मी राजमाची बोलतोय
पर्यटन, मुशाफिरी यात माणूस हा प्राणी असाही रमतोच. त्यात सध्या मंदिरे, ऐतिहासिक जागा, गड-किल्ले याकडे जाण्याचा कल वाढता आहे.
त्यातलाच एक किल्ला म्हणजे मी
राजमाची. मावळ खोऱ्याच्या दाट जंगलात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खाणाखुणा
अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवणारा. माझ्या श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन
बालेकील्ल्यांवर इतिहासाचे अनेक अवशेष आजही त्या दिवसांची प्रचिती देत असतात.
माझ्यापर्यंत येताना बहुतांश वेळा किमान आठ-नऊ किलोमीटर चालत आले की गड पायथ्याचे
दर्शन होते व त्यानंतर दोन बालेकिल्ल्यांची चढाई. नाही म्हणायला जीप, ट्रक्स पायथ्यापर्यंत येतात तरी विशेष वस्ती नसल्याने अजून गर्दीचा
ओढा नाहीच बर का....
असे असताना आज सोमवार ४ नोव्हेंबर २०१९ साधारण सकाळी आठच्या सुमारास लांबून तीन छोट्या
बस माझ्या दिशेने येताना दिसल्या. थोडा सपाट परिसर निवडून आठ-नऊ किलोमीटर आधी त्या
थांबल्या. त्यातून पुष्कळ १२-१५ वर्षाची बच्चेकंपनी आणि काही मोठी मंडळी खाली
उतरली. आधी बऱ्यापैकी गडबड-गोंधळ चालू होता, पण मग कुणा गट नेत्याने थोडेसे रागे भरल्यावर, सर्वजण सोबत आणलेल्या न्याहारीचा पटकन समाचार घेऊन पुढील
सूचनांसाठी तयार झाले.
तसे बघायला आजवर इतिहास, किल्ले, निसर्गप्रेमी मंडळी भेटायला येण्याची मला सवय असली तरी हा वयोगट
बऱ्यापैकी मोठ्यांचा असतो. आज या चिमुकल्यांविषयी मला खूपच उत्सुकता वाटत होती. मी
मनापासून त्यांच्या सगळ्या हालचाली, बोलणे टिपत होतो. माझ्या दिशेने येण्याआधी एका काकांनी (गावडेदादा)
सर्वांनाच आपण जंगल भागातून जाणार आहोत, जिथे सर्पवर्गीय जीव, अनेक कीटक शिवाय पशुही असण्याची शक्यता नाकारता येत नाही याची
कल्पना दिली. अशा ठिकाणी जमिनीकडे लक्ष ठेवत, पाय आपटत चालणे, दगड, कपारी, नव्या वनस्पती यांना हात न लावणे, खात्री न करता कुठेही न बसणे, गटात चालणे, अधून-मधून घोट घोटच पाणी पिऊन सोबत थोडा गूळ खाणे अशा अनेक सूचना
दिल्या. या सूचना मुलांकडून प्रतिसादी येत असल्याने त्यांना त्या माहित असाव्या
तरी त्याची आठवण करुन दिली जात होती हे जाणवले. त्यावरुन ही मंडळी शहरी झगमगाट न
रमणारी निसर्गात फिरणारी असणार असे माझे ठाम मत झाले.
बघता बघता गट मार्गस्थ झाला. मोठी
मंडळी अधून मधून रहात गप्पा-गोष्टी, फोटोग्राफी करत सगळे माझ्या दिशेने येत होते. एका दादाने (शिवराज)
ठरवल्यापेक्षा आपल्या बस दोन किलोमीटर पुढे आल्याने आपल्याला कमी चालावे लागेल असे
सांगितल्यावर बच्चेकंपनी पेक्षा मोठ्यांचेच चेहरे अधिक खुलल्यासारखे वाटले. मुले
त्यांच्यात नादात दंगा-मस्ती करत चालत होती.
काही मुले दगडांचे, वनस्पतींचे नमुने गोळा करत होती, काही फुलांचे-कीटकांचे फोटो घेत होती तर मगासचा तो दादा या सगळ्यात
सहभागी होत हे काय ते काय, माहिती नसेल तर गटावर पाठवा, वाघेला सरांना विचारा असे काहीतरी म्हणत होता. स्वतःही अनेक फोटो
काढून कुणाला तरी प्रश्न विचारत असावा. मला हा अनुभव नवीन आणि जरा वेगळाच असल्याने
थोड अधिक समजून घेतलं. तेंव्हा समजले ही मुले या आधी अभ्यासपूर्वक (आधी माहिती
घेऊन) रानफुलेस, पक्षी, कीटक बघण्यास जाऊन आली आहेत. या परिसरात त्यातील काय काय बघायला
मिळते, नवीन काय दिसते याचा आनंद आता ते
घेत होते. गटावर पाठवल्यामुळे त्यात सहभागी त्यांच्या पालकांनाही हे सारे
अनुभवायला मिळत होते.
नव्या युगातल्या या गमतीजमती बघताना
जुन्या काळाशी बांधलेल्या मला एकाच वेळी कौतुक वाटत होते तर दुसरीकडे पूर्वीची
माणसे एकमेकांशी कसे संपर्क करायचे, अनेकदा त्यातील दिरंगाई याने झालेले आघात याने भरुनही येत होते.
यांचे सुरुवातीलाच ठरले होते साधारण
चार-पाच किलोमीटर नंतर ब्रेक घ्यायचा. पुढे-मागे झालेला गट पुन्हा एकत्र जमायचा.
सगळे नीट आहेत, काही त्रास नाही याची खातर जमा
करायची, वाटेतील गोष्टी एकमेकांना
सांगायच्या व त्यानिमित्याने थोडी विश्रांती घ्यायची, त्यानुसार दरी, समोरील पर्वतरांगा दिसतील आणि काही वेळ सर्वांना बसता येईल अशी
थोडी पठारी जागा निवडून सर्वात पुढे असलेल्या गटातील दादांनी (राघुदादा) गटाला
स्वल्पविराम दिला. ऊन मी म्हणत असल्याने मंडळी चांगलीच दमली होती, आडोसा-सावली शोधत मागचे गट येईपर्यंत चक्क आडवी पसरली, दादाने लगेच आणि खूप पाणी न पिण्याची सूचना पुन्हा दिली, सोबत गूळ –ग्लूकाँडी घेण्यास सांगितले. हळूहळू एकेक गट येत होता, जागा शोधत पसरत होता. कोणी काय बघितले, कोणती फुले-किडे-कोळी-फुलपाखरे दिसली आणि अजून आवडीच्या विषयावर
गप्पा रंगल्या होत्या. गुळासोबत गोळ्या-चॉकलेट, कॅडबरी, च्याऊम्याऊ खाऊ बाहेर निघत होता. एकमेकांसोबत वाटला जात होता. काही
हौशी मंडळी फोटो काढण्यात दंग होती. मला दिसत होते त्यानुसार शेवटचा गट आला.
त्यातल्या एक अतिउत्साही ताईंनी (मी स्वतः) सर्वांना गृप फोटोसाठी उठवले. कुरकुरत, कंटाळा करत एकेक जण उठले. काही वेळ परिसर फोटोंमध्ये साठवण्यात
गेला. नक्की आमचा फोटो काढणार ना? की सेल्फी? आम्ही येतो का? इतके बसणार का? ओळखू येणार का? अशी गंमत चालू होती. यात मागे अजून दोघेच जण (शिवाराजदादा आणि गावडेसर) राहीले होते.
त्यांच्यासाठी सगळे थांबले होते. खूप झाले फोटो चला वेळ सांभाळायची आहेत असे ओरडत
आलेले ते दोघेही परिसर बघून काहीवेळ फोटोत रमले.
दरम्यान दोघांना काही सूचना न
पाळल्यामुळे, किंवा वातावरणाचा परिणाम असेल थोडे
अस्वस्थ वाटत होते. गावडेदादांनी त्यांना योग्य त्या गोष्टी करायला सांगून रीलॅक्स
केले. तेंव्हा काही मुलांनी थट्टा केली. मुलेच ना ती. पण दादा काहीसे रागावले विषयाचे
गांभीर्य मुलांना समजायला हवे असे वाटून त्यांनी रघुदादांना प्रत्यक्ष अनुभवलेला
प्रसंग सांगायला सांगितला. तुम्ही मोठे होऊन मित्रांसोबत फिराल, मजा कराल तेव्हा असे प्रसंग कसे हाताळायचे हे कळावे म्हणून हा
प्रपंच हे सांगायला ते विसरले नाही. मुलांनीही सारे तितक्याच गांभीर्याने समजूनही
घेतले. हे अनुभवताना भिंतीबाहेर भरलेली ही शाळा बघून माझ्यात चैतन्याने वारे फिरु
लागले. ही मंडळी अजून जवळून कधी बघायला मिळतील, माझ्या अंगाखांद्यावर कधी बागडतील, त्यांचे स्पर्श यासाठी आता मी जास्तच आतुर झालो.
त्यांनी उरलेला दोन किलोमीटरचा
मार्ग चालायला पुन्हा एकदा सुरुवात केली. लवकरच सगळेजण गड पायथ्याशी पोहोचले.
मंडळी जवळ आल्यावर त्यांच्या शर्टवरील दुर्ग जागर मजकूर बघून पुन्हा एकदा
माझ्यातली उत्सुकता शिगेला पोहोचली. काय बरं असेल या नावामागे? दुर्ग जागर म्हणताना.. काय करत असतील हे बच्चेकंपनी असा प्रश्न
पडला. मी अजून बारकाईने त्यांचे निरीक्षण करू लागलो, त्यांना ऐकू लागलो. आता ते माझ्या अंगावर बागडत होते. सगळेजण
श्रीवर्धन व मनरंजन यामध्ये असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ जमले. तिथे थोडी विश्रांती झाली ताक सरबत त्याचा आस्वाद घेतला. इथे
गावडे सरांनी मुलांना माझ्याविषयी माहिती द्यायला सुरुवात केली.
माझ्या कोठरावरील गणपतीला असलेले
चार हात यावरुन माझी बांधणी बाराव्या शतकात झाली असावी. साधारण दोन हजार
वर्षांपूर्वीपासून मी येथे आहे. भैरवनाथ मंदिर मंदिर परिसरात असलेली गजांतलक्ष्मी
बघता या परिसरातील लोक श्रीमंत होते. कोकणातून देशाकडे येण्यास हा मुख्य मार्ग
असल्याने येथे जकात वसुली होत असून तेच समृद्धीचे मुख्य कारण होते. महाराजांच्या
राजधानीच्या निवडीच्या वेळी सहा किल्ल्यांपैकी मीही एक होतो, नंतर काही कारणांनी श्रीमंत रायगड ही राजधानी झाली. देशातील
किल्ल्यांमध्ये एकट्या मलाच दोन बालेकिल्ले आहेत
यातल्या मनरंजन वर सारा राज्यकारभार तर श्रीवर्धन वर दारुगोळा साधन साहित्य
संपत्ती ठेवली जात असल्याने तेथील तटबंदी अधिक मजबूत म्हणजेच चिलखती तटबंदी आहे.
यासाठी येथे वस्तीस असणाऱ्या मावळ्यांसाठी लागणाऱ्या धान्य साठवणुकीची कोठारे ही
आहेत. त्याचबरोबर पाण्याचे असे टाके आहे तिचे तीन टप्प्यातून पाणी फिल्टर करते त्यासाठी त्यामध्ये औषधी
वनस्पती लावलेल्या बघायला मिळतात. ही माहिती देत असतानाच श्रीवर्धन किल्ल्याची
चढाई चालू होती. तेथील बारीक-सारीक गोष्टी दाखवून दादा मुलांना अनेक ऐतिहासिक
संदर्भ सांगत होते. मुले स्वतः जवळ असलेल्या डायरीमध्ये नोंदी घेत होते. शिवाय
तिथे दिसणार्या जोत्यांचे अवशेष बघून पडणारे प्रश्न विचारत शंका निरसनही करून घेत
होते. रघुदादांनी मुलांना तेथील परिसराची भौगोलिक माहिती दिली माझ्यावरून दिसणारे
इतर किल्ले दाखवले त्यांच्या दिशा सांगितल्या ते नेमके ठरवायचे कसे याची माहिती
दिली.
मुलांचे प्रश्न, इतिहासाविषयीची आवड, ज्ञान बघून मला थक्क व्हायला झाले आणि नकळत दुर्ग जागर हे नाव
काहीसे समर्पक वाटले. हे सगळे बघत, ऐकत असताना या बाळगोपाळांनी आज हा १४ वा किल्ला सर केला आहे. तेही
ही याच वर्षातला हेही समजले. संकल्पपूर्वक ठरवून ही मुले महाराष्ट्रातील २९ किल्ले
या २०१९-२० शैक्षणिक वर्षात अभ्यासपूर्ण सर करणार आहेत हे समजल्यावर आता यांना
बच्चे म्हणण्याऐवजी मावळे म्हणावे असेच मला वाटू लागले.
दुर्ग जागर असे म्हणत असताना, ही मुले फक्त किल्ल्यांवर फक्त चढाई करणे इतकेच करत नाहीत. त्याआधी
किल्ल्याचा इतिहास समजून घेतात. भौगोलिक माहिती घेतात. त्यासंदर्भातील वाचन करतात.
शिवाय या विषयाची आवड आणि अभ्यास असलेल्या तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेत किल्ला
बघतात हेही समजले, ह्यासोबत
त्यांच्या नकाशावाचन, प्रवासलेखन, खिचडी बनवणे अशा कार्यशाळाही झाल्या हे कळल्यावर तर मला आनंदही होत
होता आणि खूप भरुनही येत होते. सध्या जिथे तिथे बघायला मिळणारी स्पर्धा, पुस्तकी ज्ञानाचे ओझे याहून वेगळे असे स्वानुभवाचे धडे गिरवताना या
मुलांना बघून मला महाराजांचा काळ आठवला. महाराज आणि त्यांचे मावळे सुद्धा असेच
स्वतः अनुभवातून, निरीक्षणातून
घडले होते. ही मंडळी या सगळ्यातून मिळणाऱ्या ज्ञानातून, स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात आपले वेगळेपण नक्कीच दाखवून देतील हे
मी विश्वासाने सांगू शकतो.
साधारण तीनच्या सुमारास पिठलं
मटकीची उसळ भाकरी लोणचं आमटी भात आणि ताक असा खास गावरान बेत सगळ्यांनीच मनसोक्त
चापला.
थोडीशी विश्रांती आणि परिसरात
फेरफटका मारत असताना एक मावळ्याने अनावधानाने तेथील खताच्या उकिरड्यात पाय भरवून
घेऊन अनोळखी ठिकाणी अति उत्साह, दंगा-मस्ती करत फिरु नये याचा चांगलाच धडा घेतला. मोठ्यांमध्ये एका
दादांनी (श्री.तरस) त्याला स्वतःच्या मुलासारखे सांभाळून घेत स्वच्छ केले.
( हा उल्लेख दोन
गोष्टींसाठी आवर्जून केला. १ यातून एकूणच मुलांना नव्या जागी का काळजी घ्यायची हे
कळले, २ तरसदादांनी त्यावेळी ज्या सहजतेने
परिस्थिती सांभाळली त्यातून ज्या मोठ्यांच्या सोबत मुले असतात त्यांच्या मनापासून
असलेल्या सहभागाचा आनंद आणि कौतुक याच्यामुळे पालक निर्धास्त असतात आणि शिवराज
दादाला भक्कम मदतीचे हात असतात.)
त्यांचे नियोजन ऐकले त्यानुसार
परतीचा प्रवास सुरु करण्याची वेळ झाली होती. त्यामुळे मनरंजन आता रद्द करतील असा
कयास होता. बघतो तर जेवण होताच हे मावळे शूज घालून पुन्हा चढाईसाठी सज्ज झाले.
फक्त मोहिमेच्या नावात नाहीतर तिला तनामनाने पूर्ण करणाऱ्यांमध्येही तितकाच दम
आहे.
जवळच्या वाटेने अंदाजे पंधरा मिनीटात काही मंडळी वगळता ( २ मोठे त्यात एक वृषाली आणि ५-६ मुले) गट मनरंजनवर पोहचला. तेथील सदर बघितली जिला दिवाळीच्या निमित्त्याने फुलांच्या माळांनी सजवले होते. इथेही बघण्यासारखे भरपूर होते. पण परतीचा प्रवास जंगलवाटेने करायचा असल्याने, रुखरुख वाटत असली तरी गावडेदादा आणि राघुदादांनी स्वतःला आवर घालत थोडे घाईतच परिसर फिरवून गड उतार सुरु केला. इकडे या ठिकाणी न आलेली मंडळीही दोन गटात होती. त्यातला एक गट नकळत ठरल्या जागेपेक्षा पुढे जाताना मनरंजनवरुन बघितल्यावर गावडेदादांनी लगेच मोबाईलवर संपर्क करुन त्यांना थांबवले. परत एकदा भेटण्याची जागा गड पायथा किंवा भैरवनाथ मंदिर हे बजावून सांगितले. मग मंडळी माघारी फिरत बऱ्यापैकी चालत, चढत मंदिराजवळ येऊन थांबले. तर दुसरा गट चुकीची वाट घेऊन उतरताना बघून रघुदादांनी त्यांना हटकत आम्ही येईपर्यंत आहे तिथे थांबा बजावले. सगळे एकत्र आल्यावर या दोन्ही गटांना वेळीच थांबवले नसते तर कदाचित वाट चुकण्याची, हरवण्याची शक्यता होती. यात मोठी मंडळी होती पण या साऱ्यासाठी पुरेशी अनुभवी नव्हती. पुन्हा एकदा नव्या जागी घाई, धाडस, स्वमत पुढे न करण्याचा धडा मिळाला फक्त यावेळी कारणीभूत मोठी मंडळी होती. त्यांना त्यातली प्रखरता तेंव्हा जाणवली जेंव्हा संध्याकाळी साडे पाचलाच अंधारुन आले. सहा-साडे सहाच्या दरम्यान तर डोळ्यात बोट गेले तरी कळणार नाही अशा किर्रर्र अंधारात तेही दोन्ही बाजूला दाट जंगलातून चालताना सतत मिळणाऱ्या सूचना सर्वांनाच राहून राहून आठवताना जाणवत होते.
गटात खेळीमेळी टिकून होती. मुले
सकाळच्याच उत्साहात गप्पा टप्पा करत बॅटरीच्या उजेडात गमतीने चालत होते. नाही
म्हणायला एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके मावळे थोडेसे ढेपाळले होते. त्यात
तीन-चार मोठे तर तीन-चार लहान. त्यांना थोडे राहीले. चला घाई करा, चालत रहा असे म्हणलेले कानावर पडत होते. मोठ्यात खास करुन
वृषालीताई आणि शिवाराजदादा यांना हल्याव केलेले ऐकताना मला मजा वाटत होती.
परतीच्या वेळी बस सकाळपेक्षा एक-दीड किलोमीटर लांब गेल्या असल्याने चालणे वाढले
होते. मध्ये दोनदा थांबत अखेरीस मंडळी बसपर्यंत पोहचली. सगळ्यांनाच कोण आनंद झाला
होता काय सांगू.
इकडे ढग गडगडायला लागले होते. पाऊस
सुरु होण्यापूर्वी यांनी सुखरुप मुख्य रस्ता धरावा असे वाटत असतानाच पाऊस कोसळायला
लागला. नशीब सगळे बसमध्ये बसून पुढचा प्रवास सुरु झाला होता. किमान तीन-चार
किलोमीटरचा रस्ता हा कच्चा, अडचणीचा शिवाय पावसाने खराब होता पण वाहनचालक अतिशय शांत आणि
काळजीपूर्वक जात असल्याने मी निवांत होतो. त्यांच्याशी काहीसे मनाचे नाते जुळले
असावे कदाचित म्हणून ते पुढेही अगदी सहज प्रवास करत, अजिबात कुठेही रहदारीत न अडकता पावणे दहाच्या सुमारास त्यांच्या
निगडी प्राधिकरणातील शाळेत सुखरुप पोहोचल्याचे, तिथे पोहचल्यावर अजून एक गड यशस्वी केल्याबद्दल कौतुक झाले. उशीर, भूक, दमणूक असूनही
प्रार्थना म्हणून दिवसाची सांगता झाली असे सारे मला अंतर्मनाने समजले. त्यांची
दुर्ग मोहीम यशस्वी होणार हा विश्वास आहेच, तरी त्यासाठी मनापासून खूप शुभेच्छा.
आम्ही गड-किल्ले मंडळीही
एकमेकांच्या संपर्कात असतो. आमच्याही बैठका होतात कसे ते नका विचारु. त्यात अनेकदा
किल्ल्यांवर दंगा–मस्ती, अनावश्यक गोष्टी, उगाच टाइम पास करायला येणाऱ्या मंडळींचे किस्से ऐकायला मिळतात.
त्यांनी तिथे केलेला कचरा, नासधूस समजली की संताप होतो पण ही नाण्याची दुखरी बाजू सावरायला
आजच्यासारखे अनुभव मलमपट्टी करतात. अजूनही चांगल्या माणसांची कमतरता नाही यावर
पुन्हा विश्वास ठेवावासा वाटतो. जेंव्हा असे मावळे आमच्या अंगावर बागडतात तेंव्हा
महाराज आम्हाला पुन्हा नव्याने भेटतात. वेगवेगळ्या ठिकाणी स्वराज्य आणि सुराज्य पुन्हा
नव्याने येणार याची पुरेपूर खात्री वाटते. या साऱ्या भावी शिवाजीराजांना घडवणाऱ्या
त्यांच्या शहाजी-जिजाऊ(आई-वडील), कोंडदेव-समर्थ (गुरुजन) या साऱ्यांना माझे खूप खूप आशीर्वाद. खूप
सारे महाराज या साऱ्यातून तयार होवोत आणि महाराष्ट्र-भारतच नाही तर सोबत सारी भूमी
सुजलाम सुफलाम करोत याच मनापासून शुभेच्छा.
अशा मावळ्यांनी–महाराजांनी आम्ही गड-किल्ले फुलत राहोत. नवं चैतन्याचे, आनंदाचे वारे आमच्या वास्तूत फिरत राहोत. जसे भव्य-दिव्य इतिहासाचे
आम्ही साक्षीदार आहोत तसेच नव्या स्वप्नांचेही भागीदार होण्याचे भाग्य आम्हाला
वरचेवर मिळत राहो अशी इच्छा व्यक्त करुन आजसाठी रजा घेतो. मला, माझ्या मित्रांना असेच भेटत रहा. येत रहा. वाट बघू हे नेहमी लक्षात
असू द्या.





























No comments:
Post a Comment
suggestions most wlcome