Wednesday, January 21, 2026

विश्रांती







विश्रांतीची कहाणी..


ऐका महाराजा, तुमची कहाणी


आटपाट नगरात सुरू झाली शाळा, नाव तिचे सिटी प्राईड. बघता बघता नगरातील प्रमुख शाळांपैकी एक बनली. शाखा विस्तार होत, १ एप्रिल २०२५ रोजी चौथे अपत्य नावारूपास येऊ लागले..


जुन्या शाखांमधील मोजके सदस्य वगळता, सर्वकाही नवीन होते. तरी प्रत्येकजण मनापासून कामाच्या पद्धती, प्रणाली समजून घेत होते.


जुन्यांना शाळेच्या पद्धतीचा अनुभव असला तरी परिसर, इतर सदस्य, विद्यार्थी आणि पालक सगळं नवीनच होत.. 


सारेजण हसत खेळत एकमेकांना सोबत आनंद, उत्साहात काम करत होते,  दिवसांमागून दिवस जात होते..


सुरुवातीच्या काळात नव्या गोष्टी समजून घेण्यासाठी मिळणारा  वेळ, विचार , सुख दुःखाची देवाण घेवाण हळूहळू कमी होऊ लागली..


कामाचा पसारा, एकामागून येणारे एक पायाला चाक लावून येणारे उपक्रम, परीक्षा, इतर कामे यात सगळ्यांचे जणू यंत्र बनू लागले..


त्यामुळे वातावरण बदलू लागले, एक अस्वस्थता प्रत्येकाला त्रास देऊ लागली, काहीतरी हरवत आहे, निसटत आहे असे वाटले तरी नेमके काय हे लक्षात येत नव्हते..


त्यातच पालकांची मासिक बैठक, क्षेत्रभेट, स्पर्धा, परीक्षा, स्नेहसंमेलन असा एक संपण्यापूर्वी दुसरा अध्याय दत्त म्हणून उभा रहात होता..


विद्या प्रांगणाच्या वास्तू देवतेला हे सारे दिसत होते, आपल्या लेकरांची तगमग जाणवत होती, त्यावर हळूच फुंकर घालावी असे ठरवून, त्या अज्ञात शक्तीने जादूची कांडी फिरवली..


दिवस संक्रांत सणाचे, हेच निमित्त साधून सदस्यांना तिळगुळ समारंभ करण्याची बुद्धी दिली..


प्रस्ताव मांडला, परवानगी मिळाली, आवश्यक साहित्य, अर्थकारण साऱ्यावर चर्चा आणि नियोजन झाले..


इतक्यात मधे माशी शिंकली, नकार घंटा वाजवत विश्वव्यापी सायकल स्पर्धा आडवी आली, त्यासाठी मुलांना दोन दिवसाची सक्तीची सुटी जाहीर झाली..


तोंडावर आलेले सलग उपक्रम, त्यांचा सराव, राहिलेली ढीगभर कामे बघता, समारंभ रद्द करावा लागला..


पण देवतेला हे मंजूर नव्हते, तिने एका सदस्यास नकळत ऊर्जा दिली, येतील अनेक प्रश्न, अडचणी पण हे कार्य माझी इच्छा आहे, मनापासून काम करणाऱ्या माझ्या लेकरांना कामात थोडा बदल हवा आहे, (आजकाल काय म्हणतात ते आईस ब्रेक)..


कामाचा एकसुरीपणा, अडचणी यावर विश्रांतीची गरज आहे, जशी शरीराला झोप तशी मनाला उगाच हसण्याची, नाचण्याची गरज आहे..


अदृश्य शक्तीचा जणू आदेश झाला आणि सदस्य त्याच्या नकळत अनेक गोष्टी करून गेला..


२० जानेवारी मंगळवार, मुलांना सुटी असली तरी शाळेचे शिक्षक, कर्मचारी कुटुंबीय नेहमीप्रमाणे कामावर आले..


सदस्याने वरिष्ठांना केलेली तयारी सांगितली, पुढच्या साऱ्या उपक्रमांची कामे मिळून करूया पण त्याआधी एक तास थोडा वेगळा अनुभव घेऊ या असे गाऱ्हाणे मांडले..


वेळ उपलब्ध होता आणि हा बदल खरच आवश्यक आहे, हे जाणवून वरिष्ठांनी लगेच परवानगी दिली..


झाले, आता देवता त्या एकाच नाही तर तेथील अनेक सदस्यांच्या अंगी संचारली, बघता बघता अवघ्या अर्धा पाऊण तासात एका सुरेख समारंभाची जय्यत तयारी झाली..


तिळगुळ समारंभाला शोभेशी आरास साऱ्यांना छायाचित्र काढण्यास प्रवृत्त करू लागली, सर्वांनी एकमेकांसोबत या सुखद आठवणी आपल्या भ्रमणध्वनीत मनसोक्त टिपल्या..


एक एक करून सारे जमा झाल्यावर विद्यादात्री देवी सरस्वतीचे पूजन झाले, सर्वांनी मिळून तिचे आवाहन केले, हे देवी, दैनंदिन कामात आलेली यांत्रिकता दूर सारून आनंद, मैत्री, उत्साहाचे वारे वाहू दे..


उद्याचे भविष्य घडवू इच्छिणाऱ्या आम्हाला चैतन्य, नावीन्य, चिकाटीचे दान दे..


त्यानंतर सर्वांनी मिळून हसावे, खेळावे, बागडावे यासाठी गमतीशीर खेळ, बालगीतांवर नृत्य करण्यात आले..


त्यावेळी जी काही धम्माल, दंगामस्ती झाली की त्याच त्याच गोष्टी करून यंत्र होऊ बघणारे सारे सदस्य पुन्हा एकदा फुलपाखरासारखे रंगबेरंगी झाले..


सोबत अल्पोपहराचा आस्वाद घेताना मनमोकळ्या गप्पा झाल्या, शाळेचे नाव उखण्यात घेताना मनातले प्रेम, लटका राग व्यक्त करताना निरागाठी सुटल्या..


समारोप करताना प्रत्येकाने एकमेकांना तिळगुळ देऊन प्रेमाने मिठीत घेताना आपण सारे एक कुटुंब आहोत, इथले फक्त यश, आनंदच नाही तर प्रश्न, समस्या याही आपल्या साऱ्यांच्या आहेत आणि आपण मिळून त्यांना पार करणार आहोत असा आश्वासक आधार शब्दाविना दिला आणि मिळवला..


हा आणि असाच अनुभव सेवक कर्मचाऱ्यांनी देखील अनुभवला तेंव्हा   त्यास अधिक पूर्णत्व लाभले..


कामात थोडा बदल म्हणजे साऱ्यांनी एकत्र येऊन गप्पा टप्पा, खेळ, नाच याची अधून मधून फोडणी हवी तरच नित्य दिनक्रम अधिक आनंदी आणि उत्साही होईल हे एकमताने ठरले..


आपल्या लेकरांची काळजी घेणारी, ती अज्ञात शक्ती जशी सिटी प्राईड प्राधिकरण शाखेस लाभली, तशी ती तुम्हा सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..


अशी ही विश्रांतीची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण..


अभिगंधशाली




No comments:

Post a Comment

suggestions most wlcome