जेंव्हा चिमुकले आपले गुरु बनतात..
निसर्गाच्या चक्रात तोच टिकू शकतो, ज्याला गरजेनुसार बदल स्वीकारता
येतात हे आपण ऐकतो, शिकतो आणि घोकतो..
पण प्रत्यक्ष कृतीत मात्र बदलांना कचरतो
मग ओघाने येणाऱ्या दुःख, अपयश, प्रश्न यांच्या घेऱ्यात सापडतो..
एक शिक्षक म्हणून कालानुरुप शिक्षणपद्धती वापरली पाहिजे, हे सतत घोकले
जाते आणि अंमलबजावणी मात्र दूरच राहते..
त्यामागे नव्या रुपाची, पद्धतीची काहीशी
भिती किंवा नावड अनेकदा कारणीभूत असते..
कदाचित नवीन म्हणजे जुन्यापेक्षा खूप काहीतरी वेगळे असे ग्रह करुन
घेतल्यामुळे असे बदल नकोसे वाटतात..
याच विचारला काहीसा धक्का आज एका गमतीशीर प्रसंगाने दिला..
झाले असे की माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पिढ्यान पिढ्या चालत आलेला एक खेळ घेत होते,
"चिमणी.... भुर्रर्र."
"कावळा......भुर्रर्र"
मागे काही वर्षांपूर्वी ही यादी काही प्रमाणात बदलून, सुरुवातीला..
"माशी... भुर्रर्र"
"फुलपाखरु.... भुर्रर्र"
"डास.... भुर्रर्र"
नंतर काही वर्षांनी
"विमान.....भुर्रर्र "
"फुगा..... भुर्रर्र"
अशी वाढवत नेली होती, तेही आमच्या चिमुकल्यांच्या निरीक्षण आणि मागणीतूनच बरं का..
तर असा हा खेळ मजेत चालू होता, रंगात आला होता..
न उडणाऱ्या गोष्टी, प्राणी किंवा उपस्थित व्यक्ती यांची नावे आल्यावर
ठासून
नाही नाही नाही चा गलका घुमत होता..
इतक्यात एक चिमुकला उठला आणि म्हणाला,
"बॅटमॅन भुर्रर्र"
"सुपरमॅन भुर्रर्र "
मग इतरांनीही लगेच यादी वाढवली,
" हिमॅन भुर्रर्र "
"स्पायडरमॅन भुर्रर्र "
एकाने तर,
"हनुमान भुर्रर्र " जोडले..
मनात आलं अरे पुन्हा यादी वाढवायची वेळ आली..
काळासोबत राहायचे असेल तर, या पिढीचे अनुभव, निरीक्षण यातून हे
बदल करायला हवे, तरच त्यांना या खेळाची मजा देता-घेता येईल..
किती सहज आणि सोपे आहेत ना काळ सुसंगत शिक्षण..
तीन चार वर्षांचे हे बोबडे बोल किती पटकन आणि नकळत मोठ्यांच्या विचार कक्षा
विस्तारत नेतात..
यातूनच नवं निर्मितीचा आनंद घेतात आणि देतातसुद्धा..
आपण मात्र उगाच या सगळ्याचा बागुलबुवा करतो..
मग चला आपणही यातून काहीतरी घेऊ या..
फक्त
जुने ते सोने..
असं म्हणण्यापेक्षा, जुने ते सोनेच पण नवे तेही हवे..
असा बदल करु या.. आपल्या ज्ञान, माहितीचा विस्तार करु या..
तरच काळासोबत राहता येईल..

No comments:
Post a Comment
suggestions most wlcome