ग..

या दुर्गांसोबत असणाऱ्या सह्याद्रीच्या विशालकाय रांगा, तिचे दऱ्या खोऱ्यांचे वैभव आणि त्याच्या सहाय्याने महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती व्याख्याने, ध्वनिफिती यातूनही बऱ्यापैकी समजून घेता येऊ शकतात..

त्यापुढे जाऊन आजची अनुभवात्मक शिक्षण पद्धत आणि दीपावलीच्या निमित्ताने अंगणात किल्ला करायची जुनी परंपरा याचा सुरेख संगम बघितला, ते ज्ञान प्रबोधिनी निगडी शाळेच्या बालभवन प्रांगणात..

साधारण २० बाय २० च्या जागेत साकारलेली सह्याद्रीची अप्रमित प्रतिकृती, आणि त्यातही ठळकपणे दाखवलेली उंबरखिड लढाई..

बादशहाच्या वीस हजार सैन्याला, अवघ्या हजार मावळ्यांच्या जोरावर पायाशी लोटांगण घ्यायला लावणारी महाराजांच्या गनिमी कावा पद्धतीची अफलातून अनुभूती, अख्यानाची सुरूवात होते ती स्वा. सावरकर रचित शिवरायांच्या आरतीने..

ज्या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर बागडत बाल शिवबा छत्रपती झाले, त्याची ओळख करून घेताना, महाराष्ट्र हे नुसते नाव म्हणून, महा म्हणजे मोठे नाही तर ते खरोखरीच भव्य आहे या जाणिवेने खूप छान वाटते, आपण या भूमीत जन्मलो, वाढलो याचा खूप आनंद होतो..

हळूहळू राजांची राजनिती, चातुर्य, जीवाला जीव देणारी मावळ्यांची दौलत, कमालीचे शूर योद्धे, शत्रूला गुंगावा देणारे हेरखाते, पळता भुई थोडी करणाऱ्या करामती हे सारे ऐकताना आपण त्यांच्यातले एक होऊन जातो..

पंधरा - वीस मिनिटांचा हा प्रकाशीय चल चित्रपट संपूच नये वा पुन्हा पुन्हा बघावा असे वाटत रहाते..

नेहमी नवीनच काहीतरी करत राहणाऱ्या शिवराज पिंपुडे याची संकल्पना आणि त्याला तितक्याच ताकदीने साथ देणारे त्याचे शिक्षक, मित्र, विद्यार्थी मंडळ यांच्या भरपूर श्रमातून साकारलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास जरूर भेट द्या..

आणि हो मला अभिप्राय कळविण्यास विसरू नका..

पुन्हा थोडं सविस्तर 

जरूर भेट द्यावी असे

एक भन्नाट अनुभव - उंबरखिड लढाई

स्थळ - ज्ञान प्रबोधिनी निगडी, बालभवन
वेळ - सायंकाळी ६ ते ९ 
१६ नोव्हेंबर २०२४ शनिवार पर्यंत 
विनामूल्य

संकल्पना - शिवराज पिंपुडे 
सहिंता लेखन - अमेय गुर्जर 
उंबरखिंड  प्रतिकृती - रघुदादा, ऋषिकेशदादा
आवाज - मयुरीताई, आदित्यदादा
स्वयंचलित प्रकाश योजना - अटल  विभाग व नववीचे विद्यार्थी



No comments:

Post a Comment

suggestions most wlcome