"ओsयsय ती पेन्सिल त्यात खुपसू नको बरं. बघ किती भोके, पडली
त्याला."
लेकाजवळचा तो रंगीत तुकडा घेताच माझे मन बालपणात धावले..
तसे माझे बालपण खूप छान आणि नेटके होते, पण आताच्या मुलांसारखी सुबत्ता किंवा चोचले तेव्हा
नव्हते..
आई बाबांकडे काही मागितले, तर आठवडाभर मिळायचे नाही, कारण त्यामुळे विशेष
अडणार नाही हे ते जाणून असायचे..
मागणी लगेच पुरी न झाल्याने त्या वस्तूचे अप्रूप
असायचे..
त्यामुळे मिळाल्यावर तिची काजळी आपोआप घेतली जायची..
हातातला तो रंगीत तुकडा..
हो तुकडाच, कारण सुपुत्रांनी वेगवेगळ्या आयुधांनी त्याची शस्त्रक्रिया करुन त्यास पुरते घायाळ केले होते..
त्याचा मूळ आकारच
हरवला होता..
त्यास मायेने कुरवळताना, मला त्याचे माझ्या लहानपणीचे रुप आठवले..
तेव्हा
तो शुभ्र पाढंऱ्या रंगाचा आयताकृती छोटासा ठोकळा असायचा..
त्याचा दुसरा भाऊ, लाल
निळ्या रंगाचा आणि दोन्ही टोकाला उलट सुलट उतार असलेला होता..
वापरुन वापरुन त्यावर काळे थर जमा होऊ लागले की त्याला ड्रेसवर घासून
चकाचक करण्याचे काम करताना खूप आनंद मिळायचा..
सगळ्यांचे सारखेच असल्याने, आपला वेगळा ओळखू यावा म्हणून त्यावर
नाव घालून ठेवले जायचे..
तरी चुकून हरवला तर, जी मुक्ताफळे मिळायची, ती आता वापरली की
मुलगा त्या भाषिक समृद्धीला हसून हसून दाद देतो..
त्यावेळी आम्ही जर हसलो असतो तर, ही कल्पनाही करवत नाही..
आम्ही मात्र तो अगदी छोटुकल्या मण्याएवढा होईपर्यंत
वापरायचो..
त्यानंतर नवीन मिळाला तरी, तो मणी झालेला अनेक दिवस अडचणीला असू दे
म्हणून जपून ठेवायचो..
बर्थ डे पार्टी आणि रिटर्न भेट यांचे पेव न फुटलेला, तो काळ..
त्यामुळे त्या तुकड्याचे गरजेपेक्षा जास्त संख्येने असणे कधीच अनुभवले नव्हते..
असा तो तुकडा म्हणजे, खोडरबर..!
आता इतक्या वेगवेगळ्या आकारात आणि रंगात
मिळते, की ते काही काम करते याचा विसरच पडतो..
त्याचा छान संग्रह करावा, शो केस मध्ये सजवावे
असा मोह होतो..
पण मुलानी त्यावर केलेले शस्त्रक्रियांचे प्रयोग बघून, त्याला यातले काहीच वाटत
नाही हे प्रकर्षाने जाणवले..
असे का करतो..? असा भाबडा प्रश्न विचारला..
तर त्याने कपाटातून अजून, अशी दहाबारा
खोडरबर काढून दाखवत प्रामाणिकपणे सांगितले..
"माझ्याकडे अजून खूप आहेत, त्यात शाळेत खोडरबर वापरु देत नाही. चुकले तर फूली किंवा तीन रेषा द्यायच्या. मला त्याच्याशी असे खेळायला, त्याचे आत नेमके कसे दिसते बघायला आवडते.."
त्याचे म्हणणे काहीसे खटकले, मनात विचारांचे काहूर उठले..
खोडरबर हे माझ्यासाठी फक्त शालेय साहित्य कधीच नव्हते..
तो एक आधार
होता, चुका करत शिकण्याचा..
चुका पुसता येतात शिवाय त्याची कोणतीही आठवण मागे राहत नाही
हा विश्वास होता..
त्याला आकर्षक रंग, विविध आकार असे सौंदर्य नसले, तरी ती अतिशय गरजेची
वस्तू होती..
पहिली पूर्ण वापरल्यावर दुसरी नवीन मिळायची..
त्यामुळे त्याची आपसूक काळजी
घेतली जायची..
चूका झाल्याच तरी दुरुस्त करुन, पुन्हा सगळे पहिल्यासारखे करायला संधी
होती..
ही संधीच या नव्या शिक्षण पद्धतीने काढली आहे का..?
एक तर चूक करायचीच नाही, की चुका डोळ्यासमोर रहाव्या, यातली नेमकी
कोणती भूमिका यामागे असेल..?
अशा सतत दिसणाऱ्या चुका, मला हे जमत नाही हा न्यूनगंड वाढवतील की चुकाच होतात हा स्वैराचार रुजवतील..?
हेच बीज कदाचित फोफावत आहे..
ज्याला त्याला सगळेच परफेक्ट आणि आता तर १००% अधिक हवे आहे..
यात जराही
उणे झाले की, नैराश्य येते..
सगळे नकोसे होते, आपण काहीच करु शकत नाही याचा वणवा
भडकतो आणि सगळे हरवून जाते..
खरे म्हणजे प्रत्येकाकडे खूप सारी खोडरबर (प्रतिकात्मक) असतात..
फक्त ती अचूक वेळी
वापरली पाहिजे..
इर्षेचे खोडरबर, हार पुसून आहे तिथून पुढे जाण्याची तयारी करायला..
माफीचे खोडरबर, लहानसहान
रुसवे-फुगवे दूर करायला..
उद्रेकात मौन खोडरबर, काहीच प्रतिक्रिया न देता शांतता ठेवणारे..
गमतीशीर विनोदाचे खोडरबर, तंग
वातवरण हलके करणारे..
अशा एक ना अनेक खोडरबर आपण नित्य दिनक्रमात वापरले तर, सुखी कोण..?
या प्रश्नाला प्रत्येक जण 'मी' हे मनापासून उत्तर देईल..
कारण परवाच एका तज्ञांचे विचार वाचनात आले,
“No one is perfect, we all are near to perfection."
चला आपली खोडरबरे शोधू या, आणि त्यांच्या मदतीने नको असलेले सारे पुसून टाकू या..


No comments:
Post a Comment
suggestions most wlcome