Saturday, May 09, 2020

भोगीची भाजी






उगाच काहीतरी सुचलं म्हणून...

ही भाजी-भाकरी कुणालाही लगेच आवडेल असा मेनू नाही.

भाकरी म्हणजे दिसायला रांगडा पण तब्येतीला भारीच चांगला पदार्थ.



भाजी म्हणजे किती साऱ्या भाज्यांची सरमिसळ, आणि त्याला मसाला प्रत्येकाचा वेगळाच.

त्यामुळे दर्शनी नाक मुरडले तरी हळूच एखादा तुकडा मोडावा आणि घास घ्यावा....



प्रत्येक जण पहिल्यांदा आपले वेगळेपण दाखवेल घास विरघळून पोटापर्यंत प्रवास करेल आणि मग सगळ्यांची मिळून असलेली चव मुखी येऊन त्यांची ओळख मनात घर करेल.



हे रामायण सुरु केलं ते हा फक्त पदार्थ किंवा सण नाही तर संस्कार आहे असे वाटले आणि अनुभवले म्हणून.



माणूस म्हणजे समाजशील प्राणी, समूहात राहणारा वगैरे पुस्तकी ज्ञान आपण घेतो पण भोगीचा मेनू जिथे जमत नाही तिथे मात्र तो एखाद्या सोनेरी नावात कोंडल्या सारखा होतो.



थोडक्यात...

भाकरी म्हणजे समूहाची बांधणी करणारे, मोट सांभाळणारे सगळे.. त्यांची भूमिका रांगडीच हवी. कुणाला ना कुणाला ही वठवावीच लागते.


सूचना, नियम पाळायला लावणारी, सतत लक्ष ठेवून असणारी पण तरी पौष्टिक, स्वतःची खास चव असणारी. ही नुसतीच सगळ्यांची भूक भागवू शकेल पण हिच्याशिवाय नुसती भाजी खाणे अवघड.
भाकरीला पोळी, पराठा, थालपीठ किंवा अलीकडचे पाव, पिझ्झा हे पर्याय होऊच शकत नाही किंवा तसा प्रयत्न कुणी केलाच तर त्यांची जागा भाकरीला दाखवता आली पाहिजे.

भाजी म्हणजे सगळे सदस्य प्रत्येकाचा न्याराच ढंग. वेगळी शैली, वेगळी आवड तरीही एकत्र असण्याची गंमत माहित असणारे.

साद दिली की प्रतिसाद देणारे. आपली ओळख जपताना दुसऱ्याची बिघडू नये हे सांभाळणारे. कोणीच कुणाशी स्पर्धा न करता आपली ताकद ओळखणारे.

मसाला म्हणजे प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठीची संधी. अधून मधूनच्या गमतीदार, खुमासदार गप्पा-चर्चा म्हणजे भाजीला दिलेली फोडणी.

असं सार जमून आले की अधूनमधून लटक्या भांडणांच्या मीठमोहरीने ओवाळूनही घ्यावे आणि ते बाहेर न फेकता घरातल्या तव्यावर टाकूनच ठसका लागे पर्यंत धूर करावा. डोळ्यातून झरणाऱ्या पाण्यासोबत सगळं पुन्हा साफ व्हावं.

आणि संक्रातीच्या तिळगुळात हे बंध अधिक स्निग्ध आणि गोड व्हावे.

यात काही चुकलं माकल असेल सोडून द्या.
आवडलं तर अजून काय हवं त्यातच सगळं मिळालं.



No comments:

Post a Comment

suggestions most wlcome