Saturday, September 19, 2026

कोकणचे गौरी गणपती


कोकणचा बाप्पा लई भारी,

गौराईची तर बातच न्यारी..! 

चाकरमानी निघाले घराला,

गौरी गणपतीच्या सणाला..!

गणपती येण्यापूर्वी कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ, तिथल्या या सणाच्या बातम्या लहानपणापासून ऐकल्या, वाचल्या होत्या.

आता सोशल मीडियामुळे रिल, युट्यूबवर पाहिले होते. 

हा अनुभव प्रत्यक्ष घेण्याचा अचानक योग आला आणि विविध पद्धती, परंपरा आणि संस्कृती याने समृद्ध कोकणची नवी ओळख झाली.

झाले असे की, अभिजीतच्या मित्र यशवंत राजेशिर्के याचा काही कामासाठी फोन आला, जो गौरी गणपतीसाठी कोकणात होता. त्याने आमंत्रण दिले नि आम्ही निघालो.

शिवाजी महाराजांनी बहाल केलेली वतनदारी असणारे राजेशिर्के यांचे हे कुडाप सावर्डे (चिपळूण जवळ) गाव तिथल्या सतरा घरांचा मिळून एकच असणारा हा गौरी गणपतीचा सण. एरवी शहरात राहणारी पण या सणासाठी खास एकत्र जमणारी अनेक मंडळी मिळून अतिशय उत्साहात हा सण साजरा करतात.

आम्ही तीन दिवस उशीरा पोहोचल्याने पहिल्या दोन दिवस झालेली बाल्या नृत्य बघता आली नाही.

गौरी आवाहन अनुभवले, एक माहेरवाशीण आणि सगळ्या घरातल्या कुमारिका नटूनथटून नदीकडे निघाल्या.

तिथे शेणाने जमीन सारवली, रांगोळी काढली. नैवेद्य दाखवला. आरती केली. मग प्रत्येक घरातून रुमालात आणलेले दोरे धुपवले.



त्यानंतर देवी आणि शंकराचे आवाहन करून नदीतून सात खड्यांची गौरी घेऊन सगळ्या घरी परतल्या. 

ही गौराई आधी प्रत्येकाच्या (सतरा ) घरी नेली. दारात पाय धुवून आरती केली, देव घरात पूजा झाली,  विचारपूस झाली. सोबत आलेल्या कुमारिकांना प्रसाद, खाऊ दिला. 

गौराईने घराला धनधान्य भरभराटीचा आशीर्वाद दिला. सगळ्या घरांमध्ये फिरून तिला मुख्य घरी आणले. सर्वजण तिथे जमले. बांबूच्या कामट्यावर साडी चोळी नेसवून, चांदीचा मुखवटा, दागिने,  हारतुरे, वेणी याने सजवले, सोबत शंकरोबा बसवले.



मग प्रत्येक घरातून रानभाज्या व तांदळाच्या भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला सर्वांनी जेवण आटोपली आणि मग आरतीसाठी जमा झाले साधारण तासभर आरती व नंतर भजनाचा कार्यक्रम रंगला. यात मध्यरात्र कधी उलटली हे समजले नाही. दुसर्‍या दिवशी लवकरच उठायचे असूनही मंडळी गौराईच्या आगमनाने आनंदाने नाच गात होती.

असा हा वेगळा अनुभव रोजच्या धावपळीच्या दिनक्रमाला नवी ऊर्जा नवा उत्साह देऊन गेला.


त्यासाठी राजेशिर्के कुटुंबियांचे मनापासून आभार..


अभिगंधशाली

2 comments:

  1. खूप छान, प्रत्येक गावात गौरी बसवायची पद्धत वेगळी असते आज तुझ्यामुळे कोकणातील कळली धन्यवाद असेच प्रत्येक सण कुठे कशी करतात याची माहिती घेत रहा. खूप खूप छान.

    ReplyDelete

suggestions most wlcome