माणिक प्रभू यांची ही रचना दैनंदिन जीवनाची दिशा सुचवते.
राम म्हणजे परमेश्वराला शरण जा, समर्पित व्हा कारण दुःख, संकट, भय, वेदना अशा साऱ्याचे उपाय फक्त त्याच्याच जवळ आहेत..
त्यातही दशावतारांमधील राम हा मानवाच्या सर्व मर्यादा पाळणारा अवतार..
या अवतारात दैवी शक्ती, चमत्कार, युक्ती, इ. कोणत्याही गोष्टींचा वापर प्रभू श्रीरामांनी कधीही केला नाही..
मानव जन्म प्राप्त झाल्यावर सर्वोत्तम असण्याचे सर्व निकष त्यांनी सदैव सांभाळले आणि येणाऱ्या पिढीसाठी आदर्श स्थापन केले, अशा प्रभू रामाला शरण जा, असे रचनाकार सुचवतात..
राम हा परमेश्वरी अवतार होता, असे म्हणत त्यांनी केलेल्या गोष्टी मला शक्य नाही अशी पळवाट शोधून चालणार नाही..
रामाची आरती, गाणी, भजन इ. पोकळ स्तुती करून उपयोग नाही..
त्याआधी रामाचे गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न हवा, सत्य वचन, नीतिमत्ता, धर्मपालन असे एक ना अनेक गुणांचा अंगीकार करा..
थोडक्यात आधी राम व्हा, मग त्याचे गुणगान करा..
रामाची मंदिरात स्थापना करून पुरेसे होणार नाही, मानवी जीवनाची आदर्श मूर्ती असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या कथा ऐका..
एक राजा, पुत्र, बंधू, पती म्हणून ते कसे होते, इतकेच काय शत्रू असूनही दशग्रंथी राजा रावण याचा त्यांनी कसा मान राखला, हे सारे समजून घ्या..
व्यभ म्हणजे चुकीचा, आचार म्हणजे वर्तन, कोणतेही कर्म करताना व्यभिचार म्हणजे चुकीचे वर्तन करू नका..
कर्म करताना असत्य, अनैतिक, अधर्म या साऱ्या गोष्टी जबाबदारीने दूर ठेवा, त्यासाठी प्रभू श्रीरामांचे संस्कार, संयम, सद्भावना, साहचर्य, संतुलन असे गुण स्वतःच्या आचरणात येऊ द्या..
राम होणे ही अजिबात सोपी गोष्ट नाही, याची पूर्ण जाणीव रचनाकार माणिक प्रभू यांना आहे,म्हणूनच ते म्हणतात, हा दुस्तर म्हणजे पार करण्यास अवघड, भव याचा अर्थ स्थिती..
मला राम कसे होता येईल, त्यांचे गुण माझ्यात येण्यासाठी मी काय करायला हवे, हे मला खरंच जमेल का, अशी अवघड स्थिती निर्माण झाल्यावर, नेमके काय करायला हवे, हे सांगताना ते म्हणतात..
आपल्या संस्कृतीत सर्व श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या गुरु परंपरेची कास धरा, राम समजून घेण्यासाठी, त्यांच्यासारखे होण्यासाठी गुरुंचे सहकार्य घ्या..
मग ती व्यक्ती असेल, ग्रंथ संपदा असेल, जीवनानुभव असतील, त्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतील, फक्त मनात तशी इच्छा ठेवून मार्गक्रमण करत प्रभू श्रीराम आपले गुरु, सखा होण्याकडे प्रवास घडो..
यातून हा कठीण वाटणारा प्रवास हळूहळू सुकर होत जाईल..
म्हणे माणिक राम पहावा
काव्याच्या अंतिम चरणाकडे येताना माणिक प्रभू ईश्वराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात..
तेहेतीस कोटी देवांची परंपरा असणाऱ्या, आपल्या समृद्ध संस्कृतीत सर्वच देवतांचे इतके विलोभनीय वर्णन केले आहे, की प्रत्येकाला अशी दैवी शक्ती एकदा तरी, याची देही याची डोळा बघण्याची आसक्ती आपोआप निर्माण होते..
पण प्रभू राम म्हणजे षड्रिपुंवर विजय मिळवलेली मानवी दैवी शक्ती, मग त्यांना बघण्याची आसक्ती निर्माण होऊन कसे बरे चालेल, या आसक्तीवर मात करण्यासाठी उपाय एकच..
तया लागी हृदयी जपावा
रामासारखे बनून रामाला कोणत्याही मंदिर, मूर्तीमध्ये न शोधता, त्याला आपल्या हृदयात स्थापन करा, अगदी तसा जसा रामभक्त हनुमानाने स्व हृदयात स्थापिला..
आता राम सदैव आपल्या सोबत राहील, आपल्याला संसार रुपी भवसागर पार करण्यासाठी प्रेरणा देईल, दुःख, भय, संकट सारे निभावून नेईल, यासाठीच ..
राम होऊनी राम गा रे..
रामासी शरण निघा रे..
सदर रचना ही माणिक प्रभू यांची असून हा एक राम निरंजन, भक्तीगीत प्रकार आहे..
सोबत दिलेल्या दुव्यात या गीताचे स्वर बांधणी व सुरेल गायन पंडित प्रभाकर कारेकर यांनी केले आहे. त्याचाही जरूर आनंद घ्या..
भावार्थ कसा वाटला, प्रतिसाद द्यायला विसरू नका..
आपण सर्वांनी रामामय व्हावे याच शुभेच्छा..
खूप सुंदर
ReplyDeleteमनापासून आभार 🤗🌹
Deleteखूप सुंदर मांडणी
ReplyDeleteमनापासून आभार 🌹
Delete