दुर्गमोहीम सहभाग - खजिन्याचा शोध
२०२० इंग्रजी वर्षाची सुरुवात
काहीतरी वेगळा अनुभव घेऊन करावी, या इच्छेने शिवराज दादाच्या दुर्ग मोहिमेत सहभागी
होऊन एका दुर्गाची चढाई करण्याचे ठरवले..
तारीख चार जानेवारी जुन्नरमधील
सिंदोळा दुर्ग..
मोहिमेचा अंतिम टप्पा चालू असल्याने, दुर्ग अति अवघड श्रेणीतला..
चढाईच्या काही मिनिटातच अवघड म्हणजे काय याची प्रचिती यायला सुरुवात झाली..
जवळ जवळ गड आला पण सिंह गेला, ते कोंढाण्यासाठीचे युद्ध, तानाजी मालुसरे यांची शर्थ हे वर्णनात ऐकल्याप्रमाणे समोर दिसत होते..
दुर्गाच्या उभ्या कातळाला धरुन, घोरपडीसारखे सरपटत आम्ही पुढे पुढे जात होतो..
बरोबरीचे सगळे माझ्यापेक्षा अधिक
अनुभवी, आधीचे २२ दुर्ग सर केलेले असल्याने, त्यांना माझ्या इतके प्रश्न येत
नव्हते..
मधला बराचसा भाग खूप सरळ असल्याने
पुरती दमछाक होत होती..
तरी जिद्दीने दुर्ग सर केला..
चढायला अवघड असलेला हा सिंदोळा दुर्ग एका बाजूला निमुळती जागा, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी, न सरावलेली वाट, सुकून निसरडे झालेले गवत यामुळे उतरायलाही तितकाच कठीण गेला..
तरी
उतरताना पथदर्शक रघूदादांनी जवळची वाट शोधून निम्मे
कष्ट कमी केले..
ठरवल्याप्रमाणे दुर्ग सर करुन आले, पण दैनंदिन व्यायाम नसल्याने दुसऱ्या दिवशी या अति उत्साहाचा परिणाम
दिसले..
हाता-पायांचे स्नायू पुरते अवघडले, काम करण्याला नाही म्हणू लागले..
माझी
अवस्था बघून आमचे सुपुत्र गंधार याने अतिशय निरागस आणि खोचक प्रश्न विचारला..
जर तुला इतिहास विशेष आवडत नाही, भूगोल समजत नाही, प्रवास आवडत नाही, तर तू दुर्ग चढायला गेलीसच का..?
त्याचा प्रश्न अगदी रास्त होता, कारण मला खरोखर प्रवास, उगाच शारीरिक दमणे आवडत नाही..
त्यापेक्षा नवीन चित्रपट बघणे, वाचन-लेखन करणे, यात मन अधिक रमते..
तर मग अशी इच्छा झाली, याचे मूळ प्रबोधिनीच्या घडणीत आहे..
त्यामुळे फारसा विचार न करता मी
उत्तर दिले...
बघ, वर्ष संपताना अनेकदा नकळत त्या वर्षभरात घडलेल्या वाईट गोष्टी सतत
आठवतात आणि एक प्रकारचे नैराश्य, अस्वस्थता दाटून येते, तरीही आपण ठरल्यानुसार सकाळी उठतो, दैनंदिन कामे करतो..
पण असे असले तरी त्यात एक साचलेपणा
येतो, ज्यातून आपण काहीच करु नये असे वाटू लागते..
आपल्यातली नकारात्मकता कमालीची वाढीस लागते..
अशावेळी मन इतके सैरभैर होते की विश्रांती घेऊ, मस्त झोप काढू, आळसात वेळ घालवू असे ठरवले, तरी तेही जमत नाही..
अशावेळी गरज असते विश्रांतीची..
मला आठवते त्यानुसार, साधारण मी
इयत्ता आठवीत असल्यापासून, एक वाक्य मी घर, शाळा दोन्हीकडे सदैव ऐकत आले आहे..
विश्रांती म्हणजे कामात बदल !
असा वेगळ्या कामाचा अनुभव घेऊन, जर येणाऱ्या नव्या वर्षाचे स्वागत केले तर ते नक्कीच उत्साह वाढवणारे असते..
कामात बदल हा मुद्दा गंधारला पटला, तरी त्याची गाडी परत मूळ पदावरच आली..
बदल म्हणून नावडत्या कामाची निवड का..?
त्यातून अजून त्रस्तता आली तर..?
तेव्हा त्याला समजावले की मला
इतिहास विषय, फिरणे, शारीरिक दमणे हे जरी आवडत नसले, तरी मोहिमेत सहभागी मुलांसोबत अनौपचारिक शिक्षणाचे
अनुभव घेणे हे आवडीचे होते..
त्याशिवाय उपक्रमात सहभागी नवनवीन माणसांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, गप्पा, त्यांच्या कामाच्या पद्धती यातून नवीन काहीतरी मिळत राहते, ते सारे खूप आवडते..
आपल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत पुस्तकी शिक्षणापेक्षा
अनौपचारिक शिक्षण उपक्रम अधिक प्रमाणात चालत असतात..
यात सर्व जेष्ठ श्रेष्ठ, अनघाताई, शिवराजदादा, श्वेतलताई, मयुरीताई, अस्मिताताई, इतर विभागप्रमुख यांसारखे अनेक जण सतत काही ना काही नवीन
प्रयोग करत असतात..
या मुलांसाठी स्वानुभवातून
घडण्यासाठी निरनिराळ्या संधी असतात..
अशा उपक्रमात सहभागी होऊन, मला नवे शिकण्याचा
तर कधीतरी कोणती तरी मदत करत कामातील खारीचा वाटा उचलण्याचा आनंद मिळतो..
आता साहेबांना मुद्दा पटला, पण प्रश्न संपतील तर तो प्रबोधिनीचा विद्यार्थी कसला....
लगेच पुढचा प्रश्न..
मग या
सिंदोळ्याच्या चढाईतून काय नवे मिळाले..?
त्याची प्रश्न सरबत्ती सवयीची
असल्याने, उत्तरही तितकेच तत्पर..
त्यात सिंदोळा हा मोठा विषय होता, अति अवघड दुर्ग चढाई मला माझी शारीरिक, मानसिक क्षमता आणि कमतरता दोन्ही एकाच अनुभवात सांगून गेली..
कारण फक्त सिंदोळा चढाई नाही, तर या पूर्ण मोहिमेत जमेल तसा सहभागी झाले आणि त्यातून मला खूप काही नवे शिकायला मिळाले..
पुणे जिल्ह्यातील एकूण २९ दुर्ग वर्षभरात अतिशय अभ्यासपूर्वक सर करण्याची ही मोहीम सुरू
झाली, ती प्रबोधिनीच्या एका अतिशय उपक्रमशील, शिक्षण क्षेत्रात सतत नवे काहीतरी करण्यासाठी धडपड करणाऱ्या शिवराज पिंपुडे या जेष्ठ कार्यकर्त्याच्या ब्लॉग
पोस्टवरुन..
ज्यात दादाने मोहिमेचा मानस व्यक्त
करुन सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते..
अर्थात मी
लगेच सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती..
त्यानंतर ती मोहीम प्रत्यक्ष आकारात
येताना, अनेक प्रकारचे नियोजन होत गेले व
काही तांत्रिक गोष्टींमुळे मी बऱ्याच उशीरा मोहिमेत दाखल झाले..
ज्यात लोहगड, राजमाची आणि सिंदोळा असे फक्त तीन दुर्ग चढाई करता आली..
तरी त्या निमित्ताने ही अभ्यासपूर्वक दुर्ग पाहणी माझ्यासाठी कृतीयुक्त शिक्षणाचा एक वेगळा अनुभव होती..
त्याशिवाय मृणालताई मायदेव हीने
घेतलेली अनुभव लेखन कार्यशाळा अनुभवली, त्यातून माझ्या लेखनाला अनेक नवीन पैलू गवसले..
त्यानंतर या मोहिमेत सहभागी मुलांसाठी
झालेल्या लेखन स्पर्धेच्या परीक्षणाच्या निमित्ताने अजून एक नवी संधी मिळाली होती..
ती म्हणजे मुले का लिहीत नाहीत,
यावर जोरदार आक्षेप घेण्यासाठी खूप
सारी कारणे सापडली..
जसे मुलांना उत्तम मार्गदर्शन केले पाहिजे, प्रत्यक्ष अनुभव हवेत, तरच ते त्याचे वर्णन स्वतःच्या शब्दात अतिशय
छान आणि नेमक्या पद्धतीने करु शकतात, हा स्वानुभवातून मिळवलेला विश्वास अधिक दृढ झाला..
शिवाय मुलांचे नावीन्यपूर्ण अनुभव लेखन वाचताना मलाही लेखन, वाचन, निरीक्षण, प्रवास, इतिहास, भूगोल इ. अनेक विषयातील नवनवीन कल्पना सापडल्या..
या मोहिमेचा प्राण म्हणजे विद्यार्थी बालसेना, त्या सगळ्यांना दंगामस्ती सोबत अभ्यासपूर्वक काम करताना बघणे ही तर माझ्यासाठी आनंद अधिक उत्साह अधिक अनेक गोष्टींची पर्वणी होती, त्यांचे ते न थकता दुर्ग चढणे, एकमेकांना सहकार्य करणे, मिळालेल्या माहितीची लेखी नोंदणी करणे, सतत प्रश्न विचारणे, एक ना अनेक गोष्टीतला आनंद माझ्यातली शिक्षिका
आणि आईने अगदी मनापासून घेतला..
मोहिमेचा कर्ता करविता
शिवराजदादा, हे तर एक वेगळेच रसायन आहे, जे त्याच्या नकळत इतरांनाही त्याच्यासारखे काम करण्यासाठी प्रेरीत, नव्हे संमोहित करते ..
त्याचे काम, नियोजन, उपक्रम हाताळण्याची पद्धत आधी बघितली असली, तरी ही मोहीम हाताळताना बारीक सारीक निरीक्षण, फेरविचार, दूरदृष्टीने निर्णय इ. खूप सारे पुन्हा एकदा अजून जवळून बघण्याची
संधी मिळाली..
दुर्ग चढाईसोबत झाडे, वेली, फुले, पक्षी व इतर
नैसर्गिक साधनसंपत्ती यांचे अभ्यासपूर्वक निरीक्षण, ऐतिहासिक संदर्भ यांसाठी
मुलांना वेळोवेळी केलेले तज्ञ व्यक्तींचे (खूप मोठी यादी असल्याने नामोउल्लेख
आवरला आहे) मार्गदर्शन यातून विषयाला सर्व बाजूंनी कसे बघावे हे सांगण्याचा दादाचा
अट्टहास उपक्रम चौफेर कसा करावा हे शिकविणारा होता..
शिवाय दादाकडून नेतृत्त्व कौशल्य अधिक नेमकेपणाने शिकता आले..
आपल्याला खूप गोष्टी येत असतात, पण त्या स्वतः करुन मी केले हे मिरवत बसण्यापेक्षा, इतरांना करायला देणे, त्यात त्यांना निपुण बनवणे हे अधिक अवघड व गरजेचे असते, जे दादा लिलया करतो..
प्रसंगी घाबरवून सोडणारी कान उघडणी, तर कधी गरजेनुसार सौम्य तरी थेट शब्दात कामासाठी योग्य दिशादर्शन, भरपूर कौतुक यातून विद्यार्थी, शिक्षक, पालक गट लीलया हाताळण्याची अनोखी जादू अनुभवली..
थोडक्यात प्रबोधीनीचे कार्यकर्ते घडतात कसे, त्यांना कोण आणि कशा प्रेरणा देतात, अनौपचारिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे सांगणारी एक चालती बोलती कार्यशाळा अनुभवली असे म्हणायला हरकत नाही..
मोहिमेत सहभागी इतर मंडळी, मदतीला
असलेले पालक-शिक्षक म्हणजे दादाचे अष्ट ऐवजी इष्ट प्रधानमंडळ होते..
ज्यांना ऐतिहासिक काळातील सुरनीस, खासनीस..सेनापती असे मोहिमेस साजेसे नामकरणही केले होते, तशी कामेही
दिली होती..
त्यांच्याकडूनही खूप नव्या गोष्टी, अनुभव, मित्रमंडळ लाभले..
ज्यातील मोहिमेचे शिलेदार
निलेशदादा, रघुदादा जे आधीपासून परिचयाचे आहेत, नेहमी संपर्कात राहतील, हे दोघे मुलांसाठी इतिहास विषय
अगदी सहज, सोपा आणि मनोरंजक आहे हे पटवून
देणारी हक्काची माणसे आहे, यांच्यासोबत गड, किल्ले, दुर्ग, मंदिरे अनुभवताना इतिहास आवडीचा झाला नाही तर दोघे स्वतःचे नाव बदलतील
इतका या दोघांवर माझा विश्वास आणि आधीचा अनुभवही आहे..
इतर मंत्रिमंडळात अरुणदादा (मामा), रामदादा, सचिनदादा यांची सांगेल ते काम करण्याची तयारी आणि तितकाच झपाटा..
डाकेदादांचे चोख आणि तत्पर हिशोब, हसत खेळत वावर..
शितलताईचे मोहिमेतील मुलींसाठी
घर-संसार, इतर वैयक्तिक प्रश्न, जबाबदाऱ्या बाजूला ठेवून सदैव हजर असणे यातून मला माझ्यात असलेल्या अनेक
त्रुटी कशा भरुन काढता येतील यासाठी प्रेरणा मिळाली आणि ती नेहमीच मिळत राहील..
या सगळ्यांचे मुलांवर बारीक लक्ष
ठेवताना तितक्याच मायेने काळजी घेणे यातून पालकत्वाचे नवे धडे मिळाले..
ही सर्व मंडळी माझ्याशी नव्याने
जोडली गेली..
अगदी पुलं देशपांडे यांनी म्हणल्याप्रमाणे माझी गणगोत यादी सार्थकतेने मोठी झाली..
ही दुधात साखरचं नाही का..!
तर असे सतत अनौपचारिक शिकत राहणे हाच माझ्यासाठी दैनंदिन कामात आलेले साचलेपण वाहते करण्याचा प्रयत्न मला खूप काही देत असतो, वाढवत असतो..
हे सारं शांतपणे ऐकून घेताना मला
गंधारच्या डोळ्यात कमालीचा उत्साह, आनंद आणि त्याहीपेक्षा अधिकतेने असे अनुभव मिळवण्याची भूक राहून
राहून दिसत होती..
एक आई आणि त्यातूनही शिक्षिका
म्हणून याहून मोठा खजिना माझ्यासाठी कोणता बरं असणार..!
म्हणूनच या मोहिमेत मला माझ्या, दादाच्या एकूण उपक्रम, परिस्थतीच्या गरजेनुसार सहभागी करत, भरभरुन समृद्ध केल्याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार मानते..
शिवराजदादाचे विशेष कौतुक करते..
प्रबोधिनी परिवाराचा हा जेष्ठ नि श्रेष्ठ कार्यकर्ता, माझ्यासाठी त्याच्या माझ्या नकळत उत्तम मार्गदर्शक, प्रसंगी आधार, हक्काचा मित्र आहे याचा अभिमान, आनंद व्यक्त करते.. !
त्यात माझी आठवण ठेवत मला सहभागी करावे, जेणेकरून माझा खजिना अजून समृद्ध होईल, हा मागणी वजा हट्ट, आग्रह करते..
ज्यांना प्रबोधिनीचे असे गुणी कार्यकर्ते अनुभवायचे असतील, त्यांचे प्रकाशित साहित्य वाचावे,
अन पारिजातक हसला..!
(करोना काळात केलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे लेखन)
धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची
(मुलांच्या अभ्यास सहलींचे आणि वैयक्तिक अभ्यास दौऱ्यांचे लेखन)
या पुस्तकांसाठी मला संपर्क केल्यास मी उपलब्ध करून देईन..
त्याचा ब्लॉग फॉलो करावा, ब्लॉग लिंक
https://shivrajpimpude.blogspot.com/2024/12/blog-post_17.html
त्यांना कार्यशाळेसाठी आमंत्रित करावे असे सुचवते..
प्रबोधिनीचे नावीन्यपूर्ण शिक्षण समजून घ्यायचे असले तर त्यासाठीही प्रकाशित साहित्य वाचावे, प्रबोधिनीस भेट द्यावी, तेथील उपक्रमात सहभागी होत राहावे, असे सांगत खूप लांबलेले लेखन थांबवते..



No comments:
Post a Comment
suggestions most wlcome