खेळ बोलक्या बाहुल्यांचा
उदरनिर्वाहासाठी स्वीकारला तो शिक्षकी पेशा..
पण त्या वेळेनंतर वेगवेगळ्या प्रशिक्षणात सहभागी होणे, इतर शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी माझ्यातील क्षमतेनुसार काही ना काही उपक्रम करणे याची पूर्वीपासूनच आवड आहे..
त्यामुळे अशी संधी अजिबात सोडत नाही, त्यासाठी आवश्यक सोबत मिळाली, तर उत्तमच पण नाही मिळाली तरी काही ना काही मार्ग गजानन महाराज दाखवतात..
अगदी असेच काहीसे झाले..,
बोलक्या बाहुल्यांचा खेळ हा माझा फार आवडता उपक्रम, यापूर्वी अनेक ठिकाणी , अनेक वेळा याचे कार्यक्रम केले होते..
मॉलमध्ये इतर महिला दागिने, कपडे शोधतात, मी ह्या बाहुल्यामागे असते, काही बाहुल्या स्वतः तयार ही केल्या आहेत..
कारण इतकेच की गाणी, गोष्टी म्हणजे आपल्या भारतीय गुरूकुल शिक्षण पद्धतीचा आत्मा आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय, त्यावेळी मुलांशी संवाद साधताना वापरले जाणारे, दृकश्राव्य माध्यमातील हे सर्वोत्तम माध्यम..
अशा या बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम, आमच्या वाल्हेकर वाडीच्या महानगर पालिका शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बालदिनानिमित्त करणार का..? असे त्या शाळेच्या प्राचार्या (मला ओळखणाऱ्या, काकूच्या शेजारी राहणाऱ्या) सौ. वल्टे काकूंनी विचारले..
हो तर म्हणायचे होते, पण दीपावलीची सुटी, आवश्यक साथीदारांच्या गटाचा अभाव, सरावासाठी अजिबात नसणारा वेळ..
एक ना हजार प्रश्न..
विचारून तर बघू, असे ठरवून माझ्यासोबत सिटी प्राईडमध्ये, पाहिली दुसऱ्याच्या गटासाठी, सह शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या मैत्रिणींना विचारले आणि त्यांनी लगेच हो देखील म्हणले..
काकूंना ' हो ' कळवले..
पुढे सराव, नियोजन यासाठी अर्थात वेळ नव्हताच..
सुटीनंतर १० नोव्हेंबरला शाळा सुरू झाली, कार्यक्रम नक्की करायचा ना..?, हे काकूंना पुन्हा विचारले, 'हो म्हणजे काय?', उत्तर आले..
मैत्रिणींना आठवण केली, उद्या नियोजन करू, असे म्हणत १२ नोव्हेंबर उजाडला..
सराव अर्थात शून्य, फक्त बाहुल्या तपासल्या, गाणी-गोष्टी ठरल्या..
या साऱ्या मैत्रिणी रोज वर्ग शिक्षिकांसोबत, तितक्याच तयारीने मुलांची काळजी घेतात, त्यांच्या विकासासाठी धडपडत असतात, नुकत्याच ऑगस्ट महिन्यात झालेल्या, दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी केलेला बाहुल्यांच्या खेळाचा उत्तम अनुभव पाठीशी होता, त्यामुळे फार ताण नव्हता..
बघता बघता १४ नोव्हेंबर २०२४ बालदिन उजाडला..
आठ ते तीन शाळेतल्या सर्व जबाबदाऱ्या, अगदी मनापासून पूर्ण केल्या.मुलांसोबत बालदिन मनसोक्त अनुभवला. भरपूर नाचलो, हसलो, खेळलो..
एक तासाची सवलत घेऊन तयारीसाठी, वाल्हेकरवाडी शाळेत पोहचले..
बाकी साऱ्या मैत्रिणी त्यांची रोजची शाळा पूर्ण करून साधारण ३.४५-४ च्या दरम्यान तिथे पोहचल्या..
मग राहिलेली इतर तयारी करून कार्यक्रम सुरू झाला..
महानगरपालिका शाळांमधील मुले अनेकदा घरात खूप वेगवेगळ्या गोष्टींना, परिस्थितीला सामोरी जात असतात. त्यामुळे अनेकदा शाळा हे त्याच्यांसाठी विसाव्याची, आनंदाची जागा असते..
हे सारे त्यांच्या प्रतिसादात दिसत होते. पूर्व तयारीत त्यांच्या मदतीमुळे आमचा उत्साह अधिक दुणावला..
सुरुवात 'देवबाप्पा आवडतोस मला' ही गोड प्रार्थना घेऊन झाली, त्यात मुलांची साथ खूपच छान होती..
मग घाणेरडा विनू, छिररर छाक या गोष्टी, वन डे वुई वेंट टू द जंगल, मी आहे जादुवाला, लंबी दाढीवाले बाबा अशी गाणी सादर झाली..
मुलांच्या टाळ्या, जोरजोराने हसणे, ओरडणे या सगळ्यातून त्यांना खेळ आवडला, हे जाणवत होते..
त्यांच्या डोळ्यात दिसणारे कौतुक बघताना, 'याचसाठी केला अट्टाहास' हे राहून राहून वाटत होते..
बघता बघता एक तास कसा संपला, हे कळले देखील नाही..
ही छान संधी दिल्याबद्दल वल्टे काकूंचे मनापासून आभार, यापुढेही अजून नवनवे उपक्रम करायला नक्की आवडतील, हीच निर्मळ इच्छा..
दिवसभराचा थकवा, वाटेकडे डोळे लावून बसलेली घरीची मंडळी या साऱ्यांना थोडे बाजूला ठेवून माझ्या या मैत्रिणी स्नेहल, सुप्रिया, गायत्री, हर्षा आणि अनुराधा माझ्यासोबत भक्कमपणे बाहुली खेळासाठी तासभर उभ्या होत्या. त्याबद्दल खूप खूप आनंद आणि कौतुक वाटते..
आभार मानून त्यांना परके नक्कीच करणार नाही, तर त्यांनीही स्वतःला असे नव्याने शोधावे याच शुभेच्छा देते, आणि आजचे पुराण थांबवते..
पारंपरिक कथांच्या चालीवर म्हणते..
ही साठां उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, सफळ संपूर्ण..
उतू नको, मातू नाही, घेतला वसा टाकू नको, या शुभेच्छा तुम्ही द्या..
वाट पाहते..
.jpg)





No comments:
Post a Comment
suggestions most wlcome