Monday, February 02, 2026

श्रवण

 

श्रवण, संभाषण, वाचन आणि सर्वात शेवटी लेखन हे भाषा आत्मसाद करण्याच्या पायऱ्या आहेत.. 

भाषेची ओळख होते तेच, श्रवण म्हणजेच ऐकण्यातून..

सामान्य मूल खूप लहान वयातच विशेष प्रयत्न न करता, फक्त ऐकणे आणि निरीक्षण करणे यातून घरात, परिसरात बोलल्या जाणाऱ्या एक वा त्यापेक्षा अधिक भाषा सहज शिकते..

त्यात अधिक नेमकेपणा, समृद्धता हवी असेल, तर त्यासाठी तशा पद्धतीचे ऐकावे लागते..

मी लहान असताना म्हणजे साधारण ३५-४० वर्षांपूर्वी, भाग्य म्हणावे की काय माहित नाही, पण प्रसार माध्यमे नेमके आणि उत्कृष्ट दर्जाची होती..

दूरचित्रवाणी ( फक्त दूरदर्शन), आकाशवाणी आणि टेपरेकॉर्डर, इतक्याच साधनांच्या मार्फत दैनंदिन कामाव्यतिरिक्त गोष्टी ऐकण्यास उपलब्ध होत्या..

त्याद्वारे लहानपणी छान छान गोष्टी, नंतर थोडे मोठे झाल्यावर चित्रपट गीते, कथाकथने भरपूर ऐकली, त्यांची पारायणे केली..

त्यात निखळ मनोरंजन होते, नि सोबतच येता जाता चांगल्या विचारांची पेरणी होती..

आज स्टँडअपचे आलेले खूळ.. अत्रे, पुलं, वपु यांच्या सारख्या दिग्गज मराठी साहित्यिकांनी फार पूर्वीपासून यश शिखरावर नेऊन ठेवले आहे..

त्याचा दर्जा इतक्या उच्च प्रतीचा आहे की शिव्यांच्या जागी फक्त फुल्या फुल्या हे शब्द देखील अचूक भावना सांगतो, त्याकरता जिव्हा आणि वाणी दूषित करण्याची गरजच नाही..

अशा उत्तम श्रवणाने फक्त कान नाही, तर आचार.. विचार.. वृत्ती सर्वांवर संस्कार झाले..

पुलं आणि वपु यांचे कथाकथन त्या वयात पूर्णतः कळले नसले तरी, मनोरंजना सोबतच भाषेची गोडी लागली, समृद्धता लाभली..

आजही ती कथाकथने ऑडीओ, व्हिडिओ स्वरूपात युट्यूब व इतर माध्यमात उपलब्ध आहेत आणि त्यांचे संदर्भ तितकेच काल सुसंगत आहेत..

नव्या वा बदलत जाणाऱ्या श्रवणीय गोष्टींना कडाडून विरोध नसला तरी, जुन्या सुवर्णाची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठीच आजचा लेखन प्रपंच..

असे उत्तम दर्जाचे ऐकण्यास मिळाले तर फार आटापिटा न करता, हसता हसता माय मराठी अनेकांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय बनेल असे देखील मनापासून वाटते..

म्हणूनच लेखना सोबत पुलं ( पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) आणि वपु (वसंत पुरुषोत्तम काळे) यांच्या निवडक कथाकथांची लिंक देत आहे..

https://www.youtube.com/watch?v=AyBmI61Jrus&list=PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm

https://www.youtube.com/watch?v=JflwJiPw4LU&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=TcmLHaJaEnI&pp=ygUPcHUgbGEgZGVzaHBhbmRl

https://www.youtube.com/watch?v=nhf2odF8h1Y&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl

https://www.youtube.com/watch?v=kbpoczrrVeQ&pp=ygUSdmFwdXJ6YSB2YSBwdSBrYWxl0gcJCZEKAYcqIYzv

https://youtu.be/XoVzdHsKdr0?si=ZAOGB0sgTHTq1ykC 

यांनतर क्रोनोलोजी अजून भरपूर पर्याय देईलच..

शिवाय आता एआयच्या जमान्यात प्रत्येकाने आपल्या आवडीचे, सोयीचे काहीही ऐकले तरी चालेल, त्यातून भाषा शिकण्यास, रुजविण्यास आणि वृद्धिंगत करण्यास मदतच होईल, हे नक्की..

तुम्ही काय ऐकता, सांगण्यास विसरू नका..

आणि नेहमीचे अभिप्राय, सुधारणा यांचे स्वागत..

2 comments:

  1. पु ल आणि व पु च्या कथांची जोड उत्तम

    ReplyDelete
  2. वपु आणि पुलं कालातीत आहेत. आजकाल अनेक अँप वर खूप छान छान मराठी पुस्तके ऐकता येतात. Storytel वर अनेक नामांकित मराठी कलाकारांनी वाचलेली अनेक उतोमतोम मराठी पुस्तक आहेत. दिलीप प्रभावळकरांच्या आवाजात बोक्याच्या करामती ऐकणे म्हणजे सुख आहे .

    ReplyDelete

suggestions most wlcome