Saturday, May 09, 2020

संधीचे आकाश




मध्यंतरी एक वेगळच गाणं ऐकण्यात आलं आणि सवयीने त्याच्या अर्थामध्ये मन घुटमळले.

आकाशाची पोतडी आहे हो तय्यार
चंद्र सूर्य तारकांची आहे भरमान

आपली भाषा इतकी समृद्ध आहे की ती जशी शोधू तशी सापडते. मला या गाण्यातले आकाश अनुभवांचे वाटले आणि त्यातल्या चंद्र, सूर्य, तारका म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या छोट्या संधी, भेटणाऱ्या व्यक्ती....

यातून मिळणारा आनंद आणि मजा म्हणजे पुढच्या दोन ओळी

छोटे छोटे ढग आणि रंगांची बहार
आषाढाच्या पावसाची संतत ही धार

एखादी संधी मिळते आणि इंद्रधनुष्य दिसल्याप्रमाणे त्या अनुभवात हरवून जायला होते.

असाच काहीसा आनंद दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी घेतला.

दिवाळीची सुटी लागण्यापूर्वी वनस्थळी या बालवाडी शिक्षिका घडवणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सुषमाताई साठे यांचा फोन आला. १५ ते १७ नोव्हेंबर रोजी  या संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या या वर्गाच्या शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण शिबीर पुण्यात आपटे विद्यार्थी वसतिगृहला आहे. तू या तीन पैकी एक दिवस गोष्ट सांगणे यावर दोन तासांची कार्यशाळा घ्यायला ये असे सांगितले.

हो सांगितलेच... येते का असे  विचारले नाही. ताईंच्या ये या शब्दात जो एक विश्वास होता तिथे नाही म्हणणं शक्यच नव्हतं.

खरतरं आम्ही यापूर्वी फक्त एकदाच भेटलो होतो.  मागच्या वर्षी आकुर्डीच्या बजाज केंद्रात चालणाऱ्या वर्गाच्या प्रात्यक्षिक दिन कार्यक्रमात विजयाताई आहेर यांच्यामुळे आमची ओळख झाली. फोन नंबरची देवाण घेवाण झाली. मग मी त्यांना माझ्या गोष्टींची link पाठवायला सुरुवात केली आणि फक्त त्यावरुन ताईंनी इतकी मोठी संधी मला दिली.

गोष्ट सांगणे आता दहा वर्षाच्या अनुभवात अवघड नाही पण माझ्यासारख्याच शिक्षिका तयार करणाऱ्या शिक्षिकांशी गोष्ट सांगणे यावर दोन तास बोलायचे हे मोठे आव्हान होते. 

या सगळ्यांना याचे महत्त्व माहिती आहेच पण तरी नेमक्या शब्दात मांडून अधिक पक्के करायचे होते.

नेहमीप्रमाणे माझी माहिती आणि त्यात google मय्याने घातलेली  भर यातून आधुनिक तंत्रज्ञान वापरुन एक छोटसं ppt बनवलं. नुसतं भाषण देऊन मजा येणार नाही म्हणून प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी दैनंदिन वापरत असलेले साहित्य सोबत ठेवलं.

तयारी पूर्ण झाली तरी मनात थोडी धाकधूक होती म्हणून सोबतीसाठी निताताई पाठक यांनाही घेतलं. 

बरोबर तीनला पाच कमी असताना नियोजित जागी पोहचलो. तिथे आधीचे सेशन चालू होते. उपस्थित सुमारे ५० जणी त्यातल्या काही वयाने साहजिक अनुभवाने मोठ्या असणाऱ्यांना बघून पोटात एकदम गोळाच आला. 

सगळा अभ्यास झाला तरी परीक्षा द्यायला वर्गात पाय ठेवल्यावर जशी अवस्था होते अगदी तशीच झाली होती. त्यातच निताताईच्या मदतीने आवश्यक तयारी केली. साधन मांडून घेतली, लॅपटॉप जोडला, प्रोजेक्टर चालू झाला.

एका ताईंनी माझी ओळख करुन देताना जे सांगितले त्याने तर अजूनच दडपण आले. त्यामुळे सुरुवात मी इथे शिकवायला नाही तर माझे अनुभव वाटायला आले आहे हे सांगून केली. त्यानंतर दिलेल्या विषयावर ppt च्या मदतीने बोलत, प्रश्न विचारत, श्रोत्यांचा प्रतिसाद घेत, प्रत्यक्ष साधनांचा वापर करत, मधेच निताताईंना सादरीकरण करायला लावत गाडी पुढे सरकत होती.

मला दिलेले नियोजित दोन तास आणि अजून जास्तीची वीस मिनिटे नेमके काय घडले माहिती नाही. शेवटी एक गोष्ट संपूर्ण सांगत, निताताईंच्या मदतीने सादर केली. समारोप टाळ्यांनी झाला पण त्या आवडलं म्हणून की आता पुरे हे अजून चाचपडत होते.

मग समोर बसलेल्या अनेकजणी उठल्या आणि जवळ येऊन, गेले दोन तास त्या नेमकं काय अनुभवत होत्या हे सांगायला लागल्या तेव्हा जे ठरवलं ते करता आलं याच समाधान मिळालं. आता त्यातल्या अनेकजणी बोलत होत्या, पुढे संपर्कात राहता यावं म्हणून फोन नंबर घेत होत्या तर काही फोटोत आठवणी साठवू पहात होत्या. त्यांचे आमच्या शाळेत पण या, गोष्टी पाठवा असे आग्रहाचे बोल पुढच्या कामासाठी नकळत ऊर्जा देत होते. यात अजून एक तास कसा संपला कळलं ही नाही.

या निमित्याने संस्थेच्या बऱ्याच जेष्ठ ताईंशी ओळख झाली.

त्यांच्याकडून  पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप, नीताताईंची भक्कम साथ, हे सगळं सांगायला आई, सासूबाई, अहो, विभागप्रमुख वैशालीताई यांना झालेले फोन, status update बघून अनेक मित्र मैत्रिणींशी झालेले chatting याने तर आभाळ दोन बोटच उरले.

या संधीसाठी वनस्थळी संस्थेची आणि सुषमाताई साठे यांची मनापासून ऋणी आहे. 

जशी माझ्यावर विश्वास, प्रेम असणाऱ्या साऱ्यांमुळे माझी अनुभवाच्या आकाशाची पोतडी नवं नव्या चंद्र , तारकांनी भरते आहे तशीच माझ्या रसिक वाचकांची भरत राहो. याच शुभेच्छा.








फारुक काझी माझ्या आवडत्या बालकथा लेखकांपैकी एक. २१ जुलै २०१९ ला अटकमटक मासिकातर्फे त्यांची लेखन कार्यशाळा होणार आहे हे वाचलं होतं पण काही कारणांनी अगदीच शेवटच्या क्षणाला आयोजकांशी संपर्क झाला. त्यांच्याकडून जागा शिल्लक नाही कळल्यावर वाईट वाटलं पण तरी मनात जाण्याची इच्छा फार होती. आदल्या दिवशी दुपारी मोठा वर्ग मिळाला त्यामुळे येऊ शकता हे कळवल्यावर खूप आनंद झाला.

कार्यशाळा खूपच छान झाली. दहा ते दोन वेळ कसा संपला समजलेही नाही.  मला ओळखणाऱ्यांना वाटेल, इतके वर्ष तर लिहिते आहेस मग काय मिळाले आज वेगळे...?

मला मात्र अशा संधी दिसल्या की  मला वाटत आपण टीप कागदासारखे असावे. जे जे मिळेल ते टिपत रहावे. त्यातून निश्चितच नवे काहीतरी सापडत जाते. प्रेरणा मिळत राहते.

आज तिथे आलेले माझ्यासारखे टिपकागद ही मला मिळालेली पहिली गोष्ट. किती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी उत्साही मंडळी.  डॉक्टर,  संपादक,  समुपदेशक, चित्रकार, लेखक, शिक्षक, तर कुणी चक्क आयटी क्षेत्रात काम करणारे. सगळे अगदी वेगळे पण धागा समान तो म्हणजे मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा. खूप छान वाटलं. एका वाक्यात प्रत्येकाने स्वतःची दिलेली ओळख ऐकून यांच्याशी बोलायला हवे, ओळख वाढवायला हवी. त्यातून आपल्या मुलांना नक्की नवीन काहीतरी देता येईल असा विश्वास वाटला.

दुसरी गोष्ट म्हणजे आयोजन करणारा हृषिकेश दादा. अर्थार्जनासाठी आयटीत काम करताना आवड म्हणून किंवा तशी गरज जाणवली म्हणून अटकमटक चालू करणारा. एकूणच  नियोजन, जागेची निवड, मर्यादित सहभागी सदस्य, अतिशय कमी शुल्क आणि स्वतः सपत्नीक सक्रिय सहभाग. आठवडाभर काम करुन थकल्यावरही इतरांसाठी अशी कार्यशाळा आयोजित करण्याचा त्याचा उत्साह नकळत काहीतरी सुचवत होता.

तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फारुक सर. नावावरुन त्यांच्याविषयी तयार झालेल्या कल्पना चित्रापेक्षा खूप वेगळे. हसरे, दिलखुलास, मुलांसाठी धडपडणारे युवा व्यक्तिमत्व. त्यांचा साधा पेहराव, आत्मविश्वासाने वावरणे, चौफेर ज्ञान, मातृभूमीचा आदर, मराठी भाषेवरील प्रेम, रोखठोक मते आणि काळ सुसंगत बोलणे खूपच प्रभावी होते. समोर आपल्यासारखे विचार करणारे  कोणीतरी आहे असे राहून राहून वाटत होते.बालकथा लेखनासाठी त्यांनी सुचवलेले मुद्दे, हातच काही राखून न ठेवता  साधलेला मोकळा संवाद खूप काही देऊन गेला. माहित नसलेले संदर्भ समजले. त्यांच्यातील हाडाच्या शिक्षकाकडून अनेक नव्या दिशा मिळाल्या. प्रात्यक्षिक सदरात दिलेल्या विषयावरुन एक नवी गोष्टही लिहून झाली. 

एकूणच आजचा दिवस मिळवताना खूप साऱ्या रंगानी माझा टिपकागद रंगला आणि माझ्या आजूबाजूला हे रंग उधळण्याचे स्वप्न 
देऊन गेला.


No comments:

Post a Comment

suggestions most wlcome