एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनय आणि भाषा याचा अतिशय सुंदर आविष्कार पाहायला मिळाला..
आता प्रश्न उपस्थित होईल की अभिनय म्हटले की भाषा ओघाने आलीच, यात काय नवल..?
तर यात वेगळे पण होते ते भाषा प्रवासाचे..
भाषेची मूळ उत्पत्ती संप्रेषण, भावभावनांचे अदान प्रदान आहे याचा संपूर्ण विसर पडतो आणि हे प्रकर्षाने होते ते शिक्षणात..
याचा परिणाम भाषा तेही आपल्या देशातील भाषा शिकण्याची सक्ती करावी लागते..
आपण अनेकदा भाषा म्हणजे अक्षर, शब्द, वाक्य, व्याकरण या सगळ्यात अडकतो..
हे सारे गैरसमज हा नाट्य प्रयोगाने क्षणार्धात संपवून टाकले..
नाट्य होते मूकनाट्य, इंग्रजीत त्याला माईम म्हणतात..
शब्दांशिवाय आपल्या भावना, विचार पोहचवणे हे नक्कीच सोपे नाही..
कदाचित या करताच वेशभूषा संपूर्ण काळा पोषाश, पांढऱ्या रंगाने पूर्णपणे रंगवलेला चेहरा, पांढरे हातमोजे..
यामुळे दूरवर बसलेल्या प्रेक्षकांनाही चेहऱ्यावरचे हावभाव (आनंद, दुःख, भय, आश्चर्य ) ठळकपणे दिसतात..
हातांच्या माध्यमातून केलेल्या खाणाखुणा अचूक टिपता येतात..
सोबत वाजणारे अतिशय संथ आणि स्वस्थ पार्श्वसंगीत, बघणाऱ्यांना त्या नाटयाशी जोडून ठेवते..
रसिकांना अभिवादन करून प्रयोग सुरू झाला, अर्थात शब्द नसल्याने बघणारे अतिशय तन्मयतेने नायकाशी समरूप झाले होते..
असेच निवांत भटकत असताना नायकाला काहीतरी सापडते, अगदी लहान असलेली ती वस्तू मोठी मोठी होत जाते..
इतकी मोठी होते की नायक त्याच्या आत प्रवेश करतो, तिथे एक वेगळे, अद्भूत, जादुई जग, त्यात सुरुवातीला रमणारा, नंतर स्वतःचे मूळ रूप हरवलेला नायक..
अंतिम प्रवेशात त्यातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असून असाह्य, हतबल अशी त्याची अवस्था, आणि मोठा होत गेलेला आकार पुन्हा मूळ रूपात येताना, त्यात संपून गेलेला नायक..
अवघ्या आठ दहा मिनिटांचा प्रयोग..
पण मला तर बालपणापासून ते आजवरच्या अनेक आठवणीत लिलया घेऊन गेला..
मला सुचणारे लेखन, त्याची ताकद, त्यातला आनंद आणि अनेकदा अनावश्यक गोष्टीत अडकणारी मी याचे अनेक प्रसंग या नाट्यात अनुभवले..
त्याने काय सादर केले, मी काय अनुभवले यात काही प्रमाणात भेद होता, कारण नाट्य मूक होते..
असे असले तर त्यातून जो मूळ विचार सांगायचा होता की अनेकदा आपण बाह्य गोष्टी, गरजा यात इतके अडकतो की आपली मूळ आवड, गरज ही हरवून जाते आणि त्यामुळे खरा आनंद आपल्या आत असूनही नको तिथेच शोधत राहतो..
अनेकदा हे समजले तरी वाढवून ठेवलेल्या पसाऱ्यातून बाहेर पडायला वाटच सापडत नाही..
प्रयोग संपल्यावर, हे सारे ताकदीने सादर करणाऱ्या त्या अभिनेत्याची भेट घेतली, नाव संकेत खेडकर..
आजमितीला अनेक वाहिन्यांवर, विविध मालिकांमध्ये भूमिका करताना बघायला मिळणारा हा एक कलाकार..
असे असूनही या कार्यक्रमास अतिशय किरकोळ मूल्य घेऊन उपस्थित असणारा..
त्याच्याशी बोलताना लक्षात आले की कोणतीही गोष्ट समजणे, शिकणे हे अनुभवांनी अधिक अर्थपूर्ण होते..
आणि त्यातून जाणवले की आपण भाषा शिक्षक म्हणून किती नीरस शिक्षण देतो..
अर्थात प्रमाण भाषा शिकवताना गरज म्हणून तांत्रिक गोष्टी करायला हव्या, पण त्यासोबत भाषेचा जो मूळ प्रवास, भावनांचे प्रकटीकरण याला अधिक महत्त्व द्यायला हवे..
संकेत सोबत बोलताना अजून एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समजली की तो व्यस्त दिनक्रमात, अतिशय कमी मानधनात हे प्रयोग करतो ते त्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी..
मूकनाट्य या विषयात तो विद्या वाचस्पती (PHd) होणार आहे, त्याचे प्रबंध लिहिण्यासाठी, असे सादरीकरण, त्यात प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, चर्चा यावर त्याचे काम चालू आहे..
नाट्याचे नाव होते, मेटरिअलिस्टिक क्यूब..
हा विषय त्याला स्वानुभवातून सुचला होता..
अभिनय हा मूळ स्वभाव, तीच आवड, तेच अर्थार्जनाचे माध्यम..
या साऱ्यात तो भौतिक गरजा, दिनक्रम यात गुरफटून गेला आणि मूळ आनंदाला पारखा झाला, त्यातून बाहेर पडण्यासाठी काही काळ रिकाम्या घरात जाऊन राहिला आणि तिथेच त्याला हे नाट्य सुचले..
भटकंती करणाऱ्या एक इसमास अचानक एक वस्तू सापडते, जिचा आकार चौकोनी आहे, तो दाखवण्यासाठी त्याची दाखवलेली पकड, नंतर ती हवेत फेकून झेलताना, प्रत्येक वेळी वाढत जाणारा आकार..
तो आकार वाढत जाऊन, तयार होत गेलेली एक मोठी खोली , तेंव्हा तो चौकोन, त्याच्या भिंती, कोन हे छोटे छोटे बारकावे अफलातून जाणवत होते..
त्या ठोकळयाला चिकटून जाताना अचानक एका जागेतून आत झालेला प्रवेश, प्रथम त्यातून बाहेर पडण्याची धडपड, वाटणारे भय हे खूपच वाखण्याजोगे होते..
काही वेळाने तिथे प्रगट झालेला जीन वा देवता (मला ती देवता वाटली होती.. हवे ती मिळवण्याची आपली इच्छा, त्यासाठीचे कष्ट, बुद्धिमत्ता)
तिने पूर्ण केलेल्या एकेक इच्छा, त्यामुळे होणारा आनंद, ठोकळ्यात रमून जाणारे मन..
त्यानंतर वाढत जाणाऱ्या मागण्या, त्यातून होणारे वृत्तीचे अधःपतन याची मांडणी अक्षरशः विदारक, अंगावर काटे आणणारी होती..
मग त्यातून बाहेर पाडण्यासाठी पुन्हा एकदा झालेली असाह्य तगमग , त्यात आलेले अपयश, लहान होत जाणारा ठोकळा आणि त्यात संपून जाणारे अस्तित्व याचे उत्कृष्ट सादरीकरण..
आपण अनेकदा बाहेरून सुंदर दिसणाऱ्या, आकर्षित करणाऱ्या वस्तूंमध्ये हळूहळू कसे अडकतो..
त्यात आपल्या आत असलेली आवड, खुबी हरवत जाते, हे नाट्यात बघताना खूप काही उलगडत जात होते, हरवलेले सापडत होते..
डोळ्यांवर असलेली मोहपाशाची झापड दूर करायचे काम हे सादरीकरण नक्की करत होते ..
त्यासाठी कलाकाराला १००% , त्याच्या अभिनय केलेला मनापासून प्रणाम आणि..
अनेक प्रकारे अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संकेतला हीच गोष्ट उत्तम शब्दात नक्कीच साकारता आली असती, पण त्याने मूक अभिनय निवडला..
आणि प्रत्येकाला आलेले अनुभव, असणारी आवड, नित्य होणारी तडफड, धडपड यातून विषय स्वतःहून समजण्याची मोकळीक दिली..
त्याचे हे सादरीकरण अनेकांना त्यांचे खोलवर दडलेली स्वप्न, अधुऱ्या इच्छा नव्याने शोधण्यास नक्कीच मदत करत असेल..
असे प्रयोग तो वैयक्तिक समारंभ, शाळा, संस्था , कोणत्याही कार्यक्रमात सादर करतो, तेही अत्यंत अल्प मानधनात, तेही त्याच्या अभ्यासाचा भाग असते..
आज शिक्षणात कोटा फॅक्टरी सारखे भयंकर प्रकार चालू असताना, असा जगावेगळा अभ्यास करणाऱ्यांना बघून फार भारी वाटते..
प्रेक्षक, रसिक यांचे मनोरंजन करत, त्यांना नव्या प्रेरणा देत, नवी स्वप्ने दाखवत त्यातून मिळणाऱ्या प्रतिसादावर एका संशोधनाचे प्रबंध लिहायचे हा विचार किती भन्नाट, नावीन्यपूर्ण, सर्जनशील आहे ना..!
संकेतच्या या प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा..
सोबतच सध्या झापड बांधून चालू असणारा अनावश्यक घोडे बाजार, गधा मजदूरी विसरून आजची युवापिढी अशा हटके विषयांचा सखोल अभ्यास करो, ही सदिच्छा..
आणि अशा नवनवीन गोष्टींमधून माझ्या लेखनास नवे विषय लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
सविस्तर - संकेत खेडकर (मोबाईल - 9960599894)
शिक्षण- MSc( Zoology ), MA ( Theatre )
Alumni of National MIME institute ( Kolkatta )
NET-JRF in Theatre studies
गुरू- पद्मश्री निरंजन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय मूकअभिनयात वाचस्पती (PHd)अभ्यास चालू
बारा वर्षांपासून नाटकात लेखक , दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम.
संस्था - सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर ( अध्यक्ष - डॉ.. श्याम शिंदे )
तीन वर्षे ललित कला केंद्र ( गुरुकुल ) पुणे विद्यापीठ येथून तीन वर्षांचा नाट्य अभ्यासक्रम पूर्ण केला आहे
ललित कला केंद्र येथे नाट्य , नृत्य आणि संगीत अश्या तीन विषयांचं प्रशिक्षण दिले जाते
National youth festival ( अजमेर, राजस्थान) आणि Theatre olympic ( भोपाळ )
येथे नाटकांची सादरीकरण केले आहे
अनुभव
दैनंदिन मालिका - राजा राणी ची गं जोडी ( PSI अमेय वर्दे ), डॉ .बाबासाहेब आंबेडकर
भागो मोहन प्यारे, जय जय शनिदेव ( भुमिका - शनिदेव), गाथा नवनाथांची ( भुमिका - गोरक्षनाथ, महादेव)
चित्रपट - साजींदे, प्रोजेक्ट 24
वेब सिरीज - तुमच्यासाठी काय पण, शिस्तीत राहायचं, चाळीतली लव स्टोरी
शिवाय
गेल्या सहा वर्षांपासूनच महराष्ट्रातील शाळा कॉलेज आणि विद्यापीठामधे अभिनय कार्यशाळेत साठी प्रशिक्षक म्हणून कार्यरत..




No comments:
Post a Comment
suggestions most wlcome