Wednesday, January 01, 2025

भ्रमणध्वनी

 भ्रमणध्वनी 

नातवंड बऱ्याच वर्षांनी गावी येणार. पद्मा आजीला आनंदात काय करू, काय नको झाले. तयारीत महिना सरला. पहाटे मुले यायला निघणार, या विचाराने पूर्ण रात्र तिचा डोळ्याला डोळा लागला नव्हता. अखेर तो दिवस उगवला, मंडळी ‘श्रीवर्धन’ च्या दिशेने रवाना झाली. दंगामस्ती, नाश्ता पाणी, गाण्यांच्या भेंड्या आणि  मधेच डुलक्या घेत प्रवास एकदम झक्कास झाला. आजी नातवंडांच्या वाटेकडे डोळे लावून दारातच उभी, ‘आम्ही आलो’ चार चाकीतून आवाज आला. तसे माऊलीने नजरेनेच लिंबलोण उतरवले. मग रीतसर भाकर तुकडा ओवाळला.


गंधार, नभा दुधावरची साय, सोबत सुश्रूता, श्रीरंग, अद्विक ही त्यांची मित्रमंडळी घरभर बागडू लागली. त्यांच्या चिवचिवाटाने घर भरले. सगळ्यांनी चुलीवरच्या जेवणावर मस्त ताव मारून थोडी वामकुक्षी घेतली. आजीने रखमाच्या मदतीने संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली.


प्रवासाचा शीण ओसरला, तसे सगळे अंगणात आले. आजी आणि रखमा धान्य निवडत होत्या. मुलांना बघताच त्यांनी काम बाजूला सारले. मुले आजी भोवती पिंगा घालू लागली. गंधारने हळूच एक गंमत तिच्यासमोर धरली, "ही बाबाने तुझ्यासाठी पाठवलेली भेट."


"मी काय आता लहान आहे?" आजी.


"लहान तर तू कधीच होणार नाही, नेहमी मोठीच तर राहणार." नभा.


"भेटवस्तू आवडतात सगळ्यांना." सुश.


"थांबा रे सगळे, आजी बघ ना, काय आहे ते." श्रीरंग.


वेष्टन बाजूला सरते, आत चकचकीत काळी, आयताकृती, चपटी वस्तू असते.


"भ्रमणध्वनी..! अन् मला कशाला हवा ? अर्धी लाकडे सरणावर पोहचली, आता मुखी हरिनाम पुरे." आजी


"हरिनाम घ्यायलाही, साथ देतो मोबाईल.. नव्हे भ्रमणध्वनी.." अद्वीक.


"शिवाय आम्ही घरी परत गेलो, तरी रोज गप्पा मारू, तेही एकमेकांना बघत, व्हिडीओ कॉल म्हणतात त्याला." श्रीरंग


"तू आम्हाला तुझ्या खास रेसिपी शिकव." नभा.


"सागरगोटे, काचाकवड्या ते सारे खेळ शिकव." अद्वीक.


"रोज रात्री किमान एक गोष्ट सांग, जुनी गाणी ऐकव" गंधार.

"अरे थांबा, थांबा, त्या माऊलीला श्वास तर घेऊ द्या. तो डबा वापरायचा कसा, हे कोण शिकवणार..?" रखमा


"अगं, मावशी त्यासाठी तर उन्हाळ्याच्या महिनाभर सुटीत आलो ना आम्ही." गंधार.


"एरवी चार दिवस आजी पुण्याला किंवा आम्ही इकडे येतो, त्यात काही हे जमणार नव्हते. आजीला सांगून थकलो, की मोबाईल ही आता गरज आहे, हौस नाही." नभा.


"मग आई बाबा, आम्ही मिळून आजी आणि तुझ्यासाठी चांगले महिनाभर ‘भ्रमणध्वनी प्रशिक्षण’ घ्यायचे ठरवले आणि आलो इकडे." सुश.


"रखमे, आता मात्र हे शिकावेच लागणार बरं." आजी.


"मी तर अर्ध्या पायावर तयार आहे." रखमा.


"मावशी, तुझ्यासाठी दुसरा मोबाईल आहे, हं" श्रीरंग.


मला नाही जमायचे.. नाही यायचे या वयात, आता नको.. 


अशी एका ना हजार कारण दिली दोघींनी, पण पंचरत्नांनी हार मानली नाही.


तशी पंचक्रोशीत पद्माआजी तल्लख बुद्धीची म्हणून ओळखली जायची. रखमा पण हुशारच. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यात, हव्या त्या व्यक्तीला संपर्क करणे, संदेश पाठविणे, छायाचित्र घेणे इथ पासून ते अगदी नकाशा वापरून रस्ता शोधणे, स्वयंचलित वाहन व्यवस्था करणे, ई पेमेंट करणे अशा अनेक गोष्टी दोघी उत्तम शिकल्या, त्यातले धोके नीट समजून घेतले.


वयानुसार विस्मरण झालेच, तर अडायला नको म्हणून आजीने आवश्यक लेखी टिपणे देखील नोंदवली. आता या भ्रमणध्वनीने तिला एक नवे काम दिले. रखमाला सोबत घेऊन हळूहळू साऱ्या गावकरी मंडळींना भ्रमणध्वनी साक्षर करायचे. त्याचे धोके शिकवायचे. गरजेनुसार सारे ब्रह्मांड ‘श्रीवर्धन’ च्या दारी आणायचे.

थोडक्यात, काय तर आजी भ्रमणध्वनी वापरण्यात तरबेज.. नव्हे ‘प्रो’ झाली.

आणि मराठी म्हणींमध्ये एक नवी म्हण जन्मली,


हाती भ्रमणध्वनी धरिले,  ब्रह्मांड दारी अवतरले..


अभिप्राय - म्हणी हा भाषेचा खूपच मौल्यवान दागिना आहे. त्यात पुणेरी मराठी आणि म्हणींचा वापर याचे तर गणित म्हणजे आणखी मजा. खंत आहे की, काळाच्या ओघात हे सारे कुठे तरी मागे पडत चालले आहे, भाषेचा दर्जा दिवसेंदिवस खालवत चालला आहे.

यासाठी अशी स्पर्धा नक्कीच प्रेरणादायी वाटते. यातून उपलब्ध झालेल्या कथा नक्कीच उपयुक्त ठरतील. म्हणी समजून घेताना अधिक मजा येईल. 

या स्पर्धेच्या निमित्ताने या भाषा प्रकाराकडे नव्याने बघण्याची संधी मिळाल्यामुळे आयोजकांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन



No comments:

Post a Comment

suggestions most wlcome