Showing posts with label कुमारकथा. Show all posts
Showing posts with label कुमारकथा. Show all posts

Tuesday, May 04, 2021

गगनभरारी

पक्षी झेपावले आकाशी,


राजू आता पाचवीत गेला. अभ्यासबरोबर त्याचा विचारही वाढले होते.त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर तो स्वतः शोधायचा.
आज त्याला कथाकथन स्पर्धेत बक्षीस मिळालं.सगळ्यांनी खूप कौतुक केले.घरी आल्यावर बाबांनी त्याला विचारलं की सांग मी काय देऊ तूला.

"मला १००रु हवे आहेत.आपल्या घराजवळ जी बाग आहे ना,तिथे एक काका छोटे बुलबुल पक्षी विकतात. शंभरला जोडी.मला हवी आहे एक जोडी."
बाबांनी आनंदाने पैसे दिले.धावतच जाऊन राजू एक पिंजरा घेऊल आला.त्यात बुलबुलची जोडी किलबिलाट करत होती.
घरी येताच तो बाबाला म्हणाला, "बाबा आपण या पक्ष्यांना घेऊन लांब फिरायला जाऊ या. कुठेतरी घाटात मी हे पक्षी सोडून देणार आहे."
आजोबा :- अरे सोडून द्यायला आणले का हे पक्षी तू?
राजू :- हो.
आजी :- अरे पण का? किती छान आहेत ते.
राजू :- मला त्यांना असं पिंजऱ्यात कोंडलेलं बघितलं की खूप वाईट वाटतं. परवाची आठवण होते.
आई :- परवा काय झालं होत?
राजू :- अगं काय सांगू,परवा आम्ही सगळे लपाछपी खेळत होतो. मी आणि चिनू सोसायटीची सामानाची खोली उघडी बघून तिथे लपलो. दार कधी बंद झालं कळलच नाही.
आम्ही खूप आवाज दिला,दार वाजवलं पण कुणालाच कळलं नाही.जवळजवळ अर्धा तास आम्ही आत अडकलो होतो. नंतर बाकी सगळे, वॉचमन काकांना घेऊन आम्हाला शोधत आले. खूप घाबरलो होतो आम्ही.
( हे सांगताना सगळं आठवून राजूचे डोळे आताही भरुन आले. आईने जवळ घेऊन त्याला शांत केले.)
बाबा :- हे सगळं सांगितलं नाहीस आम्हाला.

राजू :- अरे खेळायच्या नादात मी विसरुन गेलो पण त्या बागेजवळच्या काकांकडचे ते पक्षी पिंजऱ्यात बघितले, की मला आणि चिनूला ते सगळं आठवत आणि खूप वाईट वाटत म्हणून हे दोन पक्षी मी मोकळे सोडून देणार आहे.
आजी :- छान! पण त्यांना सोडायला लांब कशाला जायचं.बागेतच सोडून दे.तिथे पुष्कळ झाड आहेत.
राजू :- अगं आजी ते काका परत पकडतात त्यांना.

बाबा :- राजू आपण त्यांच्याकडून सगळे पक्षी घेऊन सोडून देऊ आणि त्या काकांनाही दुसरं काम देऊ, असही बागेसाठी माळी हवाच आहे. त्यांना सांगू की परत पक्षी पकडून पिंजऱ्यात ठेवायचे नाही. जा बोलावं तुझ्या सगळ्या मित्रांना.

ठरल्याप्रमाणे त्या काकांना बागेत माळ्याचे काम दिले.त्यांनीही ठरवले परत पक्ष्यांना कोंडणार नाही.

राजू आणि त्याच्या मित्रांनी सगळे पक्षी पिंजऱ्यातून मोकळे केले तसे सगळे पंख हलवत आकाशात झेपावले.



*******************************************************

Sunday, May 03, 2020

राक्षस

राक्षस E कचऱ्याचा


चंपकवनात आज खूपच गडबड चालू होती. गेले काही दिवस आलटून पालटून कुणाच्या तरी पिलांच्या अंगावर बारीक बारीक फोड  येत होते, त्याला खाज सुटायची, जळजळ व्हायची. झाडपाला लावला आराम केला की बरं व्हायचं पण पुन्हा दोन दिवस गेले की तसेच व्हायचे.

त्रास वाढण्याआधी यावर उपाय शोधला पाहिजे म्हणून आज सभा भरवण्यात आली होती. याची सारी व्यवस्था आरोग्यमंत्री गजू हत्ती बघत होता. त्याने मिनू घारीला सगळीकडे फिरुन पहाणी करण्यास सांगितले होते.

ठरलेल्या वेळेनुसार सभा सुरु झाली.

सिंह महाराज :- गजू सभेस सुरुवात कर.


गजू हत्ती :- सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण गेले काही दिवस मुलांच्या अंगावर येणाऱ्या फोडांवर उपाय शोधण्यासाठी जमलो आहोत.

वैद्य घुबड :- हो हो यावर उपाय शोधलाच पाहिजे कारण रोज कुणाला ना त्रास होतच आहे. आता तरी औषध देऊन बरे वाटते पण परत त्रास होतोच आहे.

गजू हत्ती :- वैद्यदादा तुम्ही याचा काही अभ्यास केला आहे का?

वैद्य :- हो. फोडांचे निरीक्षण केल्यावर एक लक्षात आले की याचे प्रमाण तळहातावर जास्त आहे आणि मग हातावर, पायावर पसरलेले दिसतात. ही कशाची तरी अलर्जी असण्याची शक्यता आहे.

गजू :- अजून काही त्रास सापडले का?

चंचला खारुताई :- हो, हे फोड आल्यावर माझ्या बाळाचे पोट ही दुखत होते.

सोनू हरीण :- माझ्या बाळाचे डोळे लाल झाले होते आणि थोडी सूजही होती.

गजू :- मिनू मी तुला चंपकवनाची पाहणी करायला सांगितले होते. काही सापडले का तुला?

मिनू :- सापडले ? हो सापडले आणि ते बघून माझा खूप संताप होत आहे.

सिंह महाराज :- का बरं अस काय मिळाले तुला

मिनू :- नेहमीप्रमाणे जंगलातून बाहेर पडलेल्या त्या माणूस प्राण्यांनी आपल्या मुलांच्या मैदानाजवळ  कसला तरी कचरा आणून टाकला आहे. मुले खेळायला गेली की तिथे उचकपाचक करतात, त्या गोष्टी तोडून चावून बघतात त्यामुळे हे होत असणार.

सिंह महाराज :- चला आपण सगळे तिथे जाऊन ह्याचा तपास करु या.

(सगळे मैदानजवळ पोहचतात.)

मैदानाजवळ वेगवेगळ्या वस्तूंचा एक डोंगर तयार झालेला असतो.


सिंह महाराज :- बापरे हे इथे कधीपासून आहे? आपलं लक्ष कसं बरं नाही गेलं याकडे?

गोलू अस्वल :- पण हे आहे तरी काय?

झंपू माकड :- या सगळ्या लाईट-बॅटरीवर चालणाऱ्या आणि आता बंद पडलेल्या वस्तू आहेत. इलेक्ट्रोनिक वस्तू म्हणतात याला. मी अधून मधून शहरात जातो तिथे बघतो हे सगळं.

मिनू :- हो बरोबर. हा मोबाईल, हा लॅपटॉप, ही घड्याळ, हे रिमोट, cd.. (मिनू एकेक वस्तू दाखवून माहिती देते.)

वैद्य :- अरे बापरे या वस्तू तर खूपच भयंकर असतात. यातील अनेक भाग विषारी रसायनांपासून बनलेले असतात. काही वेळा सूर्य-हवेच्या संपर्कात सतत आल्यास त्याचे स्फोटही होतात. हे असे उघड्यावर टाकणे योग्य नाही.

सोनू :- त्या माणसांना जंगल म्हणजे काय कचराकुंडी वाटते का? तरी बरं आधी स्वतः इथेच रहात होता. महाराज यावर काहीतरी करायलाच हवे. यामुळे आपण धोक्यात येऊ.

वैद्य :- आधी हा डोंगर इथून हटवायला हवा.

गोलू :- ते माणसांनाच करायला लावायचे नाहीतर तर ते परत परत आणून टाकत रहातील, आणि आपण हे हटवून नेणार तरी कुठे?

महाराज :- अगदी बरोबर असे काहीतरी करायला हवे की ज्यामुळे त्या माणसांना कायमची शिकवण मिळेल आणि परत जंगल खराब करण्याची हिंमत होणार नाही. कुणाला काही सुचते आहे का?

(सगळे विचार करु लागतात.)

चतुरसेन कोल्हा महाराजांच्या कानात काहीतरी सांगतो. त्यांना कल्पना आवडते.

गुप्तपणे योजना ठरते आणि सगळ्यांना सांगितली जाते. सगळे प्राणी मोहिमेसाठी सज्ज होऊन लपतछपत जंगलातून शहरातील एका शाळेजवळ पोहचतात.

परिसरात लपून बसलेले सगळे शाळा सुटण्याची वाट बघत असतात. गेटबाहेर मुलांच्या पालकांची गर्दी होऊ लागते. घंटा होते तसे सगळे प्राणी मिळून शाळेला सगळीकडून घेराव घालतात.

इतक्या जंगली प्राण्यांना बघून सगळे गोंधळ आरडाओरडा करु लागतात.

सिंह महाराज जोराने गर्जना करतात. भीतीने सगळे शांत होतात. महाराज मानवी भाषेत बोलू लागतात.

महाराज :- उगाच गोंधळ गडबड करु नका. आम्ही कुणालाही काहीही करणार नाही.

माणूस १ :- मग इथे का आला आहात? आणि असे आमच्या मुलांना का घेरलं आहे?

वैद्य :- तुमच्यामुळे आमची पिल्ले आजारी पडत आहेत. मुले संकटात सापडली की कसे वाटते हे समजावे म्हणून त्यांना घेरले आहे.

माणूस २ :- पण आम्ही काय केले?

झंपू  :- तुम्ही सगळे आमच्यासोबत जंगलात चला. तिथे दाखवतो काय केल आहे तुम्ही.

(सगळे जंगलात त्या इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या ढीगजवळ पोहचतात. त्याकडे बोट करुन प्राणी सांगू लागतात.)

सोनू :- जंगलाची कचराकुंडी केली. बंद पडलेल्या, नको असलेल्या कसल्यातरी लाईट-बॅटरीच्या वस्तूंचा ढीग तिथे आणून टाकल्या.

झंपू :- या कचऱ्यात कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, cd, रिमोट, टेप,स्पीकर असे खूप काय काय आहे.

चंचला :- त्याच्याशी खेळून आमची पिल्ले आजारी पडत आहेत. अंगावर फोड येणे, पोट दुखणे, डोळे सुजणे असे आजार पसरत आहेत.

माणूस ३ :- अरे बापरे हे तर खूप भयंकर आहे. या वस्तू अशा उघड्यावर टाकणे योग्य नाही. यातील अनेक भाग सूर्य-हवा याच्या संपर्कात आले की विषारी वायू तयार करतात त्यामुळे हवा प्रदूषित होते. मी सध्या त्यावरच काम करत आहे.

सिंह महाराज :- म्हणजे हे फक्त जंगलासाठी नाहीतर सगळ्यांसाठीच धोक्याचे आहे.

माणूस ३ :- हो अगदी १००% सगळ्यांसाठी वाईट आहे. तो कचरा लगेच तिकडून उचलायला हवा. आणि याविषयी सगळ्यांशी बोलायलाही हवे.

शाळेचे मुख्याध्यापक :- सगळ्यांशी काय बोलायला हवे?

माणूस ४ :- या वस्तू अशा कचऱ्यात फेकणे चुकीचे आहे. जरी त्या बंद पडल्या असल्या तरी अशा फेकणे चुकीचे आणि निसर्गासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी घातक आहे, बरोबर ना?

माणूस ३ :- हो अगदी बरोबर. या विशिष्ट ठिकाणी जमा करायला हव्या. जिथे त्यांच्यावर पुर्नर प्रक्रिया करुन चांगले, उपयोगी भाग वेगळे केले जातात.

माणूस ५ :- हे सगळे करु या. पण त्यापेक्षाही याचा डोळस वापर यायला हवा. तंत्रज्ञान दर तासाला बदलत आहे त्यामुळे सतत नवीन वस्तू तयार होतात म्हणून आधीच्या चांगल्या असलेल्या टाकू नये. त्यांच्याकडे चैन म्हणून बघू नये.

माणूस ३ :- योग्य आणि नेमकं सांगितले. मी एकदा मुलांशी आणि सगळ्या पालकांशी यावर सविस्तर बोलेनच. आधी आपण सगळे जंगलातला तो कचरा साफ करण्याची व्यवस्था करु आणि पुन्हा असा कुठेही टाकला जाणार नाही हे पण बघू.

महाराज :- चला आता तुम्ही परत आमच्या जंगलात जातो. तुमची चूक तुम्हाला कळली आणि त्यावर तुम्ही काम करणार आहात हे उत्तम झाले. आपण सगळेच निसर्गाचा भाग आहोत हे लक्षात ठेवा आणि त्याची काळजी घ्या.

निवेदक :- सेकंदागणिक बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे या E कचऱ्याचा प्रश्न वाढत आहे. त्याचा मोठा राक्षस होऊन सगळीकडे हाहाकार होण्याआधीच यावर उपाय शोधायला हवा.

या वस्तूंचा योग्य वापर, काळजी घेतल्यामुळे मिळणारे फायदे, योग्य विल्हेवाट, पुनर्वापर अशा अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. पटतय ना मग चला इतरांना पण हे सांगू या आणि या राक्षसाला वेळीच आवर घालू या.







प्रयोग


  

            प्रयोगाची ऐशी की तैशी

नील लहानपणापासूनच खूप हुशार, सतत वेगळे काहीतरी आवडणारा. शास्त्र त्याच्या आवडीचा विषय, त्यातही कीटकशास्त्र जीव की प्राण. मित्रांपेक्षा त्याला किडे-मुंग्याच जास्त जवळच्या वाटायच्या. कुत्रा-मांजर पाळतात तसे हा किडे पाळायचा. 

सुरुवातीला आईबाबा या आवडीला वैतागले पण नंतर त्यातली अभ्यासाची आवड बघून बागेच्या परिसरात बाबांनी त्याला छोटी खोली बांधून दिली. त्यात याचे किडे आनंदाने राहायचे.....हो राहायचेच कारण त्यांना पकडून ठेवले नव्हते तर त्यांच्या गरजेनुसार नीलने त्यांची घरं बनवली होती. तो त्यांचे निरीक्षण करुन नोंदी करायचा. अधिक अभ्यास करण्यासाठी त्याविषयाची पुस्तके मिळवून वाचायचा. अनेक संदर्भ आंतरजालावरुन शोधायचा. शिवाय बाबांचा असाच एक शास्त्रज्ञ मित्र जयेशकाका यांच्याकडे जायचा. ते किड्यांवर प्रयोगही  करायचे. तशी शासन मान्यता त्यांच्याकडे होती.
बघता बघता नील महाविद्यालयात जाऊ लागला. त्याची आवड आता कार्यक्षेत्रात  बदलली. जयेशकाकांसोबत किड्यांवर प्रयोग करुन नव्या जाती विकसित करायचे काही यशस्वी प्रयोग केले. पण हे दोघांशिवाय कुणालाही माहित नव्हते कारण तसे नियम असतात. निळा कोळी हा सगळ्यात छान जमलेला प्रयोग होता. 

वयाच्या आड वळणावर असलेल्या नीलला सतत आपण एकट्याने काहीतरी करावेसे  वाटे. गेल्या नऊ वर्षाच्या अभ्यासातून तो तितका सक्षम नक्कीच झाला होता. त्याने आपल्या खोलीतही बरीच साधन-सामग्री जमवली होती. 
एकट्याने काहीतरी करायचे हे तर नक्की पण नेमके काय हे ठरत नव्हते. त्यासाठी त्याचे सतत वाचन, अभ्यास चालूच होता. यामुळे त्याला कोणी मित्रच नव्हते, अपवाद शेजारचा लोकेश. तो स्वतःच अधूनमधून यायचा. नीलचे किड्यांचे जग त्याला गमतीशीर वाटायचे. त्याला त्यातली आवड नव्हती पण तिटकाराही नव्हता. 

एकट्याने काहीतरी करण्यासाठी नील आता जास्तच सजग झाला होता. नेमके काय यावर लक्ष केंद्रीत करत सध्याच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी करायचे त्याने ठरवले. अशातच सजीवांचे अनुकूलन या सदरात प्लॅस्टिक खाणारे किडे या बातमीने त्याला नव्या कामाची दिशा सापडली. 

बातमीचा पाठपुरावा करत त्या किड्यांपर्यंत जाऊन पोहचला. गुपचूप प्रयोगासाठी आवश्यक किडे मिळवले. सध्यातरी ते खूपच प्राथमिक स्तरावर होते. त्यांचा कोणताही धोका पर्यावरणाला नव्हता. यांना उत्क्रांत केले तर सध्या साऱ्या जगाला भेडसावणाऱ्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी खजिनाच हाती लागेल पण पण  हा विचार आपल्याप्रमाणे अजूनही अनेकजण करतच असणार, त्यामुळे आपण वेगाने काम करुन सगळ्यांच्या आधी बाजी मारु असे मनात ठरवत तो कामाला लागला. 

त्यासाठी आता दिवसाचे त्याचे बारा-बारा तास खोलीत जात होते. आईबाबा काळजीने चिडचिड करायचे पण नील पटणारी कारणे देऊन वेळ मारुन न्यायचा. जयेशकाकांकडे जाणेही बंद झाले. त्यांचा चौकशीसाठी फोनही आला. तेव्हा अभ्यास, परीक्षा अशी कारणे देत काही महिने तरी येणार नाही सांगितले. पटण्यासारखे कारण असल्याने काकांना विशेष काळजी वाटली नाही.  

नीलला कल्पनेपेक्षाही वेगाने यश मिळत होते. किड्यांची खूप वेगाने प्रगती होत होती. थोडासा आकार वाढवला तर प्लॅस्टिक पचवण्याच्या क्षमताही खूप वाढत होत्या. अजून काही दिवस मग जयेशकाकांना हे सगळं सांगायचे असे त्याने मनाशी पक्के केले.

इतक्यात एके संध्याकाळी काकांचाच त्याला फोन आला.

“नील एक आनंदाची बातमी आहे. आपला निळा कोळी लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. त्याचावर शोधनिबंध मांडायला मी पुढच्या आठवड्यात जपानला एका जीवशास्त्र संशोधन परिषदेला जाणार आहे. त्यात यशस्वी होऊन निवड झाली तर आपल्या या कामाला नवे पंख मिळतील.”

“काय सांगताय काय काका ! खूप खूप अभिनंदन. माझ्याकडेही तुमच्यासाठी एक बातमी आहे पण ती मी तुम्हाला परत आल्यावर देईन. परिषदेसाठी खूप शुभेच्छा.”

“तुझ्याकडे काय आहे नवीन? परिषदेत जर निवड झाली तर माझा मुक्काम वाढणार आहे. त्यातील संशोधन करण्यासाठी मला पुढचे बरेच महिने तिकडेच थांबावे लागेल. काही महत्वाचे सांगायचे असेल तर येतोस का आज?”

“नाही इतके महत्वाचे नाही.” 
(मनात सांगू का आत्ताच?.... पण नको याचा त्यांच्या कामावर काही परिणाम झाला तर.....) 

अशा व्दिधा मनस्थितीचा ताण तसाच सांभाळत नील तेंव्हा शांत राहिला. त्याचे पुढचे प्रयोग चालूच होते. 
अपेक्षेप्रमाणे जयेशकाकांचे येणे लांबले कारण त्यांना पुढीची संधी मिळालीच. या प्रयोगात नीलची त्यांना खूप मदत झाली होती म्हणूनच पुढील कामातही त्याने असावे असा प्रस्ताव जयेशकाकांनी संस्थेपुढे  मांडला होता. त्यात काही तांत्रिक बाबी असल्यामुळे ते त्यांनी नीलला अजून सांगितले नव्हते.
इकडे नीलचा प्लॅस्टिकखाऊ चांगलाच तगडा बनला होता. साधारण दहा किडे मिळून दिवसाला एक किलो प्लॅस्टिक सहज फस्त करत होते. हे कुणालातरी सांगण्यासाठी नील आता खूप उतावीळ झाला होता पण काकांचा पाच-सहा दिवसात फोनच  आला नव्हता आणि त्यांना फोन करता येत नव्हता. 

नील बागेतल्या खोलीत प्लॅस्टिकखाऊचे निरीक्षण करत आईबाबांना तरी हे सांगावे का या विचारत असताना लोकेश आज बरेच महिन्यांनी आला.  

“अरे नील आहेस कुठे? आजकाल नावालाही दिसत नाहीस. आमच्या जगातच आहेस ना.... की गेला तुझ्या किड्यांच्या विश्वात?”

“मी इथेच असतो माझ्या खोलीत. तूच आज खूप महिन्यांनी आला आहेस, आणि काय रे तुझे डोळे का असे दिसताहेत? जागरण केले की काय?”

“नाही उलट जास्तच झोपलो...हा..हा..हा... माझं तुझ्याकडे जरा काम होतं.” असे म्हणत खिशातून एक गोळी काढून खात त्याचा कागद कचऱ्याच्या डब्याच्या दिशेने उडवला.

तो नेमका मधे असलेल्या प्लॅस्टिकखाऊच्या घरात पडला आणि अचानक गायब झाला.

ते बघून लोकेश उडालाच आणि नकळत ओरडला,“अरे निल्या तुझ्या या किड्यांनी तो प्लॅस्टिक कागद खाल्ला तोही सेकंदात..”

“हो माहिती आहे त्याचं नावच प्लॅस्टिकखाऊ.....” असं म्हणताना आपण काय सांगणार हे लक्षात येताच बोलणे सावरत नील म्हणाला, “तुझं काय काम होत?”

“कामाला मार गोळी. हेच सांग आधी. मी कुठेतरी वाचलं होत पण उगाच शेंड्या लावत असतील असं वाटलं, पण तुझ्याकडे तर खरोखर असे किडे आहेत. माझा तर विश्वासच बसत नाही.”

“नकोच ठेऊस विश्वास. जे बघितलस ते विसरुन जा. कुणालाही सांगू नको.”

“बरं नाही सांगत पण मला तर सांग.”

“नक्की कुणाला सांगणार नाही वचन देत असलास तर सांगतो.” “दिले वचन इतका तर विश्वास ठेव मित्रावर.”
आपला प्रयोग कुणालातरी सांगण्यासाठी आतुर झालेल्या नीलचा संयम सुटला आणि त्याने सगळ सांगून टाकलं.
“लोकेश तुला तर माहितीच आहे, मला किडे, त्यांचे विश्व याची लहानपणापासूनच  आवड आहे. मी त्यातलेच शिक्षणही घेत आहे. तू वाचलेली प्लॅस्टिक खाणाऱ्या किड्यांची बातमी अगदीच खोटी नाही. त्यावर संशोधन चालू आहे. मीही करत आहे. ही त्यांची मी प्रयोगांनी विकसित केलेली प्रजाती. त्यांना प्लॅस्टिकखाऊ असे नाव दिले आहे.”

“मित्रा हे खूपच भारी आहे. याने तर तुफान येईल, पण मला समजत नाही हे उपयोगी असूनही तू लपवून का ठेवले आहे?”

“अरे असा कोणत्याही सजीवावर परवानगीशिवाय प्रयोग करता येत नाही. माझ्याकडे परवानगी नाही, शिवाय माझा अभ्यासही अजून पूर्ण झालेला नाही. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. जसे याचे उपयोग आहेत तसे कदाचित तोटेही असू शकतात. त्यावरच मी काम करत आहे. त्यामुळे सध्यातरी हे कुणालाच माहिती नाही. तूही ते कुणालाच सांगणार नाहीस... तसं वचन दिलस हे विसरु नको...”
“नाही सांगणार.... ठेव विश्वास. चल मी पळतो मला एका मित्राकडे जायचे आहे.” 

नाही सांगणार म्हणाला तरी लोकेशचे डोळे वेगळ्याच आनंदाने चमकले.

“पण तूझं काम नाही सांगितलं?”

“काम......(जरासा विचार करुन) माझ्या मित्राकडे येणार का तेवढीच नवीन ओळख.” 

“नाही...नको. मला आजच काही महत्वाच्या नोंदी घ्यायच्या आहेत. तसेही मला मित्र, गप्पा यात करमत नाही, तुला तर माहितीये.”

“तेही आहेच. मग मी निघतो. भेटू नंतर. तू काम कर. माझा मित्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तेंव्हा ओळख ठेव म्हणजे झालं.”

“तस काही नाही... पण तू सध्यातरी यावर कुणाशीच, काहीच बोलू नको बरं का.”

“वचन...वचन....वचन मित्रा. हे रहस्य आपल्यातच राहील.” असे म्हणत लोकेश पळाला. 

नील पुन्हा आपल्या उद्योगाला लागला. त्याच्याकडे सध्या वीस विकसित प्लॅस्टिकखाऊ आणि पंधरा अंडी होती. अंड्यातून किमान आठ-दहा प्लॅस्टिकखाऊ साधारण पंधरा दिवसात मिळतील अशी खात्री होती. आता तो हे प्लॅस्टिकखाऊ किडे माणूस किंवा एकूणच निसर्गाला काही अपायकारक नाहीत ना यावर अभ्यास करत होता.
इतक्यात त्याचा फोन वाजला. पलिकडून जयेशकाकांनी सांगितलेली गोष्ट ऐकून तो गोठूनच गेला. काकांनी तीन-चार वेळा आवाज दिल्यावर भानावर आला. काकांच्या चालू संशोधनात त्याला सहभागी करुन घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. चार दिवसांनी तोही जपानला जाणार होता. हे ऐकून आनंदापेक्षा आपण काकांना न सांगता केलेल्या उद्योगाचा ताण त्याला आला.

“काका थोडावेळ आहे का तुमच्याकडे? मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे.”

“इकडे आल्यावर सांगून नाही चालणार का?”

“नाही आत्ताच सांगायला हवी.”

“दहा मिनिटांचा वेळ आहे अजून, बोल पटकन.”

“काका मी तुम्हाला न सांगता .......................... अजून थोडे काम बाकी आहे.” आपल्यावर इतका विश्वास ठेवणाऱ्या काकांना एका दमात आपण त्यांना न विचारता केलेला प्रताप त्याने सांगितला.

हे सगळ ऐकताना जयेशकाकांना या वयात आपल्यालाही अशी इच्छा व्हायची हे आठवले. भितीने आपण असे काही केले नसले तरी हे खूप सहज आहे याची जाणीव त्यांना होती. शास्त्रज्ञ असण्याबरोबरच ते उत्तम शिक्षकही होते. 
“तू जे केले त्याचे समर्थन करणार नाही पण आत्ता यावर चर्चा करुन उपयोग नाही. एक चांगले केलेस हे सगळे आत्ता तरी सांगितलेस. तुझे वीस प्लॅस्टिकखाऊ इकडे आणायची परवानगी मी तुला पाठवून देतो, पण त्याची खरी माहिती सध्या गुप्तच असू दे. तूही परवानगी पत्रात जे पाठवले असेल तेच सांग. बाकी इकडे आल्यावर बघू.”

काकांच्या शब्दांनी त्याला धीर आला. तो आनंदाने आपण जपानला जाणार ही बातमी आईबाबांना सांगायला पळाला. या सगळ्या गडबडीत पंधरा अंडी तो विसरला. दिवस वाऱ्याच्या वेगाने उडाले. त्याचे बाकीचे किडे योग्य व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी देऊन वीस प्लॅस्टिकखाऊ घेऊन नील जपानला पोहचला. काकांना त्याच्या प्रयत्नाचे कौतुक वाटले पण यावर अजून खूप काम बाकी आहे हे त्यांनी त्याला समजावले. जे त्यालाही माहिती होतेच. आता दोघांचे निळा कोळी व प्लॅस्टिकखाऊवरील पुढील काम सुरु झाले.

इकडे लोकेशला नील जपानला गेला हेच खूप उशीरा समजले. त्याला याचा प्रचंड राग आला, कारण त्याने ठरवलेली योजना आता धुळीला मिळणार होती. तरी एक प्रयत्न म्हणून तो नीलकडे गेला. बागेतल्या खोलीत आपली वही विसरली असे कारण सांगून खोलीची चावी मिळवली. खोलीत गेल्यावर बाकी सगळे किडे गायब पण अपेक्षित ठिकाणी त्याला दोन किडे दिसले. ते आकाराने खूपच लहान असल्याने खात्री करायला खिशातली गोळी काढून त्याचा कागद त्यांच्या पुढे टाकला. गेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागला पण कागद फस्त झाला. त्रासलेल्या लोकेशला आभाळच ठेंगण झालं.

त्यांना नेण्यासाठी आजूबाजूला शोधताना त्याला हवेसाठी छिद्र असणारी एक डबी सापडली. पकडण्यासाठी चिमटा पण दिसला. उगाच हाताने धरले चावतील या विचाराने चिमट्यात धरुन त्याने दोन्ही प्लॅस्टिकखाऊ डबीत व डबी खिशात टाकली.

“अरे लोकेश सापडते आहे का वही?” मागून अनपेक्षित आलेल्या नीलच्या बाबांच्या आवाजाने लोकेश जरासा घाबरला. 

त्यांनी काही बघितले नसेल ना?.... या विचारत चाचरत म्हणाला, “नाही ना, कदाचित नीलने उचलून नीट ठेवली असेल. फोन आला की विचाराल का त्याला?”

“हो, तसेच करु या. तू इथे थांबू नको बाबा... उगाच एखादा किडा चावून तू स्पायडरमॅन सारखा होशील ......,” काका हसत गमतीने म्हणाले तरी या कल्पनेने खिशातले प्लॅस्टिकखाऊ आठवून त्याला घाम फुटला, मान हलवत तो तिथून पळाला. 

कसा हा मुलगा, का बरं असा पळाला? इथे तर एकही किडा नाही मग का घाबरला असा विचार करत बाबांनी खोलीला कुलूप लावले. 

जयेशकाका आणि नीलचा अभ्यास वेग घेत होता. निळा कोळी हे खूप मोठे यश त्यांच्या नावावर लिहिले जाणार होते कारण त्याच्या जाळ्याच्या द्रवापासून चर्म रोगावर जालीम उपाय सापडला होता. हे करत असताना ते प्लॅस्टिकखाऊला विसरले नव्हते. प्लॅस्टिकखाऊच्या विष्ठेचा मातीवर काय परिणाम होतो यासाठीचे नमुने त्यांनी तपासणीसाठी पाठवले होते. दोन दिवसात ते त्यांना समजणार होते.

आईबाबांची आठवण येऊन नीलने घरी फोन केला तेव्हा आजच लोकेश आला होता, कसली तरी वही शोधायला खोलीत गेला हे त्याला समजल्यावर त्याला आश्चर्य वाटले पण बाकी गप्पांमुळे तो विषय बाजूला पडला.

दोन दिवसांनी तपासणीचे कागद आले. ते बघून नील नाराज झाला कारण प्लॅस्टिकखाऊचा प्रयोग अयशस्वी झाला होता. त्यांच्यात मुद्दाम घडवून आणलेल्या बदलांमुळे जरी ते प्लॅस्टिक खाऊन पचवत असले तरी त्यांच्या विष्ठेतून काही महिन्यात माती नापीक करणारे घटक सहजपणे मातीत मिसळत होते. प्रयोग फसला तरी नाराज होऊ नको, थांबू नको आपण मिळून पुन्हा नव्याने यावर काम करु असा दिलासा जयेशकाकांनी दिला. 

आत्ता आहेत ते सगळे प्लॅस्टिकखाऊ नष्ट करायचा निर्णय घेत दोघे कामाला लागले. वीसपैकी आठ प्रयोगांच्या दरम्यान मेले होते उरलेले बारा नष्ट केल्यावर काकांनी सहज विचारले, “संपले ना सगळे? अंडी वगैरे नाही ना?”
अंडी शब्द ऐकताच नीलला पंधरा अंडी होती आठवले. आत्तापर्यंत त्यातून नवे प्लॅस्टिकखाऊ आलेही असतील. त्याने घाबरुन गडबडीने बाबांना फोन लावला व नेमके काय आणि का करा ते घाईत सांगताना फोन चालूच ठेवायला लावला. बाबा खोलीकडे धावले. त्याच्या सांगण्याप्रमाणे प्लॅस्टिकखाऊचे घर शोधले. आवश्यक खाणे न मिळाल्यामुळे अंड्यातून बाहेर आलेले प्लॅस्टिकखाऊ मरुन पडले होते. मोजल्यावर ते सहा होते. सात अंडी तशीच तर, फुटलेली अंडी आठ होती. दोनचा हिशोब लागत नव्हता. पण नीलच्या सांगण्याप्रमाणे बाबांनी आधी मेलेले प्लॅस्टिकखाऊ आणि अंडी याची पूर्ण विल्हेवाट लावली. 

नंतर तिथले नीट निरीक्षण करुन काही वेगळे दिसते का बघितले. त्या घराभोवती थोडी माती पडली आणि किडे धरण्याचा चिमटा आहे. त्यालाही माती आहे असे त्यांनी सांगितल्यावर नील घाबरला. 

खोलीत अजून कोणी आले का हे आठवताना एकदम लोकेशची आठवण झाली. त्या खोलीत सीसी टीव्ही होता त्यावर शोधल्यावर जे दिसले ते ऐकून नील अजूनच घाबरला आणि गोंधळलाही. लोकेशने किडे नेण्याचे कारण त्याला समजेना पण त्यावर विचार न करता त्याने बाबांना पुढील सूचना देऊन फोन बंद केला आणि लगेच लोकेशला फोन लावून सापडत नसलेल्या दोन प्लॅस्टिकखाऊ विषयी विचारले. त्याला प्रसंगाची भिती वाटावी म्हणून ते ठराविक प्रमाणात वाढल्यावर माणसांवर हल्ला करतात असे खोटेच सांगितले. फोनवर बोलतच लोकेश अडगळीच्या खोलीकडे धावला तर ती डबी गायब होती.
त्याने तसे नीलला सांगितले, “तू त्यांना कुठे ठेवले होते?”
“तुझ्याच खोलीतल्या छिद्राच्या डबीत आमच्या अडगळीच्या खोलीत.”

“अरे पण ती तर प्लॅस्टिकची होती. आत्तापर्यंत त्यांनी ती खाऊन संपवली असणार. आता ते खोलीत अजून प्लॅस्टिकच्या शोधात फिरत असणार. तू त्यांना शोधून काढ आणि मारुन टाक.”
“नाही.... मी नाही करु शकत..... त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर?”

“अरे अजून ते तेवढे मोठे झाले नसणार पण तू वेळ घालवू नको. जयेशकाकांनी तिथल्या आमच्या सहकाऱ्यांना सांगितले आहे. ते थोड्याच वेळात तिथे तुझ्या मदतीला येतील पण तोपर्यंत त्यांना खोलीबाहेर पडू देऊ नको आणि मला फोनवर तिथे काय चालू आहे ते सांगत रहा.”

दुसरीकडे जयेशकाकांच्या सांगण्यावरुन झाला गोंधळ निस्तरण्यासाठी सहा मंडळी लवकरच तिथे पोहचली. त्यांनी खोलीचा ताबा घेतला. ते दोन प्लॅस्टिकखाऊ शोधण्यासाठी बराच वेळ खोलीत रणधुमाळी चालू होती.

सारे सामान अस्ताव्यस्त झाले होते. त्यांच्या विष्ठेचे फोटो काकांनी पाठवल्याने तसा माग काढत मंडळी शोधाशोध करत होती. प्लॅस्टिकच्या खूप साऱ्या गोष्टी तिथे असल्याने त्यांचे काम खूपच अवघड झाले होते. प्रत्येक वस्तू नीट तपासावी लागत होती. अखेरीस लोकेशच्या लहानपणीच्या प्लॅस्टिकच्या खेळण्यांमध्ये एक प्लॅस्टिकखाऊ, तर दुसरा सजावटीच्या सामनामध्ये सापडला.

त्यांचा वाढलेला आकार पाहून लोकेशच्या डोळ्यापुढे अंधारी येऊन तो बेशुद्धच झाला. नीलचे बाबा लोकेशला आपल्या घरी घेऊन गेले. डॉक्टरांना बोलावले. त्याचे आईबाबा परगावी गेल्यामुळे यात फार अडचण आली नाही.

मदतीला आलेल्या पथकाने सोबत असलेल्या आपल्या गाडीत दोन्ही प्लॅस्टिकखाऊ नेले. वेगवेगळी साधने वापरुन त्यांची योग्य तपासणी केली, कारण तशा सूचना द्यायला जयेशकाका विसरले नव्हते.

तपासणीत दोन्ही नरच असल्याने अजून अंडी किंवा नवे प्लॅस्टिकखाऊ तयार झाले असण्याची काहीच शक्यता आता उरली नव्हती. मग त्यांची योग्य विल्हेवाट लावून ती मंडळी परतली. 

प्राथमिक उपचारानंतर लोकेश शुद्धीवर आला. नीलच्या बाबांनी त्याला विश्वासात घेऊन प्लॅस्टिकखाऊ पळवण्यामागचे कारण विचारले. त्याने जे सांगितले ते ऐकून बाबा हतबद्ध झाले. 
लोकेश वाईट मुलांच्या संगतीत अडकला होता. त्यांच्यासोबत नशा करायचा. त्यासाठी लागणारा पैसा घरातून मिळणे शक्यच नव्हते.

त्यादिवशीही तो नीलकडे काहीतरी कारण सांगून पैसे मागायला आला होता, पण प्लॅस्टिकखाऊला बघून वेगळ्याच गोष्टी त्याच्या डोक्यात आल्या. प्लॅस्टिकखाऊ कुणालातरी विकून पुष्कळ पैसा मिळवायचे ठरवून तसे प्रयत्नही त्याने सुरु केले होते.

त्याला नशा पुरवणारे लोक अनेक काळे धंदे करायचे. त्यांच्याशी बोलणी केली होती. पुरातन वस्तूंचा चोरटा व्यापार, आपल्या देशाच्या गुप्त गोष्टी दुसऱ्या देशाला विकणे अशा अनेक गुन्ह्यात ते पोलिसांच्या यादीत अग्रभागी होते. प्लॅस्टिकखाऊ हा तर त्यांना मिळणारा खजिनाच. लवकरात लवकर खजिना मिळवण्यासाठी ते त्याला हवे ते देण्यासाठी तयार होते. 

सुरुवात म्हणून बऱ्यापैकी मोठी रक्कम त्याला दिली. त्यात नशीबाचे दान उलटले आणि नील जपानला गेला. आता दिलेली रक्कम परत करावी लागणार म्हणून तो त्रस्त होता कारण त्यातली निम्मी त्याने खर्चही केली होती.

एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून वहीचे कारण पुढे करत त्यादिवशी तो खोलीत शिरला आणि त्याला ते दोन प्लॅस्टिकखाऊ मिळाले. मग मात्र त्याची हाव वाढत चालल्यामुळे विक्रीचे गणित जमत नव्हते. 

यात आपण ज्या डबीतून प्लॅस्टिकखाऊ आणले, तीच प्लॅस्टिकची आहे हे त्याच्या गावीही नव्हते. त्याने अडगळीच्या खोलीत डबी ठेवली होती. डबीचे प्लॅस्टिक खाऊन संपवल्यावर ते दोन्ही किडे खोलीत प्लॅस्टिकच्या शोधात फिरत होते. हे एवढे सगळे अवघ्या दोन दिवसात घडले होते. बाकी पुढचा गोंधळ तर नीलच्या बाबांनी प्रत्यक्षच बघितला.  

तस्करी, नशेच्या साधनांचा बाजार हे सारे ऐकल्यावर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. लोकेशला त्या मंडळींशी पुन्हा बोलणी करायला लावली. हो नाही करत एक रक्कम आणि जागा ठरवत पोलिसांनी पुढील योजना ठरवली. योग्य सापळा रचून त्यांना पकडले. 

लोकेश एकूणच या साऱ्या प्रसंगाने पुरता घाबरला. त्याला आपली चूक समजली. आई बाबांशी बोलून या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी तो स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला.
जपानमध्ये असूनही फोनवर तिथे घडलेला प्रकार अनुभवताना संशोधन, उत्क्रांती याचे प्रयोग, त्यातले धोके, गुप्तता याचा चांगलाच धडा नीलला मिळाला. अशी चूक आपणही परत करणार नाही असे वचन त्याने जयेश काकांना दिले.