Saturday, May 09, 2020

फळबाग

                              माझी फळबाग 

आज घरी येताना, शिक्षिका म्हणून तीस वर्षांहून अधिक वर्षे कार्यरत असणाऱ्या एक काकू भेटल्या..

त्यांच्या प्रश्नाने मला एक नवा विचार दिला, माझ्या शालेय कामाला नेमका रस्ता दाखवला..

त्यांनी विचारले, "मग काय, या वर्षी वर्गात किती हापूस, किती पायरी, किती केशर, किती तोतापुरी आंबे आहेत..?"

"म्हणजे? काही समजलं नाही काकू." मी अगदी निरागसपणे..

"अगं म्हणजे किती मुले खूप हुशार, किती मधली, किती सुमार..."

पहिले मनात आले असं लगेच का समजते ते..

मुलांची शाळा सुरु होऊन, दोनच तर महिने झाले आहेत.. 

तसे शैक्षणिक वर्ष एप्रिल मध्ये सुरु झाले, पण तेंव्हा अवघे दहा बारा दिवस मिळाले, मग उन्हाळ्याची सुटी आली..

पण काकूंच्या शब्दांचा सूर, काहीतरी वेगळं सुचवत आहे हे लक्षात आले..

ते समजण्यासाठी मी पुन्हा विचारलं, "तुम्ही असं का बरे विचारत आहात?"

"अगं तूच नाही का परवा म्हणाली, गेल्या वर्षी माझी सगळी मुले मस्त  होती. काय माहीत या वर्षी कशी येणार..?"

आता मला समजले, माझा चेंडू मलाच गुगली आला..

क्षणभर विचार केला आणि त्यांना उत्तर दिले..

"काकू आपण सारे सावता माळ्याचे वंशज आहोत असे तुम्हीच म्हणता..

आपला मळा शिक्षणाचा, पण त्यात पीक कोणते घ्यायचे, हे मात्र आपण ठरवू शकत नाही.. 

प्रत्येक रोप वेगळं.. 

एक आंबा तर दुसरे डाळींब, तर तिसरे कदाचित रासबेरी असेल..

जी रोप येतील ती जपायची, वाढवायची आणि फुलवायची.. 

प्रत्येकाचा रंग वेगळा आणि चवही..

ती ओळख समजून घेऊन, त्यास अधिक उत्तम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करायचा, बरोबर ना..?"

"शंभरावर वर अजून दहा टक्के बरोबर..

याही वर्षी तुझा वर्ग मस्तच आहे, याची खात्री आता मी तुला देते..

वर्षभरात कधीतरी मलाही बघायला बोलाव, जमेल ना..?"

" हो s हो s.. नक्की बोलणार.."

काकू निघूनही गेल्या, मी मात्र त्या विचार गुरफटून गेले..

एक शिक्षक म्हणून, हेच तर काम आपण सारे दरवर्षी करतो..


ठराविक आणि काहीसा साचेबद्ध अभ्यासक्रम घेऊन, मुलांना नवनवीन विषयांची माहिती देतो.. 

मुले त्याचा कधी आनंदाने, तर कधी अनिच्छेने स्वीकार करतात, तर कधी संपूर्ण नाकारतात..

ही निरीक्षण करतो, नोंदवतो.. 

जसे अमुक ती बोलते खूप छान, त्याची चित्रकला ना एक नंबर आहे, खेळात याला कोणीच हरवू शकत नाही, इत्यादी..

हळूहळू प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, काहीतरी उत्तम, वेगळे गुण लक्षात यायला लागतात, त्यांना फुलविण्याची संधी देतो..

अधिक मार्गदर्शनासाठी पालकांना सुचवतो..

पण मग पुढे गडबड होते, परीक्षा येतात, उजळणी होते..

सगळ्यांसाठी जसा अभ्यासक्रम एकच, तसा परीक्षेचा पेपर ही एकच...

परिणाम दिसतो, काहींचा अगदीच निकाल लागतो ना हो..

जे चांगले आहे, त्याची दखल घेतली जात नाही..

गरज नसताना कशात कमी, याकडेच लक्ष अधिक जाते आणि मग सुरु होते निरर्थक धडपड, जे आवडत नाही त्यातच पुढे जायची..

हळूहळू गणिते चुकू लागतात, शास्त्रीय दाखले विसरु लागतात, भाषा अशुद्ध होत जाते, थोडक्यात सगळा सावळा गोंधळ होऊन बसतो..

जर असे व्हायला नको असेल, तर शिक्षक म्हणून आम्ही आणि पालक म्हणून तुम्ही थोडा विचार करायला हवा.

माझ्याकडे आलेल्या प्रत्येक फळाला मी ओळखायला हवे, मग त्याला त्याचा  रंग, चव  शोधायला मदत करायला हवी..

ती त्याची त्याला सापडते, मी फक्त पुरेसे संरक्षण, खतपाणी द्यायला हवे.. 

त्याचाही अतिरेक होणार नाही, हे लक्षपूर्वक बघायला हवे.

बरोबर ना?

मला तर, माझा रस्ता सापडला आहे..

माझ्यासोबत यायचे की नाही, हे मात्र आता तुम्ही ठरवायचे आहे..



No comments:

Post a Comment

suggestions most wlcome