Saturday, May 09, 2020

गोष्ट भिंतीची



आमच्या शाळेने मध्यंतरी शाळेतल्या वर्गखोल्या छान रंगवून घेतल्या, पण प्रत्येक वर्गातली एक भिंत मात्र तशीच ठेवली.
नव्या रुपात सजलेल्या भिंती तिला चिडवू लागल्या. 
हिरमुसलेली भिंत उदास होऊन  रडू लागली.



पण तिच्यासाठी एक वेगळीच मजा ठरवून ठेवलेल्या शिवराजदादाने तिच्या कानात एक गंमत सांगितली आणि ती आनंदली.


एक दिवस ठरल्याप्रमाणे अशा काहीतरी वेगळ्या असणाऱ्या भिंतींना सजवायला, त्यांना समजून घेणाऱ्या, त्यांच्याशी गप्पा मारणाऱ्या आणि असे काम आवडणाऱ्या साऱ्यांना घेऊन आपल्या चित्रांनी कमाल करणाऱ्या आभाताई भागवत शाळेत आल्या.
कोऱ्या भिंतीकडे बघत, तिच्याशी बोलत, त्यांनी बघता बघता चित्राची हलकी रुपरेषा रेखाटली.




मग सोबत असणाऱ्या मंडळीना ती भिंत त्यांना काय म्हणाली, हे सांगून प्रत्येकाला काही ना काही काम वाटून दिले.
सुरुवातीला हिरव्या रंगाच्या नाना छटांनी सारी भिंत रंगू लागली.
सारी उत्साही मंडळी ताईच्या देखरेखीखाली आपल्या चित्रकलेचा आनंद घेऊ लागली.



हळूहळू चित्रातील एक एक भाग ठळकपणे उमटू लागला.
एकीकडे  बांबूचे बन आकार घेत होते.
त्याचा पेर....त्याचा कोंब....त्याची पाने.... एकेक बारकावा रेखाटताना जणू काही तो स्वतःची कथाच सांगू बघत होता.
आणि ती आभाताईकडून समजून घेताना तर अजूनच मजा येत होती.



ते दुसरीकडे झाड बहरत होते. फांद्यांना लपेटलेली पाने वाऱ्यावरती झोके घेऊ पाहत होती, त्यांच्यासोबत डोलणारी फुले वसंताची गाणी गात होती.
हे सारे चित्रातून उमटताना मिळणारे मार्गदर्शन निसर्गाला प्रत्येकाने आपल्या नजरेतून बघा आणि त्यातून शिका असा विचार नकळत देत होते.



बघता बघता ती भिंत नव्या रुपात सजली होती. साऱ्यांनी मिळून तिला नवा साज चढवला असला तरी त्याच्यातल्या मोहक रुपावर आभाताईचा शेवटचा हात फिरला.
आणि काय कमाल .......


इतके दिवस एकटीच कोरी, उदास असणारी ती भिंत आता त्या वर्गखोलीची शान बनली होती.
आनंदात आणि अभिमानाने स्वतःची एक वेगळी गोष्ट सांगायला सज्ज झाली होती.



हे मला माहित कारण मीही तिची गोष्ट रेखाटण्याचा छोटासा अनुभव घेतला. शाळेत ही एकच नाही तर अशा सहा भिंती आहेत. प्रत्येकीची गोष्ट वेगळीच आहे. ती समजून घेताना आभाताईसोबत शाळेतल्या उत्साही विद्यार्थ्यांनी खूप मजा केली आहे.




मुले, पालक आणि आम्हा शिक्षकांसाठी अशा नवनवीन संधी उपलब्ध करुन देणाऱ्या सर्वांचेच मनापसून आभार. 
अशाच अनुभवातून आम्ही सर्वजण समुद्ध होत राहू हीच सदिच्छा.
तुम्ही प्रयत्न केला, तर तुमच्या वर्गाची, घरातली एखादी भिंतही तिची गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल.
मग काय शोधणार ना अशीच तुमच्या भिंतीची गोष्ट ?
आणि हो मला त्याची गोष्ट पहायला आणि सांगायला विसरु नका बर का !

No comments:

Post a Comment

suggestions most wlcome