Sunday, May 03, 2020

राक्षस

राक्षस E कचऱ्याचा


चंपकवनात आज खूपच गडबड चालू होती. गेले काही दिवस आलटून पालटून कुणाच्या तरी पिलांच्या अंगावर बारीक बारीक फोड  येत होते, त्याला खाज सुटायची, जळजळ व्हायची. झाडपाला लावला आराम केला की बरं व्हायचं पण पुन्हा दोन दिवस गेले की तसेच व्हायचे.

त्रास वाढण्याआधी यावर उपाय शोधला पाहिजे म्हणून आज सभा भरवण्यात आली होती. याची सारी व्यवस्था आरोग्यमंत्री गजू हत्ती बघत होता. त्याने मिनू घारीला सगळीकडे फिरुन पहाणी करण्यास सांगितले होते.

ठरलेल्या वेळेनुसार सभा सुरु झाली.

सिंह महाराज :- गजू सभेस सुरुवात कर.


गजू हत्ती :- सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण गेले काही दिवस मुलांच्या अंगावर येणाऱ्या फोडांवर उपाय शोधण्यासाठी जमलो आहोत.

वैद्य घुबड :- हो हो यावर उपाय शोधलाच पाहिजे कारण रोज कुणाला ना त्रास होतच आहे. आता तरी औषध देऊन बरे वाटते पण परत त्रास होतोच आहे.

गजू हत्ती :- वैद्यदादा तुम्ही याचा काही अभ्यास केला आहे का?

वैद्य :- हो. फोडांचे निरीक्षण केल्यावर एक लक्षात आले की याचे प्रमाण तळहातावर जास्त आहे आणि मग हातावर, पायावर पसरलेले दिसतात. ही कशाची तरी अलर्जी असण्याची शक्यता आहे.

गजू :- अजून काही त्रास सापडले का?

चंचला खारुताई :- हो, हे फोड आल्यावर माझ्या बाळाचे पोट ही दुखत होते.

सोनू हरीण :- माझ्या बाळाचे डोळे लाल झाले होते आणि थोडी सूजही होती.

गजू :- मिनू मी तुला चंपकवनाची पाहणी करायला सांगितले होते. काही सापडले का तुला?

मिनू :- सापडले ? हो सापडले आणि ते बघून माझा खूप संताप होत आहे.

सिंह महाराज :- का बरं अस काय मिळाले तुला

मिनू :- नेहमीप्रमाणे जंगलातून बाहेर पडलेल्या त्या माणूस प्राण्यांनी आपल्या मुलांच्या मैदानाजवळ  कसला तरी कचरा आणून टाकला आहे. मुले खेळायला गेली की तिथे उचकपाचक करतात, त्या गोष्टी तोडून चावून बघतात त्यामुळे हे होत असणार.

सिंह महाराज :- चला आपण सगळे तिथे जाऊन ह्याचा तपास करु या.

(सगळे मैदानजवळ पोहचतात.)

मैदानाजवळ वेगवेगळ्या वस्तूंचा एक डोंगर तयार झालेला असतो.


सिंह महाराज :- बापरे हे इथे कधीपासून आहे? आपलं लक्ष कसं बरं नाही गेलं याकडे?

गोलू अस्वल :- पण हे आहे तरी काय?

झंपू माकड :- या सगळ्या लाईट-बॅटरीवर चालणाऱ्या आणि आता बंद पडलेल्या वस्तू आहेत. इलेक्ट्रोनिक वस्तू म्हणतात याला. मी अधून मधून शहरात जातो तिथे बघतो हे सगळं.

मिनू :- हो बरोबर. हा मोबाईल, हा लॅपटॉप, ही घड्याळ, हे रिमोट, cd.. (मिनू एकेक वस्तू दाखवून माहिती देते.)

वैद्य :- अरे बापरे या वस्तू तर खूपच भयंकर असतात. यातील अनेक भाग विषारी रसायनांपासून बनलेले असतात. काही वेळा सूर्य-हवेच्या संपर्कात सतत आल्यास त्याचे स्फोटही होतात. हे असे उघड्यावर टाकणे योग्य नाही.

सोनू :- त्या माणसांना जंगल म्हणजे काय कचराकुंडी वाटते का? तरी बरं आधी स्वतः इथेच रहात होता. महाराज यावर काहीतरी करायलाच हवे. यामुळे आपण धोक्यात येऊ.

वैद्य :- आधी हा डोंगर इथून हटवायला हवा.

गोलू :- ते माणसांनाच करायला लावायचे नाहीतर तर ते परत परत आणून टाकत रहातील, आणि आपण हे हटवून नेणार तरी कुठे?

महाराज :- अगदी बरोबर असे काहीतरी करायला हवे की ज्यामुळे त्या माणसांना कायमची शिकवण मिळेल आणि परत जंगल खराब करण्याची हिंमत होणार नाही. कुणाला काही सुचते आहे का?

(सगळे विचार करु लागतात.)

चतुरसेन कोल्हा महाराजांच्या कानात काहीतरी सांगतो. त्यांना कल्पना आवडते.

गुप्तपणे योजना ठरते आणि सगळ्यांना सांगितली जाते. सगळे प्राणी मोहिमेसाठी सज्ज होऊन लपतछपत जंगलातून शहरातील एका शाळेजवळ पोहचतात.

परिसरात लपून बसलेले सगळे शाळा सुटण्याची वाट बघत असतात. गेटबाहेर मुलांच्या पालकांची गर्दी होऊ लागते. घंटा होते तसे सगळे प्राणी मिळून शाळेला सगळीकडून घेराव घालतात.

इतक्या जंगली प्राण्यांना बघून सगळे गोंधळ आरडाओरडा करु लागतात.

सिंह महाराज जोराने गर्जना करतात. भीतीने सगळे शांत होतात. महाराज मानवी भाषेत बोलू लागतात.

महाराज :- उगाच गोंधळ गडबड करु नका. आम्ही कुणालाही काहीही करणार नाही.

माणूस १ :- मग इथे का आला आहात? आणि असे आमच्या मुलांना का घेरलं आहे?

वैद्य :- तुमच्यामुळे आमची पिल्ले आजारी पडत आहेत. मुले संकटात सापडली की कसे वाटते हे समजावे म्हणून त्यांना घेरले आहे.

माणूस २ :- पण आम्ही काय केले?

झंपू  :- तुम्ही सगळे आमच्यासोबत जंगलात चला. तिथे दाखवतो काय केल आहे तुम्ही.

(सगळे जंगलात त्या इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या ढीगजवळ पोहचतात. त्याकडे बोट करुन प्राणी सांगू लागतात.)

सोनू :- जंगलाची कचराकुंडी केली. बंद पडलेल्या, नको असलेल्या कसल्यातरी लाईट-बॅटरीच्या वस्तूंचा ढीग तिथे आणून टाकल्या.

झंपू :- या कचऱ्यात कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, cd, रिमोट, टेप,स्पीकर असे खूप काय काय आहे.

चंचला :- त्याच्याशी खेळून आमची पिल्ले आजारी पडत आहेत. अंगावर फोड येणे, पोट दुखणे, डोळे सुजणे असे आजार पसरत आहेत.

माणूस ३ :- अरे बापरे हे तर खूप भयंकर आहे. या वस्तू अशा उघड्यावर टाकणे योग्य नाही. यातील अनेक भाग सूर्य-हवा याच्या संपर्कात आले की विषारी वायू तयार करतात त्यामुळे हवा प्रदूषित होते. मी सध्या त्यावरच काम करत आहे.

सिंह महाराज :- म्हणजे हे फक्त जंगलासाठी नाहीतर सगळ्यांसाठीच धोक्याचे आहे.

माणूस ३ :- हो अगदी १००% सगळ्यांसाठी वाईट आहे. तो कचरा लगेच तिकडून उचलायला हवा. आणि याविषयी सगळ्यांशी बोलायलाही हवे.

शाळेचे मुख्याध्यापक :- सगळ्यांशी काय बोलायला हवे?

माणूस ४ :- या वस्तू अशा कचऱ्यात फेकणे चुकीचे आहे. जरी त्या बंद पडल्या असल्या तरी अशा फेकणे चुकीचे आणि निसर्गासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी घातक आहे, बरोबर ना?

माणूस ३ :- हो अगदी बरोबर. या विशिष्ट ठिकाणी जमा करायला हव्या. जिथे त्यांच्यावर पुर्नर प्रक्रिया करुन चांगले, उपयोगी भाग वेगळे केले जातात.

माणूस ५ :- हे सगळे करु या. पण त्यापेक्षाही याचा डोळस वापर यायला हवा. तंत्रज्ञान दर तासाला बदलत आहे त्यामुळे सतत नवीन वस्तू तयार होतात म्हणून आधीच्या चांगल्या असलेल्या टाकू नये. त्यांच्याकडे चैन म्हणून बघू नये.

माणूस ३ :- योग्य आणि नेमकं सांगितले. मी एकदा मुलांशी आणि सगळ्या पालकांशी यावर सविस्तर बोलेनच. आधी आपण सगळे जंगलातला तो कचरा साफ करण्याची व्यवस्था करु आणि पुन्हा असा कुठेही टाकला जाणार नाही हे पण बघू.

महाराज :- चला आता तुम्ही परत आमच्या जंगलात जातो. तुमची चूक तुम्हाला कळली आणि त्यावर तुम्ही काम करणार आहात हे उत्तम झाले. आपण सगळेच निसर्गाचा भाग आहोत हे लक्षात ठेवा आणि त्याची काळजी घ्या.

निवेदक :- सेकंदागणिक बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे या E कचऱ्याचा प्रश्न वाढत आहे. त्याचा मोठा राक्षस होऊन सगळीकडे हाहाकार होण्याआधीच यावर उपाय शोधायला हवा.

या वस्तूंचा योग्य वापर, काळजी घेतल्यामुळे मिळणारे फायदे, योग्य विल्हेवाट, पुनर्वापर अशा अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. पटतय ना मग चला इतरांना पण हे सांगू या आणि या राक्षसाला वेळीच आवर घालू या.







No comments:

Post a Comment

suggestions most wlcome