Sunday, May 03, 2020

परीस

परीसाच्या संगे मी बी घडले..


आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना...
परीसाच्या संगे लोह बी घडले.... 
लोह बी घडले परीसची झाले...
सद् गुरु संगे शिष्य बी घडले....  
शिष्य बी घडले सद्गुरुची झाले...

या ओळी आठवल्या की एकदम दुसरीतल्या गंधारची आठवण होते... त्यावेळी अभंग स्पर्धेत हे म्हण असे सुचल्यावर, बी घडणे हा शब्द नेमका न समजल्यामुळे  असले वाईट काहीतरी, मी म्हणणार नाही, सगळे मला हसतील, यावर स्वारीने पुष्कळ वाद घातला होता. त्याला नीट समजावून सांगितल्यावरही, काहीशा नाराजीनेच त्याने तयारी केली. नशिबाने परीक्षकांना भाषेचे उत्तम ज्ञान व शब्दातील खोच नेमकी समजल्याने, खणखणीत आवाजात म्हणलेले या अभंगाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले, मग साहेबांचा आनंद विचारायलाच नको. पाठांतर आणि म्हणण्याची मजा यामुळे, आज आठवीतही त्याला तो अभंग उत्तम लक्षात आहे. 

दुसरीच्या वयाला त्यातला नेमका अर्थ नाही समजला तरी चालेल, पण त्याने हा अभंग शिकावा, त्याच्या अंतर्मनात कुठेतरी हे शब्द कोरले जावे व वेळ जाईल तसा त्यामागील अर्थ समजून घेऊन त्याने स्वतःसाठी असे उत्तम परीस, सद्गुरु शोधत रहावेत, या अट्टाहासाने त्याला मी ही तयारी करायला लावली होती. स्पर्धा आणि बक्षीस हा दुय्यम भाग होता.

मी ही साधारण त्याच्यात वयाची असताना हा अभंग नकळत शिकले होते. खरंतर वयाच्या बऱ्याच मोठ्या टप्प्यापर्यंत गुणगुणताना एक गमतीशीर आनंद मिळायचा व त्यासाठीच तो खूप आवडायचा. शब्दांमागील भावार्थावर काम करणाऱ्या मनाने सतत चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहण्याचा ध्यास नेमका कधी आणि कसा उचलला हे मात्र सांगता येणार नाही. एक नक्की की कोणीही संपूर्ण चांगले किंवा वाईट नसते. प्रत्येकात जे उत्तम आहे ते घेऊन स्वतःला घडवणे म्हणजे आपले परीस शोधणे. ज्यामुळे आपण अधिक समृद्ध होतो. असे हे सगळे सुख-दुःखात नेहमी आपल्यासोबत असतात. कधी प्रत्यक्ष तर कधीतरी कोणत्यातरी वेगळ्याच रुपात. 

सुरुवातीलाच इतके कठीण न समजणारे, वाचून असे वाटले, आज हे काय पुराण मांडले आहे ? नेमके काय सांगायचे आहे? असे कोणते अनुभव घेतले आहेत की जे अनुभवांच्या पोतडीतून सगळ्यांसाठी खुले करायचे आहेत.

हे नेमके समजण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. २९ डिसेंबर २०१९ रविवारचा दिवस. खरे तर सुट्टीचा-आरामाचा दिवस, पण आराम शरीराच्या आधी मनाला आवश्यक असतो. ते अतिशय स्वस्थ असावे लागते. नेमके तेच बिनसले होते. शरीराला हवी असूनही विश्रांती मिळत नव्हती.

बहिणाबाई म्हणतात ना..... 

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर 
किती हाकला हाकला पुन्हा येई पिकावर.....

वर्ष संपताना अनेकदा असे होते, की या वर्षात काय मिळवले... यापेक्षा काय गमावले... हरवले.... कुठे कमी पडलो.... कुठे हरलो याचेच हिशोब आपण मांडतो आणि दुःख करण्यातच वेळ घालवतो. थोडेफार तसेच, मन नको त्या गोष्टींच्या मागे लागून उगाच स्वतःला त्रास करून घेत होते. बरं त्याला नेमकं कुठे आणि काय दुखत आहे, हेच न समजल्याने आवश्यक उपायही करता येत नव्हता. असा तो सारा दिवस उगाच विचार करण्यात गेला. संपणारे वर्ष खूप काहीतरी घेऊन चालले आहे... वाईट अनुभवातूनच गेले आहे असाच पुरता समज करून घेतच रात्र सरली. (झोप तर लागलीच नाही...)

३० च्या सकाळी जे घडते आहे ते योग्य नाही. त्यामुळे घरातल्यांवरती, कामावरती परिणाम होत आहे, चिडचिड होत आहे, हे लक्षात आले. नेमके काय करूया...? यावर विचार करत असतानाच (सकाळी ५ वाजता) आईने what’s app ला खूप सुंदर मेसेज पाठवला. फॉरवर्ड असला तरी तो खूपच सूचक होता. वाचून सैरभैर झालेले मन एकदम शांत झाले.

तो मेसेज होता..... मी आहे ना.... Everything is  fine

आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते?याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही..

जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी..  आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो, पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं... . It's mutual relation... मन जुळलं की आपलेपणाचे नात होते...जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे "मी आहे ना" एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात.. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं... 

पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे ...नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण……. 
         
मला वाचतानाच खूप भरुन आले. नकळत अशी स्वतःहून जोडलेली नाती शोधण्यासाठी काम सुरु केले.....

ठरवून पुन्हा एकदा.... खरचं २०१९ इतके वाईट गेले का ?... याचा मागोवा घेऊ या असा विचार करुन डायरी, फेसबुक उघडून बसले. त्यामधून जे काही समोर आले ते बघून तर, मन अगदी फुलपाखरासारखे हलके आणि आनंदी झाले.... कारण त्यात एकही वाईट आठवण नव्हती. होते ते फक्त आनंदाचे, कौतुकाचे, यशाचे क्षण... अनुभवलेल्या नव्या-जुन्या गोष्टी... वेगळ्या विषयांवरचे लेखन... नव्याने जोडलेली माणसे.... सगळेच कसे अगदी हवेहवेसे..

पुन्हा एकदा आईची आठवण झाली. मागे एकदा तिने मला सांगितले होते की वही-डायरी लिहिताना, त्यात दुःखाच्या, अपयशाच्या, नकाराच्या नोंदी करायच्या नाहीत, कारण पुढे कधीतरी अनेक वर्षांनी अशा गोष्टी चाळताना फक्त चांगले आणि चांगलेच मिळाले पाहिजे. वाईट आठवणी हळव्या बनवतात, कामापासून दूर नेतात... तेच चांगल्यातून प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो. तेंव्हापासून ठरवून दुखले-खुपले तरी, त्याच्या नोंदी करणे बंद करून टाकले आणि म्हणूनच डायरी असू देत किंवा फेसबुक त्यातून वर्षभरात घडलेल्या फक्त चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी समोर आल्या... मग ३१ चा दिवस खूप स्वस्थ-निवांत आणि आनंदी झाला.

त्या एका मेसेजने मला एक वेगळा विचार करायला लावला. आपोआप मन स्वस्थ झाले. प्रश्नांची उत्तरे सापडली. सगळे सुरळीत होण्यासाठी रस्ता सापडला, जो अवघड नव्हताच. प्रश्नही मोठा नव्हता गरज होती, ते स्वतःला नेमके शोधण्याची. योग्य-अयोग्य ठरवण्याची. जे लक्षात आले त्या मेसेजमुळे. पाठवणारी होती आई, माझा हक्काचा परीस. आई-बाबाच नाही तर घरातील सर्वच मंडळी अगदी गंधार-नभा हेही माझे परीसच आहेत. जे माझ्यातल्या लोहाला परीस बनवतात. मला अस्वस्थतेतून स्वस्थ करतात. नवी स्वप्न दाखवतात. चुकले तर हक्काने सांगतात. त्यांच्याकडून मी नेहमीच खूप काही शिकत असते. समजून घेत असते. स्वतःला सावरत असते. शोधत असते. त्यांच्यासोबत बी घडण्याच्या सगळ्या संधी अगदी मनापासून घेत असते. 

हे जसे घरातले तसेच घराबाहेर पाऊल ठेवल्यावरही असे अनेक परीस भेटत राहतात आणि नकळत अभंग ऐकू येऊ लागतो.....फक्त तेंव्हा गरज असते ते स्वतःला सोनं-हिरा (मी-अहं बाजूला ठेवून) न समजता लोह होऊन त्यांच्या जवळ जाण्याची. कधीतरी एखाद्या परीसाचे तेज काहीसे दाहक असते (त्यांचा राग-लोभ अनुभवावा लागतो) पण आपल्यालाही परीस व्हायचे असेल तर ते सहन करण्याची तयारी ठेवावी लागतेच ना.... ती ठेवूनच त्यांच्या जवळ जात रहाते... तेही न घाबरता, न लाजता करते. त्यातून त्यांचे वेगळेपण दिसते... काम बघायला मिळते... नवे अनुभव मिळतात.... एकूणच खूप सारा आनंद, उत्साह, प्रेरणा मिळते. जी माझ्यातल्या मला शोधण्याचा... बी घडवण्याचा मार्ग दाखवत रहाते...

थोडक्यात सांगायचे तर असे खूप सारे परीस नेहमीच भेटत राहोत आणि मला अधिकाधिक समृद्ध करत राहोत हीच मागणी आलेल्या २०२० इंग्रजी वर्षाकडे करते आणि माझी अनुभवांची पोतडी नव्या जोमाने भरण्यासाठी तयारीला लागते... 

त्याचबरोबर माझ्या या अनुभवातून तुम्हीही बी घडण्याच्या प्रवास सुरु करावा... तुम्हा सर्वांनाही तुमचे परीस सापडावेत अशा मनापासून शुभेच्छा देते व प्रतिसादाची वाट पाहाते....

वरील व्हिडीओमध्ये असे अशी खूप छोटी छोटी कारणे दिली आहेत त्यामुळे अगदी सहज आनंदी, स्वस्थ आणि शांत राहता येते म्हणून सूचक गाण्यासोबत जोडत आहे.

वरील व्हिडीओमध्ये असे अशी खूप छोटी छोटी कारणे दिली आहेत त्यामुळे अगदी सहज आनंदी, स्वस्थ आणि शांत राहता येते म्हणून सूचक गाण्यासोबत जोडत आहे.



No comments:

Post a Comment

suggestions most wlcome