चंपक वनातले सगळे प्राणी एकत्र जमले होते. गोलू अस्वल समोर येऊन म्हणाला,
“चलो सब लोग टाली बजाओ..... माझ्याकडे तुमच्या सगळ्यांसाठी एक गंमत आहे. तीन म्हणायच्या आत डोळे मिटा बर सगळ्यांनीच,
एक.... दोन..... तीन......
हंअअ हळूच सुद्धा नाही बघायचं बर का.....
ऐ चिमडे, तू बघते आहेस बरं का डोळे मिचमीच करुन......”
गोलू जमलेल्या प्राण्यांची उत्सुकता ताणत होता. गोलूचा चंपक वनात कारखाना होता. जिथे तो माणसांकडे असलेल्या, प्राण्यांनाही उपयोगी पडणाऱ्या पण निसर्गाला त्रास होणार नाही अशा नवनवीन वस्तू बनवायचा.
सगळ्यांच्या मनात एकच... आज काय नवे बघायला मिळणार.......... इतक्यात गोलुने विचारले.
“सगळे तय्य्यार ...........”
“हो तय्य्य्ययार .............”
“उघडा आता डोळे.” ( गोलूचा आवाज काहीसा लांबून आला.)
डोळे उघडून बघतात तर काय.... गोलू गायब. इतक्यात कुठून तरी खडखड आवाज व त्यासोबत ऐकू आले,
“झुम्म झुम्म झुईईईई झुम्म झुम्म झुईईईई.....
देखो देखो गोलू की सायकल आई....... ”
झाडामागून सायकल चालवत गोलू सगळ्यांसमोर आला. सायकल विषयी याधी गोलूने सगळ्यांना सांगितले होते. प्रत्येक प्राण्याच्या वजन, उंचीनुसार बनवून द्यायचे ठरलेही होते. पण प्रत्यक्षात गोलूला सायकलवर बघून सगळ्यांनी आनंदाने गलका सुरु केला.
“हुर्यो .....हुर्यो ..... सायकल...... सायकल......”
“गोलू मला सायकल?....”
“मला.....”
“मला..... “ सगळे प्राणी एका मागून एक ओरडू लागले.
गोलू म्हणाला, ”अरे हो..... हो.... हो.... ठरल्याप्रमाणे आज सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या सायकली मिळतील. त्याआधी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका बरं. सगळ्यांनी एकमेकांना सायकल चालवायला शिकवू या. चालवताना स्वतःची आणि आपल्या सायकलीची नीट काळजी घ्यायची. अधून मधून माझ्याकडे येऊन तिला ऑइलिंग करायचे, ब्रेक दुरुस्त करुन घ्यायचे.”
“आम्ही हे सगळे नीट लक्षात ठेवू.” सर्वांनी वचन दिले. गोलूने सर्वांना त्यांच्या सायकली दिल्या.
गोलूने सांगितल्याप्रमाणे सगळे प्राणी स्वतःची आणि सायकलचीही काळजी घेत होते. थोड्याच दिवसात ते छान सायकल चालवू लागले. गंमत म्हणून पंधरा दिवसांनी सायकलची शर्यत घ्यायची ठरली. सगळे जोमाने तयारीला लागले. अधिक छान सायकल चालवण्याचा रोज सराव करायचे.
या सगळ्यात झंपू माकड मात्र सवयीप्रमाणे खोडकरपणा करायचा. कशीही सायकल चालवायचा. दगडावरुन, वाळूमधून जोराने जायला त्याला मजा वाटायची. उगाचच ब्रेक लावणे, सायकल एका चाकावर उभी करणे, दगडावरुन हवेत उंच उडवणे हे त्याचे आवडीचे खेळ. शिवाय सायकलीची काळजीही घ्यायचाही नाही, मग सायकल बिघडायची.
एकदा तर तो दगड चुकवताना पडला, फार लागले नाही पण सायकलचे हँडल वाकडे झाले. नीट करायला गेल्यावर गोलू त्याला म्हणाला, “अरे जरा नीट चालवत जा, असे करु नको कधीतरी जास्त लागेल, सायकलही पूर्ण मोडून जाईल, बघ ब्रेक अजिबात लागत नाहीयेत.”
ऐकेल तर तो झंपू कसला... तो उलट म्हणाला, “असू दे रे, तू दे बर लवकर माझी सायकल. ते ब्रेक बीक मला लागतच नाही. जरा अंदाज चुकला म्हणून आज पडलो. असं नेहमी नाही होत काही. तू नको उगाच चिंता करु. चंपकवनात मीच सगळ्यात भारी सायकल चालवतो. शर्यत पण मीच जिंकणार. बघच तू.”
गोलू बिचारा काय करणार. त्याने सायकल नीट करुन दिली.
बघता बघता शर्यतीचा दिवस उजाडला. १..२...३...सुरु असे म्हणत शर्यत सुरु झाली.
झंपू जोराने सगळ्यांच्या पुढे गेला. नीट, सरळ सायकल चालवणे त्याला माहितच नसल्यामुळे मधेच हात सोडत होता. एका चाकावर येत होता. मधूनच सायकल हवेत उडवत गाऊ लागला.
“हुलाला हुलाला... मीच आहे सायकलचा राजा.”
उताराच्या रस्तावर त्याच्या सायकलीचा वेग खूप जास्त होऊन ती वेडीवाकडी जाऊ लागली. झंपूने ब्रेक दाबले पण ते अजिबात कामच करत नव्हते. मग त्याने पायाने सायकल थांबवायचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे सायकल रस्ता सोडून खाली उतरली. तिथे काटेरी झुडपे होती. त्याचे काटे पायात, टायरमध्ये घुसले. टायर पंक्चर झाले.
खूप वेग असल्यामुळे खर्र्र्रर्र्र्र खुर्रर्र्र्रर्र्र्र खर्र्रर्र्र्रर्र्र्र धम्म्म धडाम करत झंपू सायकलसकट बरेच अंतर घसरत जाऊन एका झाडाला धडकला. धडक इतक्या जोराची होती की सायकलची पुढची बाजू वाकडी तिकडी झाली. चाक निघून गेले.
सगळे धावत त्याच्याकडे गेले. त्याला खूप लागले होते. थोडक्यात डोळा वाचला होता. पटकन डॉक्टरांकडे नेले. त्याचा एक हात आणि एक पाय फॅक्चर झाला होता. या सगळ्यामुळे झंपू चांगलाच घाबरुन गेला होता. तो रडत माफी मागू लागला.
“गोलू तू किती बजावून सांगितले होते तरी मी ऐकले नाही म्हणूनच मला अशी शिक्षा झाली. माझं चुकलं खरच चुकलं..”
गोलूला थोडा रागवून म्हणाला, “झंपू, अरे सायकल ही जरी वस्तू असली ना तरी तिची मित्राप्रमाणे काळजी घ्यायला हवी. वेळोवेळी तिची दुरुस्ती करायला हवी. शिवाय चालवतानाही नीट रस्त्यावरुन चालवायला हवी. ऊन, पाऊस यापासून जपून ठेवायला हवी. हे सगळे केले तरच ती नीट राहून आपली काळजी घेईल. हो की नाही? तू नीट चालवायचे वचन देणार असशील तर मी लवकरच तुझ्यासाठी नवीन सायकल बनवेल... नाहीतर मात्र आता तुला सायकल मिळणार नाही.”
“मी यापुढे असे कध्धी कध्धी करणार नाही. सायकलची नीट काळजी घेईन. जपून चालवेन.” झंपूने वचन दिले.
___________________________________
गोष्टीचे वाचन.....
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome