Saturday, December 07, 2024

तोत्तोचान सांगीतिक अभिवाचन

तोत्तोचान हे पुस्तक पहिल्यांदा कधी वाचले आठवत नाही..

पण पारायणे नक्की केली..

अध्ययनात प्रत्येकाची क्षमताच वेगळी असते, हे स्वानुभवातून सांगणारी, ही गोष्ट.. उत्तम शिक्षक, पालक आणि विद्यार्थी घडण्यास नक्कीच खतपाणी घालते..

खरे तर शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या, प्रत्येकाने पारायण करावे असे हे पुस्तक..

याचा अनुवाद अनेक भाषांमध्ये झालेला आहे..

माझ्या आईच्या मैत्रिणीने (आमच्या वगळबाई) सेवानिवृत्तीची भेट म्हणून त्यांच्या सर्व सख्यांना भेट म्हणून दिले असे हे पुस्तक..

आणि मला चांगले आठवते, की माझ्या लेकाला इयत्ता सहावीत हे पुस्तक वाचन अभ्यास म्हणून होते, अर्थात इंग्रजीत, तेंव्हाही आम्ही दोघे ज्यात रमलो असे हे पुस्तक..

याचे नाटक, तेही पर्ण पेठे सारखी उत्तम कसलेली रंगमंच कलाकार, म्हणजे दुग्ध शर्करा योग..

अनेक दिवसांपासून याचा अनुभव घेता यावा म्हणून प्रयत्न चालू होता..

आज ती इच्छा पूर्ण झाली. ७५ मिनिटांचा हा एकपात्री प्रयोग..

अर्थात अनेक पडद्यामागचे अनेक कलाकार साथीला होते..पण 

रंगमंचावर पूर्णवेळ वावरणारी गोंडस, निर्मळ, निरागस उचलून घ्यावी अशी, तोत्तोचान म्हणजे वेगळेच सुख..

पुस्तक वाचणे आणि ते प्रत्यक्षात नाट्य रुपात बघणे दोन्ही वेगळे पण अर्थात समृद्ध करणारे अनुभव आहेत..

अनेकदा वाचलेल्या या पुस्तकातल्या गोष्टींची मजा या नाट्य, संगीत, नृत्य आणि अभिवाचन या साऱ्यांनी अगदी सप्तरंगी केली..

त्यातून ते माझ्या मातृभाषेत, मराठीत आहे, याबद्दल खूप जास्त आनंद, आस्था..

पुस्तकाचे अनेक संदर्भ नव्याने सापडले..

काही ठिकाणी तर रंगमंचावर जाऊन तोत्तोचान सोबत ते करावेसे वाटले..

हे सारे रंगमंचावर आणण्यासाठी, आपले तन मन धन अर्पून झटणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून कौतुक..

पुस्तकातल्या उत्तम घटनांची निवड, त्याची अतिशय आकर्षक मांडणी, मधूनच अभ्यासपूर्वक आलेली जपानी शब्दांची पेरणी, उत्कृष्ट - रेखीव रंगमंच,  संगीत-नृत्य (बाल सुलभ) यांची फोडणी, मधूनच पुस्तक हातात धरून केलेले उत्तम अभिवाचन, एकपात्री प्रयोग असला तरी इतर पात्रांचे पडद्यामागून येणारे विविध संवाद ( एकच व्यक्तीने ते शिवधनुष्य सांभाळणे.. अर्थात त्यासाठी सिद्धार्थ पूरकर याचेही विशेष कौतुक) किती आणि काय सांगायचे..

एखाद्या परिकथेतील गोष्टीचे मनात घर करावे आणि ती गोष्ट समोर घडताना पाहावी इतके ते सुंदर, अविस्मरणीय आहे..

बरं हे करण्यामागे त्यांचे उद्देश काय असतील माहित नाही..

पण मला काय सापडले..?

पुन्हा एकदा पुस्तक वाचावे, तेही सोबत तशीच इच्छा असणाऱ्या कोणाला तरी घेऊन..

संधी मिळाली तर पुन्हा हे सांगीतिक अभिवाचन अनुभवावे..

वाचनाचे बदलत जाणारे, हे नवे आयाम आपल्या मित्र मैत्रिणींना सांगावे..

असे अभिवाचन आपल्या विद्यार्थ्यांना बघण्यास उद्युक्त करून, नंतर त्यांनाही तसे करण्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात..

अनौपचारिक शिक्षणाचे असे कार्यक्रम अधिकाधिक होण्यासाठी इतरांना सुचवावे..

एक ना अनेक..

अर्थात आजची ही संधी मला मिळाली, ती ज्ञान प्रबोधिनी निगडी शाळेत..

त्यातही अभिमानाने सांगते, की असे उपक्रम मुलांसाठी करणारी जाणीवपूर्वक करणारी, ज्ञानप्रबोधिनी माझी शाळा आहे..

मला बी घडवणारी हीच ती शाळा..💗🫣

असे उत्तमोत्तम कार्यक्रम बघत, कधी  असे विविध प्रशिक्षण घेत, कधी स्वतः उपक्रम करून बघत, मी मोठी झाले..

असे कार्यक्रम वैयक्तिक अनुभवताना ज्याला बऱ्यापैकी पैसे खर्च करून तिकीट काढावे लागते, आईवडिलांना त्याची आवड असावी लागते..

ते विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत, शाळेच्या खर्चाने उपलब्ध करून देणे हा खूप वेगळा आणि घडवणारा विचार आहे.. 

त्यासाठी अनेक आर्थिक व्यवस्था कराव्या लागतात, पण मुलांसाठी उत्तम गोष्टी करण्यासाठी पैसा वा इतर काहीही आड येता कामा नये ही भूमिका आजही शाळेत घडत आहे याचा खूप जास्त आनंद आणि कौतुक आहे..

आज याचे सकाळी दहा आणि दुपारी दोन असे दोन प्रयोग झाले, त्यात इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतचा विद्यार्थी गट, संपूर्ण दीड तास छान बसला होता..

बरं हे विद्यार्थी फक्त छान बसले होते असे नाही, तर नंतर तोत्तोचान (पर्ण पेठे ) टीम सोबत झालेल्या गप्पा, त्यांनी विचारलेले प्रश्न, यालाही मुलांनी छान प्रतिसाद दिला. त्यातली पात्रे, त्याचे वैशिष्ट्य बरेच बारकावे त्यांनी अचूक टिपले..

अनौपचारिक शिक्षण अजून काय वेगळे असते..

असा हा आजचा अनुभव मला माझ्या लहानपणात घेऊन गेला, माझ्या शाळेतले माझे इंद्रधनू दिवस आठवले..

विद्यार्थ्यांना समृद्ध करणारे असे उपक्रम सर्वच शाळांमध्ये वारंवार होवोत, ( मलाही अनुभवायला मिळोत) या विशेष शुभेच्छा..

आणि समेवर येताना, तोत्तोचान या पुस्तकाचे सांगीतिक अभिवाचन हा फारच वेगळा आणि निखळ आनंद देणाऱ्या या नव्या नाट्य प्रयोगास उदंड शुभेच्छा..

प्रयोग हजारांची संख्या पार करोत, इतरही भाषांमध्ये येवोत..

आणि त्यातून प्रेरणा घेऊन शिक्षणात अनेक नवीन तोमाई (तोत्तोचानची शाळा) उदयास येवोत..



प्रयोग संपला तरी पुढे तासभर तिथेच घुटमळत राहिले मी..

कदाचित त्या वास्तूत त्या नाट्याची जादू पसरली होती, त्यात बागडत रहावेसे वाटत होते..

अर्थात त्या साऱ्या प्रक्रियेत सहभागी जितक्या जणांना भेटायला मिळेल, त्यांना भेटावे, अभिप्राय द्यावा, व्यक्त व्हावे ही तर आवड आहेच..

आपले मराठी कलाकार यांचे विशेष कौतुक..

मनापासून ऐकून घेतात, अनेकदा तर रंगमंचावर चालू आवराआवरी मध्ये सहभागी होतात..

आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रयोगानंतर अगदी आपल्यातले एक होऊन जातात..

#पर्ण पेठे

YZ, फोटोकॉपी, विहीर, एक कप चहा, फास्टर फेणे.. कितीतरी छान चित्रपट

त्यानंतर अनुभवलेले नाटक *चारचौघी*
  
आणि आज *तोत्तोचान*

खूप खूप अप्रतिम 💗

अशीच काम करत रहा, आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करत रहा, खूप शुभेच्छा.. 💞

 

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome