ती पाहताच मजा... कलिजा खलास झाला !!!
अशीच काहीशी भुरळ पडली ती
गोष्टरंगची. तेही फेसबुकवर फक्त फोटो बघून. काय जादू झाली कुणास ठाऊक पण तिच्या
प्रेमातच पडले. हे आपल्याला प्रत्यक्ष का अनुभवता येत नाही बरं या विचाराने पाठलाग
सुरु झाला आणि त्यातूनच वैभवशी संपर्क झाला. तासभर गप्पा झाल्यावर भेट होऊ शकते हे
नक्की झाले असले तरी यासाठी हवा असलेला वयोगट मोठा असल्याने साहजिकच शिवाराजदादा
आणि मयुरी यांच्याकडे खांद्यावर पुढील जबाबदारी सोपवून मी काहीशी निवांत झाले. तरी
सगळ्यांच्या संपर्कात होते कारण कोणत्याही कारणांनी हा अनुभव हवाच होता.
बघता बघता शनिवार १९ ऑक्टोंबर २०१९
साधारण १२ वाजता शारदा कक्षात वैभव आणि टीमची गडबड सुरु झाली. मूळ पाच कलाकार
तयारीत गुंग होते. थोडावेळ वैभवशी प्रत्यक्ष ओळख-गप्पा झाल्या. इकडे सहभागी
सहावीच्या मुलांचा गट येऊन आसनस्थ झाला. अगदीच चार-पाच वाक्यांची प्रस्तावना करुन
सुरु झाला तो अफलातून थरार ज्याने आम्हा सर्वांनाच एका वेगळ्याच जगात नेले.
या आधी मोठ्या-मोठ्या आणि सुसज्ज
प्रेक्षागृहात खूप नाटकांचा आस्वाद घेतला होता. चित्रपटापेक्षा नेहमी उजवे असणारे
नाटकच जवळचे. तरी त्याची ओळख काहीशी मनोरंजन म्हणूनच होती. गोष्टरंग या संकल्पनेने
मात्र ही नाळ थेट शिक्षणाशी जोडून शैक्षणिक अनुभूतीचे नवे क्षितीज दाखवले.
यात येते पाहिली गोष्ट ‘मालाचे चांदीचे पैंजण’ वयोगट पहिली-दुसरीसाठी. त्यामुळे त्याची मज्जा घ्यायची तर तुम्ही
६-७ वर्षाचेच व्हायला हवे. अनेकांच्या खोड्या काढणारी गोड पण वात्रट माला वीस मिनीटे
मनापासून जगणारी प्रतिक्षा आणि तितक्याच ताकदीने साथ देणारे राम, महेंद्र, वर्धन, आणि ऋग्वेद मिळून
गोष्ट आपल्यापुढे जीवंत करतात.
त्यांच्या दंग्यात असे काही गुंगून
जातो की आजूबाजूचे भानच विसरतो. यातली दंगेखोर माला, गमतीशीर आजी- पोस्टमन, गाडी चालवणारा छोटा भाऊ यांची आठवण झाली तरी आताही हसू येते.
दुसरी गोष्ट येते ‘कोरिका नावाचा पंतग’ वयोगट इयत्ता पाचवी ते सातवी. पण ही कोणीही याचा मनोसोक्त आनंद घेऊ
शकेल ते सादरीकरणातल्या ताकदमुळे. आंध्र भागातल्या यल्लाया आणि त्याचा छोटा भाऊ
मल्लया यांची ही गोष्ट. त्या दोघांमधले लटके भांडण जाम धमाल उडवते. राजम्मा एक फळ
विक्रेती.. म्हणायला पाहुणी पण तरी गोष्टीतला आत्मा. तिच्या एन्ट्री आणि एघ्झिट
सोबतचे यल्लाया..देवा.. रे देवा आणि टूक्कू टाक्का म्हणजे गोष्ट फार गंभीर होऊ नये
यासाठी घेतलेली पुरपूर काळजी. यातील गाणे, संगीत, साहित्य
(प्रॉक्स) वापर गोष्ट अधिक प्रभावी आणि उठावदार करतात. सगळे बघताना गोष्टीतले दोन
भावंडांमधले प्रेम आणि निर्गुण-निराकार शक्तीवरचा उदंड विश्वास मनाला चटका लावतो.
तिसरी पण शेवटची नसलेली (कारण अशा
वेगवेगळ्या गोष्टी येत रहाव्या असे मनापासून वाटते.) ‘मूल साऱ्या गावाचे’ या आफ्रिकेसारख्या परदेशातल्या गावातली गोष्ट. वयोगट इयत्ता
तिसरी-चौथी. यात यमी एक मुलगी झालेला महेंद्र तर
कोकू मुलगा झालेली प्रतिक्षा म्हणजेच बरोबर उलटे गणित दिसते आणि तेही अगदी माफक
वेशभूषेत. याच सोबतची त्यांची आई आणि गावकरीही प्रेमात पडतात. इथे मनापसून सलाम
करावासा वाटतो तो सर्वांच्या सहज अभिनय आणि उत्तम दिग्दर्शनाला. कोणत्याही
साहित्याशिवाय नदी, होडीतला प्रवास
नुसता दिसत नाही तर अनुभवातून आत झिरपतो. फक्त पाच जणांनी रंगवलेला बाजार तर
प्रत्यक्ष बाजारालाही लाजवणारा ठरतो. या सगळ्यासोबत यमी आणि कोकूची गोष्ट आणि
त्यामागचा विचार मानवतेची रुजवण करतो.
गोष्टी सादर होत असताना त्याची
संपूर्ण नाटकरुपी संहिता बनलेली नाही हे जाणवत राहते. एखादे पुस्तक उघडून वाचत
आहोत असा अनुभव मिळतो. पुस्तकातली पात्र जीवंत होऊन आपल्याला गोष्ट सांगत आहेत हे
क्षणाक्षणाला वाटत राहते. तीच तर जादू आहे गोष्टरंग नावाची. यात अधून मधून दिलेला
पुस्तक, लेखक, चित्रकार यांचा परिचय म्हणजे नकळत व्यक्त होणारा त्यांच्या कामाचा
अभिमान, आदर, आनंद आणि सोबत असे भरपूर वाचन करा हा नकळत सुचवलेला विचार.
तीन्ही गोष्टींच्या नाटक रंगासाठी
रंगमंच, नेपथ्य, संगीत, साहित्य वापर, ड्रेपरी या सगळ्यातल्या कमीत कमी गरजा आणि अतिशय साधेपणा असला, तरी जे आहे त्यात उत्तमता आहे. उत्कृष्ट, सहज आणि भारावून टाकणाऱ्या अभिनयाची जोड आहे. वेगळ्या आणि अफलातून
गोष्टीची निवड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रचंड मेहनत आणि कामावरचे प्रेम आहे.
या सगळ्यातून सहज साकारलेल्या नाटकरंगी गोष्टी मनात पक्के घर करतात.
यातून मला काय सापडले माहितीये की
मजा देणाऱ्या गोष्टी वाचायला हव्या, सांगायला हव्या, वेगळ्या भाषेत असतील तर अनुवाद करायला हवा, नव्याने लिहायला हव्या. थोडक्यात छोट्या छोट्या घटना, प्रसंगपण किती मजा देऊ शकतात. खरच असे काहीतरी भन्नाट सुचायला हवे, करायलाही हवे.
खरे तर असा प्रयोग बालनाट्य (ज्याची
आज वानवाच आहे) म्हणून करुन भरघोस पैसा कमावता येईल, पण असे न करण्यातच कलेवरचे नितांत प्रेम, सामाजिक बांधिलकी, नावीन्याची ओढ, सर्व स्तरातील मुलांसाठी काहीतरी करण्याची धडपड दिसते. ही भन्नाट
संकल्पना घेऊन येणाऱ्या गीतांजली आणि सोबत असणारी वैभव सारखी मंडळीना यातून नेमके
काय हवे माहिती नाही पण मला मात्र खूप काही गवसले. अशा उपक्रमातून सलग दोन तास
निखळ आनंद कसा देता येईल इथपासून नुसतेच ते यातून नाटकाची ओळख गोष्टी सादर करत कशी
सहज देता येईल, या अनुभवातून अभिनयाच्या प्रेमात
कसे पाडता येईल, नकळत देश-विदेशांच्या भाषेची गोडी कशी
लावता येईल असे खूप काही सुचत होते आणि राहील. यातून प्रेरणा घेऊन मी वेगवेगळे
प्रयत्न करणार हे मात्र नक्की.
यात कळत नकळत सहभागी सर्वांना खूप
खूप शुभेच्छा. असेच नवेनवे सुचत राहो आणि यशस्वी होण्यासाठीचे बळ ईश्वर तुम्हाला
सदैव देत राहो हीच सदिच्छा !!!
जर गोष्टरंगचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांचे fb page like करा.
https://www.facebook.com/goshtarang/?epa=SEARCH_BOX








No comments:
Post a Comment
suggestions most wlcome